Feb 28, 2024
प्रेम

हवास मज तू!भाग -५५

Read Later
हवास मज तू!भाग -५५
हवास मज तू!
भाग -५५

मागील भागात :-
आत्या मयंक आणि मनिषाच्या लग्नाऐवजी ती घर स्वतःच्या नावावर करून मागते. तिच्या विचित्र मागणीने सर्वांना आश्चर्य वाटते.

आता पुढे.

"तुझा मयंक काय, या शश्यालाही मी माझी पोरगी देणार नाही. पण फक्त एका अटीवर.."


"कसली अट?"

"ही खोली तू माझ्या नावावर करून द्यायची." ती तोऱ्यात म्हणाली.


"आक्का, अगं काय बोलते आहेस? हे कसे शक्य आहे?"


"का शक्य नाही? ही जागा घेताना आईने तिचा दागिना मोडायला तुला दिला होता हे मला माहिती आहे. तुला दिला नसता तर तेवढं सोनं माझ्याकडे जमा असतं. मला तुझ्यापुढे हात पसरायची गरज भासली नसती." तिच्या बोलण्याचे स्पष्टीकरण देत ती म्हणाली.


"वन्स, अहो.."

"ललिता, तू काही बोलू नकोस. स्वयंपाक झाला असेल तर जेवणाची पानं घे. मी हातपाय धुवून आलोच."

ललिताला काही बोलण्यापासून रोखत ते आत गेले. त्यांच्या बोलण्याचा स्वर कमालीचा थंड झाला होता. आपली बहीण इतकी स्वार्थी असेल याची त्यांनी कधी कल्पना केली नव्हती. आजचे तिचे रूप बघून त्यांचे शब्द जणू मंदावले होते.


इच्छा मेली असतानाही सर्वांनी कसेबसे पोटात दोन दोन घास ढकलून हातावर पाणी सोडले. आत्या मात्र काही झालेच नाही असे समजून जेवत राहिली.


"बाबा, माझ्यामुळे हे सगळे घडत आहे ना? मला माफ करा. माझ्यावर ओरडा पण असे गप्प गप्प राहू नका." शांतपणे निजलेल्या वडिलांचा हात हातात घेत मयंक म्हणाला.


"ओरडून, चिडून काही झाले असते तर आक्कीवरच चिडलो नसतो का रे? जेव्हा चिडण्याने, रागाने प्रश्न सुटत नसतील तेव्हा शांतचित्त राहिलेले केव्हाही बरे. त्याने प्रश्न सुटणार नाहीत पण किमान तेवढा त्रास तरी होत नाही." ते तसेच शांतपणे उत्तरले.


"तुम्ही म्हणाल तर मी यापुढे लग्नाचा विषय काढणारच नाही." त्याच्या डोळ्यात पाणी होते.

"वेडेपणा करू नकोस. तुला त्या मुलीशी लग्न करायचे आहे ना? खुशाल कर. आक्कीच्या बोलण्याचा विचार करू नकोस आणि आपल्या या घराचा विचार करून मनीशी लग्न करण्याचे तर अजिबात ठरवू नकोस

तू या घरावरच्या प्रेमापोटी काही वेडंवाकडं पाऊल उचलशील तरी आक्काचा लोभ कमी होणार नाही. उलट तिचा मोह वाढतच जाईल. तेव्हा तुझे मन जे म्हणतेय ते कर."

"बाबा, माझ्यामुळे तुम्ही दुखावला आहात ना?"

"छे रे. ज्या बहिणीवर इतकी माया केली, आजवर तिचा प्रत्येक शब्द झेलला, ती अशी वागावी याची खंत वाटतेय, बाकी काही नाही. एकाच आईच्या उदरातून जन्म घेऊनही आम्हा दोघात इतकी तफावत कशी याचे वाईट वाटतेय.

शशी आणि तू तरी एकमेकांची साथ कधी सोडू नका. शशी थोडा सनकी आहे, पण त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मोठेपणाने त्याच्यावर माया कर. चांगल्या वाईट काळात एकमेकांना साथ द्या."

"बाबा, असे का बोलताय?"


"काही नाही रे. या क्षणी मनात येतंय ते बोलतोय. आणखी एक, जर तुमचा लग्नाचा विचार पक्का असेल तर आठवड्याभरात उरकून टाका. ललिताची नजर पारखी आहे. तिला शैली सून म्हणून पसंत आहे म्हणजे त्या पोरीत नक्कीच काहीतरी आहे.

फक्त तिला सांग, म्हणावं बाई आपण लग्न करतोय पण तुला इतक्यात डोक्यावर स्वतःच्या हक्काचे छप्पर देऊ शकणार नाही." त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले होते.


"बाबा, तुम्ही शांतपणे निजा. आपण यावर नंतर बोलूया." आत्याच्या बोलण्याने बाबा किती खोलवर दुखावले गेलेत याची त्याला कल्पना आली होती.

******

"मग आजोबा म्हणाले तसे आठवड्याभरात लग्न झाले सुद्धा?" शौर्याने भूतकाळात हरवलेल्या शशांकला प्रश्न केला.


"हो. आत्याने घरावर हक्क ठोकला आणि त्यांना आपल्याच घरात परकेपणाची भावना निर्माण झाली. दुसऱ्याच दिवशी दादासह आम्ही सर्व शैलीच्या खोलीवर आलो.

येताना बाबांनी एक नारळ आणि एक थोडी भारीतील साडी घेतली होती. त्यांनी तिच्या हातात नारळ आणि साडी देत आठवड्याभरात लग्न करायची इच्छा व्यक्त केली."

"आणि मम्मा तयार झाली?"

"बाबांचा प्रस्ताव ऐकून शैली काहीशी गोंधळली होती. कदाचित इतर मुलींसारखे तिचेही लग्नाबद्दल वेगळे विचार असावेत पण बाबांच्या डोळ्यातील अर्जव तिला नाही म्हणू देऊ शकले नाही. उलट तिनेच बाबांना आश्वस्त केले.." सांगताना तो परत भूतकाळात गेला.


".. बाबा, काळजी करू नका. अहो, आपले घर तर केवळ एका खोलीचे होते. आम्ही तिघे मिळून तुमच्यासाठी असा महाल उभारू की आत्याच काय रस्त्यावरून जाणारा प्रत्येकजण त्या बंगल्यासमोर दोन क्षण का होईना पण थांबून नजर रोखून पाहत राहील.

बस, आम्हाला काही वर्ष द्या. आमची मेहनत लवकरच हे स्वप्न साकार करेल." किती प्रेमाने ती त्यांच्याशी बोलत होती.

तिच्या डोळ्यात त्यांना एक आपलेपणाची भावना स्पष्टपणे दिसून येत होती, जी त्यांना त्यांच्या लाडक्या मनीच्या डोळ्यात कधीच जाणवली नाही. आज त्यांनी शैलीला स्विकारून योग्य निर्णय घेतला याची जाणीव झाली.

शैलीने शब्द दिल्याप्रमाणे काही वर्षातच 'शौर्या व्हिला' मोठ्या दिमाखात उभा राहिला, पण हे वैभव बघायला ते मात्र येऊ शकले नाही. त्या आधीच लांबच्या प्रवासाला ते निघून गेले होते, जिथून परत येणे केवळ अशक्य होते.


एका मंदिरात घरच्या चार मंडळीच्या साक्षीने मयंक आणि शैलीचा विवाह पार पडला. तिच्याकडून येणारे कोणी नव्हतेच. मयंकच्या घरची मंडळी हीच तिची आता मायेची माणसं झाली होती.

नाही म्हणायला शेखर यायचा पण पूर्वी ज्या मोकळेपणाने तो बोलायचा तो मोकळेपणा त्याच्या वागण्यातून कमी झाला होता.

पंधरा एक दिवसात बाबांनी घराची कागदपत्रे आक्काच्या हवाली केली. तिनेही ती हिसकावून आपल्या ताब्यात घेतली.


"मला वाटलं त्या पोरीच्या नादात दिलेलं वचन मोडतोस की काय? पण विसरला नाहीस हे बरे झाले." तिच्या बोलण्यातील उपरोध त्यांना व्यवस्थित जाणवत होता.


"आक्का, सुरुवातीला मी तिच्या विरोधात होतो कारण तुझ्यावरच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी माझ्या डोळ्यावर मी बांधली होती. ती पट्टी सुटली आणि तुझा खरा चेहरा मला दिसला. त्याबरोबरच शैलीच्या डोळ्यातील सच्चेपणाही मला कळला.

तुझ्या नादी लागून मनीला मी सून करून घेतली असती तर घरासोबत घराचे वासेही उलटे फिरले असते. ही या घराची कागदपत्रे मी तुझ्या स्वाधीन करतोय. आता यापुढे तुझा माझा कुठला ही संबंध उरला नाही." एवढे बोलून त्यांनी तिथून पाय काढून घेतला.

कागदोपत्री घरावरचे आपले नाव वाचून तिच्या चेहऱ्यावर अतिव आनंदाचे भाव पसरले. इकडे घरून निघालेले शशांकच्या वडिलांनी डोळ्याला रुमाल लावला.

हातून गेलेले स्वतःचे घर, या वयात सून आणि पोराच्या तुटपुंज्या पगारावर उभा असलेला पाच लोकांचा संसार.. त्यांना स्वतःबद्दल अपराधीपणाची भावना मनात घर करायला लागली होती. आणि तशातच पंधरा दिवसांनी एक बातमी कानावर आली.


शेखर शशीच्या कानाशी कुजबुजत होता.

"..काहीही सांगू नकोस." शशांक जरा मोठ्याने म्हणाला.


"अरे खरंच. रजनी पळून गेलीय ही एकदम सोळा आणे खरी गोष्ट आहे."


"शेखर, तोंड सांभाळून बोल." शशांक काही बोलण्याआधी बाबा गरजले.


"काका, अहो मी खरं तेच सांगतोय. वाटल्यास तुम्ही स्वतः खात्री करून घ्या. शेखर त्याच्या बोलण्यावर ठाम होता.

काही झाले तरी आक्का त्यांची बहीण होती आणि रजनी तिची लेक. आक्का कशीही वागली तरी तिच्याबद्दल त्यांच्या मनात कुठेतरी ओलावा होता.

खऱ्या खोट्याची शहानिशा करायची. म्हणून शशांकला सोबतीला घेऊन ते जुन्या घरी आले. घराचा रंग बदलला होता.

'आम्ही इथून गेल्याबरोबर आक्कीने सगळ्या आठवणी नव्या रंगाने पुसून टाकल्या. जणू काही ती याचीच वाट बघत होती.' विचाराने त्यांच्या ओठावर खिन्न हसू आले.


"शशांक आक्काला हाक दे. मी आत येणार नाही. बाहेरच काय ते बोलू." बाबा त्याला म्हणाले. त्यांचा चेहरा उगाचच मलुल झालेला त्याला वाटला.

"आत्याऽऽ, मनी.." त्याने दारावर थाप मारली.


"कोण हवंय?" दारावरच्या थापेने एका पुरुषाने दार उघडले.


"आपण कोण?" अनोळखी पुरुषाला दारात बघून बाबा पुढे सरसावले.


"मी कोण म्हणजे? मी या घराचा मालक आहे. तुम्हाला कोण हवे आहे?" त्याने वैतागून विचारले.


"मालक म्हणे. अरे या घराचा मी मालक आहे. आमच्या आक्कीला हे घर मी बक्षीसपत्र म्हणून दिले आहे. आहे कुठे ती?" बाबांचा आवाज करडा झाला होता.


आक्का कुठे गेली असेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
********

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//