Mar 03, 2024
प्रेम

हवास मज तू! भाग -५४

Read Later
हवास मज तू! भाग -५४
हवास मज तू!
भाग -५४

मागील भागात :-
मयंक शैलीला भेटायला ऑफिसमधून परस्पर तिच्या रूमवर जातो. त्याला बघून ती गोंधळते. तो तिला त्याच्या प्रेमाची कबुली देतो.

आता पुढे.

त्याच्या अनपेक्षित प्रश्नाने तिची भंबेरी उडाली, पण तसे न दाखवता तिनेही त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचे ठरवले.


"जर तुला असे वाटते की शशीने मला काही सांगितले असेल तर मलाही असे वाटते की त्याने तुलाही काही सांगितले असावे." ती मिश्किलपणे उत्तरली.


"त्याच्याकडून मला कळलेय पण मला तुझ्या तोंडून ऐकायचे आहे."


"का? मी सांगितल्यावर सत्य बदलणार आहे का?" त्याची फिरकी घेत ती.


"शैली, शब्दांचा खेळ नको ना गं. घरी सगळा सावळागोंधळ सुरु आहे त्यात मी सांगून टाकलंय की मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे.

भावनेच्या आवेगात मी बोलून गेलो खरा. पण जिच्याशी लग्न करायचे म्हणतोय तिला माझ्याशी लग्न करायचे आहे की नाही हे तिच्याकडून जाणून घेणे आवश्यक आहे ना?" बोलताना त्याच्या डोळ्यासमोर कालचा प्रसंग येत होता.


"म्हणजे तू मला इंडायरेक्टली प्रपोज करतो आहेस?" गालात हसत ती.


"नाही गं. डायरेक्टली विचारतो आहे, सांग ना मी आवडतो का तुला? माझ्याशी लग्न करशील? तुझ्या प्रगतीआड मी कधीच येणार नाही. शशी म्हणतो तसे तुझ्यातल्या उमलणाऱ्या फुलला मी कधी कोमेजू देणार नाही.

तुझी सावली बनून तुझ्यामागे वावरण्यापेक्षा तुझा हात हातात घेऊन सोबतीने चालायला मला आवडेल. तुला माझी साथ द्यायला आवडेल का?" तिच्या डोळ्यात बघत मयंक तिला विचारत होता.


त्या डोळ्यातील प्रामाणिकपणा थेट तिच्या काळजात जाऊन भिडला. त्याच्याजवळ सरकत तिने अलवारपणे त्याचे हात हातात घेतले.


"मयंक, काल नकळत धक्का लागला आणि पडण्यापासून तू मला सावरलेस त्या क्षणीच मी तुझ्यावर भाळले. मला थंडी बाधू नये म्हणून तुझ्या कपातील अर्धा चहा मला दिला, त्या क्षणी माझ्याकडून आपल्या प्रेमाचे नाते घट्ट झाले. रात्री माझी बाजू घेऊन तुझ्या घरच्यांशी तू भांडलास हे शशीकडून कळले त्याच क्षणी मी तुला मनाने वरले.

तुला जसा माझा हात पकडून सोबत चालायचे आहे ना, तसेच मलाही तुझे हात घट्ट पकडून तुझ्या सोबत चालायचे आहे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. हा घट्ट पकडलेला हात तू कधी सोडणार तर नाहीस ना?"
आपल्या हाताची पकड घट्ट करत ती म्हणाली.


"शैली, थँक यू सो मच. तुझा होकार ऐकून मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. आय लव्ह यू यार." मयंकने तिला आवेगाने मिठी मारली.


"आय लव्ह यू टू." त्याच्या मिठीत विरघळत ती म्हणाली.


"शैली, घरात खूप प्रॉब्लेम्स सुरु झालेत ग. आपल्या लग्नामुळे ते आणखी वाढतील. मनीषाला वाटतेय की तिचे माझ्यावर प्रेम आहे पण मला वाटतं ते केवळ आकर्षण असावं. प्रेमाची परिभाषा तिला अजून नाही कळली. पण तरीही आपल्या लग्नाने ती दुखावेल हे नक्की.

आणि आत्या? तिचं तर वेगळंच चाललंय. तिच्या दोनपैकी एक तरी मुलगी माझ्या गळ्यात बांधायला ती आतूर झालीय.

बाबा तर तिच्या निर्णयात केवळ आपली मान डोलावत आहेत. अशा सगळ्या अडचणीत तुला माझ्यासोबत राहणे जमेल ना?" तिला मिठीतून वेगळी करत तो म्हणाला.


"मयंक, किती रे घाबरतोस? तुझ्या कुटुंबात मी आधीपासूनच रूळली आहे. मी मॅनेज करेन रे."


"तसे नव्हे गं. आतापर्यंत तू केवळ शशीची मैत्रीण होतीस. माझी बायको म्हणून घरात येशील तेव्हा सगळी नाती नव्याने जुळतील. तेही अशा लोकांशी. त्याची भीती वाटते. तू मला हवी आहेस. तुला मला गमवायचे नाहीये गं." त्याच्या डोळ्यात पाणी आले.


"किती हळवा आहेस रे तू? मला काही होणार नाही. ऐक, तुझी कशी का असेना, किमान फॅमिली तरी आहे. मी तर माझ्या मामाकडून पळून आलेय म्हटलेस तरी चालेल. त्यानंतर तिथे कधी गेले नाही.

मयंक, मला जीव लावणाऱ्यांना मीही प्रेम देईन पण जर का उगाच वाट्याला गेले तर सहन करणार नाही, हेही तेवढेच खरे आहे."


"हम्म, आता मला जरा रिलॅक्स झाल्यासारखं वाटतेय. ऑफिसचा पहिला दिवस होता आणि अख्खा दिवस तुझा आणि घरच्यांचा विचार करण्यात गेला. इथे आलो ते एकाअर्थी बरंच झालं. आता मी निघतो." तो उठत म्हणाला.


"थांब ना. पहिल्यांदा आलास तर किमान चहा तरी घेऊन जा." ती आग्रह करत म्हणाली.

तिचा आग्रह त्याला मोडता आला नाही. शेवटी चहा घेऊन तो निघाला. घराकडच्या नाक्यावर शशांकने त्याला गाठले.


"माझ्या मैत्रिणीकडे बराच वेळ थांबलास रे. आता ऑफिसचा पहिला दिवस कसा होता हे विचारू? की शैलीकडली पहिली संध्याकाळ कशी गेली हे विचारू?" तो मिश्किलपणे म्हणाला.


"म्हणजे तू माझ्यावर पाळत ठेवून होतास तर?"


"पाळत कशाला ठेवायला लागते? तू तिचा पत्ता माझ्याकडूनच घेतला होता ना? त्यावरून अंदाज लावला." तो हसून म्हणाला.


"शश्या, तुझे डोके खूप चालायला लागले रे." त्याच्या पाठीवर थाप देत दोघांनी घरात प्रवेश केला.


"मयंक, चहा.."

फ्रेश होऊन बाहेर आल्याबरोबर मनिषा त्याच्यासाठी चहा घेऊन आली.

"मनी मला चहा नकोय गं."


"का नकोय? तू ऑफिसमधून थकूनभागून आल्यावर तीच तुला चहा देणार, हवं नको बघणार ना? त्याची आता सवय करून घे. पुढे तुमचं लग्न झाल्यावर.." आत्या बाहेर येत म्हणाली.


"आत्या तू पुन्हा कालची टेप सुरु करू नकोस गं. माझे डोके दुखायला लागेल." तिला मध्येच थांबवत मयंक म्हणाला.


"अरे? मी काय चुकीचे बोलले? दादा आता तूच सांग, याची काळजी आपली मनी नाहीतर कोण घेणार?" दारातून आत येणाऱ्या बाबांकडे बघून तिने मुद्दाम विचारले.


"आक्का, रजनी कुठेय?" तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी प्रश्न केला.


"घरातच तर आहे. तिन्ही सांजेची ती कुठे जाणार?" तिनेच उलट प्रश्न केला.

"रजनी, बाहेर ये." त्यांच्या स्वरात एक धार होती.


"काल रात्री कुठे होतीस?" त्यांनी जरबेने विचारले.


"मैत्रिणीकडे." ती खाली पाहत उत्तरली.


"कुठली मैत्रीण?"


"अं? ते.. राधा. राधाकडे मी होते." ती बोलली आणि पुढच्याच क्षणी तिच्या गालावर बाबांची पाच बोटे उमटली.


"मुलीचे नाव सांगून खोटे बोलतेस? रात्रभर एका मुलासोबत बाहेर मजा मारायची आणि घरी मैत्रिणीचे नाव सांगायचे? सकाळी माझ्या डोळ्याने मी तुला एका मुलासोबत पाहिले होते. तेव्हाच जाब विचारणार होतो पण बाहेरच्या जगात तमाशा नको म्हणून गप्प बसलो." त्यांच्या हाताच्या शिरा फुगल्या होत्या.


"दादा, माझ्या तरण्याताठ्या मुलींवर हात उचललेला मी सहन करणार नाही.तुझा लहान लेक मैत्रिणीला घरी आणतो, मोठा तिच्याशी लग्न करायचा विचार करतो, ते तुला पटते आणि माझ्या लेकीवर हात उगारतोस.

मला आता सगळं लक्षात यायला लागलंय. तुला एवढं मोठं असं काय मागितलं होतं रे? किमान एका पोरीला तू आपली सून बनवावेस हीच साधी इच्छा होती. तर तू माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोळे उडवतोस?" ती स्फून्दत म्हणाली.

"आक्का..?"


"दादा, आता एक शब्दही बोलू नकोस. जिथे माझी, माझ्या मुलींची कदर नाही तिथे मी एक क्षणभरदेखील थांबणार नाही. चला गं पोरींनो." मनिषा आणि रजनीचे हात पकडून ती म्हणाली.


"वन्स, काय चाललंय तुमचं?" ललिता पुढे आली.


"तू आम्हा बहीण भावंडात पडू नकोस. तसेही तुलाही मी इथे नकोच आहे हे दिसतेवच आहे. आता स्वतःचा आणखी पाणउतारा मी नाही करून घेणार."


"आक्का, अशी काय वागतेस? आजवर मी तुझं सर्वच ऐकत आलो आहे. मी तुला घर सोडून जा असे म्हणत नाहीये. फक्त पोरीवर आवर घाल हे सांगतोय. मी तुझ्यापुढे हात पसरतोय."


"दादा, तू हात पसरू नकोस. फक्त मी मागेन ते दे." त्याचे हात हातात घेत ती म्हणाली.


"मयंक नाही म्हणतोय तर मनी आणि त्याच्या लग्नाचा नाद सोड ना गं." ते बहिणीला म्हणाले.


"सोडला." ती छद्मी हसून म्हणाली.

"तुझा मयंक काय, या शश्यालाही मी माझी पोरगी देणार नाही. पण फक्त एका अटीवर.."


"कसली अट?"

"ही खोली तू माझ्या नावावर करून द्यायची." ती तोऱ्यात म्हणाली.


आक्काची अट दादा मान्य करतील का? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//