हवास मज तू!भाग -५३

खरंच का प्रेम फसवे असते? वाचा एका प्रेमाची अनोखी कथा.
हवास मज तू!
भाग -५३

मागील भागात :-
मयंकला नोकरी लागली हे कळताच आत्या मनीषाचे लग्न मयंकशी करण्याचा घाट घालते.

आता पुढे.

"मयंक, मनीषा चांगली मुलगी आहे. आपल्या घरची आहे. इथल्या परिस्थितीची तिला जाणीव आहे. तिच्याशी लग्न करशील तर सुखाने संसार करशील." बाबा त्याला समजावत म्हणाले.


"बाबा, मनिषा चांगली आहे, हे ठीक आहे पण मुळात तो प्रश्नच नाही. माझ्या मनात तिच्याबद्दल ती भावना कधीच आली नाही." तो आपले म्हणणे पुढे रेटत म्हणाला.


"भावनेचे काय घेऊन बसलास? सहवासाने प्रेम फुलतं. मनीच्या डोळ्यात तुझ्याविषयी प्रेम आहे. नात्यात बांधला गेलास की तुलाही तिच्यावर प्रेम होईल."

"बाबा.."


"मयंक, माझ्या बोलण्याला तुझ्या लेखी काहीच किंमत नाहीये का? एकदा विचार तर करून बघ." त्याला थांबवत ते मध्ये म्हणाले.


"बाबा, यापूर्वी तुम्ही असे म्हणाला असतात तर कदाचित मी विचार केलाही असता. पण आज आणि यापुढे मी हा विचार करूच शकत नाही.

तुम्ही म्हणता तसे संसार म्हणजे व्यवहार नव्हे. इथे एकाच्या प्रेमापेक्षा दोघांची मनं जुळणं मला महत्त्वाची वाटतात आणि याबाबतीत मनीशी माझे मन जुळणे शक्य नाही. तेव्हा मला माफ करा."


बाबाशी बोलताना त्याने आत्या आणि मनीषाकडे एक नजर टाकली. आत्याच्या डोळ्यात राग उफाळला होता आणि मनीषाच्या डोळ्यात आसवांची गर्दी झाली होती.


"मनी, तू डोक्यातून माझा विचार काढून टाक अगं. माझे एका मुलीवर खूप प्रेम आहे आणि तिचेही माझ्यावर प्रेम आहे. आम्ही एकमेकांना कसली कमीटमेंट केली नसली तरी पुढचं आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला आहे.

तू सुंदर आहेस, शहाणी आहेस. माझ्यापेक्षा आणखी चांगला मुलगा तुझ्या नशिबात असेल. माझा नाद सोडून दे." तिच्या डोळ्यातील अश्रू बघत तो म्हणाला.


"ती मुलगी कोण आहे हे मला कळेल?" आलेला हुंदका थोपवत मनीषाने त्याला विचारले.

तिच्या प्रश्नासरशी मयंकने शशांककडे पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेतला.

"खरं तर या विषयावर इतक्या लवकर चर्चा होईल असे मला वाटले नव्हते. पण आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. तू तिला ओळखतेस. तूच काय घरातील सर्वच तिला ओळखतात.."


"आपली रज्जू? चालेल ना. मनी नाही तर रज्जू सोबत लग्न केलेस तर तेही मला चालेल. दोघी बहिणीपैकी एकीला तरी तू निवडलेस आणि आम्हाला कानोकान खबर देखील लागू दिली नाही. छुपेरुस्तम आहात हं दोघं." त्याचे बोलणे पुरे व्हायच्या आधीच आत्याने आनंदाने आपला कौल दिला.

"आत्या, अगं प्रत्येकवेळी तुला मध्ये बोलायलाच हवे का? ती मुलगी म्हणजे रजनी नाहीये.

आई, मला जी मुलगी आवडते ती शैली आहे." आत्याकडे रागाने बघून त्याने ललिताकडे पाहिले.


"कोण म्हणालास?" शैलीचे नाव ऐकताच ललिताने आश्चर्याने परत प्रश्न केला.


"शैली. शशीची मैत्रीण. जी दुपारी आपल्या घरी आली होती." तो स्पष्टपणे म्हणाला.


"बघितलेस दादा? तरी मी म्हणत होते की ती पोरगी चांगली नाहीय. मुंबईसारख्या शहरात एकटीने राहणारी, मुलांच्या संगतीने फिरणारी पोरगी आहे ही. वाहिनीला तिचा मोठा पुळका. आता पाहिलेस ना तिने कसे मुलाला जाळ्यात ओढले ते." आत्या फणकाऱ्याने म्हणाली.


"वन्स, शैली मुलगी म्हणून खूप चांगली आहे. एकटीने राहते म्हणून ती वाईट चालीची आहे असे होत नाही ना?" नणंदेचे बोलणे ऐकून ललिताला राग आला.


"ती कोण मुलगी, ती तेवढी चांगली आणि माझ्या दोन्ही मुली वाईट, असेच तुला म्हणायचे आहे ना? पोरींना घेऊन तुझ्या दारात आले म्हणून तू काहीही बोलशील. पण लक्षात ठेव, हे माझ्या दादाचे घर आहे म्हणून मी इथे आलेय. नाहीतर पाय देखील ठेवला नसता." तिने डोळ्याला पदर लावला.


"वन्स, तुम्ही कुठला विषय कुठे नेत आहात. मी केवळ त्या मुलीबद्दल बोलत होते."


"आई, हा विषय नकोच आता. मला शैलीशी लग्न करायचव आहे आणि ते फायनल आहे. आता या विषयवरची चर्चा बंद करा." उद्विग्नपणे उठत मयंक गादी अंथरायला लागला.


"विषय नको कसा? माझा शब्द डावलून तू तुझा निर्णय घेत आहेस. त्या मुलीबद्दल मलाही माहिती हवी आहे." कडक शब्दात बाबांचा आवाज कानावर आला.


"ती मुलगी खूप चांगली आहे हो. मयंकला आवडली आहे तर जाऊ द्या ना त्याला पुढे."


"बघितलंस दादा? तुझ्या मुलांना तुझ्या बायकोचीच फुस आहे. नाहीतर कोणती मुलं आपल्या वडिलांशी उलटून बोलतात? त्या मुलीने हिच्या डोळ्यावर पट्टी काय बांधली, ही लगेच तिची बाजू मांडायला लागलीय." आत्याचा सूर वरच्या पट्टीला पोहचला.


"आत्या, आई आणि शैलीबद्दल अपशब्द बोललेले मला खपणार नाही. शैली माझी मैत्रीण आहे. ती कशी आहे हे मला तुझ्यापेक्षा कैक पटीने चांगले ठाऊक आहे. ती चांगली आहे म्हणून आईला तिचे कौतुक आहे आणि दादाचे तिच्यावर प्रेम आहे." इतका वेळ शांत बसलेला शशांक उसळून म्हणाला.


"ती तेवढी चांगली आणि माझी मुलगी वाईट का रे?"


"हो. मनी वाईटच आहे. तिने मुद्दाम दादाचे पत्र आईला न देता लपवून ठेवले. तो इतक्या दिवसांनी आलाय, चांगली बातमी घेऊन आलाय तर त्याचे कौतुक न होता घरात नुसते भांडण सुरु आहे. या सगळ्याला कारणीभूत असलेली मनी वाईटच आहे."


"शशी.."

"थांब आई. हिला हिच्या दोन्ही मुलींची खूप खात्री आहे ना? मग मला बोलूच दे. काय गं आत्या, तुझी दुसरी लेक, लाडकी रज्जू? ती इतका वेळ टळून गेली तरी अजून घरी कशी परतली नाही?" त्याने आत्याला तिरकसपणे विचारले.


"ती तिच्या मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली आहे, आणि कदाचित रात्री तिकडेच थांबेल." आत्या गडबडून म्हणाली.


"कुठली मैत्रीण गं?"


"आता प्रत्येक मुलीचे नाव मी काय पाठ करून ठेवू?" आत्या चिडून म्हणाली.

"मला माहिती आहे कुठली मैत्रीण ते. कालच त्या मैत्रिणीसोबत ती स्त्री रोग तज्ञाकडे जाऊन आलीय. तुला बोलली असेल ना?" तो कुत्सित हसला.

"ती लहान आहे. मुलांच्या हातून कधी चुका होतात. एवढासा तू मला किती ऐकवशील रे?" आत्या रजनीची बाजू सांभाळून घेत म्हणाली.

"शशी, आता पुरे. मयंक झोपलाय. तूही झोप. सकाळी कॉलेज असेल आणि वन्स तुम्ही तरी काय लहान मुलांसारखे भांडत सुटता?

एक लक्षात घ्या कोंबड्याने बांग दिली नाही तरी दिवस उजाडायचा थांबत नाही. तसेच तुमच्या लेकीच्या करामती कितीही झाकल्या तरी जगाला दिसायची थांबणार नाहीत. तेव्हा आपल्या मुलींवर आधी लगाम लावायला शिका आणि नतंर दुसऱ्यांच्या पोरीबद्द्दल बोला. झोपा आता."

ललिता शब्दावर जोर देत म्हणाली तसे काही न बोलता सर्वच झोपायला पांगली.

******

दुसऱ्या दिवशी सायंकाळी दारावर पडलेल्या थापेने शैलीने दार उघडले. अशा अवचित वेळी कोणी येणे तिला अपेक्षित नव्हते. त्यामुळे काहीशा त्रासिक मुद्रेनेच ती बाहेर आली. बाहेर पाहते तर तिथे मयंक उभा होता. त्याला अशी बघून ती काहीशी बावरली.


"तू? आय मिन तुम्ही? म्हणजे नेमकं काय म्हणू मी?" तिचा गोंधळ उडाला होता.


"केवळ मयंक म्हणालीस तरी मला चालेल." तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून त्याने स्मित केले.


"ओह, येस. मयंक. असे कसे अचानक येणे केलेस? आणि माझा इथला पत्ता तुला कसा ठाऊक आहे?"


"सगळ्या प्रश्नांची उत्तरं दारातच हवीत की आत येऊन देऊ?" तो.


"अं? हो.. ये ना, आत ये." त्याला आत घेत ती म्हणाली.


"चहा घेणार?"

"नको. तू बैस ना. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." तिच्याकडे बघून तो म्हणाला तसे ती अवघडून त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली.


"शैली, मला इतर मुलांसारखं आडून आडून बोलता येत नाही. जे आहे ते स्पष्ट बोलायला मला आवडते." सुरुवात करत तो बोलू लागला.


"चांगलं आहे ना."


"शशी, कदाचित तुला बोलला असेल की तू मला आवडतेस. खरंच तुला काल पहिल्यांदा पाहिले आणि मी तुझ्या प्रेमातच पडलो. मला हे जाणून घ्यायचे आहे की मी तुला आवडतो का?"

त्याच्या अनपेक्षित प्रश्नाने तिची भंबेरी उडाली, पण तसे दाखवता तिनेही त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचे ठरवले.


"जर तुला असे वाटते की शशीने मला काही सांगितले असेल तर मलाही असे वाटते की त्याने तुलाही काही सांगितले असावे." ती मिश्किलपणे उत्तरली.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार
******

🎭 Series Post

View all