Feb 27, 2024
प्रेम

हवास मज तू! भाग -५२

Read Later
हवास मज तू! भाग -५२
हवास मज तू!
भाग-५२

मागील भागात :-

शैली आणि मयंकची पहिली भेट आपण पाहिली. एकमेकांशी नजरानजर होताच दोघे प्रेमात पडले आणि स्वतःशी कबुलीही दिली होती.

आता पुढे.


"हो. मला वाटलं त्याने ते मला पाठवले आहे." ती नाकाचा शेंडा उडवत म्हणाली.


"काय गं? आईने मला इतकं धारेवर धरलं आणि तू आत्ता बोलते आहेस?" कधी कुणावर न चिडणारा मयंक चिडला होता.


"अल्लड आहे रे ती. तिचं वागणं काय मनाला लावून घेतोस?" मनीषाची बाजू घ्यायला आत्या पुढे सरसावली आणि विषय तिथेच थांबला.


पण आत्या म्हणाली तसे खरंच का विषय थांबला होता? तसे नव्हतेच. आत्ता कुठे विषय सुरु झाला होता."दादा, तुझे काही बिनसले आहे का?" रात्री जेवणानंतर शतपावली करायला म्हणून शशांक आणि मयंक बाहेर पडले होते.

शशांकच्या प्रश्नावर मयंकने त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहिले.

"नाही म्हणजे एरवी कोणावर तू चिडत नाहीस आणि आज चक्क मनीवर ओरडलास म्हणून विचारतोय." शशांकने विषय पुढे रेटला.


"आईस्क्रीम खाणार?"


"दादा? हे माझ्या प्रश्नाचे उत्तर झाले?"


"खाणार आहेस का बोल." मयंक निर्वीकार चेहऱ्याने म्हणाला.


"फुकटात मिळत असेल तर कोण सोडणार? चल." त्याच्यासोबत आईस्क्रीम पार्लरकडे जात तो म्हणाला.


"आता सांग, काय बिनसलंय?" आईस्क्रीमचा दुसरा कप हातात घेत त्याने विचारले.


"एवढ्या पावसात भिजत घरी आलो आणि आईने काय केले? तुझ्या त्या मैत्रिणीचे प्रेमाने केस पुसून दिले आणि मला साधा टॉवेल पण दिला नाही."


"म्हणून चिडला आहेस?" हसू दाबत तो.


"छे रे. चिडलो कुठे? उलट प्रेमात पडलोय. ती लाल साडी, ते उडणारे केस, काळेभोर डोळे.."

"दादा..?" तो या वेळी असे काही बोलले हे शशांकला अपेक्षित नव्हते.


"शश्या, तुझी मैत्रीण मला जाम आवडली रे. नुसती आवडलीच नाही तर मी तिच्या प्रेमात पडलोय. मघाशी मनी तिच्यासोबत जे वागली ते मला अजिबात आवडले नव्हते म्हणून मी तिच्यावर चिडलो." तो मनातले बोलून गेला.


"आयला, अजून कुठेच काही नाही आणि एकदम पजेसिव्ह झालास होय. शोभता बाबा तुम्ही एकमेकांना. अगदी मेड फॉर इच अदर. एकमेकांना न सांगता दोघांनीही आधी मलाच सांगितलं."


"शश्या, ती तुझ्याशी माझ्याबद्दल बोलली? काय बोलली सांग ना?" मयंकची उत्सुकता वाढली.


"दादाश्री, आजपासून मला तुम्ही शशी म्हणायचं. कारण शैली मला शशीच म्हणते. कळलं ना?"


"हो बाबा. तू म्हणशील तसं. आता तरी ती काय बोलली ते सांगशील का?"


"ती काय म्हणाली त्यापेक्षा मी काय सांगतोय ते नीट ऐक. तिच्या साडीतल्या गोंडस रूपावर भाळून तू प्रेमात पडला असशील तर ती चूक करू नकोस. तुला वाटते तशी साधीभोळी अशी ती अजिबात नाहीये. उलट एकदम रफ अँड टफ अशी मुलगी आहे.

ती खूप महत्वाकांक्षी आहे. तिला स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं आहे. या गोष्टीला तू तयार असशील तरच पुढे जा. तुझ्या सानिध्यात आल्यावर तिची स्वप्न जर चूरगाळली जाणार असतील तर मात्र तिच्या फंदात पडू नकोस.

शैली म्हणजे नुकतेच उमलू बघणारे फूल आहे रे. आपल्या घरी आल्यानंतर ते फूल पूर्ण फुलण्याआधीच कोमेजायला नको." शशांक गंभीरपणे म्हणाला.


"मी तुला तसला मुलगा वाटतो?"


"नाही रे. पण मी तुला तिची कल्पना देत आहे. तू माझा भाऊ असलास तरी ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिच्याशी काही चुकीचे घडले तर मला सहन होणार नाही."


"शशी, मी तुला वचन देतो की मी शैलीच्या प्रगतीआड कधीच येणार नाही. तिला जे करायचे असेल त्याला माझा पूर्ण पाठींबा असेल. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी तिची सोबत करेन. आय प्रॉमिस. आतातरी खूष ना?" मयंक प्रांजळपणे म्हणाला.

"आय लव्ह यू रे दादुड्या. तुझ्याशिवाय दुसरा कोणीच तिचा लाईफ पार्टनर होवू शकत नाही. शैली खंबीर मुलगी आहे. तिच्यासाठी तिला जपणारा, एक संवेदनाशील मन असलेला मुलगा हवा आणि तो तूच आहेस यात तिळमात्र शंका नाही.

काँग्रॅच्यूलेशन्स माय डिअर ब्रदर." शशांकने त्याला प्रेमाने एक आलिंगण दिले.


"शशी, तुला आणखी एक गुड न्यूज सांगायची आहे." आलिंगणाचा भर ओसरल्यावर मयंक म्हणाला.


लग्नाची तारीख सुद्धा काढून झाली की काय?" शशांकने खट्याळपणे विचारले.


"ती निघाली की तुला कळेलच त्यापूर्वी हे बघ." त्याच्या हातात एक कागद ठेवून तो मंद हसला.


"वॉव! दादा अभिनंदन रे. ही तर चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑर्डर आहे. किती मोठी गुडन्युज आहे रे ही."


"हेच कारण होतं म्हणून मी आलोय. उद्यापासून ऑफिसला जॉईन व्हायचे आहे. शश्या, आपल्या घराचा सर्व भार बाबा एकट्यानेच उचलतात रे. त्यांचा भार कमी करण्याची आता आपलीही जबाबदारी आहे."


"दादा, खूप मोठा झालास रे. तुझे विचारही खूप मोठे झालेत. आय रिअली प्राऊड ऑफ यू." बोलताना शशांकला भरून आले.


"मी तुझ्यापेक्षा मोठाच आहे. आता घरी चल. आई वाट बघत असेल. बाबांनाही ही आनंदाची बातमी सांगायची आहे."


"हो जाऊया. पण त्याआधी मला परत आईस्क्रीम हवे आहे."


"आत्ताच दोन खाल्लेस की. आणखी किती खाणार?"


"ते तुझ्या आणि शैलीच्या प्रेमाचे आईस्क्रीम होते. हे तुझ्या नोकरीच्या निमित्ताचे. माझ्याकडून आपल्या सर्वांना फॅमिली पॅक." शशांक पैसे देत म्हणाला.


"शश्या, तूही मोठा झालास की रे." मयंक हळवे होत म्हणाला.


"शेवटी मी तुझाच भाऊ आहे." शशांकने हसत त्याला मिठी मारली.

******

"तो दिवस आमच्या आयुष्यातील एक भन्नाट दिवस होता. दिवसाच्या काही तासात बरेच काही घडले होते.
आजवर केवळ माझी मैत्रीण असणारी शैली माझ्या भावाच्या प्रेमात पडली होती.

त्यांची झालेली पहिली नजरानजर आणि त्यांना शिवणारे प्रेमाचे वारे दोघांची एकाच वेळी गाठ पडली होती. त्याच्या नोकरीचेही पक्के झाले होते. सगळीकडे आनंदीआनंद होता." त्या प्रसंगाची आठवण सांगत शशांक शौर्याला म्हणाला.


"मग काय झाले?" तिने पुढे उत्सुकतेने विचारले.


"मग काय? जब मियाँ बिबी राजी तो क्या करेगा काजी? काही दिवसांनी दोघांनी लग्न केले." त्याने ओठ रुंदावून उत्तर दिले.


"लगेचच?"


"काय करणार? आम्ही आईस्क्रीम घेऊन घरी गेलो. दादाच्या नोकरीचे ऐकून घरी सगळ्यांना फार आनंद झाला. पण हा आनंद जास्त वेळ टिकला नाही."


"का?"

"त्याचे कारण, आमची आत्या." तो विषण्ण हसला.


"आत्या म्हणजे आमच्या आनंदावर विरजण घालून तो कसा नासेल याचीच वाट बघत होती. घरी आईस्क्रीम सोबत नोकरीची बातमी कळल्यावर तिचा चेहरा आईपेक्षाही अधिक आनंदाने फुलला.." बोलताना त्याचे मन परत भूतकाळात गेले.


"..चला, मयंकला नोकरी लागली आणि माझ्या मागचे अर्धे टेंशन पळाले." आईस्क्रीमचा चमचा चाटून स्वच्छ करत आत्या म्हणाली.


"आत्या, तुला गं माझं कसलं टेन्शन होतं?" मयंक.


"तुला नाही कळणार बाबा. पाठीवर दोन तरण्या पोरी असताना त्यांच्या आईची अवस्था तुलाच काय तुझ्या आईलाही कळायची नाही." ललिताला एक टोमणा मारीत ती म्हणाली.


"आत्या, मुद्द्याचं बोल ना."


"अरे तेच सांगतेय. तुझ्या आईला दोन्ही मुलंच. तेव्हा ते बाहेर काय करतात? घरात काय करतात, काहीच फरक पडत नाही. मुलीच्या आईचं तसं नसते रे बाबा. म्हणून मी टेंशनमध्ये असते.

आता तुला चांगली नोकरी मिळतेय त्याच आनंदात तुझे आणि मनीचे लग्न लावून द्यायचे असे मनात आहे."


तिने बॉम्ब टाकला आणि "काय?" म्हणून आश्चर्याने तीन माणसे ओरडली. ती तीन माणसे म्हणजे शशांक, मयंक आणि ललिता.

बाबा मात्र स्तिथप्रज्ञ बसले होते आणि मनी लाजेने खाली नजर करून बसली होती. जे आत्याच्या मनात होते कदाचित तेच या दोघांच्याही मनात असावे.


"आत्या, काय बोलतेस अगं? माझ्या मनात मनीबद्दल असे कोणतेच विचार नाहीत." मयंक ताडकन उभा राहिला.


"नाहीत तर आणावे लागतील. ती पोरगी तुझ्याकडे आस लावून बसलीय. तिच्या मनाचा तरी विचार कर." इतकावेळ गप्प बसलेले बाबा मयंकला खाली बसवत म्हणाले.


मयंक, मनीषा चांगली मुलगी आहे. आपल्या घरची आहे. इथल्या परिस्थितीची तिला जाणीव आहे. तिच्याशी लग्न करशील तर सुखाने संसार करशील." बाबा त्याला समजावत म्हणाले.


"बाबा, मनिषा चांगली आहे, हे ठीक आहे पण मुळात तो प्रश्नच नाही. माझ्या मनात तिच्याबद्दल ती भावना कधीच आली नाही." तो आपले म्हणणे पुढे रेटत म्हणाला.

त्याच्या बोलण्यावर बाबा कसे रिॲक्ट होतील? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार
******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//