Mar 02, 2024
प्रेम

हवास मज तू!भाग -५१

Read Later
हवास मज तू!भाग -५१
हवास मज तू!
भाग -५१

मागील भागात :-
शौर्या शशांकला शेखरबद्दल विचारते. शेखरची माहिती हवी असेल तर आधी शैलीला जाणून घेणे महत्त्वाचे आहे हे उमगून तो तिला शैलीबद्दल सांगायला सुरुवातीला करतो.

आता पुढे.

"ए, हसू नका रे. पहिल्यांदा साडी नेसताना प्रत्येक स्त्रीचा गोंधळ उडतो."

तिची नुसती गुंडाळेललेली साडी बघून ललिता तिघांना म्हणाली आणि शैलीला परत पडद्यामागे नेत पाचच मिनिटात तिला व्यवस्थित आवरून बाहेर घेऊन आली.

शैली आत गेली तेव्हा गुरफूटलेल्या सुरवंटासारखी तिची अवस्था होती आणि ती बाहेर आली तेव्हा सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतर झाले होते.

लाल रंगाची कॉटनची साडी तिला शोभून दिसत होती. साडी साधीच असली तरी त्यात तिचे सौंदर्य खुलून आले होते.

पावसाच्या पाण्याने नितळ झालेला तिचा गव्हाळ चेहरा, टपोरे काळेभोर डोळे, ओल्या केसातून निथळणारे पाण्याचे थेंब! जणू सौंदर्याची एक अलवार परिभाषाच नजरेसमोर उभी आहे असे भासत होते.


"केस बघ कसे ओलेचिंब आहेत. शशी तू टॉवेल दे रे. शैली तू माझ्या समोर बस. मी केस पुसून देते." ललिताने हुकूम सोडला.


"काकू, अहो.."


"बस गं. एकटीच असतेस. असे केस जास्त वेळ ओले राहिले तर सर्दीने त्रास होईल ना? म्हणून." प्रेमाने तिला समोर बसवत ललिता म्हणाली.


"वा गं आई? मी सुद्धा होस्टेलला एकटाच असतो की. माझेही केस ओले आहेत पण तुला माझी काहीच काळजी नाही आणि ही कोण मुलगी तर तिचे केस सुद्धा पुसून देत आहेस?" काहीश्या इर्षेने मयंक तक्रार करत बोलला.


"मग, तू असा न कळवता अचानक आलास तर तुला शिक्षा हवीच ना? आणि ही कोणी नाही रे. शैली नाव आहे हिचं. आपल्या शशी आणि या शेखरची खास मैत्रीण आहे.

आणि शैली हा माझा थोरला मुलगा..मयंक. हा असाच आहे. त्याचे बोलणे मनावर घेऊ नकोस." ललिताने बोलता बोलता दोघांची तोंड ओळख करून दिली.

दोघांनी एकाच वेळी एकमेकांकडे पाहिले.

"हॅलो." त्याच्याशी नजर मिळताच तिच्या ओठांची हालचाल झाली.

त्या आवाजाची किनार तरी किती नाजूक! गुलाबी ओठातून सप्तसुरांचा झंकार उमटतोय असेच काहीसे त्याला वाटले.


हिच्यात नेमकं काय जास्त सुंदर आहे, याचा त्याला मेळ लागेना. हे काळेभोर डोळे, तिच्या मोकळ्या केसांच्या उडणाऱ्या बटा, ते गुलाबी ओठ, त्यावरचं मोहक हसू की त्यातून झंकारलेला सप्तसुरांचा नाद?


तिला प्रत्युत्तर द्यायला शब्द जुळवत असताना मनीषा, त्याच्या आत्याची मुलगी चहा आणि टॉवेल घेऊन आली.


"मामीला तुझी काळजी नसली तरी मला आहे. हे केस पुस आणि चहा घे. तुला थोडी तरतरी वाटेल." कप पुढे करत ती म्हणाली.


"थँक्स मनी. आय रिअली नीड इट. पण एकच कप चहा का आणलास? शैली पण भिजलीय, तिलाही चहा पिल्यावर बरे वाटेल."


"ती तिच्या आनंदासाठी मुद्दाम भिजली. तुझं भिजणं तसं नव्हतं ना? तुला घरी यायचं होतं आणि आगंतूक पणे आलेल्या पावसात तू सापडलास. म्हणून तुझ्यापुरताच चहा केला." मनीषा स्पष्टीकरण देत म्हणाली.


"वेडीच आहेस तू. काहीही लॉजिक लावत असतेस. भिजणं म्हणजे भिजणं असतं." आतून दुसरा कप घेऊन
येत तो म्हणाला.


"शैली, हा तुला चहा." त्याच्या कपातील अर्धा चहा दुसऱ्या कपात ओतून त्याने तिच्यापुढे कप धरला.

तिने एकदा त्याच्याकडे आणि एकदा मनीषाकडे पाहिले.


"अगं तिच्याकडे काय बघतेस? आमची मनी उत्तम चहा करते." मयंक हसून म्हणाला तसे तिने स्मित करून त्याच्या हातून कप घेतला.


"शश्या, दादा जरा अतीच करतोय असे तुला वाटत नाहीये का?" शेखर शशांकच्या कानात कुजबुजला.


"तो एकटाच कुठे? शैली पण त्याला प्रतिसाद देतेय की."


"दोघे प्रेमात पडले असावेत का?"


"पहिल्याच भेटीत?"


"शशी.." दोघांची कुजबुज सुरु असताना कानावर शैलीचा आवाज आला तसे दोघे दचकले.

"अरे, पाऊस थांबलाय. मी निघते. नाक्यापर्यंत येतोस ना?"


"अगं, आता जेवूनच जा ना." ललिताचा हट्ट.


"आत्ता नको हो काकू. पुन्हा कधीतरी. माझी ऑफिसची एक फाईल पूर्ण करायला आणलीय. ते राहून जाईल." नम्रपणे नकार देत ती उठली.


"काकू, साडी नतंर परत केली तर चालेल ना?"


"अगं, नाही केलीस तरी चालेल. तशीही मी अजुनपर्यंत घडी मोडली नव्हती. तर हीच तुला माझ्याकडून भेट म्हणून समज आणि कधीतरी साडी नेसत जा. सुंदर दिसतेस."
ललिता म्हणाली त्यावर त्यावर ती गोड लाजली.


"काय? आज मॅडमचा वेगळाच नूर दिसतोय." नाक्याकडे जाताना शशांक तिला मुद्दाम चिडवत होता.

"काही काय रे?"


"नाहीतर काय? काय तुझं लाजणं, काय ते मुरडणं. साडी नेसल्याबरोबर ती टॉमबॉय शैली आज एकदम गर्लिशपणे वागत आहे." शेखर त्याला दुजोरा देत म्हणाला.

एरवी तिला असे कोणी काही म्हणाले असते तर तिने त्याला चांगले फैलावर घेतले असते. पण शशांक म्हणत होता तसा खरंच तिचा वेगळाच नूर होता. काही न बोलता ती केवळ हसली.


"बापरे आज या शेखरचा गाल न फोडता तू चक्क हसते आहेस? काय गडबड आहे?"


"शशी ही गडबड मी नाही, तर तुझ्या भावाने केली." तो बोलायचा अवकाश की तिने त्याचा हात घट्ट पकडला आणि बोलू लागली.


"तू बघितलंस का? तो माझ्याकडे कसा बघत होता ते?"


"तोच का? तू त्याच्याकडे कशी बघत होतीस हेही आम्ही पाहिले." शेखर म्हणाला.


"तेच तर. आजवर मी एकाही मुलाला अशी पाहिले नव्हते पण तुझा दादा वेगळाच आहे." तिने दोघांकडे पाहून म्हटले.


"वेगळा म्हणजे? त्याला शिंग फुटलीत का?" शेखर.


"शशी, वेगळा म्हणजे नेमके कसे ते मला ठाऊक नाही. पण तुझी वहिनी व्हायला मला आवडेल. तुला हे नाते आवडेल का रे?" भर रस्त्यात त्याचे दोन्ही हात पकडून ती त्याला मविचारत होती.


"अजिबात नाही." तो गंभीर चेहऱ्याने उत्तरला. तसे तिने लहानसा चेहरा करून त्याच्याकडे पाहिले.


"अगं वेडे, म्हणजे दादाची बायको झालीस तरी आपल्यातील मैत्रीचे नाते असेच कायम राहणार असेल तरच माझ्याकडून तुला परवानगी आहे." तो मिश्किल हसला.


"ओह शशी! यू आर माय बेस्ट बेस्ट बेस्ट फ्रेंड." तिने त्याला एक मिठी मारली.

भररस्त्यात तिने मारलेली ती मिठी त्यांच्या मैत्रीचे नाते आणखी घट्ट करणारी मिठी ठरली.


"पुरे. अशी मिठी मारशील तर लोकांना वाटायचे की तू माझीच गर्लफ्रेंड आहेस." तिला बाजूला करत तो हसला.


"वाटू दे रे. जगाला का भ्यायचं? तू मला कायम सोबतीला हवा आहेस, माझा सखा म्हणून. शशी तू मला साथ देशील ना रे?"


"हो गं. हे काय विचारणं झालं?" तो हसला तशी मोकळेपणाने त्याचा निरोप घेऊन ती निघाली.


"मयंक दादामध्ये असे काय आहे रे जे माझ्यात नाही? शैलीला मी सोडून तो बरा आवडला?" ती गेल्यावर शेखर शशांकला म्हणाला.

याचे उत्तर माझ्याकडे नाही रे. पण जर दोघांनाही एकमेकांबद्दल ओढ वाटत असेल तर तू मध्ये मोडता घालू नयेस असे मला वाटते.

शेखर, एक सांगू? शैली तुझ्याकडे त्या अँगलने बघत नाही तेव्हा तूही तिचा नाद सोडून दे ना. आपण तिघे फ्रेंड्स आहोत. तेच नातं टिकवू या."

"हम्म. तुझं बरोबर आहे मित्रा. आता मला माझा बळी द्यावाचं लागेल." तो किंचित हसला आणि सायकल घेऊन त्याच्या घराच्या दिशेने निघाला.


'याचं तिच्यावर प्रेम आहे हे मला कळतंय पण शैली त्याच्या वाऱ्यालाही जवळ फिरकू देत नाही हे कळायची त्याला लवकरात लवकर बुद्धी येवो.' सायकलवर निघालेल्या शेखरकडे बघून मनातल्या मनात शशांक बोलत होता.

*******

"अगं आई, मी आज येतोय म्हणून पत्र पाठवलं होतं गं. असा न सांगता आजवर कधी आलोय का?" शशांक घरी आला तेव्हा मयंक ललिताला त्याचे बोलणे पटवून देत होता.


"अरे, पण आम्हाला घरात कोणाला पत्र मिळालेच नाही."


"एक मिनिट. मनी, मघाशी चहा देताना तू म्हणालीस की मी येणार होतो आणि त्यात आगंतूकपणे पाऊस आला अन त्यात मी सापडलो.म्हणजे मी येणार आहे हे तुला ठाऊक होतं?" मनिषाकडे बघून मयंकने विचारताच तिने मान खाली घातली.

"मनी, तुला दादाचे पत्र मिळाले होते?" आता शशांकदेखील संभाषणात सहभागी झाला.


"हो. मला वाटलं त्याने ते मला पाठवले आहे." ती नाकाचा शेंडा उडवत म्हणाली.


"काय गं? आईने मला इतकं धारेवर धरलं आणि तू आत्ता बोलते आहेस?" कधी कुणावर न चिडणारा मयंक चिडला होता.


"अल्लड आहे रे ती. तिचं वागणं काय मनाला लावून घेतोस?" मनीषाची बाजू घ्यायला आत्या पुढे सरसावली आणि विषय तिथेच थांबला.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार
*******

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//