हवास मज तू!भाग -५०

खरंच का प्रेम फसवे असते? वाचा एका प्रेमाची अनोखी कथा.
हवास मज तू!
भाग-५०

मागील भागात :-
शौनकच्या तोंडून शेखर आणि शशांकबद्दल ऐकते. सत्य जाणून घ्यायला ती शशांकला तातडीने तिच्याकडे भेटायला बोलावते. तो तिला त्यांच्या कॉलेज ग्त्रिकुटाची माहिती सांगायला सुरुवात करतो.

आता पुढे.

एखाद्या टॉमबॉय सारखी तिची वर्गात एंट्री झाली आणि हे काहीतरी खास रसायन आहे हे आम्हा दोघांना एकाचवेळी पटलं. वर्गातील काही मुली सुरुवातीपासूनच ओळखीच्या होत्या. काही नवीन असल्या तरी लाजाळू, शामाळू होत्या. त्याला अपवाद म्हणजे शैली!"

तिच्याबद्दल बोलताना त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक भासत होती.

ती आली ते थेट आमच्याच बाजूच्या बेंचवर बसली. अपऱ्या नाकाची, गव्हाळ वर्णाची. बघायला नाजूक साजूक असली तरी कोणाशी भिडली तर एकटीच सगळयांना भारी पडणारी अशी होती ती.

जेव्हा मुली आपल्या सलवार सूट वरच्या ओढण्या बरोबर आहेत की नाही हे सांभाळत असायच्या त्यावेळी ही पोरगी शर्ट पॅन्ट घालून बिनधास्त वावरायची."


"काही सांगतोस. मम्माला तर मी कायम साडीमध्येच पाहिले आहे." शौर्या मध्येच म्हणाली.


"तू तिला पाहिलेस ते तिच्या लग्नानंतर. मी त्या पूर्वीची गोष्ट सांगतो आहे. " तिच्या डोक्यावर एक टपली मारून तो हसला.

"मम्मा खूप धाडसी होती का रे?" तिला आता पुढे ऐकायची उत्सुकता लागली होती.


"हो. धाडसाचं वेडच होतं जणू. तिच्या आईने एकटीने तिला वाढवलं होतं. त्यानंतर मामाकडे राहून ती शिकली. कायम कुणाच्यातरी दबाबाखाली राहिल्यामुळे असेल; घराबाहेर पडल्यावर ती तिची स्वतंत्र होती.

त्या काळात पार्टटाईम जॉब करून तिने स्वतःचे शिक्षण पुरे केले. होस्टेलवर राहण्यापेक्षा भाड्याने खोली करून ती रहायची. मामाच्या घराबाहेर पडल्यानंतर तिला आता कुठल्याच बंधनात अडकायचे नव्हते."

"मम्माबद्दल मला हे काहीच ठाऊक नव्हतं." शौर्याच्या चेहऱ्यावर एक वेदना होती.

"कारण तू केवळ तिचा रुबाब बघितला आहेस. चारचाकी गाडीतून फिरताना, चार लोकांना हाताखाली राबवून मालकीणीचा तोरा मिरवताना तिला पाहिले आहेस. पण त्या मागे तिचे कष्ट, तिची धडाडी तुला फारशी दिसली नाही. हे सगळं जाणून घ्यायचं तुझं वयच नव्हतं गं बाळा."

"तुला आवडायची ती?"

"मैत्रीण म्हणून फार आवडायची. तिचा बेधडकपणा, स्वतःचं अस्तित्व शोधण्याची धडपड बघून मी तर पार भारावून गेलो होतो. पण नजरेच्या दुसऱ्या कोनातून तिला बघण्याचा मोह कधीच झाला नाही."

"आणि शेखर?"

आपण तिच्या लायकीचे नाही हे कळत असतानाही त्याने माती खाल्ली होती. एकदा उघडपणे तिच्या समोर त्याने आपल्या भावना मांडल्या सुद्धा होत्या. पण शैलीच ती. तिने तिच्याच शैलीत त्याला समज दिली. त्याची कॉलर पकडून तिने सांगितले की भावा, आपल्या वाटेला जायचे नाही. हवे तर बिझनेसमध्ये तुला पार्टनरशिप देईन पण लाईफ पार्टनर कधीच नाही." तेव्हाचा प्रसंग आठवून त्याला हसू आले.

"बिझनेस?"

"हम्म. शैलीला उडायचे होते. उंचच उंच विहरायचे होते.. खूप काहीतरी करायचे होते आणि त्यासाठीच ती गाठीशी पैसा बांधत होती. शेखरही तिला म्हणायचा की तू फक्त पहिले पाऊल पुढे टाक. तुझ्या पाठीमागे शशी नसला तरी मी आहे. त्याला तिची पाठराखण करायची होती.

तिला मात्र तिच्या सोबतीने पाऊल उचलणारा सखा हवा होता. म्हणूनच तिला शेखर तेवढा रुचायचा नाही पण त्याने तिची पाठ मात्र कधीच सोडली नाही."


"दोन दोन मुलगे सोबतीला होते तरी तिakmmr तुमच्यात रुची नव्हती?" शौर्याच्या चेहऱ्यावर नवल दिसत होते.


"तिच्या आयुष्याबद्दल फार अवास्तव अपेक्षा नव्हत्या. जेवढे आयुष्य हातात उरले होते ते तिला तिच्या मनाप्रमाणे जगायचे. मनासारखे जगायला भाग पाडणाऱ्या आयुष्याचा जोडीदार देखील तिला तसाच मनासारखा हवा होता; आणि मयंक दादाच्या रूपात तो मिळालाही."

"इंटरेस्टिंग! पण पप्पा मम्माला कुठे भेटले? मेन म्हणजे तुम्ही दोघं भाऊ आहात हे मम्माला ठाऊक होतं का?" तिचा अधीर प्रश्न.

"हो. कारण दादा तिला आमच्याच घरी भेटला."

"काय?"

"आम्ही तिघे एकत्र एक प्रोजेक्ट करत होतो. पुष्कळसे काम तिच्या रूमवरच चालायचे पण कधी कधी आम्ही आमच्या घरी बसायचो. खरं तर तिच्या रूमवर राहायला मला जास्त आवडायचे. आपले घर म्हणजे दहा बाय दहाचा छोटा खुराडाच होता. आई, बाबा, एक विधवा आत्या, तिच्या दोन मुली इतकी सगळी माणसं एकाच खोलीत वावरत होतो.

दादाचा होस्टेलला नंबर लागला होता म्हणून काही दिवसांसाठी त्याची या खुराड्यातून मुक्तता झाली होती. त्या दिवशी प्रोजेक्ट थोडे अडले होते. लागणार साहित्य मी घरीच विसरलो होतो म्हणून मग आम्ही तिघेही घरी आलो."


"मम्मा पहिल्यांदा तुमच्याकडे आली होती?"


"छे गं. अधूनमधून बरेचदा ती येत असे. आईला तशी आवडायची. तिचा बिनधास्त स्वभाव आत्याला खटकायचा. शैलीमुळे तिच्या मुली बिघडतील असे तिला वाटायचे. आईला मात्र शैलीचे कौतुक होते.

आजकालच्या जगात अगदी भिडस्त राहील्यापेक्षा थोडेसे जगाला अनुसरून वागावे असे तिला वाटायचे. आत्याला मात्र आईचे म्हणणे कधीच पटायचे नाही."

"आजी आधीपासूनच खुल्या विचारांची होती ना रे?"

"हो, म्हणूनच तर आत्या आणि बाबांचा विरोध पत्करून तिने शैलीला सून करून घेतली."

"बापरे! सून शेर तर सासू सव्वाशेर?" शौर्या म्हणाली आणि शशांक मंद हसला.

"शैली खरंच वाघ होती गं. तिच्यापुढे दादाच कुठेतरी कमी पडतोय की काय असं वाटायचं. त्या दिवशी आम्ही घरी प्रोजेक्ट करत बसलो होतो. अचानक आजूबाजूचे वातावरण बदलले आणि ही बया घरी जायला निघाली.

पावसात भिजून तब्येत बिघडेल म्हणून आईने तिला बळजबरीने रोखले आणि खरंच अगदी पाच मिनिटात जोराचा पाऊस कोसळायला लागला. स्वस्थ बसेल ती शैली कुठली? पावसात भिजेल म्हणून आईने तिला रोखले होते आणि या मॅडम पाऊस बघून धावतच अंगणात येऊन गिरक्या घेऊ लागली."

"तिला पाऊस आवडयचा?" शौर्या.

"पावसासाठी वेडी होती ती. आईने तिला थांबवावे तोवर ती चिंब भिजली होती. ती आणि तिचा पाऊस! बाकी कसलेच भान उरले नव्हते. दहा पंधरा मिनिटं गेली असतील. ती अशीच गिरकी घेत असताना एका तरुणाला आदळली.

"पप्पा?"


"बावळट, तेव्हा तो कुठे तुझा पप्पा होता? माझा दादा होता तो." तिला टपली मारत तो हसला.


"येस, यू हॅव ए पॉईंट. पुढे सांग ना. मी जाम एक्सायटेड झालेय."


"तूच काय आम्हीही एक्सायटेड झालो होतो. दादा असा अचानक येणार आहे हे आम्हाला ठाऊक नव्हते. तो चिंब, तीही चिंब. आपल्याच नादात गिरकी घेताना त्याला आदळणारी ती आणि ती पडेल म्हणून तिला सावरणारा तो!

प्रेमात पडायला एक क्षण पुरेसा असतो म्हणतात. आमच्यासोबत नेहमी प्रॅक्टिकल वागणाऱ्या शैलीने तो क्षण हातून निसटू न देता तसाच पकडून ठेवला.

आणि दादा? तो तिच्या काळ्या नजरेत पुरता गारद झाला होता. ती कोण? इथे कशी? हे एकही प्रश्न त्याला पडले नाही. त्याच्या नजरेत उतरलेली ती अनामिका एका क्षणात हृदयात कशी जाऊन बसली त्यालाच कळले नाही."


'अरे पोरांनो, आणखी किती वेळ पावसात भिजणार आहात? अशाने अंग अवघडून जाईल.आत या.' आईने दोघांना तंबी दिली तेव्हा कुठे दोघं एकमेकांच्या नजरेतून बाहेर आले. दादाने तिचा हात झटक्याने सोडून दिला. तीही गोरीमोरी झाली होती." सांगता सांगता भूतकाळात जाऊन ते क्षण तो वेचू लागला.

"मयू, तुला पाऊस बाधतो हे ठाऊक असूनही असा रे कसा भिजलास? जा, आता अंग पुसून घे आणि कापडं बदल." आई दादाला दम देत म्हणाली तसा काही उत्तर न देता पाच मिनिटात तो आपले आवरून बाहेर आला.

"शैली, ही साडी घे आणि आत जाऊन तूही कपडे बदलून घे. अशी ओलेती राहिलीस तर सर्दी पडसे होईल."

"अहो काकू कशाला.."

"मोठ्यांचं ऐकावं गं. साडी फार भारीतली नाहीय पण तुला खुलून दिसेल. जा आता."

ललिताचा शब्द शैली टाळू शकली नाही. न्हाणीघरात जाऊन ती पंधरा मिनिटांनी अंगाला कशीबशी साडी गुंडाळून आली. ती आली तेव्हा सगळ्यांनी ओठावर हात ठेवून आपले हसू दाबण्याचा प्रयत्न करायला लागली.

ए, हसू नका रे. पहिल्यांदा साडी नेसताना प्रत्येक स्त्रीचा गोंधळ उडतो."

तिची नुसती गुंडाळेललेली साडी बघून ललिता तिघांना म्हणाली आणि शैलीला परत पडद्यामागे नेत पाचच मिनिटात तिला व्यवस्थित आवरून बाहेर घेऊन आली.

शैली आत गेली तेव्हा गुरफूटलेल्या सुरवंटासारखी तिची अवस्था होती आणि ती बाहेर आली तेव्हा सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतर झाले होते.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
******

🎭 Series Post

View all