Feb 29, 2024
प्रेम

हवास मज तू! भाग -चार.

Read Later
हवास मज तू! भाग -चार.


हवास मज तू.
भाग -चार.

"शशांक सर असेच आहेत का?" बाजूच्या टेबलवर असलेल्या विनीतकडे बघून त्याने विचारले.

"असे म्हणजे कसे?" विनीत.

"म्हणजे इतके केअरिंग? आपल्या स्टॉफसाठी एवढं कोण करतं ना?" विहान.


"नव्याबद्दल बोलताय का? नव्या इज स्पेशल फॉर शशांक सर. तिने खूप कमी दिवसात खूप अचिव्ह केलंय. तुम्ही बसला आहात ना त्याच टेबलवर तीही आधी असायची. आता तिला तिची केबिन मिळालीय. स्वकर्तृत्वावर. असे हुशार लोकं सरांना आवडतात." तो हसून म्हणाला.

"मग तुम्हाला नव्या मॅमविषयी जेलसी नाही का वाटत? म्हणजे तुमच्या मागून येऊन त्या समोर गेल्या." विहान.

"जेलसी कशाला? ती तिच्या हुशारीने पुढे गेली. पुढे गेली असली तरी ती अजूनही आमचीच आहे. आमची फ्रेंड आहे. मग आम्ही का जेलस होऊ?" कीर्ती त्यांच्या गप्पात सामिल होत म्हणाली.

"याह! यू आर राईट. मला सुद्धा नव्या मॅमचा स्वभाव फार आवडला." तो म्हणाला.

आपल्यामुळे तिची ही अवस्था झालीये याचा गिल्ट मनात होता. कधी एकदा तिला भेटतो आणि माफी मागतो असे त्याला झाले होते. तेवढ्यात त्याच्या टेबलवरचा फोन वाजला.

"मिस्टर विहान, मिस नव्याच्या केबिनमध्ये या. मला थोडे बोलायचे आहे." पलीकडे शशांक होता.

याचा अर्थ नव्या शुद्धीत आली असावी हे नक्की होते.विहानने मनातच देवाला धन्यवाद दिले आणि तो केबिनकडे निघाला.

तो केबिनमध्ये गेला तेव्हा नव्या सोफ्यावर बसली होती. चेहरा काहीसा मलुल दिसत होता.

"नव्या मॅम, तुम्ही आता ठीक आहात ना?" त्याने अधीरतेने विचारले.

"मिस्टर विहान, आधी तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. प्लेटमधील जेवण तुम्ही संपवलं होतं?" शशांकच्या अचानक विचारलेल्या प्रश्नावर विहान गडबडला.

"सर, ते मी मघाच तुम्हाला सांगणार होतो.." त्याच्या चेहऱ्यावर गोंधळल्याचे भाव स्पष्ट दिसत होते.

"ॲक्च्युली सर, मीच त्यांना खायला दिले. त्याच काय ना की मिस्टर विहानच्या घरी कोणी नसतं. त्यामुळे त्यांना वेळेवर खाऊ घालायला कोणी नाही. त्यांना भूक लागली होती सो मीच खा बोलले." शशांक काही म्हणेल त्या आधी नव्याच मध्ये बोलली.

तिचे स्पष्टीकरण ऐकून शशांकने एकवार तिच्याकडे आणि मग विहानकडे पाहिले.

"मिस्टर विहान, असे असेल तर रोज दहा मिनिटं लवकर ऑफिसला येत चला आणि आपल्या कॅन्टीनमधून ब्रेकफास्ट करत चला. नाहीतर मिस नव्या सारखी कंडिशन व्हायची. या तुम्ही." शशांक अगदी शांत स्वरात बोलत होता.

विहान मान हलवून बाहेर गेला.

"मिस नव्या.."

"हं?" तिने दचकून शशांककडे पाहिले. विहान गेल्याच्या दिशेने ती टक लाऊन बघत होती हे शशांकच्या नजरेतून सुटले नव्हते.

"तुम्ही घरी जाऊ शकता." तो तिच्यावर नजर गाढत म्हणाला.

"हं?" ती शॉक होऊन म्हणाली.

"सर,पण माझ्याकडे गाडी नाहीये ना?" ती पिटुकला चेहरा करून म्हणाली.

"मला माहित आहे. माझा ड्राइवर घरी सोडून देईल." तो.

"पण सर.." तिला पुढे बोलायचे होते.

"आय डोन्ट लाईक आर्ग्युमेंट्स." त्याने एक करडी नजर तिच्यावर फिरवली. "आणि हो, दोन दिवस घरीच रेस्ट करायचा. देअर इज नो निड टू कम इन ऑफिस."

"पण सर, माझं प्रोजेक्ट?"

"ते विहान पूर्ण करेल." तो शांतपणे.

"सर.." तिचा चेहरा पडला होता.

"धिस इज माय ऑर्डर, ओके?" आपली नजर तिच्यावर फिरवत तो म्हणाला आणि जायला निघाला.

"खडूस एसके." ती हळूच पुटपुटली. तरीही शशांकच्या कानावर ते ऐकू आलेच. हलके हसून तो आपल्या केबिनकडे निघाला.

******

"निवी, तुला कितीदा सांगितलं की ब्रेकफास्ट स्किप करायचा नाही तरीसुद्धा तू काही खाल्लं नाहीस. आता बघितलेस ना काय अवस्था झालीये?" तिच्यावर ओरडताना सुद्धा सुनंदाच्या डोळ्यात पाणी आले होते.

"मॉम, सॉरी ना. यापुढे नाही होणार असं." नव्या कानाला हात लाऊन म्हणाली. ती नुकतीच घरी आली होती. आणि तिची अवस्था बघून सुनंदा आणि ललिता दोघीही अस्वस्थ झाल्या होत्या.

"सुनंदा, शांत हो. तिला आराम करू दे. निवी टेक केअर बेटा." सुनंदाकडे बघून ललिता.

"आज्जी, तू सुद्धा माझ्यावर रागावलीस ना?" इटुकला चेहरा करून नव्या.

"नाही, तुझ्यावर का रागावू? आमची लाडोबा आहेस ना तू? मला तर शशीचे आश्चर्य वाटत आहे. एवढे सगळे घडून गेले आणि त्याने फोन करून आम्हाला साधे कळवले सुद्धा नाही?" ललिता.

"हो ना आई. मी तर शशीला फोन करून निवीला काही खायला दे म्हणून सांगितले होते. तरी हा हलगर्जीपणा?" सुनंदा थोडी रागात आली.

"मी त्याला झापतेच चांगली. बायकोचे ऐकत नाही म्हणजे काय? दे इकडे तुझा मोबाईल." सुनंदाकडे तिचा मोबाईल मागत ललिता म्हणाली.

"अगं, आई, आज्जी. थांबा जरा. एकतर मी ऑफिसला नाहीये. सगळी जबाबदारी एकट्या डॅडवर आहे आणि तुमचं काय चाललंय? आता मी आहे ना ठीक?" ती उठून बसत म्हणाली.

"हो, हो. आम्हाला माहिती आहे तुला त्याचा किती पुळका आहे ते? तुझी प्रतिक्रिया बघायची होती म्हणून मी मोबाईल घेतला. नाही करणारे फोन." ललिता हसून म्हणाली.

"तरीही निवी, यापूढे ना अशी वागू नकोस. शौर्याला कळलं ना तर ती तुला काही बोलणार नाही पण मला किती ओरडेल माहितीये ना तुला? आणि तू आता छोटूशी नाही राहिलीहेस ना बाळा? स्वतःची काळजी घ्यायला शिक ना." सुनंदाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले.

"मॉम, प्लीज दी ला यातलं काही सांगू नकोस आणि खरंच गं सॉरी. यापुढे असं कधीच होणार नाही." सुनंदाचा हात हातात घेत नव्या म्हणाली.

"हम्म. तू आराम कर.आम्ही थांबतो बाहेर." तिच्या गालावर हलके हात फिरवून सुनंदा ललितासह बाहेर आली.

त्या दोघी बाहेर गेल्या आणि नव्या डोळे मिटून पडून राहिली. सकाळपासूनचा घटनाक्रम तिच्या डोळ्यासमोर येत होता. तिला झालेला उशीर, त्यात रस्त्यात मध्ये आलेली गाय, एका अनोळखी तरुणासोबत झालेले भांडण, त्याने देऊ केलेली लिफ्ट आणि मग ऑफिसमध्ये भेटलेला, शशांकने नव्याने अपॉइंट केलेला विहान. तिच्या ओठावर खुदकन हसू आले. तिच्यासाठी आणलेले जेवण एखाद्या भुक्कडसारखे त्याने एकट्याने फस्त केले होते.

जेवणानंतर तृप्त झालेला त्याचा चेहरा तिच्या मिटल्या नजरेसमोरून हलत नव्हता. सकाळी त्याच्याशी ती भांडली होती खरी, पण आता मात्र आठवण येताच हृदयात काहीतरी व्हायला लागले होते. काहीतरी म्हणजे नेमके काय होतेय तिला कळत नव्हते पण तो हृदयात वसलाय याची हलकीशी चाहूल लागली होती. एक लांब श्वास घेऊन तिने डोळे आणखी घट्ट मिटले.

*****

"मिस नव्या दोन दिवस सुट्टीवर आहेत, सो मिस्टर विहान हे प्रोजेक्ट तुम्हाला एकट्यालाच पूर्ण करायचे आहे. जमेल ना तुम्हाला?" आपल्या केबिनमध्ये विहानला बोलावून शशांक त्याला सांगत होता.

"येस सर. मी करेन पूर्ण. आणि सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्यामुळे नव्या मॅम आजारी पडल्या."तो मनापासून दिलगिरी व्यक्त करत होता.

"हम्म, तो विषय आता संपलाय. त्यावर चर्चा नको. तुम्ही कामाला लागा. यू हॅव ओन्ली टू डेज." शशांक.

"ओके सर." खाली मान टाकून विहान आपल्या टेबलकडे परतला. नव्याचा मलुल चेहरा आठवून त्याला वाईट वाटत होते.


आज शशांक लवकर घरी जायला निघाला. शेवटी सकाळपासून त्याच्या लाडकीत त्याचा जीव अडकला होता. शशांक सराच्या नावाची पाटी त्याने काढून टाकली होती. आता तो केवळ एक पिता होता. नव्याचा लाडका डॅड होता.


"डॅड, आय एम सॉरी ना रे." त्याच्या मांडीवर डोके ठेवून नव्या लाडिकपणे बोलत होती.

"निवी, यू डोन्ट नो, हाऊ प्रेषिअस यू आर. तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं?" तिच्या केसातून हात फिरवत शशांक बोलत होता.

"डॅड, आय नो द्याट. पण मला सांग आपल्यासमोर एखादा भुकेला व्यक्ती असता तर आपण काय केलं असतं? त्या विहानच्या डोळ्यात भूक स्पष्ट दिसत होती सो मी त्याला खाऊ दिले. मला काही त्रास झाला तर डॅड, तू आहेस रे माझ्याबरोबर. पण मिस्टर विहानला ला कोणीच नाही रे. डॅड, तू माझ्यावर रागावला नाहीस ना?" तिने डोळे किलकीले करून त्याच्याकडे पाहिले.
त्याने मंद हसून तिच्या गालावरून हात फिरवला.

'मुलगी आता मोठी झालीय.' त्याच्या डोक्यात आले.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
*******
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//