Login

हवास मज तू!भाग -४९

खरंच का प्रेम फसवे असते? वाचा एका प्रेमाची कथा.
हवास मज तू.
भाग -४९

मागील भागात :-
शशांकच्या आठवणीत असतानाच शौर्याला अनपेक्षितपणे त्याचा फोन येतो. ती त्याला विहान हा शौनक असल्याचे सांगते.

आता पुढे.

"शौर्या, तुला माझी शपथ. तू सांग तर. ते ऐकून मला काहीही होणार नाही. या दोन दिवसात मी स्वतःला तेवढे स्ट्रॉंग बनवले आहे."


"काका, अशी शपथ नको रे घालू. मी सांगते." भावनिक होत शौर्या बोलू लागली.

"शेखर कारखानीस.. तू त्याला ओळखतोस ना? हा विहान म्हणजे दुसरा कोणीही नसून त्याचाच मुलगा आहे; शौनक कारखानीस." ती श्वास रोखून म्हणाली.


"काका.." त्याचा काहीच प्रतिसाद ऐकू न आल्यामुळे तिने साद घातली.


"शौर्या, बहूतेक सुनी येतेय. मी फोन ठेवतोय आणि ऐक, मी बरा आहे. तेव्हा तू माझी काळजी करू नकोस." मनावर दगड ठेवून त्याने कॉल कट केला.


"शशी, कुणाशी बोलत होतास का?" पाण्याची बाटली ठेवून त्याच्याजवळ येत सुनंदा म्हणाली.


"आता इतक्या रात्री कुणाशी बोलणार?" त्याने विषय संपवत अंगावरून चादर ओढून घेतली.


"तुला बरं वाटते आहे ना?" त्याच्या चेहऱ्यावरचा घाम टिपत ती.


"थोडा थकवा जाणवतोय. झोपलो की बरे वाटेल. तू सुद्धा झोप." तो कुशीवर वळत म्हणाला.


"शशी, शौर्याचे हे वागणे कोड्यात टाकणारे आहे. ती का अशी वागतेय काहीच कळत नाही. निवी आणि तिच्यात मी आजवर कधीच भेदभाव केला नाही रे. आपल्या लेकीसारखे तिलाही माया लावली. प्रेम दिले आणि आता तीच निवीच्या सुखावर उठलीय.

तुला सांगू? या सर्व गोष्टीचे वाईट वाटण्यापेक्षा मला आता आश्चर्य वाटतेय." डोळ्यांचा कडा पुसत ती बोलत होती.


"सुनी, प्रत्येकाचं प्राक्तन निराळं असतं. त्यात काय वाढून ठेवलंय हे जर आधीच ठाऊक असेल तर मग सगळी मजाच संपली. आपले कष्ट, आपल्या यातना याला काही कारणच उरले नसते. आयुष्य सगळे मिळमिळत झाले असते गं.

अशा गोष्टी खरं तर आपला कस बघायला घडतात. कठीण समयी कोण आपलं? कोण परकं हे ओळखायला शिकवतात." आपल्या ऊबदार हातात तिचा हात घेत तो म्हणाला.


"म्हणजे शौर्या आपली नव्हती का? की आपण तिचे कोणी नाही? का वागतेय ती अशी? का माझ्या लेकीवर अन सौभाग्यावर ती उठलीय?" ती मुसमूसायला लागली.


"नको त्रास करून घेऊस. आमच्यावरचे तुझे प्रेम काय कमी आहे का? कोणी जरी जीवावर उठायचा प्रयत्न केला तरी तुझ्या प्रेमापुढे त्यांचा निभाव लागणार नाही." तिला कुशीत घेत केसातून मायेने हात फिरवत तो म्हणाला.


"शशी, निवी पार कोमेजून गेलीय रे. तिला असं नाही बघवत. तू असा हृदयावर दुखणं ओढवलेला, ती तशी दुःखी हृदय घेऊन बसलेली.. तुम्हा दोघांकडे बघून माझी फार तगमग होते रे."


"सुनी, शांत हो. प्रत्येक गोष्टीला अंत असतो, ही अवस्था त्या अंतापर्यंतची असते. मी बोलेन निवीशी. तू झोप आता."

तिचे मुसमूसने सुरूच होते. त्याचे हलके थोपटणेही सुरु होते. शेवटी तो जिंकला आणि तिचा डोळा लागला.

तिचा डोळा लागला; त्याच्या डोळ्यावरची झोप मात्र केव्हाच उडाली होती. शौर्याशी झालेले बोलणे अजूनही कानात फिरत होते.

तिने विचारले होते, 'शेखर कारखानीस.. तू त्याला ओळखतोस ना?' तो एक प्रश्न त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करून गेले होते.

शेखर कारखानीस. खरे तर या व्यक्तीला तो कसे विसरणार होता? या एका माणसामुळे त्याच्या आयुष्याची सगळी उलथापालथ झाली होती. हे परत त्याला आठवले.. अगदी दोन वर्षांपूर्वीप्रमाणेच.


दोन वर्षांपूर्वी असाच मध्यरात्री शौर्याचा फोन आला होता. तिचा घाबरलेला स्वर. काहीतरी चुकीचे घडून गेलेय असे तिच्या बोलण्यातून जाणवत होते. पण पठ्ठी फोनवर बोलायला तयार नव्हती.


"..मला तुला भेटायचं आहे. हा विषय असा फोनवर बोलण्यासारखा नाहीय." तिचा हट्ट.


"काय झालं प्रिन्सेस? प्रेमात वगैरे तर पडली नाहीस ना?" त्याची थट्टा सुरु होती.

"हा तो विषय नाहीये काका. खूप वेगळा आहे. कसेही करून तुला इथे यायला हवे. प्लीज."

तिच्या हृदयातील आर्ततातिच्या आवाजातून थेट त्याच्या कानात उतरली होती. काहीतरी 'वेगळं' आहे हे लगेच त्याला उमगले आणि मग सगळ्या मिटींग्स कॅन्सल करून, काही पुढे ढकलून तो तसाच दोन दिवसात तातडीने तिच्यासमोर हजर झाला होता.

तो ज्या हॉटेलमध्ये उतरला होता त्याला भेटायला शौर्या एकटीच गेली होती. शशांकला इथे बोलावलेय हे तिने शिरीनला सांगितले नव्हते कारण तिने त्याच्यावर वॉच ठेवण्याचा दिलेला सल्ला तिला अजिबात पटला नव्हता.


"प्रिन्सेस..?" तिला बघून शशांक आश्चर्यचकित झाला. तेज मावळलेला तिचा कोमेजलेला चेहरा. बँडेजने झाकलेली कपाळावरची जखम..

"शौर्या? तुला काय झालेय?" तिला मिठीत घेत प्रेमाने कुरवाळत त्याने काळजीने विचारले.


त्याच्या खांद्यावर मान ठेवून ती हुंदके देऊन रडत होती. ही मिठी तिच्यासाठी आजवरची सर्वात सुरक्षित जागा होती. हा खांदा तिचा हक्काचा खांदा होता. लहान असताना त्या खांद्यावर ती कितीतरी वेळा बसून फिरली होती. त्या खांद्यावर बसून बाहेरचे जग निरखत होती. मोठी होत गेली तसा तो खांदा तिची विश्वासाची आणि हक्काची जागा बनली होती.

शशांक केवळ तिचा काका नव्हता. तिचा बाबा, तिचा बेस्ट फ्रेंड, तिचा तो जीवाभावाचा सखा होता. त्यामुळेच शौनकने त्याच्यावर केलेल्या आरोपाने ती पुरती हादरली होती. तिला बालपणापासून जपणारा तिचा एसके कुणाच्या बालमनाचा खून कसा करू शकणार होता?


"ए, बछड्या काय झालं ते सांगशील का?"

त्याच्या प्रश्नावर स्वतःला सावरत ती बाजूला झाली. आसवांचा पूर आता ओसरला होता.

"एसके, एक विचारायचं होतं."

"हं. त्यासाठीच तर इतक्या लांबून आलोय."

"आधी वचन दे की माझ्याशी खोटं बोलणार नाहीस." हात समोर करत ती म्हणाली.

"बच्चा, आजवर तुझ्याशी खोटं बोलल्याचं मला स्मरत नाही; पण तरीही तुला वचन हवे असेल तर घे, दिले वचन." तिचा हात आपल्या दोन्ही हातात पकडत तो म्हणाला.


"शेखर कारखानीस.. तू ओळखतोस का त्याला?" त्याच्या डोळ्यात बघत तिने प्रश्न केला आणि नजर फिरवत शशांकने आपल्या हाताची पकड ढिली केली.

"काका, तू मला वचन दिले आहेस. हा शेखर करखानीस कोण हे मला कळायला हवे आणि ते तुझ्याकडूनच कळायला हवे." ती हुंदका दाबत म्हणाली.


"शेखर माझा मित्र होता." एक लांब श्वास घेत तो म्हणाला.

"आणखी?"

"तो जसा माझा मित्र होता तसा तो शैलीचा देखील मित्र होता."

"मम्माचा मित्र? फक्त मित्र?"

"का? एक स्त्री आणि पुरुष फक्त मित्र असू शकत नाहीत?" 'फक्त' या शब्दावर जोर देत त्याने विचारले.

"मी आणि शैली देखील मित्रच होतो. खूप चांगले. अगदी हार्ट टू हार्ट आमचे कनेक्शन होते. तिचे माझ्या दादासोबत लग्न झाले तरीही आमच्यातील मैत्रीचे नाते कधीच बदलले नव्हते." तिच्या नजरेत नजर मिळवत तो म्हणाला.


"काका, मी तुझ्याबद्दल कुठे काही बोलते आहे? तुमची मैत्री मला ठाऊक आहे ना. मला केवळ या शेखर बद्दल जाणून घ्यायचे आहे."


"काय जाणून घ्यायचे आहे? आणि असे अचानक त्याच्याबद्दल तुला कोणी सांगितले?"


"कोणी काय सांगितले हे तेवढे इम्पॉर्टन्ट नाहीये. पण मला सत्य जाणून घ्यायचे आहे. काका तू माझे प्रेरणास्थान आहेस रे. तुला कोणी वाईट बोललेलं मला कधीच सहन होणार नाही." ती परत हळवी झाली.


"ए वेडाबाई, अशी सारखी रडू नकोस गं. माझी शौर्या अशी रडूबाई नाहीये. तुला तर मी नेहमी वाघीण म्हणत असतो. शैलीचा छावा आहेस गं तू. म्हणून तर तिने मोठ्या कौतुकाने तुझे नाव शौर्या ठेवले होते. हे अश्रू पुस बघू आधी."


"मला शब्दात अडकवू नकोस रे." डोळे पुसत ती म्हणाली.

"शैली असंच बोलायची. तुझ्यासारखी. तुझ्यात मला कित्येकदा तिची छबी दिसते." तिच्यावर नजर रोखून तो म्हणाला.

"मम्मा खूप शूर होती का रे?"

"शूर? वाघीण होती ती. आमच्या त्रिकुटाची ती शान होती."

"त्रिकुट?" तिचा प्रश्न.

"हम्म. त्रिकुट. शेखर, शैली आणि मी. आमच्या तिघांची दोस्ती खूप निराळी होती. अगदी जगावेगळी. शेखर आणि मी ज्युनिअर पासूनच मित्र होतो. एकदम पक्के दोस्त. सिनिअर कॉलेजला आम्हाला शैली भेटली.

एखाद्या टॉमबॉय सारखी तिची वर्गात एंट्री झाली आणि हे काहीतरी खास रसायन आहे हे आम्हा दोघांना एकाचवेळी पटलं. वर्गातील काही मुली सुरुवातीपासूनच ओळखीच्या होत्या. काही नवीन असल्या तरी लाजाळू, शामाळू होत्या. त्याला अपवाद म्हणजे शैली!"

तिच्याबद्दल बोलताना त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक भासत होती.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.