हवास मज तू!भाग -४८

खरंच का प्रेम फसवे असते? वाचा एका प्रेमाची कथा.
हवास मज तू!
भाग -४८

मागील भागात :-
शौर्या विहानला भेटते आणि त्याचे सत्य जाणून तिथेच भोवळ येऊन पडते. शिरीन तिला घरी घेऊन येते.

आता पुढे.

"काय झालंय शौर्या? शौनक गेला म्हणून मनाला जास्तच लावून घेतलेस का? नाही म्हणता म्हणता त्याच्या प्रेमात वगैरे तर पडली नाहीस ना?" ती काहीच बोलत नाहीये हे बघून शिरीन तर्कवितर्क लावत होती.

"सी, तसे असेल तर चांगलेच आहे. ही इज ए स्कॉलर. दोघं सुखाने संसार कराल."

शिरीनचे बोलणे संपत नाही तोच शौर्याने तिला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातील अश्रुंचे थेंब शिरीनच्या खांद्यावर पडले तसे शिरीनने तिला हलकेच बाजूला केले.

"हेय शौर्या, आय एम जस्ट किडींग. रडू नकोस ना यार. ॲटलीस्ट काय झाले ते सांग तरी."

"शिरीन, तो खूप चुकीचा वागला गं." शौर्या हुंदका देत उत्तरली.


"म्हणजे?"

"म्हणजे तो आपला मित्र नव्हताच. त्याने मैत्रीचे केवळ नाटक केले होते."

"काही कळेल असं बोलशील?"

"शिरीन.." शौर्याने तिला शौनकला भेटायला गेल्यावर काय काय घडले ते सर्व सांगितले.


"ओ माय गॉड! म्हणजे हा मुलगा तुला पूर्वीपासूनच ओळखत होता. इथे तुझ्याशी दोस्ती केली ते केवळ तुला त्रास व्हावा यासाठी? किती चुकीचे आहे हे?

शौर्या मला माफ कर यार. मीच त्याच्याशी तुझी भेट करून दिली. त्या दिवशी तुला मॅच बघायला मी सोबत नेले नसते तर तुमची मैत्री झालीच नसती." शिरीन रडत म्हणाली.

"नो यार, तू का माफी मागतेस? त्याला मला भेटायचेच होते. तुझ्यामुळे नाही तरी कधी ना कधी तो मला भेटला असताच. मी त्याला खूप चांगला मित्र, एक चांगली व्यक्ती समजले होते. पण ते सगळं खोटं होतं गं.

शिरीन, मला ना आता भीती वाटतेय. इंडियात गेल्यावर तो काकाला काही करणार तर नाही ना?" तिचे काळीज धडधडायला लागले होते.


"मला तसे वाटत नाही. तो बोलला असेल पण असे काही करायला एक धमक लागते ती त्याच्यात नाहीये. तो काय म्हणाला? त्याला तुमच्या कपंनीपेक्षा मोठी कंपनी उभारायची आहे. बिझनेस करायचा आहे. मुळात अशी कंपनी एका दिवसात तर उभी राहत नाही ना?

एक दिवस सोड, एका वर्षात देखील तो हे करू शकणार नाही. त्यासाठी त्याला आणखी काही वर्ष वाट बघावी लागेल. नेक्स्ट इयरला तू इंडियात परत जाशील तेव्हा सुद्धा तो कोणीही नसेल आणि ऑलरेडी त्याने त्याचा प्लॅन सांगितला आहे तर तुही सजगतेने वागशीलच की.

तू तिथे गेल्यावर काही दिवस तुमच्या बिझनेस मध्ये लक्ष घाल. तुझ्या काकावर वॉच ठेव. ते चांगले की वाईट ते तुला कळेलच." शिरीन तिला तिचे म्हणणे पटवून द्यायचा प्रयत्न करत होती.


"शिरीन..?"


"सॉरी डिअर. पण शौनक एवढे बोलला तर ते खरे की खोटे हे ठरवायला तुला एवढं तर करावंच लागेल. शंकेचे निरसन होण्यासाठी म्हणून?"


या क्षणी शिरीन जे बोलत होती ते सारेच शौर्याला पटत होते. पण तिच्या प्राणप्रिय काकावर ती कशी वॉच ठेवू शकणार होती? त्यापेक्षा तिला शशांकशी परस्पर बोलणे केव्हाही योग्य वाटले असते.

*******

'शिरीन, तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुझ्याशी बोलत होते पण त्या वेळी तुझ्या तोंडून शौनक बोलतोय हे मला कळलेच नव्हते गं. किती बेमालूमपणे तू मला स्वतःच्या जाळ्यात ओढत होतीस? आणि मीही विश्वास ठेवून तुझे ऐकत राहिले.

त्याच वेळी मी इंडियात परतले असते तर माझ्या नाजूकशा निवीला त्याच्यात गुंतण्यापासून रोखू शकले असते. त्याने मुद्दाम निवीला ढाल बनवून काकावर हल्ला चढवलाय. त्याने आमचा बिझनेस त्याच्या नावावर करून मागितला असता तर एकदा तेही त्याला देवून टाकले असते. पण निवीच्या भावनांशी खेळून हा कसला बदला घेतो आहे?'


"शौर्या, अंधारात काय करते आहेस?" पलीकडच्या बाल्कनीतून यशचा आवाज आला तशी ती विचारातून बाहेर आली.

ती काही बोलणार तोच 'धप्प' असा आवाज होऊन लागोलाग यश त्याच्या बाल्कनीतून तिच्यासमोर येऊन उभा राहिला.


"यश अरे काय आहे हे? असे उडी मारून कोणी येतो का?"


"समोरून दार वाजवून आलो असतो तर तुला आवडले नसते. म्हणून मग असा आलो. तू अचानक अशी नाराज होऊन आत आलीस तर माझ्याही घशाखाली घास उतरत नव्हता." यावेळी बोलताना त्याच्यातील खट्याळपणाची जागा गंभीर स्वराने घेतली होती.


"हे तुझेच घर आहे. तू कुठेही, केव्हाही येऊ शकतोस." ती आत येत म्हणाली.


"तू अशी कायम तोडल्यासारखी का बोलतेस?"


"तू तरी का मग सारखा काहीतरी जोडण्याच्या मागे लागतोस?" त्याला सरळ उत्तर न देता ती म्हणाली.

"म्हणजे?"


"उगाच काही कळत नाही असा आव आणू नकोस. मला आवडते म्हणून तू मुद्दाम तुला न आवडणारी भाजी करायला लावलीस. कशासाठी?"

"माझ्यासाठीच. मला वाटलं की आवडती भाजी बघून तू थोडेसे जेवशील तरी. तेवढेच मला समाधान लाभले असते. ते घडले नाही उलट तुझ्या डोळ्यात पाणी मात्र आले. सॉरी." तो उत्तरला.


"माझ्याशी चांगले वागण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचा मला राग येतो."


"शौर्या, तू प्रत्येक व्यक्तीकडे एकाच चष्म्यातून का बघतेस? एकदा माझ्यावर विश्वास ठेवून तर बघ."


"आता परत नको. विश्वासघाताचे दुःख खूप त्रासदायक असते." ती शून्यात बघत म्हणाली.


"मी माझ्यावरच्या विश्वासाबद्दल बोलत नाहीये. तुझा किमान तुझ्यावर तरी विश्वास असावा; एवढंच म्हणणं आहे." तिची अवस्था जाणून तो म्हणाला.

"अजून तरी स्वतःवरचा विश्वास डगमगला नाही म्हणून तर मी स्थिर आहे."

"गुड! हा विश्वास असाच राहू दे. मग कुठलीही लढाई आपण जिंकू शकतो. आता आजचे ज्ञान संपलेय. मी झोपायला जातोय. गुडनाईट."

"आणि हो, भूक वगैरे लागली तर काही खायला घेऊन येऊ का?" त्याने काळजीने विचारले.

"नाही, नको." तिने मान हलवून नकार दिला.

'अती काळजी करणारी लोकं भेटली की आता माझ्या मनात शौनक डोकावतो त्याला मी तरी काय करू?' तो गेल्यावर एक सुस्कारा टाकून ती बेडवर बसली.

'काका, कसा आहेस रे तू? आजवर माझ्यामुळे काय काय फेस करत आला आहेस आणि आता मीच तुला आजारी करून ठेवले. मला माफ करशील ना रे? मला तुझी खूप आठवण येतेय. आय मिस यू व्हेरी बॅडली.'

मनात शशांकच्या आठवणीने दाटलेली व्याकुळता चेहऱ्यावर उमटली होती. तिचे लक्ष बेडवर असलेल्या मोबाईलकडे गेली आणि काय स्क्रीनवर झळकणारे नाव वाचून तिने झटकन मोबाईल हातात घेतला.

'एस के कॉलिंग.' नाव वाचून मोबाईलची खरंच रिंग होतेय की मनाची तार वाजतेय हे तिला उमगत नव्हते.
बोटांचा मोबाईलला स्पर्श झाला आणि कॉल उचलल्या गेला.

"बच्चा.."

पलीकडून आलेला आवाज ऐकून तिला रडू आले नसेल तर नवलंच. कारण फोनवर तोच होता; तिचा लाडका काका, शशांक.

"ए, प्रिन्सेस. तू रडू नकोस. मी बरा आहे अगं."

तिचा जन्मदाता नसला तरी त्याने तिच्यावर पित्याची माया केली होती. तिच्या मनातील खळबळ काही न बोलताही त्याच्यापर्यंत बरोबर पोहचली.


"काका, सॉरी रे.."


"ए बाळा, तू सॉरी म्हणू नकोस. मी आता बरा आहे. उलट मलाच माफ कर. नेहमी तुला माझी प्रिन्सेस म्हणतो पण तुलाच तुझ्या राजमहालत रहायला ये म्हणू शकत नाहीये. आय एम फीलिंग व्हेरी गिल्टी."


"काका, असे नको वाटून घेवूस. मी ओके आहे. इतक्या रात्री कसा फोन केलास? तिथे काकू असेल ना?" डोळे पुसत तिने विचारले.


"ती पाणी घ्यायला गेली म्हणून मी तुला फोन केला. तुझ्या काळजीने जीव टांगणीला लागला होता म्हणून आज फोन करायचाच हे ठरवले होते. तुलाही माझी आठवण येत होती ना?" त्याचा अलवार स्वर.


"काका, तुला माझ्या मनातील सारे कसे रे कळते?"


"प्रिन्सेस, तुझ्या जन्माआधीपासून मी तुझ्याशी जुळलोय गं राणी. आता जवळ नसलीस तरी तुझे मन मी आरपार वाचू शकतो." हळवे होत तो उत्तरला.


"शौर्या, बाळा आता मला एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे. ज्या मुलाने आपल्या निवीच्या आयुष्यात गोंधळ केलाय, ज्याच्यामुळे तू घरच्यांपासून दुरावली आहेस तो विहान म्हणजे कोण आहे हे सांगशील का?"


"काका, तू आधी बरा तर हो. मग सांगेनच." ती.


"मी ओके आहे गं. काहीही ऐकायला तयार आहे. माझ्या दोन्ही मुलींच्या भावनांशी कोण खेळतोय आणि का खेळतोय हे मला कळायला हवे."


"काका.."

"शौर्या, तुला माझी शपथ. तू सांग तर. ते ऐकून मला काहीही होणार नाही. या दोन दिवसात मी स्वतःला तेवढे स्ट्रॉंग बनवले आहे."


"काका, अशी शपथ नको रे घालू. मी सांगते." भावनिक होत शौर्या बोलू लागली.

"शेखर कारखानीस.. तू त्याला ओळखतोस ना? हा विहान म्हणजे दुसरा कोणीही नसून त्याचाच मुलगा आहे. शौनक कारखानीस." ती श्वास रोखून म्हणाली.

हे ऐकून शशांक कसा रिऍक्ट होईल? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all