Login

हवास मज तू!भाग -४७

खरंच का प्रेम फसवं असतं? वाचा एका प्रेमाची कथा.
हवास मज तू!
भाग -४७

मागील भागात :-
रात्री जेवायला बसल्यावर शौर्या तिच्या कुटुंबियांच्या आठवणीने हळवी होत तिथून निघून जाते. या सगळ्याला कारणीभूत असलेल्या शौनकचा तिला खूप राग येतो.

आता पुढे.

"तुझा राग माझ्यावर होता. काकावर होता. आमची कंपनी, आमच्या बिझनेसवर होता. या सगळ्यात तू माझ्या कोवळ्या निवीला ओढायला नको होतेस." डोळे पुसून ती उठून बसली.

बाल्कनीचा दरवाजा उघडून ती बाहेर आली. आकाशात पडलेल्या पिठूर चंदण्याने आकाश शुभ्र झाले होते; त्याच वेळी दोन वर्षांपूर्वी शौनकला भेटायला त्याच्या खोलीत गेल्यावर तिचा पडलेला पांढरा चेहरा तिच्या डोळ्यासमोर तरळत होता.

शौनक भारतात परत जाणार म्हणून काहीश्या खट्टू मनानेच ती त्याला भेटायला गेली होती. म्हटले तर ती त्यांची सरप्राईज मिटिंग ठरणार होती. पण नियतीच्या मनात मात्र दुसरेच काहीतरी होते. त्याचमुळे त्याला सरप्राईज मिळण्यापेक्षा तिलाच मोठा धक्का बसला होता.

दोघांसाठी म्हणून किती प्रेमाने तिने कॉफी केली होती. कॉफी पीत पीत मस्त गप्पा मारायच्या. या वर्षभरात त्याने तिला दिलेल्या मैत्रीच्या बहुकिमती नात्याबद्दल धन्यवाद द्यायचे.. त्यावेळी तिच्या मनात कदाचित हेच चालत होते.

हातातील कॉफीचा ट्रे सांभाळत ती सावकाशपणे त्याच्या बेडरूम मध्ये प्रवेशली.

सरप्राऽईज!" ती आनंदाने ओरडली आणि त्याचवेळी समोरचे दृश्य पाहून तिच्या हातातील ट्रे खाली पडला. चेहरा अचानक पांढराफट्ट झाला होता.

"शौर्या? ओह तू आलीस तर? ये ना. खरं तर तू येशील हे मला ठाऊक होतेच." त्याच्या कामात गर्क असलेल्या शौनकने तिच्याकडे वळून बघत म्हटले.

शौर्याच्या कानावर त्याचे शब्द कुठे पोहचले होते? पायात थरथर जाणवायला लागली होती आणि घशाला कोरड पडली होती.


"शौनक.. हे.. हे सगळं काय आहे?" अडखळत तिने त्याला प्रश्न केला.


"कुठे काय?" तिच्याजवळ येत तो बेफिकीरीने म्हणाला.

"हे.. हे.."

"हे फोटोग्राफ्स होय? अगं यातील सर्वांना तू तर ओळखतेसच. वेगळी काय ओळख करून द्यायची?" तिची नजर जिथे खिळलेली होती तिकडे एक कटाक्ष टाकत तो छद्मी हसला.


"तरीही मी तुला नव्याने ओळख करून देतो, ये. काय माहित? कदाचित तुझ्यासाठी ही नवीन ओळख असेल."

तिचा हात धरून त्याने तिला समोर खेचले. दोघेही एका क्लिपबोर्ड जवळ उभे होते आणि त्या बोर्डवर काही फोटो टांगलेले होते. शौर्या आत आली तेव्हा शौनक त्या फोटोवर मार्करने क्रॉसची खूण करत होता.

"हा सुंदर चेहरा बघितलास? ही.. सॉरी, या आहेत मिसेस शैली केळकर आणि हा फोटो आहे मिस्टर मयंक केळकरांचा. केवळ समाजात वावरायला म्हणून हे मिस्टर आणि या मिसेस. प्रत्यक्षात मात्र हे मयंकराव बायकोच्या ताटाखालचे मांजर होते म्हणतात.

ही बाई म्हणेल ती पूर्वदिशा. मिस्टरांना स्वतःचे असे काहीच मत नाही. नाहक गेले बिचारे. शेवटी वाघाबरोबर शेळी सुद्धा जीवानिशी जाईलच ना?"
त्याच छद्मीपणाने तिच्याकडे पाहून तो परत हसला.


"शौनक, माईंड युअर लँग्वेज. माझ्या मम्मीपप्पा बद्दल मी असे काहीच ऐकून घेणार नाही." तिच्या आवाजाबरोबर तिचा हातही उठला होता.


"हो अगं, मी विसरलोच होतो. हे तुझे आईवडील नाही का? तुझ्यातही तुझ्या आईप्रमाणे.. सॉरी, मम्मीप्रमाणे वाघीणीचे गुण भरले आहेत की तुझ्या पप्पासारखी शेळी आहेस हे अजून मला कळलेच नाही गं." तिने उगारलेला हात पकडत तो म्हणाला.

"मी शौर्या केळकर आहे. माझा काका मला नेहमी वाघीण म्हणतो, त्यावरून तरी माझ्यात कोणाचे गुण आहेत हे तुला कळलेच असेल." हात सोडवण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली.

अरे हो, तुझ्या काकाला भेटवायचे तर राहूनच गेले." तिचा हात आणखी घट्ट आवळत त्याने दुसऱ्या फोटोकडे अंगुलीनिर्देश केला.

"हे तुझे काका, मिस्टर शशांक केळकर. सध्या एसके म्हणून मोठ्या मानाने मिरवतो. आपल्याच वाहिनीशी गोडगोड बोलून पूर्ण कंपनी स्वतःच्या घशात टाकली आणि कोणाला काही करताही आले नाही. व्हेरी इंटेलिजन्ट पर्सन हं." त्याच्या ओठावर हसू पसरले.


"माझ्या काकाबद्दल चुकीचे बोललेले मला खपणार नाही. मुळात तुला आमच्या फॅमिलीशी काय देणंघेणं आहे? हे सगळं का करतो आहेस तू?" राग आणि आश्चर्य दोन्ही सूर एकाचवेळी बाहेर पडले.

"गुड क्वेश्चन! तुझ्या काकाबद्दल मला काही देणं नाहीच मुळी. आहे ते केवळ घेणं! मी दहा वर्षाचा असेतोपासूनचा इतक्या वर्षांचा हिशोब घ्यायचा आहे. माझ्या यातनांचा बदला घ्यायचा आहे." त्याचा स्वर हळवा झाला.

"तुझे माझ्या काकांशी कसले वैर आहे?"

"खुनी आहेत ते." तिच्याकडे बघून तो म्हणाला.

"माझ्या बालपणाचा, बालमनाचा त्यांनी खून केला. त्यांच्यामुळे मी माझ्या वडिलांना मुकलो. आणखी काय काय सांगू?

इथे हे फोटो बघून तुझ्या तुझ्या हातातील ट्रे खाली पडला आणि कपाचे तुकडे तुकडे झाले. मला समज आली तेव्हापासून मी हे फोटो स्वतःजवळ बाळगतो आणि जेव्हा बघतो तेव्हा दरवेळी माझं काळीज असंख्य तुकड्यात विखुरले जाते."

"शौनक, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. काका असा नाहीये. तो तर.."

"ते एकटेच दोषी नाहीयेत. त्यांच्याइतकेच तुझे आईवडील देखील दोषी आहेत. पण मी त्यांना कसली सजा देऊ शकलो नाही. यांना मात्र मी सोडणार नाही."


"तू काय करणार आहेस?" तिने चाचरत विचारले.

"तू घाबरलीस ना? त्यांनाही असेच घाबरवेन." तो मोठ्याने हसून म्हणाला.

"मी माझे मोठे साम्राज्य निर्माण करेन. खूप मोठी कंपनी..आणि तिचा मालक असेल शौनक कारखानीस. म्हणजेच 'एसके.' माझ्या कंपनीपुढे तुझ्या काकाचा बिझनेस कवडीमोल ठरेल आणि मग तोही मला घाबरायला लागेल.

भीती.. भीतीने तो असाच घाबरला पाहिजे. या नव्या एसके समोर त्याची पुरती गाळण उडायला हवी तेव्हाच मला एक आनंद मिळेल. ज्याची मी कित्येक वर्ष वाट पाहतो आहे."

"शौनक, तू चुकतो आहेस." ती त्याला समजावणीच्या सुरात म्हणाली.

"शौनक कधीही चुकत नसतो. कारण तो शेखर कारखानीसचा मुलगा आहे. हा शेखर कारखानीस म्हणजे कोण? ते एकदा विचार तुझ्या काकाला." तो आवेशाने म्हणाला.

"काकापर्यंत पोहचायला म्हणून तू माझ्याशी मैत्री केलीस?" ती भावनिक झाली होती.


"नो, डिअर. माझा प्लॅन वेगळाच आहे. आपल्याला आवडणारी माणसं सोडून गेल्यावर किती दुःख होते याची जाणीव करून द्यायला मैत्रीचे नाटक केले. नाटकच ते. कारण सगळी नाती क्षणभंगुर असतात हे तुला पटवून द्यायचे होते." तो सगळी फोटो बॅगमध्ये कोंबत म्हणाला.


"चल मी रेडी झालोय. आता मला निघायला हवे. माझी फ्लाईट चुकायला नको. तुला थांबायचे असेल तर थांबू शकतेस किंवा जाऊ शकतेस. तसाही उद्यापासून हॅरी इथे राहायला येतो आहे. मात्र मी थांबू शकत नाही." तिच्याकडे बघून त्याने मंद स्मित केले आणि बॅग घेऊन तो बाहेर आला.

'काय होतं हे? जे घडतंय ते स्वप्न? की जे घडून गेले ते स्वप्न? शौनकची माझ्याशी मैत्री फक्त नावापूरतीच होती का? त्याचं वागणं, त्याचं सोबत असणं.. सगळं सगळं खोटं होतं.'

तिचा हुंदका दाटून आला. आपण का रडतोय हेच तिला कळत नव्हते. भिंतीवर टांगलेली त्यांच्या मैत्रीची निशाणी असलेली ट्रिपल एसची फोटोफ्रेम तिने ओढून काढली आणि जोरात फिरकावली.

हॉलभर नुसता काचा विखुरल्या होत्या आणि त्यातच ती केव्हा कोसळली तिलाही कळले नाही.


जाग आली तेव्हा ती तिच्या फ्लॅटवर होती. तिच्या बेडरूममध्ये, तिच्या बेडवर पहुडली होती.

"शौर्या, हाऊ आर यू फीलिंग नाऊ?"

"मला काय झालं होतं?" शिरीनने तिला प्रश्न केला तेव्हा तिनेच तिला उलट विचारले.

"घ्या आता. मी तुला विचारायचे तर तूच विचारते आहेस? बाईसाहेब तुम्ही घरी नव्हता म्हणून काहीसा संशय येऊन मी शौनकच्या फ्लॅटवर गेले होते. तिथे शौनक तर भेटला नाही पण तू मात्र सापडलीस. खाली कोसळलेली. ही बघ, डोक्याला काचेमुळे छोटी जखम देखील झाली आहे.

कसेबसे तुला हॉस्पिटलला घेऊन गेले तेव्हा कळलं की तुझा बीपी शूट झालाय. तिथे दोन तास थांबल्यानंतर आपण घरी आलो आणि त्यानंतर तू झोपलीस ते आत्ता उठते आहेस आणि मलाच विचारतेस की काय झालं होतं. कमाल आहे यार." तिच्याजवळ येऊन बसत शिरीन म्हणाली.


"काय झालंय शौर्या? शौनक गेला म्हणून मनाला जास्तच लावून घेतलेस का? नाही म्हणता म्हणता त्याच्या प्रेमात वगैरे तर पडली नाहीस ना?" ती काहीच बोलत नाहीये हे बघून शिरीन तर्कवितर्क लावत होती.

"सी, तसे असेल तर चांगलेच आहे. ही इज ए स्कॉलर. दोघं सुखाने संसार कराल." शिरीनचे बोलणे संपत नाही तोच शौर्याने तिला घट्ट मिठी मारली.

शिरीनच्या बोलण्यावर शौर्याचे उत्तर काय असेल? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार
******

🎭 Series Post

View all