हवास मज तू! भाग -४६

खरंच का प्रेम फसवं असतं?
हवास मज तू!
भाग -४६

मागील भागात :-

ऑफिसमध्ये शौर्या तिच्या आणि शौनकच्या भूतकाळात हरवून जाते. त्यात रात्र होऊन गेलीय हेही तिच्या गावी नसते. यश उशिरापर्यंत तिच्यासाठी तिच्या ऑफिसबाहेर थांबतो.

आता पुढे.

"शौर्या मॅम, तुमचा ड्राइव्हर तुमची वाट बघत आहे." ती जवळ येताच यशने तिच्यासाठी दरवाजा उघडला.

"यश, अरे काय हे?" ती ओशाळल्यागत म्हणाली.

"कुठे काय? मी सकाळीच तुला घ्यायला येणार हे सांगितले नव्हते का? हं, आता मला वाटलं की तू सहा वगैरे वाजता ऑफिसमधून सुटशील पण तब्बल दोन तासांनी आलीस, म्हणून थांबावं लागलं. त्यात तशी माझीच चूक आहे म्हणा. किती वाजता यायचं हे मी तुला विचारलंच नव्हतं." तो मिश्किल हसत म्हणाला.

"रिअली सॉरी रे. ते मी.. "

"प्लीज शौर्या, तुला मला स्पष्टीकरण द्यायची अजिबात गरज नाहीय. आता लवकर बस. आपण निघूया."

त्याच्या बोलण्यावर ती सकाळप्रमाणे मागे जाऊन बसली आणि तिचा हा तोरा बघून त्याच्या ओठावर हास्य फुलले.

"यश.." धीर एकवटून तिने हाक मारली.

"हं?"

"तुला दोन तास अकारण थांबावे लागले. त्याबद्दल खरंच सॉरी अरे." ती अपराधीपणे म्हणाली.

"ओह, कम ऑन शौर्या. तुझ्यासारख्या सुंदर आणि स्मार्ट मुलीने माफी मागावी असं काहीच घडलं नाहीये. उलट हा वेळ मी माझ्या सत्कारणी लावलाय."

"म्हणजे?"

"म्हणजे तुमच्या वॉचमनशी दोन तास मी गप्पा मारत बसलो होतो. त्यांच्याकडे भरपूर खजिना आहे. परत अशी संधी कधी मिळेल तर नक्की त्या संधीचे सोने करेन." आरशातून तिच्याकडे बघत त्याने उत्तर दिले.


"वेडा आहेस तू." तिच्या ओठावर हसू होते.


"कधीकधी वेडेपणा चांगला असतो. तुला नाही कळणार." तो म्हणाला आणि तिच्या ओठांच्या उमललेल्या पाकळ्या परत मिटल्या गेल्या.


ओठ बंद करून तिने खिडकीतून बाहेर नजर टाकली. बाहेरची गाड्यांची गर्दी बघून तिने डोळे मिटून घेतले.

'ही मुंबापुरी कायम अशीच धावधाव करत राहील का? इथे प्रत्येकाला केवळ स्वतःसाठी जगायचे असते. कायम एकमेकांशी सुरु असलेली शर्यत. कधी थांबेल ही शर्यत?' तिच्या मनात प्रश्न आला.

'आपणही या शर्यतीत भाग घेतल्यासारखे सारखी पळापळ करत आहोत. पण आपली शर्यत नेमकी कोणाशी आहे? शौनकशी? निवीशी? की स्वतःशीच?' मनातल्या विचाराने ती जराशी चरकलीच.

'ही शर्यत, ही स्पर्धा माझ्यासाठी नव्हतीच मुळी. शौनकच्या फासातून आपल्या कंपनीला आणि पर्यायाने नीवीला वाचवण्यासाठी मी इथे आलेय. ही स्पर्धा वगैरे काहीच नकोय मला. पण तरीही कंपनीला वाचवायचे म्हणून मला या क्षेत्रात उतरावेच लागले.

का अशी माणसं माझ्या आयुष्यात आली? मैत्रीचा हात पुढे करून शौनकने त्याच नात्याचे धिंडवडे काढले.

आणि आता हा यश. हा कोण? कुठला? म्हणे प्रेमात पडलाय. याचेही हे नाटकच असेल का? जसे शौनकने मैत्रीचा हात पुढे करून मला फसवले, तसे प्रेमाच्या जाळ्यात ओढून मला अडकवण्याचे या यशच्या मनात तर नसेल?'

तिचे मन उगाच यश आणि शौनकशी तुलना करायला लागले.

'आता कुणात उगाच अडकणे नको. कुठे गुंतणे नको. कुठेतरी दुसरी जागा शोधून याच्या बंगल्यातून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं.'


"मॅम, प्लीज कम आऊटसाईड." कारचे दार उघडत यश तिला अदबीने म्हणाला तसे विचारातून जागी होत तिने त्याच्याकडे गोंधळून पाहिले.

"घर आलंय. बाहेर या." तो मिश्किलीने म्हणाला.

"च्.. वेडीच आहे रे मी. कुठे हरवले होते कळलेच नाही." डोक्याला हात मारून बाहेर येत ती म्हणाली.


"कधीकधी वेडेपणा चांगला असतो आणि त्या वेडेपणात हरवणे त्याहून चांगले." तो हसून म्हणाला.


"काही काय बोलतोस?"


"काही कुठे? खरं तेच सांगतोय. आपल्या वेडेपणाचं एक जग असलंच पाहिजे. ती दुनिया केवळ स्वतःची असते. मनातील भावना, राग, लोभ, मत्सर.. आणि प्रेमही, सारं काही त्या वेडेपणाच्या जगात समावले असतात. जणू काही आपले संवगडीच. एक सांगू? हे संवगडीच कधीकधी माणसांपेक्षा आपल्याला योग्य दिशा दाखवत असतात."

"यू आर इम्पॉसिबल." ती लिफ्टकडे वळत म्हणाली.


"कदाचित हे खरे असेलही. पण तू तुझ्या जगातील त्या मित्रांचे ऐकून तर बघ, तुला तुझा योग्य मार्ग निश्चिच गवसेल." तिच्यासोबत घरात प्रवेश करत तो म्हणाला.


"इतक्यात सर्वच मित्रांची भीती वाटायला लागलीय. कोण कधी फसवेल त्याचा नेम राहिला नाही." स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटत ती तिच्या खोलीत गेली.


आत आल्यावर कसल्याच गोष्टीचा विचार न करता तिने आधी शॉवर घेतला. गार पाणी अंगावर पडताच तिला तरतरी आल्यासारखी वाटली.


"मॅडम, खाली साहेब जेवायला तुमची वाट बघत थांबले आहेत." अर्ध्या पाऊण तासाने गीता दारावर थाप देत म्हणाली.


"इतक्या लवकर जेवण?" तिने प्रश्नार्थक मुद्रा केली.


"अहो, लवकर कुठे? नवच्या वर काटा गेलाय. साहेब इकडे असले की आठच्या आधीच डिनर करतात. आजचा त्यांचा नियम कसा मोडला माहित नाही." ती स्वच्छ हसून उत्तरली.

"ओह असं आहे का? चल मग." शौर्या उठत म्हणाली.


"मी तुला पहिल्यांदा बघतेय गं. तुझं नाव काय आहे?" पायऱ्या उतरताना शौर्याने विचारले.


"मी गीता. इथे काम करणाऱ्या रघू आणि सुमन यांची एकुलती एक मुलगी." गीता स्मित करून म्हणाली.


शौर्या खाली आली तेव्हा यश तिच्या आधीच डायनिंग खुर्चीवर बसला होता. ती बसताच सुमनने दोघांची पानं वाढली.

"एरवी साहेबांना भरेलली भेंडी काय, भेंडीचे नाव सुद्धा चालत नाही. आज मात्र त्यांनी फोन करून आठवणीने ही भाजी करायला लावली." शौर्याच्या ताटात भरली भेंडी वाढताना सुमन म्हणाली.

पानातील भाजी बघून शौर्याच्या डोळ्यात थेंब उभा राहिला. जेव्हा केव्हाही ती परदेशातून घरी परतायची तेव्हा सुनंदाकाकू तिच्या आवडीची भरली भेंडी खास तिच्यासाठी तयार करून ठेवायची. अश्रू लपवत तिने यशकडे एक नजर टाकली. तो तिला खुणेनेच जेव म्हणून इशारा करत होता.

"काय झालं मॅडम? भाजी आवडली नाही का? आईने यापूर्वी कधी केली नव्हती म्हणून मग यू ट्यूबवरून बघून आम्ही दोघींनी मिळून भाजी बनवली."


"नाही गं. भाजी तर फार छान झालीये. मलाच फारशी भूक नाहीये. आज ऑफिसमध्ये छोटीशी पार्टी होती त्यात खाणं झालं." कशीबशी एक चपाती खाऊन ती उठली.

"आय एम सॉरी, माझं पोट भरलंय. आता जाम झोप येत आहे. मी जाते, तुम्ही कंटिन्यू करा." यशकडे बघून त्याच्या उत्तराची वाट न बघता ती तिच्या खोलीत पळाली.

"गीता, भाजी खरंच खूप रुचकर झालीये. तुझ्या हाताला चव आहे बरं." गीताकडे बघून त्याने स्मित केले.

"थँक यू साहेब." ती हसली.


"अगं साहेब म्हणू नकोस म्हणून तुला किती वेळा बजावलं? ही दोघं त्यांची सवय मोडणार नाहीत. किमान तू तरी मला साहेब म्हणू नकोस. तू मला दादाच म्हण."
तो तिला दमटावित म्हणाला.


"थँक यू दादा. तुम्हाला भाजी आवडली म्हणजे नक्कीच छान झाली असेल. पण त्या मॅडम फार जेवल्या नाहीत. त्यांना भाजी आवडली नसेल का?" गीता लहानसा चेहरा करून म्हणाली.

"नाही गं. त्यांनी ऑफिसमध्ये खाल्ले हे सांगितले ना? तू नको काळजी करू. रघुकाका आणि तुम्ही जेवून घ्या. मी ही आता आराम करतो." यश उठत म्हणाला.

खरं तर शौर्या अशी उठून गेली तसे त्याचेही जेवणावरचे लक्ष उडाले होते पण गीताला आणि सुमनला वाईट वाटायला नको म्हणून तो बळेबळे जेवला होता.

******

इकडे बेडवर स्वतःला झोकून देताच इतका वेळ रोखून ठेवलेला शौर्याचा बांध फुटला होता. घरच्या आठवणीने ती कासावीस झाली होती. घरी असल्यावर सतत तिच्या पुढेमागे असलेली सुनंदा आणि ललिता, गुळावर माशी चिटकावी तशी तिला चिपकून असलेली नव्या आणि डोळ्यात अभिमान मिरवणारा तिचा लाडका काका.. आता हे जग पुन्हा कधी वाट्याला येईल ही अपेक्षाच उरली नव्हती.


शौनकमुळे तिची सर्व नाती तिच्यापासून दुरावली होती.. नव्हे त्याने ती हिरावली होती.

"शौनक, यू शुड पे फॉर एव्हरीथिंग." रडतच ती खुसपुसली.

"मी कसेही करून माझी नाती परत मिळवेन पण तू त्यांच्या नजरेतून जेव्हा उतरशील तेव्हा त्यांच्या मनात तुझ्याबद्दल प्रेमाचा लवलेशसुद्धा उरलेला नसेल. तुला वाटतेय की तू जिंकतो आहेस, पण तुझी हरण्याची ही पहिली पायरी आहे. जेव्हा सगळ्यांच्या नजरेत तुझ्याबद्दल तिरस्कार उरला असेल ना तेव्हा तू पुरता कोसळून जाशील अरे.

तुझा राग माझ्यावर होता. काकावर होता. आमची कंपनी, आमच्या बिझनेसवर होता. या सगळ्यात तू माझ्या कोवळ्या निवीला ओढायला नको होतेस." डोळे पुसून ती उठून बसली.

बाल्कनीचा दरवाजा उघडून ती बाहेर आली. आकाशात पडलेल्या पिठूर चंदण्याने आकाश शुभ्र झाले होते त्याच वेळी दोन वर्षांपूर्वी शौनकला भेटायला त्याच्या खोलीत गेल्यावर तिचा पडलेला पांढरा चेहरा तिच्या डोळ्यासमोर तरळत होता.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार
*******

🎭 Series Post

View all