हवास मज तू!भाग -४५

वाचा शौर्या आणि नव्याची कथा.
हवास मज तू!
भाग-४५.

मागील भागात :-
ऑफिसमध्ये आलेली शौर्या शौनक आणि शिरिनच्या आठवणीत गुंतते.

आता पुढे.

"त्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीय. आमची कंपनी, बिझनेस सारं काही माझ्या बहिणीसाठी असले. मी फक्त फ्री बर्ड सारखी इकडे तिकडे विहरत राहीन आणि मग एखाद्या एनजीओशी जुळून जाईल." ती म्हणाली.

"बाय द वे तुझा फ्युचर प्लॅन काय आहे?" तिच्या प्रश्नावर त्याचे डोळे चमकले.

"तुझ्या सारखाच माझाही फ्युचर प्लॅन एकदम क्लिअर आहे.फरक एवढाच की तुला तुझा बिझनेस नकोय आणि मला तो हवाय." तिच्या नजरेत खोल बघत तो उत्तरला.

"तुला सांगू? माझी एक मोठ्ठी कंपनी असेल. लाखो-करोडोच्या उलाढाली.. सर- सर म्हणून माझ्या मागे असणारा सर्वांचा गराडा. फुल्ली एअरकंडिशन्ड असलेली माझी केबिन, तिथली महागडी असलेली माझी खुर्ची आणि टेबलवर सजलेली नेमप्लेट.. 'एस के' स्टॅंड्स फॉर शौनक कारखानीस." डोळ्यात चमक घेऊन तो बोलत होता.

"वॉव! मस्तच. आवडलं मला. फक्त ते नाव मात्र चेंज कर. कारण एसके आमच्या कंपनीचे ब्रँड नेम आहे."
ती हसून म्हणाली त्यावर तोही हसला.


"यू नो शौर्या, माणसाने मोठमोठी स्वप्न बघावीत म्हणजे ते पुरे करण्याचे बळ आपसूकच मिळते. तू बघशीलच माझे स्वप्न नक्कीच पुरे होईल."

"तथास्तु!" तिने स्मित करत हात वर केला आणि दोघेही परतीच्या वाटेला निघाले.

*******

'शौनक, का असं वागलास तू? तुझ्यावर विश्वास टाकून मी आपली मैत्रीची नाते स्वीकारले होते तू मात्र बेमालूमपणे त्या नात्याची हत्या करून टाकलीस. इतका निष्ठुर कसा झाला आहेस रे तू?' शौर्य मनातच बोलत होती.

त्या वर्षभरात शौर्या, शिरीन आणि शौनक या तिघांचा एकदम घट्ट बॉण्ड झाला होता.


"लुक, 'शौशिशौ!' वाव कसलं भारी वाटतंय ना हे?" हातात एक मोठी फ्रेम घेऊन शिरीन शौर्यकडे बघून म्हणाली.


"ए, काय गं हे? म्हणायला किती विचित्र वाटतंय? 'शौशिशौ? काही मिनिंग तरी जुळते का त्याचा?" त्या फ्रेमकडे विचित्रपणे बघत शौर्या उद्गारली.

अगं आपल्या नावाची आद्याक्षरे आहेत ही. शौर्या, शिरीन आणि शौनक मीन्स 'शौशिशौ' साऊंड कूल ना?" एक गोड स्मित करत शिरीन म्हणाली


"याह! इट्स साऊंड कूल पण म्हणायला अवघड आहे. त्यापेक्षा हे बघ." शिरीनने आणलेल्या फ्रेमपेक्षा मोठी फ्रेम आत घेऊन येत शौनक म्हणाला


"वाव इट्स वंडरफुल! किती मस्त आहे हे?" त्याच्या
हातातील फ्रेम पकडत शौर्य आनंदाने म्हणाली.

इंग्रजीमध्ये 'ट्रिपल एस' कोरलेले ती सुंदरशी फ्रेम होती. त्यावरची रंगसंगती सहज कुणाचेही लक्ष वेधून घेईल अशी होती.


"आवडलं ना तुला? थँक्यू अँड हॅपी फ्रेंडशिप डे माय डियर एस एस बडीज." दोघींना विश करा तो गोड हसला.


"थँक्यू डियर. शिरीन आपण फ्रेम ना आपल्या हॉलमध्ये लावूया." शौर्या.


"तुला शेवटी याचेच गिफ्ट आवडते माझ्या प्रेमाची तर काही व्हॅल्यूच नाही." शिरीन लटक्या रागाने म्हणाली.

"ए असं कोण बोललं? ही फ्रेम आपण आपल्या स्टडीरूम मध्ये लावूया म्हणजे एवढा भयानक काही वाचण्यापेक्षा आपण अभ्यास तरी करत जावू." शौर्या तिला चिडवत म्हणाली तशी शिरीन तिला मारायला धावली.

"शिरीन.. सॉरी ना."

त्या आठवणीत बुडालेली शौर्या नकळत मोठ्याने बोलून गेली. तिच्याच आवाजाने तिने डोळे उघडले. तिथे शिरीन नव्हती. समोर होता तो टेबल. त्यावरचा लॅपटॉप आणि फाईलींचा गठ्ठा.

'शिरीन, शौनकच्या मदतीने मला किती सहज गंडवलेस? मी मात्र आपल्या ट्रिपल एसचा बॉण्ड घट्ट करण्यात गुंतले होते. मला सांग, मैत्री सुद्धा अशी फसवी असते का गं?' गालावर उघडलेले अश्रूचे थेंब पुसून शौर्याने घोटभर पाणी प्याली. 350


त्यांच्या मैत्रीचा प्रवास अधिक घट्ट होतोय असे शौर्याला वाटत असताना अचानक एक घटना घडली की तिचा या नात्यावरचा विश्वासच उडून गेला होता.


तो दिवस तिला डोळ्यासमोर लख्खपणे आठवत होता. कितीही विसरायचा म्हटला तरी न विसरता येणारा तो दिवस.

शौनकची परीक्षा आटोपली होती आणि तो भारतात परत येणार होता. आदल्या दिवशी त्या तिघांची छोटेखानी पार्टी झाली होती. मायभूमीत परत जातोय याचा आनंद आणि आपल्या पासून दूर जाणार याचे दुःख.. दोघींच्या भावना सारख्याच होत्या.

"शौनक, इंडियात गेल्यावर आम्हाला विसरणार तर नाहीस ना? म्हणजे तू तुझ्या बिझनेसच्या पाठी लागशील, मोठा माणूस बनायला सुरुवात करशील. त्या सगळ्या गोंधळात आम्ही तुझ्या लक्षात राहणार ना?" ती त्याला कोपरखळी मारत म्हणाली पण चेहऱ्यावर दुराव्याचे दुःख स्पष्ट झळकत होते.


"माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही विसरण्यासारख्या तरी आहात काय? स्वप्नात जरी तसा प्रयत्न करायला गेलो तरी दोघी माझ्या मानगुटीवर बसून माझा जीव घ्याल." तो हसून म्हणाला.


"जोक अपार्ट, पण खरंच मी तुम्हाला कधीच विसरणार नाही आणि शौर्या तुला देखील मला विसरू देणार नाही. मला पक्की खात्री की तू रोज माझी आठवण करशील."

"अँड व्हॉट अबाऊट मी?" शिरीन डोळे मोठे करून म्हणाली.

"डफर, तू सुद्धा. दोघी एकत्र असता तर एकत्रच मिस करणार ना?" तिला मिठीत घेत त्याने तिला हलकेच थोपटले.

दुसऱ्या दिवशी तो प्रवासाला निघणार होता. पेपर असल्यामुळे त्याला सोडायला जाणे शौर्याला जमणार नव्हते. आदल्या दिवशी भावूक झालेली शिरीन आज मात्र सकाळपासूनच बॉयफ्रेंडसोबत बाहेर गेली होती. त्यातून मध्यम मार्ग काढत परीक्षेच्या एक तासापूर्वी शौर्या त्याच्या फ्लॅटवर पोहचली.


ती गेली तेव्हा फ्लॅटचा मुख्य दरवाजा उघडा होता. त्यामुळे बेल न वाजवतात ती आत प्रवेशली. हॉलमध्ये तसे कोणीच नव्हते. भिंतीवर टांगलेली ट्रिपल एसची दुसरी फ्रेम दिमाखाने मिरवत होती. फ्रेम बघून शौर्याने गालात मंद स्मित केले.


'खरच आमची मैत्री किती अनोखी आहे? या मैत्रीला कुणाची नजर लागायला नको.' मनात बोलत ती आत डोकावली.

यावेळी शौनक त्याच्या बेडरूम मध्ये असेल याची तिला कल्पना होती. त्याला डिस्टर्ब न करता ती हलक्या पावलांनी स्वयंपाक घरात गेली. यापूर्वी ती शिरीनसोबत अनेकदा इथे आली होती. त्यामुळे तिथल्या वस्तूची तिला माहिती होती.

दोघांसाठी कडक कॉफी तयार करून तिने ते कपात ओतले आणि ट्रे घेऊन ती त्याच्या बेडरूममध्ये आली. अपेक्षेप्रमाणे तो तिथेच होता.

"सरप्राऽईज!" ती आनंदाने ओरडली आणि त्याचवेळी समोरचे दृश्य पाहून तिच्या हातातील ट्रे खाली पडला. चेहरा अचानक पांढराफट्ट झला होता.

******
"शौर्या मॅडम, आठ वाजलेत. पूर्ण स्टॉफ घरी गेलाय. मलाही जायचे आहे. तर.." दिनकर केबिनचे दार उघडत तेथूनच बोलत होता. ती मात्र एका वेगळ्याच नजरेने त्याच्याकडे पाहू लागली.

"शौर्या मॅडम.. ऑफिस बंद करायचं ना?"'तिचा काहीच प्रतिसाद नाही हे बघून त्याने पुन्हा विचारले.

जणू काही लागलेली तंद्री अचानक मोडावी तशी ती भूतकाळातून बाहेर आली.

"अं? हो. निघूया. त्यापूर्वी प्लीज एक स्ट्रॉंग कॉफी घेऊन येतोस का?" यावेळी तिच्या स्वरात आदेश नव्हता तर एक विनंती होती.

"हो मॅडम आलोच." नाईलाज असला तरी त्याला ते काम करावे लागणार होते.

शौर्या उठून बेसिनपाशी आली. चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिपका मारल्यावर असा तिचा अंदाज खोटा ठरला.

'या डोकेदुखीमुळे लवकरच मी मरणार आहे.' आरशातील स्वतःच्या चेहऱ्याकडे बघून त्यावरचे पाणी टिपत ती म्हणाली.

"मॅडम, कॉफी." दिनकरने टेबलवर कप ठेवत तिला आवाज दिला.

"थँक यू." तिने स्मित करत ओठाला कप लावला.

"दिनकर मी निघतेय. तू एकदा सगळं चेक करून घे आणि मग जा." लॅपटॉप आणि पर्स सांभाळत ती केबिनबाहेर येत त्याला म्हणाली.

"हो मॅडम." म्हणत तो कामाला लागला.


ऑफिस गेटच्या बाहेर पडेपर्यंत आपण कुठे जाणार आहोत याची तिला कल्पना नव्हती. दिवसभरात यश प्रकरण तिच्या खिजगणतीलाही उभे राहिले नव्हते. तशात ऑफिसच्या बाहेर आल्याबरोबर तिला काहीशी ओळखीची वाटणारी एक कार उभी असलेली दिसली आणि आपोआप तिचा हात डोक्यावर गेला.

"शौर्या मॅम, तुमचा ड्राइव्हर तुमची वाट बघत आहे." ती जवळ येताच यशने तिच्यासाठी दरवाजा उघडला.

"यश, अरे काय हे?" ती ओशाळल्यागत म्हणाली.

"कुठे काय? मी सकाळीच तुला घ्यायला येणार हे सांगितले नव्हते का? हं, आता मला वाटलं की तू सहा वगैरे वाजता ऑफिसमधून सुटशील पण तब्बल दोन तासांनी आलीस, म्हणून थांबावं लागलं. त्यात तशी माझीच चूक आहे म्हणा. किती वाजता यायचं हे मी तुला विचारलंच नव्हतं." तो मिश्किल हसत म्हणाला.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
******

🎭 Series Post

View all