हवास मज तू!भाग -४४

वाचा शौर्या आणि नव्याची कथा.
हवास मज तू!
भाग -४४

मागील भागात :-
मिस्टर दास आणि त्यांच्या बॉससोबत मिटिंगमध्ये सहभागी होण्याचे ठरवते.

आता पुढे.

"विनीत, तुला कदाचित मी स्वार्थी वाटत असेल तर सॉरी रे." त्याच्याजवळ सरकत कीर्ती म्हणाली.
"पण बघितलेस ना, मॅम काय म्हणाल्या? हाजीर तो वजीर असंच ना?

सी, आपण काही तिचा प्रोजेक्ट चोरून किंवा काही काड्या करून आपल्या नावावर शो करत नाही आहोत तर मॅमनी आपल्याला सांगितलेय म्हणून आपण केलंय. मग जर त्याचा काही फायदा झाला तर का नाकरायचं?" कीर्ती त्याला उलट विचारत होती.

"विनीत, बी प्रॅक्टिकल यार. आता बघ, आपण गेल्या वर्षभरापासून रिलेशन मध्ये आहोत. माझ्या घरी मला लग्नासाठी आडून आडून विचारणं सुरु झाले आहे. या प्रोजेक्ट मुळे आपले इन्क्रिमेंट वाढले तर मला घरी तुझ्याबद्दल सांगायला सोपे जाईल.

आता आणखी जास्त काळ मी हे टाळू शकणार नाही. तू मला प्रपोज केलेस आणि मीही हो म्हणालेय. पण आता घरच्यांचा होकार देखील आवश्यक आहे ना?" तिचे हळवे होत बोलणे त्याला पटत होते.

पण हे घडण्यासाठी प्रोजेक्टमध्ये आणखी सुधारणा आवश्यक होती. तो तिला मान डोलावून कामाला लागला.
******

विनीतने पाठवलेला मेल शौर्या चेक करत होती. तशा फारश्या काही चुका नव्हत्याच पण तिने मुद्दाम त्यांना कामाला लावले होते.

'निवी, किती हुशार आहेस यार? इतक्या कमी वेळात किती परफेक्ट प्रेजेंटेशन तयार केलेस. काकाची नजर एखाद्या जोहऱ्याप्रमाणे आहे. त्याने तुझ्यातील कॅलिबर अचूक ओळखले आणि ऑफिस जॉईन करायला लावले. खरंच यार खूप मोठी होणार आहेस तू. इतकी हुशार असूनही का त्या मूर्ख मुलाच्या मागे पडलीस हेच मला कळत नाही.

त्यात तुझा तरी काय दोष म्हणा? एवढी पारखी नजर असलेल्या काकानेच त्याच्या बद्दल धोका खाल्ला, तू तर आत्ता कुठे या मायाजाळात पाऊल ठेवले आहेस.'
एक दीर्घ श्वास घेऊन तिने खुर्चीला रेलून डोळे मिटून घेतले.


ती तरी कुठे शिरीनला ओळखू शकली होती? तिच्याजवळ मनाचे पुस्तक उघडे करताना ती आपल्याला फसवेल असा विचारही मनाला शिवला नव्हता.


शिरीनच्या माध्यमातून तिची शौनकशी ओळख झाली आणि त्यांची मैत्री बऱ्यापैकी फुलत गेली होती. विकेंडला कित्येकदा हे त्रिकुट भटकायला निघत होते. कधी कधी मात्र शिरीन या दोघांना सोडून आपल्या बॉयफ्रेंडसोबत जात असे.

"दर तीन चार महिन्याला एक नवा बॉयफ्रेंड! हिला कसं परवडतं गं?" एकदा लेट नाईट कॅफेमध्ये गप्पा मारताना त्याने विचारले.


"हिला परवडण्याचा प्रश्न कुठे येतो? तिचे खर्च तिचे बॉयफ्रेंड करतात, त्यांना कसं परवडतं तो खरा प्रश्न आहे." तिने हसत टाळी द्यायची म्हणून हात समोर केला.

तो मात्र टाळी ऐवजी तिचा हात हातात घेत निरीक्षण करू लागला.

"तुला एक बहीण आहे ना?" तिच्या हातावर नजर रोखून त्याने विचारले.


"हो.. पण तुला कसं कळलं?" आजवर तिने त्याला हे सांगितले नव्हते.

त्यालाच काय शिरीनशी देखील या विषयावर ती कधी बोलली नव्हती. इथे परदेशात तिला तिच्या श्रीमंतीचे आणि कुटुंबाचे प्रदर्शन करायचे नव्हते.

नाही पेक्षा त्याला पहिल्यांदा भेटली तेव्हा मुंबईत त्यांची एक छोटीशी कंपनी आहे हे ती बोलली होती आणि त्यावर ती मोठया घरची हस्ती आहे हे त्याला कळले होते. पण तिने आपल्या कुटुंबियांचा उल्लेख करणे टाळले होते. आणि आज तो तिच्या बहिणीबद्दल बोलतोय हे बघून तिला आश्चर्य वाटत होते.

"ॲक्च्युली, मला ज्योतिषशास्त्र थोडेफार कळते." तो मंद हसत म्हणाला.


"चल, काहीतरीच. अशा गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही हं. हातावरच्या रेघा बघून असे काही सांगता येते का?" त्याच्या हातातून हात सोडवत ती म्हणाली.


"अगं खरंच. असं असते. आपल्या हातावरच्या रेघा आपल्याशी बोलतात पण त्यांना आपल्याला ऐकता यायला हवे. शिरीनचा देखील विश्वास नव्हता पण जेव्हा मी तिच्या फॅमिलीबद्दल बोललेले शब्द न शब्द खरे ठरले तेव्हा तिलाही माझे म्हणणे पटले. म्हणूनच तर आमची मैत्री आणखी घट्ट झाली.

कुणाला सांगू नकोस पण नवा बॉयफ्रेंड शोधण्यापूर्वी ती नेहमी माझा सल्ला घेते, इतका तिचा माझ्यावर विश्वास आहे." तो मिश्किल हसला.


"काहीही काय सांगतोस? मला तर हे अजिबात खरं वाटत नाहीये." ती उद्गारली.


"आय स्वेअर! एकदा आजमावून बघ तरी." तिचा हात हातात घेत तो म्हणाला.
"अतिशय लाडाकोडात वाढलेली मुलगी आहेस बट नो स्पॉईल्ड गर्ल. घरात श्रीमंती सुखाने नांदते आहे.."

"मी आमच्या एसके कंपनी बद्दल सांगितले म्हणून तू हे बोलतो आहेस ना?" ती हसून म्हणाली.

"व्हॉटएव्हर." तो हसला.

"हे काय?" अचानक डोळे विस्फारून त्याने तिच्याकडे पाहिले.

"काय झाले?" तिची प्रश्नार्थक मुद्रा.

"घरात सगळी सुख आहेत पण मनातून तू आनंदी नाहीस. तुझ्या पेरेंट्सना तू खूप मिस करतेस ना?" तिच्या डोळ्यात आरपार बघत तो म्हणाला.


"ऑफकोर्स! आपला देश सोडून आपण इतक्या लांब राहतो तर त्यांना मिस करणारच ना? तुही तुझ्या पेरेंट्सना मिस करत असशीलच की." आपला हात ओढून त्याला वेड्यात काढत ती म्हणाली.


"हं. पण मी तुझ्या खऱ्या आईबाबांबद्दल बोलतोय. जे या जगातच नाहीयेत. तुझ्या काका काकूंचे तुझ्यावर अफाट प्रेम असले तरी तू तुझ्या जन्मदात्यांना विसरू शकली नाहीयेस, हे खरंय ना?"

त्याने त्याची स्थिर नजर तशीच रोखून विचारले आणि शौर्याच्या डोळ्यातून खळकन पाणी खाली सांडले.


"काही काय बोलतो आहेस?" तिचा स्वर डळमळीत झाला होता.


"तेच जे तुझ्या हातावरच्या रेघा तुझ्या डोळ्यात उतरून बोलत आहेत. शौर्या, सर्वांसोबत राहूनही एकटेपणा काय असतो हे मला चांगल्याने माहित आहे. बिकॉज आय अल्सो लूज माय फादर.

त्यामुळे तू सुद्धा तुझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांच्या गराड्यात असूनही किती लोनली फील करत असशील याची कल्पना मी करू शकतो." बोलता बोलता तो स्वतःबद्दल सांगून गेला.


"ॲक्च्युली आय मिस देम. ते गेले तेव्हा मी काही फार मोठी नव्हते. तरीही मनाच्या कप्प्यात सर्व आठवणी जशाच्या तशा साठून आहेत. माझे काका काकू माझे खूप लाड करतात. स्वतःच्या मुलीपेक्षाही जास्त पण तरीही माहित नाही का? बट आय मिस माय ओन पेरेंट्स.

आपलं जीवन म्हणजे मृगजळ असतं रे. जे आहे त्याला सोडून नाहीये त्याच्या पाठी आपण लागतो." ती खिन्न होऊन म्हणाली.

"बरं आता ते सोड, मला सांग माझा कुणी बॉयफ्रेंड वगैरे असणार आहे की नाही?" तिने हसून हात पुढे केला. दुःख कुरवाळत राहायची सवय तशी नव्हतीच.

"हम्म.. बॉयफ्रेंडचे सुख काही तुझ्या नशिबी नाही कारण तुझ्या स्वभावामुळे मुलं काही तुझ्याकडे जास्त फिरकत नाहीत." तो मिश्किल हसत म्हणाला तसे तिने त्याच्या पाठीत एक गुद्दा हाणला.

"अगं अगं.. मारतेस काय? पूर्ण ऐकून तर घे. फायनली जो कोणी तुझ्या आयुष्यात येईल ना तो मात्र जाम लकी असेल."

"कसा?"

"कारण तू त्याच्याकडून हॉटेलिंग, शॉपिंगवगैरे साठी पैसे उकळणार नाहीस ना. उलट तूच त्याला काही ना काही गिफ्ट करत राहशील." तो पुन्हा हसला आणि हिने रागाने हात काढून घेतला.


"शौर्या, शौर्या.. सॉरी ना अगं. मी फक्त गंमत करत होतो. खरं तर जो मुलगा तुझ्या आयुष्यात येईल तो खरंच भाग्यवान असेल यात शंका नाही. तू त्याच्यावर एवढं प्रेम करशील की तो तुझ्यासाठी काहीही करायला तयार असेल." ती जायला निघाली तसा तिच्या मागे धावत येत शौनक म्हणाला.


"सो फनी. मिस्टर कारखानीस, यू नो? अशा गोष्टीसाठी माझ्याकडे वेळच नाहीये. हे प्रेम, लग्न बिग्न.. आय डोन्ट लाईक. लग्न करा, मुलांना जन्म द्या. त्यांच्या भविष्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घाला. मला नकोय हे सगळं.

आपला फंडा एकदम क्लिअर आहे. मस्त शिकायचं. दूर दूर फिरायचं. लाईफ एंजॉय करायचं. मुलं म्हणशील तर माझी स्वीट सिस्टर आहेच. तिच्यावर माझं एवढं प्रेम आहे की कधी कधी मला ती माझी मुलगी वाटते. तेव्हा मला अजून काहीच नको."


"आणि तुमचा बिझनेस?"


"त्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीय. आमची कंपनी, बिझनेस सारं काही माझ्या बहिणीसाठी असले. मी फक्त फ्री बर्ड सारखी इकडे तिकडे विहरत राहीन आणि मग एखाद्या एनजिओशी जुळून जाईल." ती म्हणाली.

"बाय द वे तुझा फ्युचर प्लॅन काय आहे?" तिच्या प्रश्नावर त्याचे डोळे चमकले.

काय असेल त्याचे उत्तर? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार


🎭 Series Post

View all