हवास मज तू!
भाग -४०
भाग -४०
मागील भागात :-
पबमध्ये एक तरुण नशा चढलेल्या शौर्याची छेड काढण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यापासून तिला दूर करत एक घाऱ्या डोळ्यांचा तरुण तिला आपल्या घरी घेऊन येतो.
पबमध्ये एक तरुण नशा चढलेल्या शौर्याची छेड काढण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यापासून तिला दूर करत एक घाऱ्या डोळ्यांचा तरुण तिला आपल्या घरी घेऊन येतो.
आता पुढे.
पंधरा मिनिटांपूर्वी अविरत बडबड करणारी ती हीच का? असा त्याला प्रश्न पडला आणि त्या प्रश्नासरशी त्याच्या ओठावर स्फूट हसू उमटले.
तिच्याकडे टक लावून बघतच तो सोफ्यावर आडवा झाला. निद्रादेवीने त्याला कधी तिच्या कुशीत घेतले त्यालाही कळले नाही.
******
सूर्याची कोवळी किरणे डोळ्यावर पसरायला लागली आणि त्या स्पर्शाने शौर्याची झोप चावळली.
किलकीली नजर करत तिने पडल्यापडल्या अंगाला आळोखेपिळोखे दिले आणि क्षणार्धात करंट लागल्यासारखी उठून बसली. आपल्या अंगावरचा शॉर्ट आणि स्लीव्हलेस ड्रेस बघून तिने अंगावर पांघरून घेतले आणि इकडेतिकडे बघून निरीक्षण करू लागली.
एका मोठ्या अशा आलिशान बेडरूमध्ये ती होती. ती ज्यावर ती निजली होती तो बेड देखील त्या खोलीला साजेसा असा मोठा महाराजा बेड होता. निळ्या रंगाच्या भिंतीवर महागडे पेंटिंग्स लावले होते. भल्यामोठया खिडकीतून डोकावणारी सूर्याची किरणे आणि ताजी हवा खोलीतील वातावरण प्रफुल्लित करत होते.
ती कुठे आहे हे मात्र तिला कळेना. रात्रीचे अंधुकसे तिला आठवायला लागले तेव्हा तिच्या हातात ड्रिंक भरलेला ग्लास आणि एका तरुणाने तिचा धरलेला हात हे आठवले. त्यानंतर तिने त्याच्या कानशिलात लगावली होती हेही अंधुकसे तिला आठवले. पण त्यानंतर नेमके काय घडले याचा तिला अंदाज येईना. डोक्याला ताण देऊनही नीटसे आठवत नव्हते.
तिची नजर बाहेर बाल्कनीच्या बाजूने उघडत असलेल्या दरवाज्याकडे गेली. तिथे तरी काही संदर्भ लागतो का? असा विचार करून शौर्याने उठण्याचा प्रयत्न केला आणि तिला गरगरल्यासारखे होऊन ती तिथेच बसली.
"गुडमॉर्निंग! आता कसं वाटतंय? नीट झोप झाली ना?" ती डोक्याला हात लावून बसली तेवढ्यात तिच्या कानावर एक स्वर ऐकू आला. थोडासा ओळखीचा नि काहीसा अनोळखी आवाज ऐकून तिने डोळे उघडून नजर वर केली.
हातात ट्रे पकडून एक तरुण समोर उभा होता. उंच, गोरा वर्ण, घारे डोळे, रोजच्या व्यायामाने कमावलेली भारदस्त बॉडी. त्याच्याकडे तिने निरखून पाहिले. ओळखीची अशी एकही खुण तिला सापडत नव्हती.
"ए कोण आहेस तू?" कशीबशी उठत ती त्याच्यावर झेपावली.
"शौनक आहेस का तू? आता चेहरा बदलवून माझ्या समोर आलाहेस. डोळ्यात मुद्दाम लेन्स घालून ते घारे केलेस ना? मी तुझे हे डोळेच बाहेर काढते."
ती रागाने त्याच्या डोळ्यात बोट घालणार तोच त्याने तिचा दंड पकडला आणि तिला खाली बसवले.
"रात्रीचा हँगओव्हर अजून गेला नाहीये. तुला याची गरज आहे." बाजूच्या खुर्चीवर शांतपणे बसून त्याने तिच्यासाठी लिंबूपाणी तयार करून दिले.
"हे पी म्हणजे जरा बरं वाटेल आणि माणसा-माणसातील फरक कळेल." तिच्या हातात ग्लास देत तो म्हणाला.
शौर्याने काहीशा संशयी नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि पाण्याचा घोट घेतला. डोके दुखायला लागल्यामुळे तिला तशी गरज होतीच.
ती लिंबूपाणी पीत आहे हे बघून त्याने त्याच्यासाठी आणलेली ग्रीन टी कपात ओतली आणि तोही चहाचा आस्वाद घेऊ लागला.
"कोण आहेस तू? म्हणजे तुम्ही कोण आहात?" ग्लास रिकामा झाल्यावर तिने त्याला प्रश्न केला. तिचा आवाजाची धार थोडी सौम्य झाली होती.
"डोन्ट वरी, मी शौनक कारखानीस म्हणजेच तुमचा विहान नाहीये." मिश्किल हसून तो उत्तरला.
"शौनक बद्दल तुम्हाला कसे ठाऊक? तू त्याचा माणूस आहेस का?" तिच्या डोळ्यात रागाची छटा उमटली.
"नाही मी कुणाचाच माणूस नाही." त्याने स्मित करत उत्तर दिले. मी फक्त माझाच माणूस आहे. मी यश. यश पाटील." त्याने तिच्यापुढे हात समोर केला. तिने मात्र त्याच्या हातात हात देण्याचे टाळले. तसे त्याने आपला हात लगेच मागे घेतला.
"शौनक बद्दल तुला.. आय मिन तुम्हाला काय माहिती आहे?" तिने सांशकतेने विचारले.
"तू जे सांगितलेस तेच." त्याचे ओठ परत रुंदावले.
"आणि हो, मला केवळ यश म्हटलेस तरी चालेल. तुझ्यापेक्षा फार फार तर दोन वर्षानेच मी मोठा असेल. बोलताना कधी तू कधी तुम्ही असं म्हणतेस तर मला अवघडल्या सारखं होतं." तो पुढे म्हणाला.
"शौनक बद्दल मी काय आणि केव्हा सांगितले?" त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती.
"काल रात्री. नशेत फूल टल्ली होतीस तेव्हा."
"काय?"
"हेच की गंगाधर ही शक्तिमान है." तिचे वाक्य आठवून तो पुन्हा हसला आणि तिच्या चेहऱ्यावर संतापाची रेघ उमटली.
"म्हणजे विहान आणि शौनक हे दोघे वेगवेगळे नसून या दोन्ही एकच व्यक्ती आहेत हे सांगितलंस." तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तो वरमून म्हणाला.
"आणखी?"
"शिरीनने तुला कसं फसवलं? निवीवर तुझे किती प्रेम आहे हेही सांगितलेस. मला एक कळत नाही, तुझ्या आयुष्यात शौनक नावाचा एक मुलगा आहे त्या सोबत पुन्हा दोन दोन मुली. हे सगळं तू कसे मेंटेन करतेस गं?"
त्याच्या प्रश्नावर तिने त्याच्याकडे जळजळीतपणे पाहिले.
"आणखी एक गोष्ट आठवलीय. कोणत्या तरी डिअर एसकेना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलं हे सांगताना तुझ्या डोळ्यात पाणी होतं."
"ओ माय गॉड. मी पार विसरूनच गेले होते. मला निघायला हवं. माझे ऑफिस.. माझं वर्क. शीट! कुठली दुर्बद्धी सुचली आणि मी पबला गेले." एसके चे नाव घेतल्याबरोबर तिला कालचा दिवसभराचा घटनाक्रम आठवला आणि ती जायला उठली.
"मिस्टर यश, थँक यू सो मच. रात्री मला जास्त झाली म्हणून तुम्ही मला इथे घेऊन आलात त्याबद्दल धन्यवाद. आता मला निघायला हवं." बाजूच्या टेबलवर असलेला तिचा क्लच घेऊन ती उभी झाली.
"मिस शौर्या केळकर, आत्ताच जायला हवं का?" ती उठली तसे त्याने शांत स्वरात तिला विचारले.
"व्हॉट? तुम्हाला माझं नाव कसं माहित? की मी तेही नशेत बरळले?" तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले.
"ऑलरेडी आय नो एव्हरीथिंग अबाऊट यू. एसके कंपनीचे मालक मिस्टर शशांक केळकर यांची पुतणी, एम. के. गांधी कॉलेजची ब्रिलियंट एक्स स्टुडन्ट, आणि प्रेजेंटली न्यूयार्क युनिव्हर्सिटीमध्ये एमबीएच्या सेकंड इयर ची हुशार विद्यार्थीनी.."
"माझ्याबद्दल एवढं सगळं तुम्हाला कसे माहिती आहे?"
तो बोलत होता की तिने त्याला मध्येच थांबवले.
"ते तेवढे महत्त्वाचे नाहीये. मिस्टर शशांक केळकर हॉस्पिटलमध्ये आहेत तर तुला ऑफिसला जायचे होते ना? त्याच्या तयारीला लाग. तुझे सर्व सामान आणि लॅपटॉप या कपाटात आहेत. तू तुझे आवरून घे." तिचा ग्लास आणि स्वतःचा कप ट्रे मध्ये घेऊन जायला निघत तो म्हणाला.
"एक मिनिट. मिस्टर यश, माझे सामान इथे कसे आले?" तिने प्रश्न केला.
"कारण ज्या हॉटेलमध्ये तू होतीस ते माझ्या मालकीचे आहे. आणि तात्पुरती का होईना तू एसके कंपनीची ओनर आहेस. तेव्हा तू असे हॉटेलमध्ये राहणे मला रुचले नाही सो मी तुझे सामान इकडे बोलावून घेतले."
"माझ्या सामानाला हात लावण्याची तुमची हिंमत कशी झाली आणि मुळात मी कुठे राहावे हे ठरवणारे तुम्ही कोण?" तिचा चिडका स्वर.
"मी कोण? हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास तू माझी गेस्ट आहेस. तुझे आवरून झाले की खाली ये. मी ब्रेकफास्टसाठी वाट बघतोय." ओठ रुंदावून तो बाहेर गेला.
तो गेल्यावर ती विचार करत तिथेच उभी होती.
'हा यश कोण आहे? आणि इतका अधिकारवाणीने का वागतोय? माझे सामान, लॅपटॉप सारं काही इथे घेऊन आलाय. देवा, याने माझ्या वस्तूशी किंवा माझ्याशी काही छेडखानी वगैरे केली तर नाहीये ना?'
तिने स्वतःच्या शरीरावरून एक नजर टाकली आणि व्यवस्थित असलेला ड्रेस परत नीट करून कपाट तपासू लागली.
तिच्या सर्व बॅगा जशाच्या तशाच आत ठेवल्या होत्या. कुठलेही सामान इकडचे तिकडे झाले नव्हते. इक सुटकेचा निःश्वास सोडून ती बाथरूममध्ये गेली.
पंधरा वीस मिनिटामध्ये स्वतःचे आवरून ती खोली बाहेर आली तेव्हा तिला कळले की ती ज्या खोलीत आहे ती वरची रूम आहे.
'म्हणजे हा मला त्याच्या हातात पकडून एवढ्या पायऱ्या चढून वर घेऊन आला?' त्या विचाराने तिच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला.
तिची नजर खाली गेली. डायनिंग टेबलवर यश तिचीच वाट बघत होता. ती येईपर्यंत त्याने स्वतःचे आवरून घेतले होते.
सुटाबुटातील तो मघापेक्षा एकदम डॅशिंग असा कुणीतरी वेगळा भासत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा करारीपणा, गौरवर्णावर झळकणारे तेज.. ती त्याला तिथूनच निरखत उभी होती.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.