हवास मज तू!भाग -३७

वाचा नव्या आणि शौर्याची कथा.
हवास मज तू!
भाग-३७

मागील भागात :-

विहान शौर्याला भेटतो आणि तिच्या इथे परत यायला त्याने कसे भाग पाडले हे तिला सांगतो. नव्यापुढे तिला वाईट ठरवण्यासाठी तो पुन्हा नाटक करतो आणि नव्याच्या मनात शौर्याबद्दलची तिरस्काराची भावना आणखी वाढीला लागते.

आता पुढे.

शौर्याला आपल्या जवळ खेचत तिच्या ओठावरून बोट फिरवून तिची लिपस्टिक स्वतःच्या ओठावर लावली त्याने पुन्हा तिला थोडे दूर सारले. तो काय करतोय हे क्षणभर तिला कळलेच नाही.समोरून येणाऱ्या नव्याने मात्र त्याच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या तिला पाहिले आणि विहानचे बोलणे देखील ऐकले.

खरे तर तिने ऐकावे म्हणूनच तो मुद्दाम जोराने बोलायला लागला होता.

"दीऽऽ, काय करते आहेस तू?" शौर्याला मागून ओढत नव्या रागाने ओरडली.


"नव्या, यांना का कळत नाहीये गं? प्रेम असे जबरदस्तीने होत नसते. यांनी मला कितीही मोठी ऑफर दिली तरी मी तुला सोडू शकत नाही." नव्याचा हात घट्ट पकडून डोळ्यात पाणी आणत तो म्हणाला.


"दी, आता खरंच मला लाज वाटू लागलीये. तू अशी या थराला जाऊ शकतेस याची मी कल्पनाही करू शकत नाही. आय हेट यू दी, रिअली हेट यू."

"विहान, तू एकट्याने बाहेर का आलास? ही मुलगी आज पब्लिक प्लेस मध्ये असे वागू शकते तर पुन्हा काहीही करू शकते. तू माझ्यापासून लांब जात जाऊ नकोस. मला आता भीती वाटायला लागलीय रे." त्याचा हात पकडून घेऊन जात नव्या काळजीने बोलत होती.


"एक मिनिट नव्या, इथेच थांब." तिचा हात सोडून तो पुन्हा शौर्याजवळ आला.


"शौर्या मॅडम, तुम्ही माझ्यासोबत जे वागत आहात त्याबद्दल मला वाईट वाटतेय पण तुम्ही तुमच्या बहीणीच्या आयुष्याची वाताहात करायला निघालात त्याचे जास्त वाईट वाटतेय. तिचे तुमच्यावर किती प्रेम होते ते मला माहितीय. पण तुम्हाला तिची काहीच पर्वा नाहीये. तुम्ही खूप सेल्फिश आहात. पण जोपर्यंत मी नव्यासोबत आहे ना, तुम्ही तिला आणि तिच्या कुटुंबाला काहीही करू शकत नाही." तो तिरस्काराने म्हणाला.


"बघितलेस? मला हेच हवे होते. तुम्हा दोघींमध्ये दुरावा." त्याचा स्वर आता कमालीचा मृदू झाला होता. ज्याचा आवाज नव्यापर्यंत पोहचू शकत नव्हता.

"त्यासाठीच तर शिरीनच्या माध्यमातून मी तुला इथे बोलावून घेतले. अरे एक गोष्ट सांगायची विसरलोच. शिरीन माझी मावसबहीण आहे. त्यामुळे तुझ्याबद्दलचे सगळे अपडेट्स मला आपसूकच कळत होते."
मंद हसत हळुवारपणे तो तिला म्हणाला आणि नव्याकडे परत गेला.

शिरीनबद्दल ऐकून शौर्या मात्र धक्का बसल्याप्रमाणे त्याच्याकडे पाहत उभी होती.


"तिला तू काय म्हणत होतास?" नव्याने त्याला विचारले.


"हे सगळं सोडून दे असं सांगायचा प्रयत्न करत होतो. पण त्या काही ऐकायलाच तयार नाहीत. त्यांचा वेडसरपणा वाढायला लागलाय. तुला सांगू? बहुतेक त्यांना सायकॅट्रिक्स ट्रीटमेंटची गरज आहे. नाहीतर आपल्याच बहिणीसोबत आणि कुटुंबासोबत असं कोण वागेल? आपण त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचं का?"


विहान, तू किती चांगला आहेस रे? दी इतकी वाईट वागूनही तुला तिची काळजी आहे. ती हे का समजून घेत नसावी?" त्याला हॉस्पिटलच्या वेटिंग एरियाकडे घेऊन जात ती म्हणाली.


ते दोघे गेले. शौर्या सुन्न मनाने तिथेच उभी होती. दोन-एक मिनिटात तिच्यासमोर कॅब येऊन थांबली आणि ती तिच्या हॉटेलच्या दिशेने वळली.

******

नखशिकांत भिजलेली शौर्या शॉवरखाली उभी होती. तिच्या डोक्यावरून खाली घसरणारे पाणी डोळ्यातील बाहेर पडणाऱ्या पाण्याला एकत्र घेऊन वाहून नेत होते. त्या पाण्यात तिच्या अश्रुंचा खारटपणा बेमालूमपणे मिसळून गेला. अर्धा तरी तास ती तशीच शॉवरखाली होती.


मनात एकच प्रश्न होता, मी चुकीचे वागतेय का? अशा आडवळणाने जायची खरंच काय गरज होती? इथे आल्या आल्या सरळ शशांकची भेट घेऊन सांगितले असते की हा विहान फक्त विहान नाही तर तो शौनक कारखानीस आहे तर? तर सगळं संपलं असतं. तिच्या लाडक्या एसके ने स्वतःच नव्याचे नाते संपवून टाकले असते.

पण असं खरंच घडलं असतं का? शौनक कारखानीस हे नाव ऐकूनच त्याच्यावर जबर आघात झाला असता आणि कदाचित हा धक्का तो पचवू शकला नसता. एका क्षणात सारे काही संपले असते आणि त्याला जबाबदार हिलाच ठरवण्यात आले असते.

'मी निवडलेला मार्ग भलेही कॉम्प्लिकेटेड आहे पण इतरांना त्याच्या परिणामाची झळ तेवढया तीव्रतेने लागणार नाही हे मला ठाऊक होतं. म्हणूनच या मार्गाने मी वाटचाल सुरु केली. पण शौनक माझी पार कोंडी करून टाकलीस रे तू. माझ्या लाडक्या निवीची ती तिरस्काराची नजर मला सहन होत नाही.' तिचा हुंदका दाटून आला.


अर्ध्या तासाने ती बाथरूममधून बाहेर आली. तिचे डोके खूप जड आले होते. तिने तसेचbस्वतःला बेडवर झोकून दिले. तिचा डोळा केव्हा लागला तिला कळलेच नाही. विमानाच्या प्रवासाने आलेला थकवा घालवायला तिला पुरेसा वेळ मिळाला नव्हता, त्यामुळे आता बेडवर पडल्यापडल्या ती झोपी गेली.


जाग आली तेव्हा खोलीत संपूर्ण अंधार पसरला होता. तिने डोळे किलकीले करून खिडकीतून बाहेर पाहिले. बाहेरचे जग रोषणाईच्या झगमगाटाने उजळून निघाले होते. तिच्या खोलीत मात्र अंधार दाटून आला होता... तिच्या हृदयात साठलेल्या अंधाराप्रमाणेच.


रात्र झालीय हे लक्षात यायला तिला वेळ लागला नाही. चार पाच तासांची झोप होऊनदेखील तिचे डोके ठणकतच होते. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. आणि मग लक्षात आले की अरे, सकाळपासून आपण काही खाल्लेच नाही.

रिसेप्शनवर कॉल करून खायला काही मागवावे असा एक विचार डोक्यात आला पण आज केवळ खाल्ल्यानेच मन शांत होणार नाही याची जाणीव सुद्धा झाली.

एक विचार करून ती उठली. मोकळ्या केसांना क्लिप मध्ये अडकवत तिने चेहऱ्यावर पाण्याचा शिपका मारला. लगेज बॅगमधून काळ्या रंगाचा चकाकणारा स्लीवलेस असा गुडघ्यापर्यंत लांब असणारा तिचा आवडता वन पीस ड्रेस घातला. चेहऱ्यावर हलके कॉम्पॅक्ट, ओठावर लीपग्लास आणि हातात क्लच घेऊन ती हॉटेलच्या बाहेर आली.

नेमके कुठे जायचे आहे तिला ठाऊक नव्हते. कुठे जाणार हेही कळत नव्हते. पण सध्या तिला तिच्या खोलीतील भयानक शांतता खायला उठली होती. मनात सुरु असलेले कोलाहल आणि उठलेले वादळ शांत करायला तिला तशीच जागा हवी होती जीचा शांततेचा कसलाही संबंध नसेल आणि मनातील कोलाहलाप्रमाणे तिथेही फक्त आणि फक्त गोंधळ असेल.


तिथे कोणीच कोणाचा नसेल आणि तरीही तिथल्या कर्कशतेचा प्रत्येकजण एक भाग असेल. ड्रिंक, डान्स अँड डेअर..बाकी काही नाही. रात्री बाहेरच्या अंधारापासून दूर आत रंगीत प्रकाशाच्या झगमगाटात अशा अनेक जागा तिला ठाऊक होत्या पण आजवर त्या जगात डोकवण्याची तिला कधी गरज भासली नव्हती.


"मॅडम, कुठे जायचे आहे?" विचारात असतानाच एक रिक्षा तिच्याजवळ येऊन थांबली.


"ट्रिस्ट पब? सोडणार का?" तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले.

"मॅडम, मला ते उलटं पडेल." तो.

"मी डबल भाडे देईन. चालेल का?"

ती म्हणाली तसे त्याने तिच्याकडे नजर फिरवून एकवार निरखून पाहिले. त्याला बघायला ती मोठ्या घरची वाटत होती पण एकटीच इथे काय करतेय असा प्रश्नही मनात येऊन गेला.

'मोठया लोकांच्या मोठया बाता. आपल्याला डबल भाडं मिळतंय त्यातच समाधान मानायचं.' स्वतःशी पुटपुटत त्याने मीटर खाली केला.

"बसा मॅडम. पण भाडं डबल देण्याचं कबूल केलेय हे विसरू नका." तो तिला आत घेत म्हणाला.

"काळजी करू नका. दिलेला शब्द मला फिरवता येत नाही." ती खिन्न हसून म्हणाली.

खरे तर तिचे जगच वेगळे होते. अगदी साधे. फारशी अपेक्षा नसलेले. डिस्को, पब वगैरे ठिकाणी जावून धांगडधिंगा घालणे एरवी तिला कधी रुचले नसते आणि आज मात्र मनाचा थकवा घालवायला तिने त्याच ठिकाणाची निवड केली होती.

एका दिवसात तिचे आयुष्य एकदम तीनशेसाठ डिग्रीने बदलले होते. त्याबरोबर तिची तत्व, तिच्या गरजा याही अशाच अचानक बदलल्या होत्या का?


म्युझिक, डान्स, ड्रिंक.. कॉर्नरच्या टेबलवर बसून ती बाजूचा नजारा बघत होती. अगदीच शॉर्ट ड्रेसेस घातलेल्या, डान्सच्या नावाखाली सोबत असलेल्या मुलांच्या अंगाशी आदळणाऱ्या मुलींना बघून तिला त्यांची कीव येत होती.


या मुली अशा कशा वागू शकतात? त्यांना घरच्यांचे काहीच भान राहत नसेल का? घरच्यांपेक्षा ही काही क्षणाचे सुख देणारी मुलं त्यांना इतकी जवळची कशी वाटू शकतात? त्यांचे निरीक्षण करत मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधू पाहत होती.

शिरीन.. अचानक तिला शिरीनची आठवण झाली. तीही तिच्या बॉयफ्रेंडसोबत कित्येकदा रात्रीची गायब असे. दोन तीन महिन्यात एक नवा बॉयफ्रेंड! तिचा फंडाच काही निराळा होता.

शिरीनची आठवण येताच आत्तापर्यंत हातात धरून ठेवलेला पेग तिने तोंडाला लावला.

आजवर ज्या मुलीला बेस्ट फ्रेंड मानले ती तिची मैत्रीण नव्हतीच. उलट शौनकच्या कटात सामिल असलेली ती त्याचीच मावसबहीण होती.

'इतके दिवस एकत्र राहून मला तिचा कधीच कसा संशय आला नाही?'

हातातील पेग गळ्यात रिचवून ठणकणाऱ्या डोक्याला तिने गच्च पकडले. तिच्या नजरेपुढे शिरीनचा हसरा चेहरा तरळू लागला होता.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all