हवास मज तू!
भाग -३५
भाग -३५
मागील भागात :-
शौर्याच्या विचित्र वागण्यामुळे शशांकला हृदयविकाराचा सौम्य धक्का बसतो आणि त्याला हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागते.
शौर्याच्या विचित्र वागण्यामुळे शशांकला हृदयविकाराचा सौम्य धक्का बसतो आणि त्याला हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागते.
आता पुढे.
"थँक यू अंकल." आलेल्या हुंदक्याला आवरत तिने कॉल कट केला.
हॉटेलमध्ये पोहचल्यावर थोडे फ्रेश होऊन ती हॉस्पिटलला निघाली. तिथे गेल्यावर सुनंदा, ललिता सर्वांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे तिला काहीच कळत नव्हते. आत्तापर्यंत वागत आलीय ते चूक की बरोबर या फंदातही तिला पडायचे नव्हते. यावेळी तिला फक्त तिच्या लाडक्या काकाला एकवार नजर भरून पहायचे होते.
"विहान तुझे खूप आभार बाळा. तू सोबत होतास म्हणून नव्या शशांकला इथे घेऊन तरी आली. नाहीतर काय झालं असतं." सुनंदा डोळ्यात पाणी घेऊन हात जोडून उभी होती.
"आँटी, असं काय म्हणता? मी नेहमीच तुमच्या सोबत आहे. असे हात जोडून वगैरे मला गिल्टी फील करून देऊ नका ना. तुम्हाला मुलासारखाच आहे ना मी?" सुनंदाचे हात हातात घेत तो नम्रपणे म्हणाला.
"जीला पोटच्या पोरीसारखे आजवर वागवले. एवढं प्रेम दिलं, तीच तिच्या काकाच्या जीवावर उठली. आता नात्यावरचा विश्वास उडाल्यासारखा झालाय रे." तिला हुंदका अनावर झाला होता.
"एक नाते चुकीचे निघाले म्हणून सर्वच तशी नसतात ना? आणि कधीकधी रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती सुद्धा वरचढ ठरतात.
असो. सध्या तो विषय नाहीच आहे. सरांची तब्येत बरी होणे जास्त गरजेचे आहे. तुम्हीच अशा रडत बसलात तर आजी आणि नव्या काय करतील? तुम्हाला आता स्ट्रॉंग बनावेच लागेल." तिला आधार देत तो म्हणाला.
"शशी नेहमीच म्हणायचा की शौर्या त्याची वाघीण आहे. त्याचा अभिमान आहे ती. तिचा केवढा आधार वाटायचा त्याला आणि तिनेच असे वागावे?"
"एक सांगू? कुंपणाने शेत खाल्ले तर आपण कुणाकडेही तक्रार करू शकत नाही. पण एक करू शकतो ते काटेरी कुंपणच उपटून फेकून देऊ शकतो.
सॉरी टू से, पण मला वाटतं शौर्या मॅडमना तुम्ही सरांशी यापुढे कसला कॉन्टॅक्ट ठेवू देऊ नका. कारण त्यांच्या स्वार्थी स्वभावामुळे सरांचा हृदयाचा त्रास परत केव्हाही बळावू शकतो."
समोरून येणाऱ्या शौर्याकडे लक्ष जाताच सुनंदाला सावधगिरीचा इशारा देत तो म्हणाला.
समोरून येणाऱ्या शौर्याकडे लक्ष जाताच सुनंदाला सावधगिरीचा इशारा देत तो म्हणाला.
"काकू, काका ठीक आहे ना गं?" जवळ येत काळजीने शौर्याने विचारले.
"शौर्या, हे विचारण्याची तुला गरज आहे असे खरंच तुला वाटते? की मुद्दाम जखमेवर मीठ चोळायला म्हणून तू इथे आली आहेस?" तिच्याकडे नजर रोखून सुनंदा म्हणाली.
"काकू, असं नाहीये."
"मग काय आहे? वडिलांच्या जागी त्याला तू बघायचीस ना? मग असं आपल्याच वडिलांशी कोण वागतं? अगं जे आहे ते तुझंच होतं. तू फक्त एकदा त्याला म्हटलं असतंस तर त्यानेही स्वेच्छेने तुला सगळं बहाल केलं असतं. तुला या थराला जायचं काय कारण होतं?" सुनंदाच्या डोळ्यातून आगीच्या ज्वाळा निघत होत्या.
"काकू, तुला वाटते तसे नाहीये गं. मला काकाला एकदा भेटायचे आहे. भेटू शकते ना?" डोळ्यात अर्जव घेऊन तिने विचारले.
"नाही." सुनंदा काही बोलायच्या आत ललिता तिथे येत म्हणाली.
"शौर्या, शशीच्या या अवस्थेला तू जबाबदार आहेस. त्याला भेटण्याची किंवा त्याच्याशी बोलण्याचीही तुला परवानगी नाहीये."
"आजी, फक्त एकदाच. प्लीज. त्यानंतर मी नाही भेटणार अगं." ती विनंती करत म्हणाली.
"तुला त्याच्या जीवाची काळजी नसेल तरी मला आहे. माझ्या एका मुलाला या आधीच गमावलेय. आता या वयात हे दुःख झेलायची माझी क्षमता नाहीय." कणखरपणे बोलत असतानाही ललिताच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
ललिताच्या बोलण्यावर मौन धारण करणेच शौर्याने योग्य समजले. कितीही झाले तरी तिला शशांकची काळजी होतीच आणि या घडीला त्याच्या अवस्थेला तीच जबाबदार आहे हे नाकारता येण्यासारखे नव्हते.
काही न बोलता ती बाजूच्या एका रिकाम्या बाकावर बसून राहिली. कदाचित तिच्या मनाची घालमेल कोणीतरी ओळखेल आणि तिला शशांकला किमान बघू तरी देईल अशी मनात आशा होती.
मात्र अर्धा तास उलटून देखील कोणी तिच्याकडे साधे पाहिलेसुद्धा नाही, तेव्हा मावळलेली आशा मनात कोंडून ती उठली. राहून राहून तिचे डोळे भरून येत होते पण सर्वांसमोर रडून तिला कमजोर पडायचे नव्हते.
तिने एक नजर नव्याकडे टाकली. नाजूकशी नव्या लागोपाठ मिळालेल्या धक्क्याने पार कोमेजून गेल्यासारखी दिसत होती. सुनंदा आणि ललिताच्या चेहऱ्यावरचे दुःखी भाव देखील अजून बदलले नव्हते. विहान नव्याशेजारी बसून तिला धीर देत होता.
इथे जास्त वेळ थांबून काहीच उपयोग होणार नाही याची तिला प्रचिती आली होती. त्यामुळे खचलेल्या मानाने शौर्या परत जायला निघाली. तीन-चार पाऊले पुढे गेली असेल तोच शशांकच्या खोलीतून बाहेर आलेल्या नर्सचा आवाज तिच्या कानावर आला.
"तुमच्यापैकी शौर्या कोण आहेत? तुमचे पेशंट जाग येईल तेव्हा हे एकच नाव घेत आहेत. त्यांना त्यांच्याशी बहूतेक भेटायचं आहे." बाहेर आलेली नर्स बोलत होती.
"असं इथे कोणीही नाही. त्यांनी काही दुसरेच नाव घेतले असेल." सगळ्यांच्या वतीने विहानने उत्तर दिले.
"एक्सक्युज मी. मी शौर्या आहे." विहानच्या उत्तराकडे दुर्लक्ष करत शौर्या तिथे येत म्हणाली.
"ओके. पेशंटना तुम्हाला भेटायचे आहे. ते सारखे तुमचे नाव घेत आहेत." गोंधळलेल्या नजरेने विहानकडे आणि नतंर शौर्याकडे बघून नर्स म्हणाली.
"शौर्या, तुला शपथ आहे. तू जर शशीला भेटलीस तर यापुढे आयुष्यात कधीच मी तुझे तोंड सुद्धा पाहणार नाही." ललिता तिला थांबवत म्हणाली.
"आजी, तुझ्या शब्दाचा मान राखून मी आतापर्यंत नाही भेटले ना गं? आता काका स्वतःहून बोलावतेय तर जाऊ दे ना, प्लीज?" ती काकूळतीला आली होती.
"शौर्या.."
"आजी, तू म्हणतेस तसं नको बघूस माझे तोंड. हवे तर माझ्याशी बोलूही नकोस. पण आता यावेळी मला काकाला भेटण्यापासून रोखू नकोस गं." ललिताकडे लक्ष न देता ती नर्ससोबत आत जायला निघाली.
"शौर्या मॅम, तुम्ही सरांना जरूर भेटा. पण त्यांची कंडिशन लक्षात घेऊन तुमच्या मनातील त्यांच्याबद्दलचा आकस आणि वैर इथेच सोडून जा. सरांना त्रास होईल, असे वागू नका." विहान समोर येत म्हणाला.
'कुणाशी कसे वागायचे हे तू मला शिकवायची गरज नाहीय.' तिला म्हणायचे होते पण या घडीला गप्प राहून आत गेली.
खोलीत आल्यावर ती शशांकच्या शेजारी उभी राहिली. त्याच्या एका हाताला लावलेले सलाईन, दुसऱ्या हाताला सुरु असलेले मॉनिटर. हे बघून तिला अपराधीपणाची भावना छळू लागली होती.
"काका.." भरल्या डोळ्याने साद घालत तिने शशांकचा हात पकडला.
"शौर्या.." तिचा स्पर्श होताच किलकिल्या नजरेने त्याने तिच्याकडे पाहिले.
"काका, आय एम सॉरी." तिला अचानक रडू कोसळले. त्याबरोबर त्याच्याही डोळ्यातून दोन थेंब गालावर ओघळले.
"शौर्या, बेटा. आपले हे वैभव, ही संपत्ती सर्व तुझेच तर आहे. मी केवळ एक राखणदार आहे. हे तुला ठाऊक असतानाही का अशी वागलीस?" बोलताना त्याला त्रास होतोय हे तिला जाणवले.
"काका, मी चुकीची वागतेय असे तुलाही वाटतेय का रे? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का?" त्याच्या हाताला घट्ट पकडून डोळ्याशी लावत ती म्हणाली.
"स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे बाळा. पण म्हणून तुझ्या वागण्याचे समर्थन नाही ना करू शकत. निवी म्हणजे तुझा श्वास होता ना? तिलाच तू दुखावलेस?"
"त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता." ती डोळे पुसत उत्तरली.
"तुझ्या अशा वागण्याने निवी हर्ट होतेय." शशांक.
"नाही काका, उलट आपल्याच माणसांशी लढायला ती ट्रेन होतेय. हे बळ यायला हवं म्हणूनच तर हा सगळा घाट घालावा लागला." ती म्हणाली.
"म्हणजे?"
"विहान चांगला मुलगा नाहीये. तिच्यासाठी तो योग्य नाहीय. त्याच्यापासून दूर करायला म्हणून मी हे केले." ती.
"काय बोलते आहेस? त्याला खूप चांगला ओळखतो गं मी."
"किती दिवसांची ओळख काका? त्याला भेटून तुला केवळ एकच महिना झालाय ना? मी त्याला दोन वर्षांपासून ओळखतेय." एक आवंढा गिळून ती म्हणाली.
"शौर्या.." त्याचा आवाज कापरा झाला.
"घाबरू नकोस. आता मी आलेय ना. मी सगळं नीट करेल." त्याला धीर देत ती म्हणाली.
"आणि तू म्हणतेस तसं तो वाईट मुलगा असेल आणि निवीला काही करेल तर?" त्याचा श्वास वाढला होता.
"तर तिच्यापुढे ढाल बनून मी उभी राहील. मी तिच्यासोबत असेनच पण काका, दरवेळी सोबत असेनच असं नाही ना रे होणार? तिलाही तिची लढाई लढता आली पाहिजे. म्हणून तर तिला मी ट्रेन करते आहे.
माझ्यावर इतकं प्रेम करणारी निवी आता केवळ तिरस्कार करतेय. उद्या विहानबद्दल सत्य कळून तिला लढावं लागलं तर त्याचा त्रास होऊ नये याची मी पूर्वतयारी करून घेते आहे असं समज.
आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याविरुद्ध लढणं सोपं नसतं ना रे?" तिच्या डोळ्यातील थेंब त्याच्या हाताला स्पर्शून गेला.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
*फोटो गुगल साभार.*
******
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
*फोटो गुगल साभार.*
******
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा