हवास मज तू! भाग -२९

वाचा नव्या आणि विहानची एक अनोखी प्रेमकथा.
हवास मज तू!
भाग -२९

मागील भागात :-
नव्याकडून परत आल्यावर विहान त्याच्या घरी खूप आनंदात असतो. त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळतेय असे त्याला वाटू लागते.
आता पुढे.


या वेळी त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याच जवळ होते.
त्याने खुशीत येऊन तिथल्या तिथेच एक गिरकी घेतली.

'ओह! विहान, व्हाट्स गोइंग ऑन? तुझ्या सुखाचा पेला भरतीला लागलाय. हे सुख तुला असेच जपून ठेवायचे आहे. इनफॅक्ट पुन्हा वाढवायचे आहे. पेल्यातून सुख खाली झिरपेपर्यंत वाढवायचे आहे.' त्याचा स्वतःशीच संवाद सुरु होता.

'हा डाव आता शेवटपर्यंत माझ्याच मुठीत असायला हवा.' स्वतःला सांगत तो बाल्कनीतून हॉल मध्ये आला.

आत येऊन त्याने बुद्धिबळाचा पट मांडला.

"क्वीन इज ऑलरेडी माईन आणि आता संपूर्ण राज्य देखील लवकरच माझ्या हातात असेल." हातातील राणीकडे बघून त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य उमटले.


"टुडे आय एम सो हॅपी, सो, सो,सो हॅपी. डिअर नव्या, यू मेड माय डे. रिअली अ बिग थँक्स टू यू." एक मोठा श्वास घेऊन त्याने खेळ तसाच गुंडाळला.


"आई, यशाच्या दिशेने तुझ्या मुलाने नवे पाऊल टाकलेय. आता आपले स्वप्न पुरे व्हायला फारसा वेळ लागणार नाही." आईचा फोटो छातीशी कुरवाळत त्याने डोळ्यात आलेले अश्रू पुसले.

"हसू आणि आसू.. आज दोघांचाही मिलाफ होतो आहे. आज आनंदाने इतका हसलोय की ते हास्य देखील डोळ्यातून वाहतेय. कधीकधी जादाचा आनंद देखील नसायला हवा, हो ना गं?" ओठावर पुन्हा छोटेखानी हसू घेऊन त्याने मोबाईल हातात घेतला.

हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याच्या मोबाईलवर नव्यासोबत घेतलेला सेल्फी त्याने इंस्टाग्रामच्या स्टोरीला लावला आणि सोबतच हटके कॅप्शन देखील लिहिले.

'..अँड फायनली आय फाउंड माय लव्ह!
हॅश टॅग बर्थडे सेलिब्रेशन विथ माय ब्युटीफूल लेडी.' आणि सोबत हृदयाचे चित्र असलेले इमोजी जोडले होते.

"माय ब्युटीफूल लेडी! माय डिअर नव्या. नो, नॉट नव्या.. इट्स निवी. एन फॉर नव्या अँड वी फॉर विहान!" स्वतःच्या कल्पनेने त्याला परत हसू आले आणि डोळ्याचा कोपरा पुन्हा ओला झाला.166

मोबाईल हातात घेत पोस्ट केलेली स्टोरी त्याने काही वेळातच डिलीट केली आणि नव्याला 'मिस यू ' मेसेज सेंड करून तो ऑफलाईन गेला.


'डिअर नव्या, मिस यू.'
मोबाईलची टिक टिक वाजली तसे स्वप्नाळू डोळ्यांनी नव्याने व्हाट्सॲप उघडून बघितले.

विहानचा वाढदिवस आणि त्याच्या जेवणाच्या निमंत्रणाचे रसाळ वर्णन मेसेजमधून तिने शौर्याला कळवले होते. आणि आता मोबाईलचा आवाज ऐकून तिचाच रिप्लाय असावा असे वाटून तिने मोबाईल बघितला तर तो विहानचा मेसेज होता.

'डिअर नव्या..' मेसेजची सुरुवात बघूनच तिची झोप उडाली.

'आय मिस यू टू डिअर. लव्ह यू.' त्याला रिप्लाय पाठवून ती निळ्या रेषांच्या प्रतीक्षेत तिथेच रेंगाळली.

ऑफलाईन गेलेल्या विहानच्या हे गावीही नव्हते. किंवा मुद्दामच नेटवर्क बंद करून तो गाढ झोपी गेला होता.

हिच्या डोळ्यावरची झोप पार पडाली. आजच्या दिवसाचा अख्खा घटनाक्रम आठवून ती त्याच्यात रमून गेली. बंगल्यावर आल्यानंतर त्याची उडालेली त्रेधातिरपीट, शशांकला समोर बघून उडलेला गोंधळ..! सर्व आठवत असताना तिच्या ओठावर अलगद हसू उमलत होते.

मोबाईल हातात घेऊन तिने परत व्हाट्सॲपवर नजर फिरवली. त्याला पाठवलेला मेसेज अजूनही एकच पांढरी रेषा दिसत होती तर शौर्याला पाठवलेल्या मेसेजची पण तीच गत होती.

तिला क्षणभर दोघांचाही राग आला आणि मग हेवादेखील वाटला. दोघेही कसे सारखेच, एकमेकांना भेटायला आतूर असलेले, तिला जपणारे, काळजी घेणारे आणि त्याहून जास्त तिच्यावर प्रेम करणारे.

दोघात आढळणाऱ्या साम्यतेचे तिला हसू आले आणि सोबत कौतुक देखील वाटले.
सध्या दोन ध्रुवावर असलेल्या या दोन व्यक्ती. ज्यांचे तिच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व होते आणि दोघेही या घडीला तिच्यासाठी उपलब्ध नव्हते.

मनात काय विचार शिवला कोणास ठाऊक? अंगावरची चादर तशीच घेऊन ती खोलीबाहेर आली. कसलासा विचार करून तिने शशांकच्या खोलीचा दरवाजा ठोठावला.


"शशी, ऊठ ना रे. बाहेर कोणीतरी दार वाजवतो आहे." सुनंदा मिटल्या डोळ्यांनी त्याला म्हणाली.


"तू झोप ना गं. आत्ता कोण येईल?" तो.


"शशी, खरंच दार वाजतेय. ऊठ." ती थोडी चिडून म्हणाली त्यावर डोळे चोळत तो उठून बसला.


"कुठे कोण आहे?" तो.

"दाराबाहेर." त्याला धक्का देत ती म्हणाली.

डोळे चोळत त्याने दरवाजा उघडला तर बाहेर नव्या उभी होती.

"निवी? तू? काय झाले बाळा? अशी रात्रीची इथे काय करते आहेस?" नव्याला तिथे बघून त्याने चकित होऊन विचारले.


"निवी?" शशांकच्या तोंडून तिचे नाव ऐकताच सुनंदा उठून खाली आली.


"डॅड, मॉम मला तुमच्यासोबत रात्र घालवायची आहे." सरळ त्यांच्या बेडवर मधे बसत नव्या म्हणाली.


"निवी काय झाले? तुला बरं वाटत नाहीये का?" शशांकच्या नजरेत काळजी होती.


"नाही रे. इनफॅक्ट मी खूप खूष आहे पण हा आनंद वाटायला माझ्याजवळ कोणीच नाहीत ना? म्हणून मी इथे आलेय." ती लहानसा चेहरा करून म्हणाला.


"ओह, मेरा स्वीट बच्चा. तुझ्यासाठी नेहमीच आम्ही आहोत की." तिच्या कपाळावर ओठ टेकवत सुनंदाने तिला आपल्या कुशीत घेतले.


"डॅड, मॉम मी इथे तुमच्यासोबत झोपले तर चालेल
ना?" तिचने निरागसपणे दोघांकडे पाहिले.


"आम्हाला फारच आवडेल. हो ना सुन्नी?"त्याने आनंदून सुनंदाकडे नजर टाकली. तिने मान डोलावून त्याला होकार दिला.


’थँक यू. यू आर वर्ल्ड्स बेस्ट पेरेंट्स." दोघांना एकेक पापी देत ती लगेच आडवी झाली.

सुनंदा तिच्या केसातून हात फिरवत होती. लवकरच नव्याचा डोळा लागला आणि ती स्वप्नाच्या दुनियेत रममाण झाली.

"शशी, आपली निवी किती निरागस आहे रे? काही वर्षांपूर्वी छोटूशी असलेली, दुडूदुडू धावणारी गोड परी केवढी मोठी झालीये. प्रेमात पडून आपला लाईफ पार्टनर देखील शोधलाय." सुनंदा तिच्या केसातून हात फिरवत म्हणाली.

"हम्म. पण तरीही ती आपली तीच गोड परी आहे. बघितलेस ना तुझ्या कुशीत कशी विसावलीय." लेकीच्या चेहऱ्यावर नजर खिळवून तो म्हणाला.

निवी केव्हाच गाढ झोपी गेली होती आणि हे दोघे तिच्या बद्दल बोलत कितीतरी वेळ बोलत बसले होते.

*******

"शौर्या बेबी, सी. व्हाट्स इज धिस?" मोबाईलमध्ये डोके घालून असलेली शिरीन एकदम उसळून म्हणाली.


"शिरीन, डिअर किमान यावेळी तरी मोबाईल नको ना. आपल्याला कॉलेजला उशीर होईल. आजचा पेपर थोडा अवघड आहे आणि माझा अभ्यास बाकी आहे."


"अभ्यासाला गोळी मार आणि मी काय बघतेय ते बघ तरी." शिरीन तिच्या बेडशेजारी येत म्हणाली.


"शिरीन यार, उगाच डिस्टर्ब नको ना करुस. प्लीज. ही एक्साम माझ्यासाठी खूप इम्पॉर्टन्ट आहे."


"मी तुला जे दाखवतेय तेही इम्पॉर्टन्ट आहे. बघ ना." हातातील मोबाईल शौर्या समोर ठेवत शिरीन बोलली.


"नेमकं काय बघू म्हणतेस?" एकदा मोबाईलकडे आणि मग तिच्याकडे बघत शौर्या तिरकसपणे म्हणाली.

"अगं ही इन्स्टा स्टोरी.." मोबाईलमध्ये डोके घालत शिरीन उत्तरली.
"ऑ? आत्ताच तर मी बघितली होती. लगेच डिलीट कशी झाली?" तिच्या चेहऱ्यावर प्रश्न होता.


"शिरीन, इट्स नॉट अ टाईम फॉर जोक, ओके? तेव्हा अशा काड्या करू नकोस. लेट्स मी कॉन्सन्ट्रेट."
शौर्या वैतागली होती.


"सो फनी! उगाच काड्या करायला मला देखील वेळ नाहीये. पण मी आता इन्स्टा स्टोरीला तुझ्या बहिणीचा फोटो बघितला म्हणून सांगत होते." शिरीन फिस्कारून म्हणाली.

"व्हॉट? निवी? तेही इंस्टाग्राम वर?" शौर्या हसली.

"मला मान्य आहे की निवी छोटीशी आहे पण तिला असला व्हायातपणा करायला आवडत नाही. आणि तू तिला कधी फॉलो केलेस की तुलाच तिची स्टोरी दिसली?" शौर्या पुन्हा किंचित म्हणाली.


"शौर्या, आय एम नॉट मेकिंग एनी जोक. मी इंस्टावर तुझ्या सिस्टरला पहिलं हे शॉकिंग नाहीये. तर शॉकिंग हे आहे की तिला मी कुणासोबत पाहिलं." शिरीन गंभीरपणे म्हणाली.

"कुणासोबत?" तिचे गंभीर भाव बघून शौर्या सुद्धा गंभीर झाली.

"ज्या व्यक्तीसोबत तिला बघायला तुला आवडणार नाही त्यासोबत." शिरीनचा स्वर थोडा खालावला.

"शिरीन?"तिच्या हातातील मोबाईल स्वतःकडे घेत ती प्रोफाइल भरभर खाली सरकावत शौर्या म्हणाली. तिला तिथे नव्याचा कुठलाच फोटो दिसला नव्हता आणि त्यामुळे ती सैरभैर झाली होती.

"शौर्या, ते फोटोज डिलिट झाले आहेत. बट बिलीव्ह मी. माझी नजर धोका खाणार नाही हे मला माहिती आहे. देअर वाज अ कॅप्शन विथ द्याट पीक.
'..अँड फायनली आय फाउंड माय लव्ह!
हॅश टॅग बर्थडे सेलिब्रेशन विथ माय ब्युटीफूल लेडी.'

एक्साक्टली हेच कॅप्शन. मला हे ठामपणे आठवतंय कारण मी आत्ताच ते रीड केले आहे."

शिरीन विश्वासाने सांगत होती आणि ते बघून शौर्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडू लागला होता.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all