हवास मज तू! भाग -२८

वाचा विहान आणि नव्याची अनोखी प्रेमकथा.
हवास मज तू!
भाग -२८

मागील भागात :-
नव्या विहानला तिच्या घरी घेऊन जाते. तिथे ललिता आणि सुनंदाच्या प्रेमाने न्हाऊन निघत असतानाच शशांक येतो. त्याला बघून विहानला आश्चर्याचा धक्का बसतो.
आता पुढे.

"आणि आता आमच्या घरातील एकुलत्या एक कर्त्या पुरुषाला भेटून घे. म्हणजे पुढचे बोलायला आपण मोकळे होऊ." ललिता हसत म्हणाली तशी नव्या सावरून विहान शेजारी उभी राहिली.

"शशी येतो आहेस ना? आपल्याकडे आपले पाहुणे आले आहेत."

"हो, आलो गं." ललिताच्या आवाजाने आपला कुर्ता नीट सावरत शशांक बाहेर आला आणि त्याला बघताच अचानक जोरात शॉक लागल्यागत विहान जागेवरून उठून उभा झाला.

"एसके सर? तुम्ही? तुम्ही इथे कसे काय?" त्याच्यासमोर प्रश्नांचा नुसता खच पडला होता.


"एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? हे घर तुझ्या एसके सरांचेच आहे मग ते इथेच असणार ना?" ललिता त्याची अवस्था बघून म्हणाली.


"नव्या मला अजूनही सारं स्वप्नवत वाटते आहे. हे सगळे भास तर नाहीत ना? तू म्हणतेस की हे तुझे घर आहे आणि आजी म्हणत आहेत की हे एसके सरांचे घर आहे. आय एम गेटिंग कन्फ्यूज्ड यार. मी नेमका कुठे आहे हे मला कळेल का?" एकदा ललिताकडे आणि मग नव्याकडे बघून त्याने गोंधळून विचारले.

त्याच्या चेहऱ्यावर किती तो गोंधळ आणि किती ती अस्वस्थता? त्याची ही अवस्था बघून शशांक त्याच्या जवळ आला.


"यंग बॉय, डोन्ट गेट कन्फ्यूज्ड. आय विल एक्सप्लेन यू एव्हरीथिंग." त्याच्या खांद्यावर हात ठेऊन त्याला खाली बसवत तो शांतपणे म्हणाला.

"हे घर माझे म्हणजे आमच्या सर्वांचे आहे आणि नव्या माझी मुलगी आहे त्यामुळे पर्यायाने तिचेदेखील घर हेच आहे." शशांक मृदू स्वरात बोलत होता.

"काय?" शशांक जे सांगत होता ते ऐकून विहानला धक्क्यावर धक्के बसत होते.


"नव्या तुमची मुलगी आहे? म्हणजे नव्या, एसके सर तुझे वडील आहेत?" त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते.

"विहान,अरे दोघांचा अर्थ सारखाच होतो." नव्या हसून म्हणाली.


"आय एम सॉरी सर. म्हणजे मी नव्याला प्रपोज केले तेव्हा ती इतक्या बड्या असामीची लेक असेल हे मला ठाऊक नव्हते. माहिती असते तर मी ही हिंमत केलीच नसती."


"अच्छा, म्हणजे तू आता स्टेटस बघून प्रेमात पडणार होतास तर."


"हो.. म्हणजे नाही. म्हणजे प्रेम तर होतेच पण मी कधीच व्यक्त केले नसते." त्याची गोंधळलेली अवस्था कायम होती.


"म्हणून तर मी तुला ते कळू दिले नाही. नव्या माझी लेक आहे हे समजल्यावर तिचा फायदा घ्यायला खुपजण तयार झाले असते. पण विहान तू केवळ तिच्यावर प्रेम करतोस आणि खूप प्रेम करतोस हे तुझ्या डोळ्यात मला दिसत होते, म्हणून मी तुझ्या पाठीशी होतो."

"सर.." त्याला काय बोलावे ते सुचेना.


"आमच्या निवीचा पार्टनर म्हणून तू मला भावलास रे. त्यामुळेच तुमची ही पार्टनरशिप कायम राहावी या उद्देशाने आज तुला बोलावून घेतले होते. तुला हे आवडेल ना?"

"सर.."

"अरे नुसता सर- सर काय करतोस? गिव्ह मी अ हग." शशांक त्याला आलिंगण देत म्हणाला.


"सर, माझ्यासाठी हे सर्व अकल्पनीय आहे. रिॲलिटी काय आहे हे मला माहिती नव्हतं. पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडले हा तुमचा मोठेपणा." तो भावनिक होत म्हणाला.

"विहान आता ते सगळे विसरून जा. खरं तर ऑफिसमध्ये सुद्धा निवी माझी मुलगी आहे हे कुणालाच ठाऊक नाहीये. तेव्हा फरगेट इट डिअर."


"हम्म. पण तरीही मला काहीसं ऑकवर्ड फील होते आहे." विहान.

"त्या ऑकवर्डनेसला गोळी मार आणि इथे बैस." हातात औक्षणाचे ताट घेऊन येत सुनंदा म्हणाली.


"आता हे आणखी काय?" तो.


"आज तुझा वाढदिवस ना? मग औक्षण करायला नको? तू तुझ्या आईजवळ असतास तर तिने हे केलेच असते ना?"

सुनंदा म्हणाली तसे काही न बोलता भरल्या डोळ्याने तो बसला. शेवटी आईचा विषय त्याच्यासाठी किती हळवा होता हे त्यालाच माहीत होते.


"अरे, असे डोळ्यात पाणी का आणतोस? मी तुझ्या आईसारखीच आहे ना? आणि हा केक बघ. मी तुझ्यासाठी खास आपल्या हाताने तयार केलाय."


"थँक यू आँटी. आजचा दिवस माझ्यासाठी किती स्पेशल झालाय हे शब्दात सांगू शकत नाही." त्याने आवेगाने तिला मिठी मारली.


मध्यरात्री नव्यासोबत झालेले सेलिब्रेशन, शशांकने ऑफिसमध्ये दिलेले सरप्राईज आणि आता सुनंदाने केलेले औक्षण. तो अगदी भारावून गेला.


"आजी, आँटी, माझ्याकडून तुमच्यासाठी हे छोटेसे गिफ्ट." त्याने सोबत आणलेल्या पिशव्या समोर केल्या.

"तुम्हाला आवडेल की नाही माहीत नाही, पण मला जसे रुचले तसे घेऊन आलोय."

ललिता आणि सुनंदासाठी आणलेल्या साडया त्याने बाहेर काढल्या.

"वॉव! अरे किती सुंदर आहेत? आणि तू ही शॉपिंग केव्हा केलीस?" नव्या एकदम चाटच झाली.

साडया बघून त्याने एक तास आधी सुट्टी का मागितली असावी याचे आकलन शशांकला झाले.

त्याने आणलेल्या साड्यांचे रंग दोघीला आवडतील असेच होते. म्हणून त्या दोघीही आनंदी होत्या.

"खूप छान साडया आहेत रे. थँक यू." साडीवरून हात फिरवत सुनंदा म्हणाली.

"चला आता जेवायला घेऊया. उशीर होतोय." ललिताने सुनंदाला इशारा केला.

"नव्या मदतीला येतेस ना?" सुनंदा नव्याला घेऊन स्वयंपाकघरात गेली.


"आँटी, जेवण खूप मस्त झालेय. शेवटी घरचे जेवण ते घरचेच असते आणि त्यात तुमच्या हाताची चव. एकदम भारीच." तो बोटे चाटत म्हणाला.

जेवणानंतर काही वेळ गप्पा झाल्यावर तो जायला निघाला.

"आजी, आँटी, मी आता निघतो." त्यांना नमस्कार करत तो उठला.

"सर, येतो मी. थँक्स फॉर एव्हरीथिंग." शशांकला चरणस्पर्श करण्यासाठी तो वाकला.

"अरे, हे काय करतोस? तुझे स्थान पायात नाही तर हृदयात आहे." शशांकने त्याला छातीशी लावले.

"नव्या, विहानला सोडून येतेस ना?" ललिताने सूचक विचारले.

"ऐक ना इतक्या रात्री तू नको येऊस. मी माझा निघून जाईल." विहान म्हणाला.

"मी कारपर्यंतच येतेय. बाकी तुला सोडायला ड्रायव्हर काका येतील." ती त्याच्याकडे बघून मंद हसली.

"तर, कशी वाटली माझी फॅमिली?" बाहेर आल्यावर नव्याने त्याच्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकून विचारले.

"खूप छान. अगदी डाऊन टू अर्थ. घरात इतकी श्रीमंती असूनही तुम्ही सगळे किती साधे जीवन जगताय?

नव्या, या क्षणी माझ्या मनात काय वाटतंय? हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. तू सरांची मुलगी आहेस हे माहिती असतं तर तुझ्याकडे या नजरेने मी कधी बघूच शकलो नसतो. पण आता वाटतंय तू माझ्या आयुष्यात नसतीस तर मी इतक्या सुंदर फॅमिलीला कायमचे मुकलो असतो.

आजी आणि आँटी किती प्रेमळ आहेत अगं? आणि सरांबद्दल काय बोलू? ते तर खरंच खूप खूप ग्रेट आहेत." त्याचे बोलणे संपतच नव्हते.


"आणि मी? माझ्याबद्दल तर काही बोलतच नाहीयेस. सर्वांची स्तुती करून झाली पण माझा नंबर तर आलाच नाही." ती खोटे खोटे रुसून म्हणाली.


"तुला कसं विसरू? तू तर श्वास आहेस गं माझा. देवाने माझ्या विराण आयुष्यात पाठवलेले दवबिंदू आहेस तू. माझ्या स्वप्नांना दिशा दाखवणारी आशेचा किरण आहेस तू."

"ऑ! किती रे गोड बोलतोस? तुझ्याच प्रेमात मी परत नव्याने कितीदा पडायचे?" तिच्या चेहरा अगदी फुलून आला होता.

*********

रात्रीचा मंद वाहणारा वारा आणि बाल्कनीतून येणाऱ्या गुलाबाच्या सुगंधाने विहान बाहेर आला. आकाशातील शीतल चांदणे त्याला खुणावीत होते. त्याने आपली थंडगार नजर भोवताल फिरवली.

त्याची थंड नजर, सभोवतालचे थंड वातावरण, एक थंड लहर त्याच्या शरीरातून गेली.

आज त्याचे मन अगदी शांत झाले होते. त्याने आनंदात एक शीळ घातली. नकळत हात कुंडीतील गुलाबाकडे वळले पण त्याने लगेच हात मागे घेतला.

'आज नो गुलाब अँड नो गेम! कॉज गेम इज ऑलरेडी ओव्हर.' त्याचे ओठ हलले.

'खरंच का गेम ओव्हर झालाय की खरा गेम आत्ता सुरु झालाय?'

या वेळी त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याच जवळ होते.
त्याने खुशीत येऊन तिथल्या तिथेच एक गिरकी घेतली.

'ओह! विहान, व्हाट्स गोइंग ऑन? तुझ्या सुखाचा पेला भरतीला लागलाय. हे सुख तुला असेच जपून ठेवायचे आहे. इनफॅक्ट पुन्हा वाढवायचे आहे. पेल्यातून सुख खाली झिरपेपर्यंत वाढवायचे आहे.' त्याचा स्वतःशीच संवाद सुरु होता.

'हा डाव आता शेवटपर्यंत माझ्याच मुठीत असायला हवा.' स्वतःला सांगत तो बाल्कनीतून हॉल मध्ये आला.

काय आहे विहानच्या मनात? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
******

🎭 Series Post

View all