हवास मज तू! भाग -२७

वाचा नव्या आणि विहानच्या प्रेमाची अनोखी कथा.
हवास मज तू!
भाग -२७

मागील भागात :-
नव्या विहानला घ्यायला त्याच्या घरी जाते. तिथे त्याच्या आईचा फोटो बघून ती शॉक होते.

आता पुढे.


"विहान, एक मिनिट. या कोण आहेत?" तो फोटो हातात घेत तिने प्रश्न केला.


"ही कोण म्हणून काय विचारतेस? ही म्हणजे माझं दैवत. माझी प्रेरणा आहे." त्याचा आवाज लगेच मवाळ झाला.


"म्हणजे? या तुझ्या आई आहेत का?" त्याच्या डोळ्यातील ओल बघून तिने पुढे विचारले.


"हो. आईच माझी. आईशिवाय आणखी मोठं दैवत दुसरं कोणी असू शकतं का?" ओठ दुमडून तो म्हणाला.


"सॉरी मला काहीच आयडिया नव्हती म्हणून तुला विचारले. तू दुखावला तर नाही आहेस ना?!


"नाही गं. दुखावलो नाहीये आणि सॉरी कशाला म्हणतेस? उलट माझ्या आयुष्याची प्रत्येक बाजू तुला ठाऊक असायलाच हवी ना?" तो म्हणाला.

"होय रे."


"आईबद्दल तुझ्याशी मी नतंर कधीतरी बोलेनच. आता मात्र निघायला हवे. नाहीतर उशीर होईल." त्याने तो विषय बाजूला सारून सुरु असलेल्या विषयात हात घातला.


"हो, हो. चल. उशीर होईल तर घरचे काळजी करत बसतील." ती बोलायचा अवकाश तोच तिच्या मोबाईलची रिंग वाजली.

"हॅलो आजी, अगं आम्ही निघतोच आहोत. अर्ध्या तासात घरी पोहचतोय. डोन्ट वरी. बाय." कॉल कट करत तिने विहानबरोबर लिफ्ट मध्ये पाय ठेवले.

"बघितलेस? घरच्या लोकांना जराही धीर धरवत नाही." मोबाईल ठेवत तिने विहानकडे हसून नजर टाकली.


"अशी प्रेम करणारी आपली माणसं सोबत असायला भाग्य लागतं गं. आता तर मला तुझा हेवा वाटायला लागला आहे." खाली पोहचत असताना तो म्हणाला.


"डोन्ट वरी, आता माझी माणसं तुझीसुद्धा झाली आहेत. आज बघशीलच. घरी गेल्यावर मला विसरून सर्व तुझ्याच दिमतीला असणार आहेत." ड्राइव्हिंग सीटचा ताबा घेत ती हसून म्हणाली.


"नव्या, आय थिंक तुझे घर या दिशेला आहे. म्हणजे काल तुला मी इकडेच सोडल्याचे आठवतेय." बोलता बोलता कार विरुद्ध दिशेने वळताना दिसताच तिला थांबवत विहान म्हणाला.


"नाही रे. आपण योग्यच दिशेने जात आहोत." ती कार पुढे नेत म्हणाली.


"पण मला आठवतेय ते.." तो परत बोलायला लागला तेव्हा नव्याने त्याच्या हातावर हात ठेवून त्याला थांबवले.


"विहान, तुला जे आठवते आहे ते खरेच आहे. तू काल मला जिथे सोडलेस ना ते ठिकाण या वळणाने नाहीच आहे. पण आपल्याला तिथे जायचे नाहीये म्हणून आपण इकडे वळलोय." ती.


"म्हणजे?" ती काय बोलतेय याचा त्याला अंदाज येत नव्हता.


"म्हणजे मी तुझ्याशी खोटं बोलले होते." ती नरमाईच्या सुरात म्हणाली.


"म्हणजे?" त्याचा प्रश्न कायम होता.


"म्हणजे, ऐक ना.. तू रागावू नकोस. तुझ्याशी खोटं बोलण्याचा किंवा तुझ्यापासून काही लपवण्याचा माझा हेतू नव्हता. पण मला खरं काय ते सांगताही येत नव्हते." शब्दांची जुळवण करत ती म्हणाली.


"नव्या, तू काय बोलते आहेस ते तुला तरी कळतेय का? आणि आपण आत्ता कुठे जात आहोत हे मला कळेल का?" तो त्रागा करत म्हणाला.


"आपण माझ्याच घरी जात आहोत हे खरं आहे आणि काल तू मला सोडलेस ते घर माझं नाही हेही खरं आहे."


"नव्या?" तिचे स्पष्टीकरण त्याच्या पचनी पडत नव्हते त्यामुळे तो वैतागला होता.


"विहान थोडावेळ दम धर ना. घरी पोहचलो की तुला सारं काही कळेल."

"अगं.."

"प्लीज? तू माझ्यावर एवढा तरी ट्रस्ट करू शकतोस ना रे? तुझ्याशी खोटं बोलण्याचा माझा काहीच हेतू नव्हता. मुळात मी खोटे बोलत नव्हते फक्त काही गोष्टी तुला सांगितल्या नव्हत्या." ती वाक्य पूर्ण करत म्हणाली.


"तू काय म्हणते आहेस ते अजूनही मला कळले नाहीये. पण तुझ्यावर माझा विश्वास आहे हे नक्की. त्यामुळे तुझ्यासोबत कुठेही यायला मी तयार आहे." तिच्या हातावर दाब देत तो म्हणाला.


"ओह! हाऊ स्वीट. तुझ्या प्रेमात पडण्याचे मला मिळालेले आणखी एक कारण." त्याच्याकडे बघून ओठांचा चंबू करत ती म्हणाली त्यावर त्यानेही हलकेच एक स्मित केले.


"अँड फायनली वी रिच्ड एट अवर डेस्टिनेशन." एका आलिशान बंगल्यापुढे कार पार्क करत ती उत्तरली.

कार मधून बाहेर आल्यावर तो स्तब्ध होऊन बघतच राहिला.

'शौर्या व्हिला ' बंगल्यावरचे चमचमणारे नाव आतल्या वैभवाची साक्ष देत होते. गेटवर उभ्या असलेल्या वॉचमनने अदबीने त्याला सलाम केला तेव्हा क्षणभर त्याला आपणच या बंगल्याचे मालक आहोत असे वाटून गेले.


"नव्या, हे तुझे घर आहे? घर कुठे? हा तर एक मोठा बंगलाच आहे." दिपलेल्या डोळ्याने निरखत तो म्हणाला.


"हम्म. हेच माझे स्वीट होम आहे. शौर्या व्हिला. माझ्या दी च्या नावाचा आमचा हा छोटासा बंगला." ती स्मित करत उत्तरली.


"छोटासा बंगला? अगं हा किती मोठा बंगला आहे? इतक्या मोठ्या घरात आय मिन बंगल्यात तू राहतेस म्हणजे तू नक्कीच कोणी साधी मुलगी नाहीयेस." तो म्हणाला.


"विहान, म्हणजे आता तू मला माझ्या घरावरून जज करणार आहेस का?"


"तसे नाही गं. पण तू मोठया घरची म्हणजे तुझ्या कुटुंबातील व्यक्तीही कर्तबगारीने आणि मानाने मोठया असतील ना? त्याचेच मला दडपण आलेय." तो मनातून बोलत होता.


"काहीही काय रे? उलट त्यांना भेटशील तर त्यांना तू पहिल्यांदा भेटतो आहेस असे तुला वाटणारच नाही." ती परत हसली.


"नव्या, तू मला घाबरवते आहेस की धीर देते आहेस?" तो.


"ए गप रे. चल तू." त्याच्या हाताला ओढत ती दरवाज्यापर्यंत घेऊन आली.


"अगं अगं, त्याला अशी आत घेऊन कशी येते आहेस? थांब जरा." ललिताचा करारी आवाज कानावर पडला तसा विहान चपापला.

"नव्या?"

"घाबरू नकोस रे. माझी आजी आहे. आवाज थोडासा कडक आहे पण स्वभावाने अगदी लोण्यासारखी मऊ आहे. तुमच्या दोघांचे गुळपीठ अगदी छान जुळेल बघ." त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली.

"विहान बाळा इथे असा उभा राहा. आमच्याकडे पहिल्यांदा येतो आहेस तर तुझे औक्षण केल्यावरच आत पाऊल टाक." आरतीचे ताट हातात घेऊन ललिता समोर आली.

"हे सगळं आटोपल्याशिवाय तुझा गृहप्रवेश होणार नाही बघ." नव्याने त्याला हळूच कोपरखळी मारली.

ललिताने त्याला ओवाळून घेतले आणि अंगावरून मीठमोहरीचा हात फिरवून त्याची अलाबला घेतली.

"बाळा, आता आत ये." ललिता.

"आजी बहूतेक धान्याचे माप ठेवायला विसरली वाटते." नव्या त्याच्या कानात कुजबुजली तसे त्याने ओशाळून तिच्याकडे पाहिले.


"नव्या, आपल्या संस्कृतीची अशी मजाक न उडवता आपण तिला धरून चालायचे असते हे लक्षात असू दे. विहान, बाळ तिच्या बालिशपणावर लक्ष देऊ नकोस. तू बिनधास्त आत प्रवेश कर." ललिता त्याचा हात पकडून आत घेऊन आली.

"बैस रे. संकोच करू नकोस. आपलेच घर समज." त्याला सोफ्यावर बसवत ललिताही त्याच्या शेजारी बसली.

"सुनंदा अगं ऐकलेस का? विहान आलाय. त्याच्यासाठी तू केलेला केक घेऊन येतेस ना?" आत बघत तिने सुनंदाला आवाज दिला.

हो, हो आलेय." आतून सुनंदाचा नाजूक आवाज त्याच्या कानावर आला.

आजी अगं, पोळ्याच्या बैलासारखे त्याच्या मागे का लागली आहेस? आधी त्याची सर्वांशी ओळख तर होऊन जाऊ दे."


"हो गं. ओळख करून द्यायची राहिलीच बघ. विहान मी ललिता. आमच्या शौर्या आणि निवीची आजी. आणि आजपासून तुझीसुद्धा आजी बरं." ललिताने त्याला आपली ओळख करून देताच त्याने तिला नमस्कार केला.

"सुखी राहा. तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पुऱ्या होऊ दे." त्याला भरभरून आशीर्वाद देत ललिता म्हणाली.


"तुला माहितीये का बाळा, आमची शौर्या घरी असली की घर एकदम भरल्यासारखे वाटते. आज तू आमच्याकडे आलास आणि तीच भावना जाणवली बघ."

"आजी, तुम्हाला भेटून मला देखील खूप आनंद झाला." त्याने स्मित करत म्हटले.

" हो ना? आता आणखी इतर मंडळीशी भेटशील तर पुन्हा आनंद होईल. सुनंदाऽऽ " तिने आत वळत परत हाक दिली.

"आलेऽऽ." हातात थंड पेय असलेले ट्रे घेऊन येत सुनंदा बाहेर आली.

"हे तुझ्यासाठी. मी खास बनवलेले कोकम सरबत."

"थँक यू." ग्लास हातात घेत तो म्हणाला.

"ही सुनंदा. माझी सून आणि तुझी होणारी सासू. सोबतच निवीची मॉमदेखील." ललिताने सुनंदाची ओळख करून दिली. त्यावर त्याने तिला नमस्कार करून आशीर्वाद घेतला.


"आणि आता आमच्या घरातील एकुलत्या एक कर्त्या पुरुषाला भेटून घे. म्हणजे पुढचे बोलायला आपण मोकळे होऊ." ललिता हसत म्हणाली तशी नव्या सावरून विहान शेजारी उभी राहिली.

"शशी येतो आहेस ना? आपल्याकडे आपले पाहुणे आले आहेत."

"हो, आलो गं." ललिताच्या आवाजाने आपला कुर्ता नीट सावरत शशांक बाहेर आला आणि त्याला बघताच अचानक जोरात शॉक लागल्यासारखे विहान जागेवरून उठून उभा झाला.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all