Mar 03, 2024
प्रेम

हवास मज तू! भाग -२६

Read Later
हवास मज तू! भाग -२६
हवास मज तू!
भाग -२६

मागील भागात :-
नव्या विहानला रात्री डिनरसाठी तिच्या घरी आमंत्रित केले आहे असे सांगते. सुरुवातीला तो आढेवेढे घेतो पण नतंर ते आमंत्रण स्वीकारतो.

आता पुढे.


"ओके. आता जा पण मी तुला साडेसातला घ्यायला येतेय हे लक्षात ठेव. तुझ्या बिल्डिंगचा ऍड्रेस तेवढा मला मेसेज कर." खुर्चीवर बसत ती म्हणाली.

तिला होकार देऊन तो हसत केबिनच्या बाहेर पडला खरा पण डोक्यात काहीतरी वेगळेच सुरु होते.

शशांकच्या केबिनजवळ पोहचातच त्याचे पाय अचानक थबकले आणि मनात एक विचार करत तो आत डोकावला.

"मे आय कम इन सर?" दारावरची टकटक ऐकून शशांकने मान वर केली. तसेही त्याचे बाहेरचे घुटमळणे त्याने पाहिले होते.


"हो, ये ना." त्याने हसत त्याला आत बोलावले.


"एनी प्रॉब्लेम?" तो अजूनही घुटमळत होता हे बघून शशांकने त्याला प्रश्न केला.


"सर, ऍक्च्युली मला नेहमीपेक्षा तासभर आधी सुट्टी हवी होती ती मिळेल का?"


"असे अचानकपणे? का? हम्म, लेट मी गेस. तुला मिस नव्याबरोबर बाहेर बर्थडे सेलिब्रेट करायला जायचेय, हो ना?" विहानच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत त्याने पुढे विचारले.


"नो सर. म्हणजे मला बाहेर थोडं काम आहे आणि ते आजच सायंकाळच्या आत करायचे आहे, म्हणून सुट्टी हवीय. हवे तर त्या बदल्यात मी उद्या दोन तास काम करायला तयार आहे."

त्याचे स्पष्टीकरण ऐकून शशांकला हसू आले पण त्याने त्यावर नियंत्रण ठेवले.


"विहान, तू आलास ते एका अर्थी बरेच झाले. तसेही मी तुला बोलावणारच होतो. मला आता एका मिटिंगला जावे लागेल. ही फाईल अर्ध्या तासात कंप्लिट करून मिस नव्याला मेल कर. ठीक आहे?" खुर्चीवरून उठत शशांक म्हणाला.


"ओके सर." चेहरा पाडून त्याने मान डोलावली.


"आणि हो ही खूप महत्त्वाची फाईल आहे तेव्हा हे काम इथेच बसून केलेस तर बरं होईल. त्यानंतर तू जाऊ शकतोस हं." त्याच्या खांद्यावर हात ठेवून शशांक हसत केबिनबाहेर पडला.


शशांक बाहेर पडल्यावर लॅपटॉप टेबलवर ठेवून विहान कामाला लागला. बरोबर वीस मिनिटाच्या कालावधीत त्याने काम पूर्ण केले आणि लगेच ती फाईल नव्याला मेल केली.


"डॅड, आपण डेस्टिनेशनला पोहचण्यापूर्वीच विहानचा मेल पोहचला देखील." कारमध्ये शशांकशेजारी बसलेली नव्या फाईल चेक करत म्हणाली.


"निवी, त्या मुलात एक स्पार्क आहे हे मी तुला वारंवार सांगतोय. बघ ना, त्याचीच ही झलक आहे. अशा मुलांना पुढे जाण्याचा एकतरी चान्स देऊन बघायला हवा गं आणि मी तो देणार. तू बघशील, तो नक्कीच त्या संधीचे सोने करेल." शशांक तिला म्हणाला.


"हम्म. यू आर राईट." ती हसून म्हणाली.


"तू हसते आहेस की लाजते आहेस?" त्याने मुद्दाम तिला डिवचले.

"डॅड, तू पण ना." आता खरंच तिचा चेहरा जणू लाजाळूचे झाड बनले होते.

*******

एक आळसावलेली जांभई देत विहानने लॅपटॉप बंद केला. मनगटावरील घड्याळात लक्ष गेले तर ऑफिस सुटायला अजून दीडतास उरला होता. काम आटोपले की तू जाऊ शकतोस असे शशांकने त्याला सुचवले होते ते आठवून त्याच्या ओठावर हलके असू येऊन ठेपले.


'डिअर एसके सर, यू आर रिअली ग्रेट. मी तुम्हाला एका तासाची सुट्टी मागितली तर तुम्ही मला अर्धा तास जादाचा दिलात. थँक यू सो मच.' स्वतःशी बोलत तो उठून उभा राहिला.

केबिनबाहेर जायला निघत असताना त्याचे पाय पुन्हा एकदा थांबले आणि तो परत माघारी फिरला.


आता त्याची नजर शशांकच्या खुर्चीवर खिळली होती. त्याने अलवारपणे त्या खुर्चीवरून हात फिरवला. ते करत असताना त्या खुर्चीवर बसून बघण्याचा मोह तो आवरू शकला नाही.

खुर्चीवर बसून त्याने एक गोल गिरकी घेतली. त्या बरोबरच टेबलवर असलेली 'एस के' नामांकणाची नेमप्लेट हातात घेऊन तो ती न्याहाळत राहिला.

"एस के." तो जराश्या मोठयानेच पुठपुटला. त्याच्या चेहऱ्यावरचे आतापर्यंत असलेले साधे स्मित अचानक गायब होऊन एक वेगळेच हसू उमटू लागले होते.

खुर्चीवर ताठपणे बसत त्याने स्वतःला मागे झोकून दिले आणि नेमप्लेट वर कोरलेल्या त्या दोन अक्षरांवरून आपले बोट हळुवारपणे फिरवले.

"माझं स्वप्न आता लवकरच साकार होईल." त्या अक्षरावरून बोट फिरवत तो खुर्चीवरून खाली उतरला.

"विहान सर, तुमचे काम झाले असेल तर तुम्ही जाऊ शकता. अर्ध्या तासाने केबिन लॉक करायला नव्या मॅडम मला बोलल्या होत्या." बाहेरून आत डोकावत प्यून म्हणाला.

"होय, मी निघतोच आहे." लॅपटॉप हातात घेत निघण्याच्या तयारीत तो होता.

"नव्या मॅडम सुद्धा मीटिंगला गेल्यात का?" केबिन लॉक करत असताना त्याला विहानने सहज म्हणून विचारले.

"हो तर. स्पेशल मिटिंग असली की शशांक सर नव्या मॅडमला सोबत घेऊन जात असतात हे अजून तुमच्या ध्यानात आले नाही होय?"

उत्तर देताना असा प्रश्न विचारणारा हा किती मठ्ठ आहे असा भाव त्यावेळी प्यूनच्या चेहऱ्यावर दिसत होता.

******

"विहान, वॉव! तुझा फ्लॅट तू किती सुंदर मेंटेन केला आहेस. म्हणजे आज जर मी इथे आले नसते ना तर एखादा मुलगा इतका नीटनेटका आणि व्यवस्थित राहत असेल यावर माझा विश्वास बसला नसता."


नव्या त्याला घ्यायला म्हणून त्याच्या बिल्डिंगखाली आली होती आणि त्याला खाली यायला पाच मिनिटं शिल्लक होती म्हणून तीच त्याच्या फ्लॅटवर पोहचली. तिथला त्याचा व्यवस्थितपणा बघून तिला एकदम आश्चर्याचा धक्का बसला होता.


"का? मुलं सुद्धा मनुष्य प्राण्यामध्येच मोडतात ना? मग मुलींप्रमाणे ते का नीटनेटके राहू शकत नाही?" त्याने तिलाच उलट प्रश्न केला.


"हं. ते आहेच. पण मी इतकी नीट नसते बरं. माझी रूम तर खूपदा मेस्सी होऊन जाते." ती ओशाळून म्हणाली.


"तर काय झाले? तू पसरवलेस तर आवरायला मी आहे ना? तू कशाला टेन्शन घेतेस?" तिच्याजवळ येत तो मिश्किलपणे म्हणाला.


"विहान.." त्याच्या जवळ येण्याने तिच्या शरीरात एक वेगळीच लहर पसरली.

"काय? आता आपण एसके सरांच्या ऑफिसमध्ये नाही आहोत. तर माझ्या.. आय मिन आपल्या घरी आहोत. इथे कुणाची भीती?" तिच्या कानामागे फुंकर घालत तो आणखी जवळ सरकला.

त्याच्या त्या कृतीने तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले. तेज वाढलेली हृदयाची धडधड तिची तिलाच स्पष्ट ऐकू येत होती.

तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत तो तिच्या आणखी जवळ आला. आता त्याच्या हाताचे बोट तिच्या चेहऱ्यावरून हळूवार फिरत होते. त्याचे उष्ण झालेले श्वास तिला जाणवायला लागले होते. काहीतरी घडेल असे वाटत असतानाच तिच्या चेहऱ्यावर फुंकर घालत तो बाजूला झाला आणि तिने डोळे उघडले.

"विहान?" त्याच्या अशा अचानक मागे सरण्याने ती त्याच्याजवळ आली.

"नव्या, आय एम सॉरी. मला असं भावनेच्या भरात वाहून जायला नको होतं." त्याच्या आवाजातून त्याला वाईट वाटतेय हे तिला उमगत होते.

"विहान, तू खरंच खूप चांगला आहेस अरे. स्वतःवर कंट्रोल करणं मलाच कठीण जात असताना तू मात्र आपल्या दोघांनाही अडवलेस. खरंच मला हे आवडलेय. तुला सांगू? जेव्हा जेव्हा मी तुला भेटते ना, प्रत्येकवेळी तुझ्या नव्या रूपाच्या मी प्रेमात पडते." त्याचा हात हातात घेत ती म्हणाली.


"नव्या, एखादे नाते तुटायला मोहाचा एक क्षण देखील पुरेसा असतो गं. आपलं नातं हेल्दी बनवायला आपल्याला हाच मोह तर टाळता यायला जमलं पाहिजे." तिच्या नाकावर नेहमीप्रमाणे टिचकी मारून तो म्हणाला.


"यू आर राईट आणि तुला निवडून माझा चॉईस किती राईट आहे हे मला पटायला लागलंय." त्याच्या मिठीत शिरत ती म्हणाली.


"बरं आता निघायचं ना? नाहीतर तुझ्या घरचे मला उशीरा आलेले बघून लेट मार्कच्या शेऱ्याखाली नकार वगैरे द्यायचे."


"काहीही रे तुझं. लेट मार्क लागायला माझे घर म्हणजे काय आपले ऑफिस आहे का?" त्याच्या मिठीतून बाहेर येत ती लटक्या रागाने म्हणाली.


"पण आता जायला हवे हेही खरेच आहे हं." ती.


"गुड गर्ल. बस एकच मिनिट. मला या पिशव्या घेऊ देत." सोफ्यावरच्या पिशव्या उचलत तो म्हणाला.

त्याने पिशवी बाजूला करताच टेबलवरच्या फोटोकडे नव्याचे लक्ष वेधले.


"विहान, एक मिनिट. या कोण आहेत?" तो फोटो हातात घेत तिने प्रश्न केला.


"ही कोण म्हणून काय विचारतेस? ही म्हणजे माझं दैवत. माझी प्रेरणा आहे." त्याचा आवाज लगेच मवाळ झाला.


"म्हणजे? या तुझ्या आई आहेत का?" त्याच्या डोळ्यातील ओल बघून तिने पुढे विचारले.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
फोटो गुगल साभार.
********

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//