हवास मज तू! भाग -२४

वाचा नव्या आणि विहानची एक अनोखी प्रेमकथा!
हवास मज तू!
भाग -२४.

मागील भागात :-
नव्या विहानच्या प्रपोजल बद्दल शौर्याला सांगते. रात्री ती त्याच्याच आठवणीत बराच वेळ जागी असते.

आता पुढे.


नाकाजवळचा गुलाब त्याने त्याच्या ओठावरून अलगद फिरवला. त्या गुलाबपाकळीवर ओठांचा स्पर्श करत त्याने डोळे मिटून घेतले.


'डिअर नव्या, फायनली मी तुझ्यासमोर मोकळा झालो. माझे प्रेम व्यक्त केले. खूप खूप खूप आनंदी गं मी.'

मनातल्या मनात बोलताना त्याने एक आवंढा गिळला. डोळ्याच्या कोनातून एक अश्रू हलकेच गालावर येऊन विसावला होता.

त्या अश्रूच्या थेंबाला त्याने आपल्या बोटाने अलगद टिपून घेतले आणि हातातील गुलाब बाजूला सारून आईचा फोटो हातात घेतला.
"खूप दिवसापासून मी बुद्धिबळाचा डाव खेळलाच नाही गं. आज एक गेम होऊन जाऊ देऊया का?" फोटोतील चेहऱ्यावर नजर रोखून तो म्हणाला. त्याच्या डोळ्यातील अश्रू बाजूला सरून आता तिथे जिंकण्याची नशा चढू लागली होती.


"चेक द मेट!" तासभर डोकं लढवत बसल्यावर त्याने विरुद्ध बाजूच्या राजाला संपूर्णपणे घेरत म्हटले.

तोच लढवत असलेली दुसरी बाजू पूर्णपणे कमकुवत झाली होती. पुढल्या खेळीत तिथल्या राणीला त्याने उचलून ओठाशी लावले.

"राणी तर माझी झालीच आहे. आता फक्त शेवटची चाल.. आणि खेळ खलास!" स्वतःशीच मोठ्याने हसत त्याने खेळ तिथेच थांबवला. जणुकाही त्याने ती चाल बुद्धिबळाच्या पाटावर नव्हे तर प्रत्यक्षात चालवायला राखून ठेवली होती.

राणीची ती सोंगाटी त्याने तशीच मुठीत धरून ठेवली. आईच्या फोटोला छातीशी घट्ट पकडले आणि टेबलावरचा गुलाब ओठावर टेकवला. हळूहळू डोळे जड येऊ लागले होते. तो मग तसाच निद्रेच्या स्वाधीन झाला.

******
"गुडमॉर्निंग!"

सकाळी गडबडीत तो ऑफिसला पोहचला तेव्हा ऑफिसच्या गेटजवळ नव्या त्याची वाट बघत उभी होती.

"व्हेरी गुडमॉर्निंग ब्युटीफूल गर्ल." तिच्याजवळ येत त्याने हसून प्रत्युत्तर दिले.

"आज अशी एकदम बाहेर का उभी आहेस?"

"तुझीच वाट बघत होते." ती गोड स्मित करत म्हणाली. "बाय द वे विश यू व्हेरी हॅपी बर्थडे वन्स अगेन."त्याचा हात हातात घेऊन तिने त्याला शुभेच्छा दिल्या आणि सोबतच एक लाल गुलाब देखील.

"वॉव! रेड रोज! आय लव्ह इट. थँक्स डिअर." त्या गुलाब पाकळ्यावर त्याचे ओठ नेहमीच्या सवयीप्रमाणे अलगद फिरले.

"चल आत जाऊया. नाहीतर कोणीतरी आपल्याला असे एकत्र बघेल आणि उगाच आपल्या नावाचा बोभाटा करेल." तो आत वळत म्हणाला.

"तू घाबरतोस?"


"छे गं. मी स्वतःसाठी घाबरत नाही पण माझ्यामुळे तुला कोणी काही म्हणेल म्हणून घाबरतो. तुला त्रास झालेला मला कसं बरं आवडेल?"


"ओह! आय एम इम्प्रेस्ड. बाय द वे, माझ्यासाठी तुला असे आता जास्त दिवस घाबरावे लागणार नाही कारण आपल्यातील नाते मी लवकरच जाहीर करणार आहे." जाता जाता एक डोळे मिचकावत ती म्हणाली.

"नो नव्या, प्लीज." त्याने तिचा हात पकडून तिला थांबवले.


"म्हणजे जोवर मी स्वतःच्या बळावर आणखी मोठा होत नाही तोवर तरी इथे नको ना गं कोणाला सांगूस." त्याच्या चेहरा गंभीर झाला होता.

"मिस्टर विहान आपण ऑफिस कॅम्पस मध्ये आहोत. इथे माझा हात पकडण्याची तुमची हिंमत कशी झाली?" नव्या गमतीत बोलली खरी पण खरंच त्याने तिच्या हातावरची पकड काढून टाकली.


"बापरे! किती घाबरतोस रे." त्याची अशी चटकन आलेली प्रतिक्रिया बघून तिला हसू आवरत नव्हते.


"नव्या मॅडम, आपण ऑफिस कॅम्पस मध्ये आहोत. विसरू नका बरं." तिच्या नाकावर हळूच टिचकी मारून तो हसत पुढे निघून गेला.

तो गेला ती मात्र स्तब्ध होऊन क्षणभर पाठमोऱ्या त्याच्याकडे बघतच राहिली आणि मग डोक्याला टपली मारून तिच्या केबिनकडे गेली.

******

"मॅम, सरांनी सर्वांना तातडीने केबिनमध्ये बोलावले आहे." दुपारी लंच नतंर प्यून सांगून गेला तसे नव्याने आपले दोन्ही खांदे उडवले. शशांकने बोलावले तर तो तिला तसे इंटरकॉम वरून देखील कळवू शकला असता.

'आता पुन्हा नवीन काय झोल झालाय?' असा स्वतःशीच विचार करत ती बाहेर आली.

"डिअर ऑल, आत्ताच थोड्यावेळापूर्वी मला कळले की आपल्या एका गुणी स्टॉफ मेंबरचा वाढदिवस आहे आणि तो इथे एकटाच असल्यामुळे त्याचा वाढदिवस आपण सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट करावा असे माझ्या डोक्यात आले. त्यासाठी हा केक."

केबिनमध्ये जमा झालेल्या सर्वांच्या नजरा केकवर खिळल्याचे बघून शशांकने स्पष्टीकरण दिले.

"सर, तो लकी मेंबर कोण आहे ते तरी कळू द्या. म्हणजे आम्हालाही कल्पना येईल." सर्वांच्या वतीने विनीत समोर येत म्हणाला.

"विहान, ये ना. आफ्टरऑल धिस इज युअर डे." शशांकने विहानकडे बघत इशारा केला आणि आणि चारशे चाळीस चा झटका बसावा तसा विहान एकदम शॉक झाला.

"विहान, छुपा रुस्तम. दिवस संपत आलाय आणि आम्हाला तुझा बड्डे आहे हे साधं सांगितलं देखील नाहीस." कीर्ती त्याच्याकडे डोळे मोठे करून म्हणाली.

"खरं तर मी कधी वाढदिवस साजरा करत नाही म्हणून कोणाला सांगितलं नव्हतं." काहीसा बुजत समोर येत म्हणाला.

काय? आजवर तू कधीच वाढदिवस साजरा केला नाहीस? मग यापुढे दरवर्षी आपण इथेच साजरा करत जाऊया. हो ना हो सर?" त्याच्या एका कलीगने शशांककडे सूचक बघत म्हटले.


"तशी आयडिया चांगली आहे." शशांकने तिला दुजोरा दिला.


"नव्या, बघतेस ना? ही कशी गोड गोड बोलतेय. आजवर आपण सरांना खडूस म्हणत आलोय आणि आज ते चक्क स्टॉफचा बड्डे सेलिब्रेट करत आहेत, हे तुला काहीसे विचित्र वाटत नाहीये का?" कीर्तीने हळूच नव्याला कोपऱ्याने मारले.


"अं? हो. मलाही विचित्र वाटतेय." खरे तर नव्या देखील शॉक झाली होती.

काल भावनेच्या भरात तिने त्याला हे मागणे मागितले होते आणि त्यावर त्याने नकार देखील दिला होता. पण लेकीच्या आनंदासाठी तो ऑफिसमधले नियम असे बाजूला बसवेल हे तिला तरी कुठे ठाऊक होते?


"नुसती हो, हो काय करतेस? त्याला जरा लवकर पटव ना. नाहीतर ही बया त्याला घेऊन पसार व्हायची." विहानला केक भरवत असलेल्या त्या कलीगकडे इशारा करत कीर्ती परत नव्याच्या कानात कुजबुजली.


"हम्म. हो." तिला काय उत्तर द्यावे हे नव्याला कळेना.


"तू केवळ हो, हो च करत रहा. बाकी तुझ्याने काही होणार नाही." तिच्या थंड प्रतिक्रियेवर चिडून कीर्ती विहानला केक भरवायला गेली.


"इतक्या सुंदर सरप्राईजसाठी थँक यू सो मच सर. माझ्या आयुष्यातील हा सर्वात संस्मरणीय वाढदिवस असेल." बोलताना विहानला भरून आल्यासारखे झाले.

अरे, असे नाहीय." त्याच्या खांद्यावर हात ठेवत शशांक त्याला आश्वस्त करत म्हणाला.

हळूहळू सगळे आपल्या जागेवर परत गेले.

"मिस नव्या, तुम्ही तुमच्या कलीगला विश नाही केलेत." शशांकने नव्याकडे एक कटाक्ष टाकला.


"सर ते.." काहीशी गोंधळून ती जवळ आली आणि केकचा एक पीस तिने विहानला भरवला.
केक भरवताना त्याच्या ओठांचा झालेला ओझरता स्पर्श तिला शहारून गेला.

******

"मॅम, तुम्ही सरांना आजच्या दिवसाबद्दल सांगितले का?" केबिनमधून बाहेर येताना त्याने नव्याला विचारले.


"एसके सर आपले बॉस आहेत हे विसरू नकोस. त्यामुळे त्यांना सर्व इन्फॉर्मेशन असते." त्याला बगल देत ती तिच्या केबिनकडे गेली.


"काय गं? माझ्या नातजावयाला जेवायला यायचे निमंत्रण दिलेस की नाही?" काम करत असताना नव्याला ललिताने फोन केला.


"नाही गं आजी. ऑफिस सुटले की सांगेन ना." ती.

"निवी, अशी गं कशी तू विसरभोळी आहेस? मला त्याचा नंबर दे बघू. मी कॉल करून सांगते." ललिता तिच्यावरच भडकली.


"अगं आजी, मीच सांगते. तू नको काळजी करुस." नव्या फोन ठेवत म्हणाली.


"निवी, विहानची फेवरेट डिश काय आहे जरा सांगशील का गं?" थोड्याच वेळात सुनंदाने तिला फोन केला.


"मॉम, अगं तुम्ही जे कराल ते तो आनंदाने खाईल. आता प्लीज मला त्रास नका ना देऊ." तिने थोडेसे चिडून फोन कट केला.

थोड्यावेळाने पुन्हा फोन व्हायब्रेट झाला तसे कुणाचा कॉल आहे हे न बघताच तिने कानाला फोन लावला.


"तुम्ही दोघी मला छळायचे थांबवणार नाही आहात का? असे कराल तर मी आता पुढचा कॉल घेणारच नाही बघा." तिचा स्वर वैतागलेला होता.


"मॅम प्लीज, असं काही करू नका ना. दिवसभरातून मी तर पहिल्यांदा कॉल करतोय." पलीकडून विहानचा आवाज कानावर येताच नव्याने जोरात जीभ चावली.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
*******


🎭 Series Post

View all