हवास मज तू!भाग -२०

वाचा विहान आणि नव्याच्या प्रेमाची कथा
हवास मज तू!
भाग -२०

मागील भागात :-

ऑफिस पार्टीमध्ये शशांक विहानचे निरीक्षण करत असतो. आपल्या लेकीला हाच योग्य जोडीदार आहे याची त्याला खात्री पटते.

आता पुढे.


"अं? हो. मला काय प्राब्लेम असेल? पण रात्र खूप झालीये. तिला लवकर तिच्या घरी पोहचवलेस म्हणजे झालं. मिस नव्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना?" त्याने मुद्दाम तिच्याकडे बघितले.


त्याच्या प्रश्नाने तिचा चेहरा गोरामोरा झाला होता. आपल्या मुलीला असा कोंडीत पकडणारा डॅड कुठून लाभला असे तिला त्यावेळी झाले.


दोघे सोबत हॉटेलच्या बाहेर पडले. शशांक मंद हसत त्यांच्या जोडीला निरखत होता. हातात मोबाईल घेत त्याने सुनंदाचा नंबर डायल केला.


"हॅलो सुनी, आपली लेक मोठी झालीये गं." कानाला मोबाईल लावत तो अलवार स्वरात म्हणाला.


"शशी, आपली निवी त्या विहानसोबत डेटवर वगैरे नाही ना गेली?" तिच्या अचानक आलेल्या प्रश्नावर त्याने चमकून इकडेतिकडे बघत कानोसा घेतला.


"सुनी, तू कुठे आहेस?" त्याच्या प्रश्नात आणखी प्रश्न होते.


"शशी, अरे मी घरीच आहे. काय झाले? माझा तर्क बरोबर ठरला ना? निवी विहानसोबत गेलीये ना?" तिने हसू विचारले.


"हम्म. म्हणजे तो बहूतेक तिला प्रपोज करतोय असा माझा अंदाज आहे म्हणून मीच जाऊ दिलं." तो उत्तरला.


"शशी, आपण जगातील पहिले आईवडील आहोत का रे? जे आपल्याच लेकीला प्रेमात पडायला मदत करतोय? मला ना विचार करूनच हसू येतंय." सुनंदा खरंच हसायला लागली.


"आता काय करणार? शौर्या असं कधी वागणार नाही तेव्हा निवीच्या आनंदात आपण आपला आनंद मानायचा." त्याने हसत उत्तर दिले.

"बरं चल, मी घरी येतोय. नतंर बोलूया. बाय." कॉल कट करून तो निघाला.

*******

पायाला होणाऱ्या त्रासामुळे नव्या हळूवार पाऊल उचलत होती. विहानदेखील तिच्याच चालीने चालत होता. त्याच्या कारशेजारी आल्यावर पुढे होऊन त्याने तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडला. तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला तसे इशाऱ्याने तिला आत बसायला सांगत त्याने ड्रायव्हिंग सीटचा ताबा घेतला.

इतक्या रात्री तो तिला कुठे घेऊन जाणार आहे; तिला काहीच ठाऊक नव्हते. केवळ त्याच्या शब्दावर विश्वास ती त्याच्यासोबत निघाली होती.

विश्वास! किती मोठा शब्द. याच विश्वासाने शशांकने त्याच्या काळजाच्या तुकड्याला एका परक्या मुलासोबत पाठवले होते आणि तो त्याचा विश्वासघात करणार नाही हा त्याला विश्वास होता.


कारमध्ये नव्या विहानच्या शेजारी बसली होती. मधूनच त्याच्याकडे एक नजर टाकत होती. तो मात्र काही न बोलता शांतपणे कार चालवत होता. तिला असे स्वस्थ बसवत नव्हते. तिच्या मनाची चाललेली चुळबुळ त्याला जाणवत होती. काही न बोलता त्याने म्युझिक सिस्टीम सुरु केले.

'होशवालों को खबर क्या
बेखूदी क्या चीज है,
इश्क किजीये फिर समझीए
जिंदगी क्या चीज है..

जगजीतस सिंगचा आवाज ऐकून तिने चमकून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या ओठावर मिश्किल हसू होते.


"तुला जगजीत सिंगची गाणी आवडतात?" आश्चर्याने डोळे मोठे करून तिने त्याला विचारले.


"हम्म. तुला आवडणारी प्रत्येक गोष्ट मला आवडते." तो अगदी सहजपणे बोलून गेला आणि ती आ वासून त्याच्याकडे बघत राहिली.


"नव्या मॅडम तोंड बंद करा नाहीतर डास आत जाईल बरं." तिला तसे बघून त्याला खेचायची लहर आली आणि त्याचे ऐकून तिने चटकन तोंडावर हात ठेवला.

"ॲक्च्युली कारमध्ये एकही डास नाहीत." तिला तोंडावर हात ठेवलेले बघून तो हसला.


तसे तिही ओशाळून खिडकीतून बाहेर बघू लागली. त्याच्याकडे बघायची तिची हिम्मत होत नव्हती.

रात्रीची वेळ. शहराच्या बाहेरच्या भागातून पळणारी कार, दुरून दिसणाऱ्या लाईट्समुळे जणू चांदणे खाली उतरल्याचा होणारा भास, बाहेरचा झुळझुळणारा वारा आणि सोबतीला जगजीत सिंगची मनाला भिडणारी गायकी.. तिने डोळे मिटून घेतले. काही काळ ती त्या जगात जणू हरवून गेली होती.


"मॅम, उतरायचं?" विहानच्या आवाजाने ती भानावर आली. बघते तर कार थांबली होती आणि तिच्या बाजूचा दरवाजा उघडून विहान समोर उभा होता.

"विहान आपण कुठे आलो आहोत?" बाहेर येत तिने विचारले.


"विश्वास ठेवून इथवर आलीसच की. आता त्याच विश्वासाने माझ्यासोबत चल." आपला हात तिच्यापुढे करत तो म्हणाला.

त्याच्या हातात हात द्यावा की नाही या विचाराने ती थोडीशी अवघडली.

"तुझा पाय त्रास देत असेल म्हणून मी हात पुढे केलाय. डोन्ट टेक इट अदरवाईज." त्याच्या आश्वासक स्वराने तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि तिच्याही नकळत तिचा हात त्याच्या हातात गेला.


ते एक सुंदर असे ओपन स्पेस रेस्टॉरंट होते. तिथले आल्हाददायक वातावरण मनाला मोहवत होते. रेस्टॉरंट शहराच्या बाहेर असल्यामुळे तिथे जास्त गर्दी नव्हती.

"वेलकम सर, वेलकम मॅम. आपला टेबल तयार आहे."

वेटर अदबीने म्हणाला त्यावर नव्याने सूचकपणे विहानकडे पाहिले. तिच्या नजरेतील प्रश्न त्याला दिसत होता. उत्तरादाखल त्याने केवळ स्मित केले.


"तू टेबल आधीच बुक करून ठेवले होतेस. म्हणजे मी तुझ्यासोबत येणार आहे हे तुला ठाऊक होतं?" खुर्चीवर बसत असताना त्याच्याकडे बघून तिने विचारले.


"हम्म तशी नव्याण्णव टक्के खात्री होती." त्याचे उत्तर.

"आणि उरलेल्या एका टक्क्याचं काय?" ती.

"तो एक टक्का माझ्यासाठी होता. जर तू नाही म्हणालीस तर तुला मनवून मी घेऊन आलो असतोच." तिच्या चेहऱ्यावर नजर रोखून त्याने उत्तर दिले.

त्याची ती नजर तिला हवीहवीशी वाटत होती पण स्वतः त्या नजरेत थेट नजर मिळवायला तिला जमत नव्हते. लज्जेने तिचे सुंदर डोळे आपोआप खाली झुकले होते.

"नव्या, आज खूप सुंदर दिसते आहेस. असं वाटतंय की तुझ्या चेहऱ्यावरून नजर दुसरीकडे वळायलाच नको." तो मनातले बोलून मोकळा होत होता आणि ती लाजेने पाणी पाणी होत होती.


"सर, युअर ऑर्डर." वेटरच्या आवाजाने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि नव्याने क्षणभरापासून पकडून ठेवलेला श्वास सोडला.

'उफ्फ! प्रेम तर आहेच. हवेही आहे. जे घडतेय ते आवडत देखील आहे. मग तरीही हे हृदय का इतके धडधडतेय?' ऑफिसमधील मोठमोठ्या समस्या सहज सोडवणाऱ्या तिला स्वतःच्या भावानांना नियंत्रित करणे केवढे कठीण जात होते?

"टू आईस्ड कॅरमल लॅट्टे." त्याने ऑर्डर दिली. "म्हणजे हे चालेल ना तुला?"

वेटर ऑर्डर घेऊन गेला तेव्हा त्याने नव्याला विचारले.

"येस. आईस्ड कॅरमल इज माय फेवरेट. ती गोड हसली. कारमध्ये आवडता जगजीत आणि आता आवडती कॉफी. ओठावर गोड हसू उमलणारच ना?

"तुला माझ्या सर्व आवडीनिवडी बऱ्या ठाऊक आहेत रे?" तिने कॉफीचा एक सिप घेत विचारले.

"अहं, मी तर फक्त माझी आवड सांगितली होती. पण तुला आवडणारी प्रत्येक गोष्ट मला आवडते हेही तितकेच खरे आहे." हाताच्या स्लीव्हज फोल्ड करत तो म्हणाला.

यावेळी तिची नजर त्याच्यावर खिळली होती. त्याने पार्टीत घातलेला जॅकेट आता बाजूला काढून ठेवला होता. फोल्डेड स्लीव्ह्ज मध्ये तो एकदम कूल दिसत होता.

'ही इज सच अ कूल गाय.. मिस्टर कूल!' मनात ती मंद हसली.

"सर, धिस इज युअर केक." वेटर एक ब्लॅक फ़ॉरेस्ट केक टेबलवर वेटर म्हणाला.

"थँक यू." म्हणत विहानने मनगटावरच्या घड्याळात पाहिले. तासकाटा आणि मिनिटकाट्याची जोडी बाराच्या आकड्यावर विराजमान होत होती.

"विहान, केक?" नव्याच्या चेहऱ्यावर कुतूहल होते.


"हम्म. चला केक कटिंग करूया?" हातातील सूरी तिच्याकडे फिरवत तो म्हणाला.


"पण..?" काय करावे तिला सुचत नव्हते.


"नव्या, टुडे इज माय बर्थडे. लेट्स सेलिब्रेट." अगदी हळू स्वरात त्याने तिला सांगितले तसे ती डोळे फाडून त्याच्याकडे पाहत राहिली.


"विहान, मूर्ख अरे हे तू आत्ता सांगतो आहेस?" ती त्याला ओरडली.

"अगं बर्थडे आत्ता दोन मिनिटांपूर्वी सुरु झालाय. मग आधीच कसं सांगायचं ना? आणि तसेही मी कधी मनवत नाही पण आज स्पेशल व्यक्ती सोबत असणार होती म्हणून साजरा करावासा वाटला." तिच्या प्रतिक्रियेवर त्याने हसून उत्तर दिले.


"तरीही रे. आधी सांगायचंस ना? मी काही गिफ्ट तरी घेऊन आले असते." ती निरागसपणे खंत व्यक्त करत म्हणाली.

"गिफ्ट तर मला मिळेलच. त्याआधी केक कापूया?" मिश्किलपणे तिच्याकडे पाहत तो म्हणाला.

तिने हसून मान डोलावली. त्याने केक कापला आणि तिला तिला एक पीस भरवला. तिनेही त्याला भरवला.


"हॅपी बर्थडे विहान. तुझी सर्व स्वप्न पूर्ण होऊ देत." त्याला शुभेच्छा देत तिने त्याच्या गालाला केकवरची क्रीम लावली.


"थँक यू सो मच." तो म्हणाला.

"तुला सांगू? आजचा बर्थडे माझ्या आयुष्यातील सर्वात खास आहे. कारण एका खास व्यक्तीबरोबर मी तो सेलिब्रेट करतोय. थँक्स टू यू नव्या. तू आलीस म्हणून हे शक्य झाले." तो थोडासा हळवा झाला होता.

:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
फोटो गुगल साभार.
*****

🎭 Series Post

View all