हवास मज तू!भाग -१९

विहान नव्याला आपल्या मनातील भावना सांगेल का?
हवास मज तू!
भाग -१९
मागील भागात :-
नव्याच्या पायाला त्रास होतोय हे समजल्यावर विहान तिला त्याच्यासोबत घेऊन जातो. तिची ही अवस्था त्याच्यामुळेच झालीय असे समजून खरे कारण जाणून घ्यायला तो तिला शपथ घालतो.

आता पुढे.


"म्हणजे माझ्यामुळेच तुला त्रास झालाय, हो ना? प्लीज खोटं बोलू नकोस. खरं खरं सांग. तुला माझी शपथ."

त्याने शपथ घातली आणि खाली झुकलेली तिची नजर तिने वर केली.


"नव्या?" त्याने परत एकदा अलवारपणे साद घातली.


"हो.. म्हणजे नाही.. म्हणजे हो." त्याने शपथ घातली त्यामुळे तिला सांगणे टाळता येणं शक्य नव्हते.


"म्हणजे हो. बरोबर?" त्याने तिला कोंडीत पकडले.


"हम्म." नजर दुसरीकडे करत ती.

"ॲक्च्युली मी देवीला साकडे घातले होते की ही डील यशस्वी झाली तर मी देवीच्या दर्शनाला अनवाणी चालत जाईन. तेच पूर्ण करायला मी आज गेले होते. म्हणून पायाला इजा झालीय." ती सांगत होती आणि इकडे विहानच्या डोळ्यात पाणी जमा झाले.


"नव्या, हे सगळं करायची खरंच गरज होती का? माझ्यामुळे तुला त्रास होतोय हे बघून खूप गिल्टी फील होत आहे. का इतकी चांगली आहेस तू? माझ्यासाठी का एवढं करत असतेस?" बोलताना तो हळवा झाला.


"सर, फर्स्ट एड बॉक्स." दारातून रूम सर्व्हिस वाल्याने नॉक करत हाक दिली.


"नव्या, पाय समोर कर. मला ही क्रीम लावून द्यायची आहे." तो गेल्यावर विहान तिला म्हणाला.


"विहान, अरे माझं मी लावून घेईल ना."


"नो, तुला माझ्यामुळे त्रास झाला तेव्हा मीच लावून देईन." तिच्या नाजूक पायाच्या तळव्यावरून मलम लावलेले बोट फिरवत तो म्हणाला.

त्याच्या काळजीयुक्त मऊशार स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे येत होते. तिने पाय आकसून घेतले.

"विहान, पुरे आता. बाकीचे मी लावून घेईल."


"नो. तू माझ्यासाठी इतका त्रास सहन करू शकतेस तर मी हे छोटेसे काम करू शकत नाही का? तू फक्त शांतपणे बैस." त्याने ठामपणे नकार दिला. त्यावर ती पुढे काहीच बोलू शकली नाही.


तसेही ती काय बोलणार होती? त्याच्या स्पर्शाने मनात काहीतरी होतेय हे कुठे ती सांगू शकली असती? काही न बोलता तिने अलगद डोळे मिटून घेतले. पायाला मलमेचा थंड स्पर्श होताच त्रास कमी झाल्यासारखे वाटत होते. कमी झालेला त्रास क्रीममुळे होता की काळजीने ते लावून देणाऱ्या विहानमुळे, तिलाही कळत नव्हते.

"आता कसं वाटतंय?"

"मच बेटर." त्याचा आवाज आला तशी डोळे उघडून ती म्हणाली.

डोळे उघडले तेव्हा विहान तिच्या अगदी समोर उभा दिसला. त्याचा हँडसम चेहरा, सेट केलेले केस, डिओचा दरववळणारा सुगंध आणि डोळ्यात दिसणारी तिच्याबद्दलची काळजी. हा क्षण पुढे सरकूच नये, असाच पकडून ठेवावा असे तिला वाटले.


"नव्या, यापुढे असला वेडेपणा करू नकोस. तुला त्रास झाला की मला सहन होत नाही गं."

किती अलवारपणे तो बोलत होता. जणू काही ते बोल म्हणजे तिच्या जखमेवर हळूवारपणे मारलेली फुंकर, त्यावर लावलेल्या थंडगार मलमेचा स्पर्शच.


"मला त्रासात बघून तुला का त्रास व्हावा?" मन नको म्हणत असताना तिच्या ओठावर प्रश्न आलाच.


"खरंच का याचं कारण तुला कळत नाहीये?" तिच्या लोभसवाण्या चेहऱ्यावर नजर खिळवून त्याने प्रश्न केला.


"अहं." त्या नजरेने जराशी बावरली ती.


"माझ्या मनात काय चाललंय हे तुला कळतं, मग ही गोष्ट का कळत नाहीये गं?" त्याने सौम्यपणे विचारले.


"आता नाही कळत आहे तर काय करू? तू जरा नीट उलगडून सांग ना." तिचा लडीवाळ हट्ट.


"पार्टी आटोपली की थोडा वेळ माझ्यासोबत घालवशील? तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तेव्हाच देईन." क्षणभर विचार करून तो म्हणाला.


"शुअर! चालेल मला." ती चटकन उत्तरली. जणू काही ती याचीच वाट बघत होती.


लगेच तिला तिचा उतावीळपणा लक्षात आला आणि तिचेच तिला हसू आले. संयमी आणि संयतपणे प्रत्येक परिस्थिती सांभाळणाऱ्या शौर्याची ती बहीण होती, आणि तिच्या तुलनेत आपण किती उतावीळ आहोत हे उमगून तिने डोक्यावर हात मारला. मनात एकदम खजिल झाल्यासारखे वाटले.


तो तिच्या चेहऱ्यावरचे एकेक भाव निरखत होता. तिच्या मनात काय खळबळ माजलीय याचा त्याला अंदाज आला असावा कारण त्याचे ओठ हलकेच रुंदावले होते.


"विहान एक सेल्फी घेऊयात?" त्याने विषयाला काही फाटे फोडण्यापूर्वी तिने दुसरा विषय सुरु केला.


"हो, चालेल ना. स्वतःच्या चेहऱ्यावर मास्क लावून त्याने तिचा मास्क तिच्या हातावर ठेवला.

"सेल्फी विथ मास्क?" तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह लगेच मावळला. कारण सेल्फी काढून लगेच ते फोटो तिला शौर्याला पाठवायचे होते. मास्क घातल्यामुळे त्याचा चेहरा तिला पूर्णपणे पाहता आला नसता.


"पार्टीत सर्वांनी मास्क घातले आहेत. तेव्हा आपल्यालाही घालावेच लागेल. सेल्फीनतंर पार्टी जॉईन करायची आहे ना?"

तिच्या हातातील मोबाईल घेऊन त्यानेच तिच्या डोक्याला डोके भिडवून फोटो काढला आणि मोबाईल तिच्या हातात परत ठेवला. हे सर्व इतक्या वेगात घडले की तिला काही बोलताच आले नाही.


"बाहेर जाऊयात?" तिच्यासमोर हात करत तो म्हणाला. होकार देत ती उभी झाली.

"सांभाळून. हळुवार पाऊल टाकलेस तरी चालेल." त्याच्या डोळ्यात पुन्हा काळजी दाटली आणि ते बघून तिच्या ओठावर स्मित उमटले.

*******

"काय मग? झाली का तुझी सेटिंग?" पार्टीत पुन्हा जॉईन झाल्यावर कीर्ती हळूच तिच्या कानात कुजबुजली.


"काही काय बोलतेस? पायाला त्रास होत होता, म्हणून तो सोबत आला होता. मैत्रीण असून तुला माझा त्रास दिसला नाही पण त्याला लगेच कळले." तिच्यावर धुसफूसत नव्या म्हणाली.


"अगं, चिडू नकोस ना. माझ्या लक्षात नाही आले. पण नव्या, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? आपल्या दुःखाच्या वेळी आपलं प्रेमच आपली जास्त काळजी घेतो. कदाचित म्हणून आम्हाला कुणाला काही कळले नाही ते त्याला कळले.

आय एम डॅम शुअर की तो सुद्धा तुझ्या प्रेमात आकंठ बुडाला आहे." तिला कोपराने धक्का देत कीर्ती हसून म्हणाली.ते ऐकून नव्याच्या चेहऱ्यावर लज्जेची लाली पसरली.


"फायनली, यू प्रपोज्ड हर." स्मित करत असणाऱ्या विहानला शशांकने पुन्हा गाठले.


"ॲ क्च्युली सर.. नो. बट आय विल. म्हणजे प्रयत्न सुरु आहेत." काहीसे लाजत, केसातून हात फिरवत त्याने उत्तर दिले.


"कम ऑन विहान. एखाद्या मुलीला मनातील भावना सांगण्यासाठी किती वेळ घेशील?"

"सर, हे म्हणजे ते डील फायनल करण्यासारखं नाहीये ना हो. पण आज नक्की मी माझ्या मनातलं बोलेन. सगळं सांगून मोकळा होईल. मग ती काय म्हणेल ते म्हणेल. तिच्या भावनांचा मी कायम रिस्पेक्ट करेन."


त्याच्या उत्तराने शशांकच्या चेहऱ्यावर एक समाधानाची रेषा उमटली.एखाद्या वडिलांना काय हवे असते? सुख, समृद्धी, वैभव सारेच त्याने त्याच्या लेकीला बहाल केले होते. स्वतःच्या कर्तृत्वावर ती स्वतः उच्च पदावर कार्यरत होती. आयुष्यात कशाची कमी म्हणून काही उरली नव्हतीच. फक्त हवा होता एक जोडीदार. जो तिला समजून घेईल. तिच्यावर प्रेमाची उधळण करेल. तिला जरा जरी दुःख झाले तर त्याची झळ त्याला लागेल.


आणि हे सर्व गुण शशांकला विहानमध्ये दिसत होते. जीवनभर आपल्या मुलीचा हात घट्ट पकडून ठेवणारा तिचा जीवनसाथी म्हणून तो विहानकडे बघत होता. त्याचा सालस आणि मृदू स्वभाव, हुशारी, चिकाटी याने तो प्रभावीत झाला होताच पण आज इतक्या लोकांमध्ये नव्याची सॅन्डल हातात पकडून तिला ज्या काळजीने तो घेऊन गेला, त्यावरून हाच तिचा योग्य साथीदार याची शशांकला खात्री पटली होती.


पार्टी आटोपल्यावर एकेक करत सर्व घरी जायला निघाले. कीर्ती आणि विनीत एकत्र जाणार होते. त्यांनी नव्याला ड्रॉप करून देऊ का म्हणून विचारले पण तिने नकार दिला.


"मिस नव्या, तुम्ही कशाने जाणार आहात? उशीर होतोय तर तुमच्या घरचे काळजी करत असतील ना? माझ्यासोबत चला, मी सोडेन तुम्हाला." शशांक स्वतःहून असे म्हणाला त्यावर काय उत्तर द्यावे हे तिला सुचेना.


"एक्सक्युज मी सर, मी मिस नव्याला सोडले तर तुम्हाला चालेल का?" ती शशांकला होकार देईल असे वाटून विहान लगेच पुढे आला.


"अं? हो. मला काय प्राब्लेम असेल? पण रात्र खूप झालीये. तिला लवकर तिच्या घरी पोहचवलेस म्हणजे झालं. मिस नव्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना?" त्याने मुद्दाम तिच्याकडे बघितले.


त्याच्या प्रश्नाने तिचा चेहरा गोरामोरा झाला होता. आपल्या मुलीला असा कोंडीत पकडणारा डॅड कुठून लाभला असे तिला त्यावेळी झाले.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *

🎭 Series Post

View all