Login

हवास मज तू. भाग -१८

खरंच का प्रेम फसवे असते? वाचा नव्याच्या प्रेमाची कथा.
हवास मज तू!
भाग -१८

मागील भागात :-
छानशी तयार झालेली नव्या पार्टीमध्ये एंट्री करते पण तिच्याकडे विहानचे लक्ष नसते. त्यामुळे ती थोडी चिडते आणि विनीतला डान्ससाठी विचारते.
आता पुढे.


"बघितलेस ना? सगळ्या मुली त्याच्यामागे कश्या लागल्या आहेत ते. एखाद्या सुंदर मुलीने त्याला पटवले तर तोही नाही म्हणणार नाही. ऑफ्टरऑल मेन्स विल बी मेन्स." कीर्ती हळू आवाजात कुजबुजली.


"हू केअर्स?"

आपली पोनिटेल जोरात हलवत नव्या विनीत जवळ जाऊन उभी राहिली. विहानला असे मुलींसोबत बघून राग तर आला होता पण यावेळी तिला व्यक्त होता येत नव्हते.


"विनीत, कॅन वी डान्स?" म्युझिक वाजू लागली तसे तिने विनीतसमोर हात पुढे केला.


"ऑफकॉर्स!" तिचा हात हातात घेत विनीत उत्तरला आणि ते बघून कीर्तीने डोक्यावर हात मारून घेतला.

"गाईज, बिफोर डान्स प्लीज पुट मास्क्स ऑन युअर फेसेस." पार्टी ऑरग्नाइझरने अनाउंस केले त्याप्रमाणे सर्वांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क लावले.


म्युझिक, डान्स, ड्रिंक्स..सर्व पार्टीचा आनंद लुटत होते. नव्या सुद्धा विनीतसोबत नाचण्यात गुंग झाली होती. खरं तर त्यात तिला फारसा आनंद येत नव्हता पण विहानवरचा राग घालवायचा म्हणून ती हे करत होती. थोड्यावेळाने तिने आपली जागा कीर्तीला दिली आणि मग ती एकटीच म्युझिकच्या बिट्सवर थिरकू लागली.

डोळ्याच्या एका कोनातून विहान हे बघत होता. चेहऱ्यावर मास्क असला तरी नव्याच्या चेहऱ्यावर कसे भाव उमटले असतील याची तो कल्पना करू शकत होता.


"कम ऑन विहान, लेट्स डान्स." त्याच्यासोबत असलेल्या मुलींनी मास्क चढवत त्याला आमंत्रित केले.


"सॉरी गर्ल्स. आय कॅन्ट डान्स." दिलगिरी व्यक्त करत त्याने हळूच त्यांच्यातून पाय काढून घेतला.


ड्रिंक काउंटर वरून ऑरेंज ज्युस घेत तो एकटाच कोपऱ्यातील खुर्चीवर बसून नव्याला न्याहाळत होता.


"यू लाईक हर?" अचानक कानावर आलेल्या आवाजाने त्याने दचकून बाजूला बघितले. बाजूच्या खुर्चीवर बसलेला एसके त्याच्याकडे बघून मिश्किल हसत होता.


"सर.. ते.." चेहऱ्यावरचा मास्क काढत तो शब्दांची जुळवाजुळव करू लागला.


"अहं, मास्क नाही काढला तरी चालेल. तुझा चेहरा दिसत नसला तरी मनातील भाव मी वाचू शकतो." शशांकच्या चेहऱ्यावरचे हसू कायम होते.


"ऍक्च्युली सर, येस आय लाईक हर." हातातील ग्लास बाजूला ठेवत तो म्हणाला.


"ऑरेंज ज्युस? तू ड्रिंक करत नाहीस का?" शशांक.


"नाही. म्हणजे आजवर तरी केलं नाहीये आणि पुढेही करणार नाही." तो नम्रपणे म्हणाला.


"ओह! इम्प्रेस्ड. देन चिअर्स!" शशांकने आपल्या हातातील ग्लास त्याच्या ग्लासला लावला.

"तुम्ही सुद्धा ऑरेंज ज्युस?" प्रश्नार्थक नजरेने विहान त्याच्याकडे बघत होता.


"येस. नशा करून हवेत उडण्यापेक्षा पाय जमिनीवर टेकून असलेले मला जास्त आवडतात." एक घोट घेत शशांक उत्तरला.


"ग्रेट सर. तुमची पॉलिसी ना मला फार आवडते. म्हणजे तुम्ही ना मला एकदम आयडल वाटता. माझ्यासाठी तर तुम्हीच आयडल आहात. एक दिवस मलाही तुमच्यासारखेच मोठे नाव कमावायचे आहे."

विहानच्या बोलण्यावर शशांक मंद हसला.


"मग? काय ठरवलं आहेस?"


"हार्ड वर्क. खूप खूप मेहनत करून पुढे जायचा प्रयत्न करणार." विहान.


"मी नव्याबद्दल विचारतोय." शशांक असे म्हणताच त्याला ठसका लागला.


"अरे जरा सावकाश. ही प्रेमाची पहिली पायरी आहे. घाई नको व्हायला."


"हां, तेच. म्हणून पुढे जायला घाबरतो आहे." स्वतःला सावरत विहान.


"कोणाला? नव्याला घाबरतोस काय?" त्याच्या मनातील पूर्ण काढून घेणार नाही तो एसके कसला?


"हो.. नाही.. म्हणजे.." त्याला पुन्हा शब्द जुळवायला कठीण जात होते. कारण खुद्द त्याचा बॉस त्याला प्रश्न करत होता.


"ऍक्च्युली सर, मला ती आवडते. तिला प्रपोज करावं असं कित्येक दिवसांपासून मनात आहे. पण भीती वाटते. जर तिला माझे प्रपोजल आवडले नाही तर ती माझ्याशी असलेली मैत्री तोडणार तर नाही ना?" शेवटी तो शशांकसमोर मोकळा झाला.


"जर प्रेम करतोस तर तेवढी रिस्क तर तुला घ्यावीच लागेल ना." स्मित करत शशांक.


"सर, मी तिच्यासाठी योग्य मुलगा आहे असे तुम्हाला वाटतं का? म्हणजे तुम्ही वयाने आणि अनुभवाने मोठे आहात. कदाचित नव्याच्या वडिलांच्या वयाचेही असाल म्हणून मी विचारतोय. ती माझी सिनिअर आहे. तर तिचे पेरेंट्स मला एक्सेप्ट करतील ना?" तो आशेने शशांककडे पाहत होता.


"हम्म. प्रश्न तसा कठीण आहे आणि याचे उत्तर तर तिचे पेरेंट्सच देऊ शकतील. पण तुला सांगू? तू खूप हुशार आहेस. त्यामुळे मोठमोठया संधी तुला खूप पुढे घेऊन जातील. तेव्हा तिच्या फॅमिलीला तेवढा काही प्रॉब्लेम यायला नको. बाकी तू त्यांच्याशी कसा डील करतोस त्यावर डिपेंड करतं." शशांक त्याच्या शंकेचे निरसन करत म्हणाला.


इकडे नाचत असताना नव्याच्या पायाला त्रास होऊ लागला. सकाळी अनवाणी चालल्यामुळे पायांना त्रास होत होताच त्यात आता उंच टाचेचे फिट्ट असणारी सॅन्डल घालून नाचल्यामुळे आणखी जास्त वाढला.

शशांकशी बोलत असला तरी विहानचे तिच्याकडे बारीक लक्ष होते. नाचायचे थांबून काहीशी लंगडत ती ड्रिंक काउंटर वर गेली तसा तो जागेवरून उठला.


"सर, प्लीज एक्सक्युज मी. आय विल बॅक ऑफ्टर समटाईम." शशांकची माफी मागत तो तिच्याकडे जायला निघाला.


"टेक युअर ओन टाईम. जमलं तर प्रपोज करूनच ये." त्याला अंगठा दाखवत तो स्वतःशीच हसला. त्याचे ऐकून विहानच्या ओठावर देखील हलके हसू उमटले.

ड्रिंक काउंटरवर नव्याने ड्रिंकचा ग्लास हातात घेत असताना विहान तिथे गेला आणि काही न बोलता तिच्या हातातील ग्लास काढून घेत ऑरेंज ज्युस असलेला ग्लास ठेवला.


"एक्सक्युज मी? हू आर यू? अँड हाऊ टू डेअर टू एक्सचेंज माय ग्लास?" ती तिरिमिरीत म्हणाली.


"माझ्यासोबत चल. मी सगळं सांगतो." तिचा हात पकडत तो म्हणाला.

त्याने हात पकडल्याबरोबर तिने तो झिडकारला. त्याचा स्पर्श निर्मळ होता आणि त्यावरून तो विहान आहे हे तिने ओळखले होते. खरं तर तो तिथे आला तेव्हाच तिने त्याला ओळखले पण मॅडमचा राग अजून तरी गेला नव्हता ना.

त्याचा हात बाजूला करून ती जायला वळली आणि तेव्हाच वेदनेने कळवळली.

"नव्या, काय झालंय?" त्याने काळजीने विचारले.


"नथिंग." ती तशीच थोडी लंगडत जायला निघाली.


"ए, एक मिनिट हं. थांब जरा." तिची वाट अडवत तो गुडघ्यावर बसला आणि तिच्या पायातील सॅन्डल काढू लागला.


"विहान, अरे काय करतोस?" त्याचा पायाला स्पर्श होताच ती त्याला म्हणाली.


"थँक गॉड. एकदाच मला ओळखलंस तरी. काय गं? इतका त्रास होत असताना सुद्धा हिल्स घालणं आवश्यक असतं का? कशा गं तुम्ही मुली?" दोन्ही सॅन्डल्स हातात पकडून उठत तो म्हणाला.


"विहान, माझ्या हिल्स दे. मी ठीक आहे." ती.


"अजिबात नाही. तू माझ्यासोबत चल."


"अरे, सगळीजण आपल्याकडेच बघत आहेत."


"आय डोन्ट केअर." एका हातात सॅन्डल्स आणि दुसऱ्या हाताने तिचा हात पकडून तो तिला हॉटेलच्या एका रूममध्ये घेऊन गेला.


"नव्या काय हे? तुझ्या पायाला एवढं काय झालंय? नक्कीच तुझ्या हिल्समुळे हे झाले नाहीये. दुसरंच काहीतरी कारण आहे." तिच्या लाल झालेल्या पायावरून बोट फिरवत तो म्हणाला आणि रिसेप्शनवर फोन करून त्याने फर्स्ट एड बॉक्स मागवून घेतला.


"काहीतरी बोलशील का अगं?" तिला गप्प बघून त्याने पुन्हा विचारले.

"अरे यार, आपण वेड्यासारखे असे मास्क लावूनच एकमेकांशी बोलणार आहोत का?" हसून त्याने त्याचा मास्क काढला आणि नतंर तिच्याही चेहऱ्यावरचा मास्क काढला.

मास्क काढताना त्याची प्रेमळ नजर तिच्यावरच खिळली होती. पार्टीला आली तेव्हा किती गोड दिसत होती ती. आणि आता त्याच गोड चेहऱ्यावर एक वेदना दिसत होती. तिचे सुंदर डोळे पाण्याने भरून आले होते.


"नव्या, तुला खूप जास्त त्रास होतो आहे का? आपण डॉक्टरांकडे जाऊया का? तू अशी रडू नकोस ना यार." तिचे भरून आलेले डोळे बघून त्यालाही गलबलून येत होते.


"विहान, आय एम सॉरी." डोळे पुसत ती म्हणाली.


"तू का सॉरी म्हणते आहेस?"


"तुझ्याशी मी खूप रुड वागले ना? आणि तरीही तू माझी किती काळजी करतो आहेस." ती.


"मग मलाही सॉरी म्हणू दे. कुणास ठाऊक का पण कुठेतरी मला असं वाटतंय की तुझ्या पायांची ही अवस्था माझ्यामुळे झालीय. तुला माझ्यामुळे त्रास झालाय ना? इज इट राईट?" त्याने प्रश्न करताच तिची नजर खाली गेली.


"म्हणजे माझ्यामुळेच तुला त्रास झालाय, हो ना? प्लीज खोटं बोलू नकोस. खरं खरं सांग. तुला माझी शपथ."

त्याने शपथ घातली आणि खाली झुकलेली तिची नजर तिने वर केली.

नव्या त्याला खरे कारण सांगू शकेल का? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *