Feb 29, 2024
प्रेम

हवास मज तू. भाग -१५

Read Later
हवास मज तू. भाग -१५


हवास मज तू.
भाग -पंधरा.

मागील भागात:-
निवी प्रेमात पडलीय हे शशांककडून सुनंदाला कळते. सकाळी ऑफिसला जाणाऱ्या तिला सुनंदा आणि ललिता अडवतात. दोघींच्याही डोळ्यात पाणी बघून नव्या काळजीत पडते.

आता पुढे.

"निवी, तू आमच्याशी असं नाही वागू शकत." ललिताने ठेवणीतले शस्त्र हाती घेतले, तशी ती गडबडली.


"आज्जी, काय झालेय? तू का अशी रडते आहेस? मॉम?" ललिताला प्रश्न विचारता विचारता तिने सुनंदाकडे पाहिले तर तिच्याही डोळ्यात पाणी होते.


"आज्जी?" बाहेर पडायचे सोडून नव्या परत आत आली.

ती जवळ आली तशी ललिताने पाठ फिरवली.


"अगं अशी काय करतेस? तू काही सांगशील तेव्हाच मला काही कळणार ना?" एकवार हातातील घड्याळाकडे आणि नंतर ललिताकडे पाहत ती म्हणाली.

ललिताने काही प्रतिसाद न देता फक्त नाक वाकडे करत डोळ्यातील पाणी पुसले.


"पुरे झाला हं तुझा मेलोड्रामा. नसेल सांगायचं तर असू दे. मला उशीर होतोय, मी निघते."


"हमको तो तुमने पराया कर दिया." ती वळणार तोच ललिताने हुंदका दिला.


"हांऽऽ." मान हलवत सुनंदा ने दुजोरा दिला.


"सुनबाई, हमे तो कोई कुछ बताताही नहीं." सुनंदाकडे वळत ललिता.


"हांऽऽ." तिने पुन्हा मान हलवली.


"आई, तुम्हाला बहुरानी म्हणायचं होतं का?" जराशी गोंधळून सुनंदाने ललिताला इशारा केला.


"अगं, तेच ते. तू तरी माझ्या भावानांना समज. इथे तर कोणाला काही पडलेच नाहीये." ललिता आता तिच्या मातृभाषेत परतली होती.


"तुमचं काय चाललंय ते जरा नीट सांगाल काय?" दोघींचे आपापल्यातील चाललेला संवाद ऐकून नव्या चिडून म्हणाली.


"तुझे काय चाललेय? ते तू आम्हाला सांगशील का?" दोघींनी एकाचवेळी तिच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.


"अं? मी काय केलंय?" त्यांच्या अचानक हल्ल्याने गोंधळून ती सोफ्यावर बसली.


"प्रेम." दोघी एका सुरात म्हणाल्या.


"तेही एका मुलावर." ललिताचा स्वर करारी झाला होता.


"आई, काय बोलताय? तिने मुलीवर प्रेम केलेलं चाललं असतं तुम्हाला?" सुनंदाचे डोळे वटारले होते.


"ए, विषयांतर नको. मुद्द्याचं बोलूया." चूक लक्षात येताच घसा खाकरत ललिता नव्याकडे वळली.


"निवी, प्रेम केलंस आणि तुला आम्हाला साधं सांगावं सुद्धा वाटलं नाही? सीआयडी बघून बघून मला अंदाज तरी आला. तुझ्या मम्माला तर काहीच कळत नाही."


"आई, अहो मीच तर तुम्हाला कन्फर्म न्युज दिली होती ना?" सुनंदाचा चेहरा अगदी बिचारा झाला होता.


"ओये गर्ल्स गँग, ही गोम आहे तर." नव्या सोफ्यावरून हसत उठत म्हणाली.


"त्याचे काय ना, ज्याच्या प्रेमात आहे त्यालाच अजून सांगितले नाही तर तुम्हाला कसे सांगणार होते?"
दोघींच्या खांद्यावर हात टाकत ती पुढे म्हणाली.


"त्याला का नाही सांगितलंस?" सुनंदाचा चेहरा अजूनही बिचाराच होता.


"जर त्याने नाही म्हटलं तर?" किंचित हसून नव्या.


"असा कसा नाही म्हणेल? या ललिताच्या नातीला नाही म्हणण्यापूर्वी दहादा विचार करायला लागेल त्याला."


"आज्जी?" नव्याला हसू येत होते.


"नाहीतर काय? त्याने नकार दिला तर कान पकडून माझ्याकडे घेऊन ये. त्याला म्हणावं, तुझी गाठ नव्याशी नाही तर ललिताशी आहे."


"आज्जी, अगं काय बोलतेस तू?" तिची हसून हसून पुरेवाट लागत होती.


"तसे नाव खूप छान आहे.. विहान! उंच उंच आकाशात झेप घेणारा. मला फार आवडलं हे नाव." सुनंदा नव्याकडे बघत म्हणाली.


"त्याला भेटशील तर तोही खूप आवडेल. तूर्तास मी जाऊ?" परवानगी घेत ती.


"हो, जा आणि त्याला सगळं सांगून टाक आणि मग हो म्हणाला की घरी जेवायला घेऊन ये." सुनंदा.


"मॉम, किती गं गोड आहेस तू? लव्ह यू." तिच्या गालाची पापी घेत ती.


"मॉम तेवढी गोड आणि मी?" ललिताने नाक फुगवत विचारले.


"तू तर खूप स्वीट आहेस." नव्याने तिचीही पापी घेतली.
"बरं आता खरंच निघते मी." ती बॅग घेत निघाली.


"जा निवी जा, जी ले अपनी जिंदगी." ललिताने हसत तिला बाय केले.


दोघींशी बोलण्यात वेळ गेल्यामुळे थोडासा उशीर झाला खरा, पण नव्याचा मुड मात्र फ्रेश झाला होता. ती हसतच कारमध्ये बसली आणि म्युझिक सिस्टीम सुरु करून गाणे ऐकत ऑफिसला निघाली.


*****
"गुडमॉर्निंग मॅम." तिच्या बुटांचा टकटक आवाज कानावर पडताच ऑफिसमधील स्टॉफमेंबर तिला ग्रीट करत होते.


"गुडमॉर्निंग!" एक प्रसन्न स्मित करत तिने सगळ्यांना प्रतिसाद दिला.


"गुडमॉर्निंग डिअर." विनीत आणि कीर्तीचा एकत्र आवाज आला आणि आज त्यांच्याकडे बघून ती क्षणभर थांबली.


"गुडमॉर्निंग लव्हबर्ड्स! आजही तुमचा पार्टनर लेट येणार आहे का?" विहानच्या टेबलकडे बघत तिने विचारले.

"तो आमचा पार्टनर नाहीये. तुझ्या हाताखाली काम करतो म्हणजे तुझा पार्टनर झालाय." विनीत तिला म्हणाला तसे नकळत तिचे ओठ रुंदावले.


"बाय द वे आम्हाला लव्हबर्ड्स का म्हणालीस?" कीर्तीचा प्रश्न.


"कारण काल तुम्ही दोघं मला कॅफे हाऊस मध्ये हातात हात घालून बसलेले दिसलात म्हणून गेस केलं आणि
मला वाटते माझे गेसिंग चुकीचे नाहीये. होय ना?" कीर्तीच्या डोळ्यात डोळे घालून ती म्हणाली तसे कीर्ती सावरून बसली.


"विहान आला आहे. एसके सरांच्या केबिनमध्ये आहे तो." विषय टाळून तिने नव्याला माहिती दिली."ओके! अँड काँग्रॅच्यूलेशन्स टू बोथ ऑफ यू." तिला डोळा मारून नव्या तिच्या केबिनकडे गेली.


"ही अशी वेड्यासारखी कधीपासून वागायला लागली?" ती गेल्याच्या दिशेने बघत विनीत कीर्तीला म्हणाला.


"ते सोड रे. आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल कळलंय तिला. बघितलेस कसा डोळा मारून गेली." कीर्तीचा चेहरा लाजेने गोरामोरा झाला होता.


"कदाचित तीही प्रेमात पडलीय म्हणून तिला आपल्या भावना कळल्या असाव्यात. जस्ट चिल अँड फोकस ऑन युअर वर्क." तिला सल्ला देत विनीत कामाला लागला.

******

केबिनच्या दारातून नव्याची नजर सारखी बाहेर जात होती. विहान एकदा तरी नजरेस पडावा म्हणून तिची सुरु असलेली धडपड आणि तसे न झाल्यामुळे मनाचा होणारा विरस. त्यामुळे कामात लक्ष लागत नव्हते.


"मे आय कम इन?" अचानक त्याचा आवाज आला आणि अधीरतेने तिने मान वर करून पाहिली. केबिनच्या दारात उभा असलेला तो तिच्याचकडे टक लावून बघत होता.

"हम्म, येस."

चेहऱ्यावरचा आनंद लपवत फार्मलपणे तिने त्याला आत घेतले. कामाचे बोलून झाल्यावर तो निघाला तसे तिने त्याला साद घातली.


"मिस्टर विहान, आज फार बिझी दिसत आहात? एसके सरांनी एक्स्ट्रा वर्क दिले आहे का?" मनातील सगळी भडास काढायची होती पण तरीही तिने शांतपणे विचारले.


"नाही तर, रोजचेच. तुम्हाला असं का वाटतेय?" त्याचा सहज सूर तिला राग यायला भाग पाडत होता.

राग तर व्यक्त करता येत नव्हता आणि तुझी आठवण येतेय ही सांगायची सोय देखील नव्हती.

"एक मिनिट, रात्री नीट झोप लागली ना? एखाद्या गोड मुलीने असे इतका वेळ जागत राहू नये. " तो मिश्किल हसत म्हणाला.

उफ्फ! तो असा हसला की त्याच्या कातिल अदेने ती मनातल्या मनात पार वितळून गेली.

"नव्या.."

"हं?" तो पुढे काही बोलायच्या आत नव्याचा हुंकार बाहेर पडला.

"रात्री विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सापडले ना? की अजूनही तो प्रश्न मनात आहे?" एक भुवई वर करून त्याने त्याच हसऱ्या शैलीत विचारले आणि आता तर तिचे गाल आणखीनच गुलाबी झाले.


"मिस्टर विहान तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आय डोन्ट वॉन्ट टू मिक्स माय पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ टुगेदर." ती मुद्दाम चिडून म्हणाली.


"सॉरी.आय एम जस्ट किडींग." तो कानाला हात लावत तिथून निघून गेला.


तो गेल्यावर तिने डोक्याला हात मारून घेतला. तो असा हर्ट होऊन निघून जाईल हे तिच्या गावीही नव्हते.


"आय एम सॉरी, अरे, मी सुद्धा गंमतच करत होते." तिने त्याला मेसेज पाठवला. त्याने मात्र मुद्दामच तिच्याकडे दुर्लक्ष केले.


"विहान सॉरी ना." लंच ब्रेक मध्ये तिने पुन्हा मेसेज पाठवला.

"तुम्ही का सॉरी म्हणताय? खरं तर सॉरी मला म्हणायला हवे. आफ्टरऑल यू आर माय बॉस. मला हे विसरून चालणार नाही."


"ओके, फाईन. तू जर माझ्याशी असाच वागणार असशील तर मी आज लंच करणार नाही." तिने धमकीवजा मेसेज करून मोबाईल बंद करून टाकला.


'शीट! घरून निघताना किती चांगल्या मुडमध्ये मी होते. याने पूर्ण वाट लावून टाकली. आता मला खरंच जेवायचे नाहीये.' लॅपटॉप मध्ये डोके टाकत तिने स्वतःला कामात गुंतवून टाकले.


यांच्यात काही जुळण्यापूर्वीच तुटायला लागले का? की होणार असेल नव्या नात्याची सुरुवात? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//