हवास मज तू भाग -१३

खरंच का प्रेम फसवे असते?


हवास मज तू!
भाग तेरा.

मागील भागात :

डील अचानक कॅन्सल झाल्यामुळे शशांक चिडलेला असतो पण विहान परत नव्याने काही बदल करून दुसरे प्रोजेक्ट तयार करतो आणि त्यामुळे ती डील त्यांच्या कंपनीला जाहीर होते. शशांक सर्वांसमोर विहानचे कौतुक करतो आणि रविवारी सक्सेस पार्टी असल्याचे जाहीर करतो. त्याच्या नजरेतून नव्याच्या डोळ्यात विहानवर असलेले प्रेम लपू शकत नाही आणि तो तिला याबद्दल विचारतो.

आता पुढे.


"डॅड, म्हणजे तसा आवडतो मला तो. पण त्याला काय वाटतं ते माहित नाही." अडखळत का होईना पण पठ्ठीने बापाला सांगून टाकले.

"त्याला काय वाटायचं? त्याच्याही डोळ्यात तेच दिसतंय जे तुझ्या डोळ्यात दिसत आहे. एंजॉय युअर लाईफ. जेव्हा सिरिअसली हे नातं पुढे न्यावेसे वाटेल तेव्हा सांग. मी आहेच तुझ्या पाठीशी."

"जेव्हा सिरिअसली म्हणजे व्हॉट? आय एम क्वाईट सिरीयस अबाऊट धिस." पुढच्याच क्षणी एकदम तडक तिचे उत्तर आले आणि शशांक जोरात हसायला लागला.


"शीट, डॅड तू ना अगदी दी सारखा आहेस. माझ्या मनातील सगळं काढून घेतोस. जा बाबा." ती एकदम झक्कास लाजली.

"प्रेमाची गंमत तीच असते गं, जेव्हा न सांगताही इतरांना कळून जाते. तू बिनधास्त प्रेम कर. कुसुमाग्रजाच्या भिल्लसारखं कर. फक्त आपल्या कामावर त्याचा परिणाम होऊ देऊ नकोस म्हणजे झालं." तिच्याकडे प्रेमाने बघत तो म्हणाला.


"ओह, डॅड यू आर सो स्वीट." त्याला एक हलकी मिठी मारून ती त्याच्या केबिनबाहेर पडली. सकाळपासून उदास असलेला चेहरा आता कैक पटीने खुलला होता.


******

"दी, ऐक ना." नव्याच्या आवाजात इतका आनंद होता की शौर्याने पुस्तक बाजूला ठेवून फक्त तिच्याच बोलण्यावर लक्ष केंद्रीत करायचे ठरवले.


"दी, फायनली. फायनली आय रिअलाईझ की मी प्रेमात आहे आणि.."


"आणि काय निवी? त्याने तुला प्रपोज वगैरे केले की काय? प्लीज लवकर सांग ना." शौर्याचा अधीर स्वर.


"नाही गं. त्याचं काही नाही. फक्त एवढंच की मी प्रेमात आहे हे डॅडला कळलेय."

"व्हॉट?" शौर्या तर उडालीच.

"निवी आत्ता काय म्हणालीस ते परत एकदा सांग." कानावर विश्वास बसला नाही म्हणून तिने फोन स्पीकरवर टाकला.

"येस दी. डॅडला कळलेय."

"मग? तुझा खडूस एसके तुझ्यावर ओरडला तर नाही ना?"

"नो, इनफॅक्ट डॅड म्हणाला की त्यालाही तो आवडतो."

"निवी, डोन्ट टेल मी की तो मुलगा तुमच्या ऑफिसमधला आहे."

"येस दी, यू आर राईट. डॅडला तर तो इतका भावला ना की काही विचारू नकोस. आज तर नुसता त्याच्या तारिफेचे इमले बांधत होता." सकाळी घडलेला वृत्तांत थोडक्याय सांगत ती म्हणाली.


"मिस्टर शशांक केळकर उगाच कोणाची तारीफ करणाऱ्यातले नाहीत. निवी, बंदे मे कुछ तो दम है तेव्हाच मिस्टर शशांक आणि त्यांची मुलगी त्याच्या प्रेमात पडलेत."


"एक्झाक्टली दी! डॅडने सुद्धा हेच शब्द वापरले. मी इतकी खूश आहे ना की विचारू नकोस."

"माझे राणी, त्याचा अंदाज तर मला आलाय. त्यामुळे ते मी विचारणार नाही, पण ज्या मुलाने माझ्या लाडक्या बहिणीचे हृदय चोरले त्याचे नाव काय? हे तर विचारू शकते ना?"

"विहान. नुकताच आपल्या कपंनीला जॉईन झालाय. पण असं वाटायला लागलेय की केव्हाचा इथे कामाला आहे. तो इतका हुशार आहे ना की…"

नव्या त्याच्याबद्दल भरभरून बोलत होती. तो असा, तो तसा..त्याच्याबद्दल काय सांगू नि काय नको, असे तिला झाले होते.

आणि शौर्या? ती फक्त श्रोत्याची भूमिका बजावत होती. आजवर नव्या केवळ एकाच व्यक्तीबद्दल इतके भरभरून बोलायची, ती म्हणजे तिची लाडकी शौर्या दी. आज शौर्या बरोबरच आणखी एका व्यक्तीचे गुणगान गाताना ती थकत नव्हती आणि ती व्यक्ती होती वन अँड ओन्ली वन, विहान.

त्याच्याबद्दल ऐकताना शौर्याच्या चेहऱ्यावर मंद हसू उमटत होते. ते हसू त्याच्यासाठी होते की तिच्या लाडक्या निरागस निवीसाठी, तिलाही कळले नाही.


"हे सगळं त्याचं ऑफिसमधील कौतुक झालं. त्याच्या फॅमिलीबद्दल काही सांग ना." शौर्याने विचारले तसा नव्याचा स्वर एकदम खाली आला.


"दी, त्याला त्याचे असे जवळचे कुणीच नाहीत गं. एकटाच असतो बिचारा."


"एकटाच म्हणजे काय? कोणीतरी असेल ना?"


"अगं म्हणजे इथे एकटा राहतोय. बाकी मला फारसं काही माहिती नाही. फॅमिलीबद्दल तो काही सांगत नाही म्हणजे त्याचा मुड डाऊन असतो त्याबद्दल बोलताना, सो मीही कधी जास्त विचारले नाही."


"ओके, ओके तू इमोशनल व्हायची गरज नाहीये. कधीतरी सांगेलच तो. बरं मला सांग त्याला प्रपोज केव्हा करणार आहेस?" तिचा मुड ठीक करण्यासाठी शौर्याने दुसरा प्रश्न केला.


"काहीही काय दी? मी का प्रपोज करू? तो करेल की. तसे त्याच्या डोळ्यात देखील मला माझ्याबद्दल फिलिंग्ज जाणवतात ना."

"ओह! हाऊ रोमँटिक. बरं आता तू स्वप्नात त्याच्यासोबत एंजॉय कर. मी थोडा अभ्यास करते."

"ओके, बाय दी अँड लव्ह यू."

"हम्म, आता हे लव्ह यू तुझ्या विहानसाठी राखीव असू दे बरं." तिची खेचत शौर्या.

"असं कसं दी? तू तर माझं पहिलं प्रेम आहेस, विहानमुळे ते बदलणार नाही हं." नव्या म्हणाली आणि शौर्याला भरून आले.

'डिअर निवी, तू तर माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस. तुझ्यावर जितकं प्रेम मी करते ना कधीच कुणावर करू शकणार नाही.' डोळे मिटून घेत ती मनात म्हणाली.

"दी.." तिचा काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून नव्याने साद घातली.

"लव्ह यू टू माय डिअर सिस अँड बाय बाय." कॉल कट करत ती म्हणाली.

******

"शशी, इतक्या रात्री कुणाचा फोन वाजतोय? बघ ना जरा." गाढ झोपेत असलेली सुनंदा मोबाईलच्या रिंगने विचलित होत म्हणाली.

तिच्या आवाजाने झोपेतच शशांकने हातात मोबाईल घेतला आणि स्क्रिनवरचे नाव बघून त्याची झोप पार पळाली. अर्थातच फोन त्याच्या लाडक्या प्रिन्सेसचा म्हणजे शौर्याचा होता.


"बोल प्रिन्सेस, इतक्या सकाळी कसा कॉल केलाहेस?"

"सकाळी? आय थिंक तिकडे रात्र आहे."

"हो गं. तुझ्याकडे सकाळ असेल ना म्हणून म्हणालो." बाल्कनीत येत शशांक म्हणाला.

"हा विहान कोण आहे आणि कसा मुलगा आहे मला जरा कळेल का?" त्याच्या प्रश्नाकडे सरळ दुर्लक्ष करत तिने तिच्या मनातील खदखद व्यक्त केली.


"प्रिन्सेस, तुझा कॉल मला एक्स्पेक्टेड होताच पण अशी मध्यरात्री मला झोपेतून उठवशील असं काही वाटलं नव्हतं." शशांकच्या ओठावर हसू होते.

"डिअर एसके, निवीसाठी सकाळ काय नि रात्र काय? तुला माहितीये ना,माझा जीव आहे ती. नाजूक आहे रे खूप. कुण्या चुकीच्या मुलाच्या प्रेमात पडल्यावर झालेला त्रास सहन नाही करू शकणार म्हणून मला त्या मुलाची माहिती हवीय." तिचा स्वर कातर झाला होता.


"शौर्या, तुझा जीव असलेली निवी माझी मुलगी आहे हे तुला माहितीये ना? मग असा कसा तिला कोण्याही मुलाला निवडू देईल? विहान चांगला मुलगा आहे, हुशार आहे. त्याच्यात गट्स आहेत. आत्ता भलेही तो आपल्या कपंनीत कामाला असेल पण पुढे स्वतःच्या बळावर स्वतःची कपंनी उभारण्याचे कॅलिबर्स आहेत अगं त्याच्यात." तो तिला हळूवार समजावत म्हणाला.


"हो, पण त्याच्या फॅमिलीबद्दल कुठे काही आपल्याला माहिती आहे?"


"मी काढलीय माहिती. आई पुण्याजवळ कुठेतरी खेड्यात असते. गरिबीतून वर आलेला,विधवा आईचा एकुलता एक मुलगा आहे तो. कर्तृत्ववान आहे. एकदा का स्वकर्तृत्वाने इकडे सेटल झाला की आईलाही इकडे घेऊन येणार आहे. इतकी माहिती पुरेशी आहे ना? की आणखी काही?" तो.


"त्याचा एखादा फोटो?" ती म्हणाली तसे शशांक खळखळून हसला.


"शौर्या, निवीबाबत इतकी पजेसीव्ह होऊ नकोस. विहान खरंच चांगला मुलगा आहे. मी काही लगेच तिचे लग्न वगैरे लावून देणार नाही आहे. तू आल्यानंतर, त्याच्याशी भेटल्यानंतर पुढे काय करायचे ते बघूया ना. सध्या माझी लेक प्रेमात पडलीये तर तेवढं एंजॉय करू दे, उगाच तिथून सीआयडी पणा करू नकोस."

"पण.. "

"हे बघ बाळा, सध्या तू तुझ्या एक्झामवर फोकस कर. इथे आलीस की बोलू आपण यावर. एका महिन्यात फारसं काही बदलणार नाही आहे, ओके? आता तू तुझी कॉलेजची तयारी किंवा काय ते कर. मी सुद्धा झोपतो."

"हम्म."

"निवीची इतकी काळजी करणं सोड. तिच्यासाठी आम्ही सगळे आहोत की इथे. तू तुझ्याकडे देखील थोडं लक्ष दे. तिच्यावर जेवढं प्रेम करतेस ना, त्यातील निम्मे जरी प्रेम स्वतःवर करशील तर मला जास्त आवडेल." तो पुन्हा प्रेमळ स्वरात म्हणाला.

"हं. ठीक आहे. बाय." त्याच्या सल्ल्यावर तिने रुक्षपणे मोबाईल बंद करून ठेवून दिला आणि पुस्तकाचे पान पलटवायला लागली.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all