Mar 01, 2024
प्रेम

हवास मज तू! भाग -११

Read Later
हवास मज तू! भाग -११


हवास मज तू!
भाग - अकरा.

मागील भागात :-
विहानच्या ओढीने नव्या ऑफिसमध्ये लवकर येते, पण नेमके तेव्हाच विहानला उशीर होतो. त्यामुळे रागावलेली ती त्याच्यावर ओरडते.
तिचा राग शांत होईल का? वाचा आजच्या भागात.


"किती मिस्टेक्स मिस्टर विहान? एक प्रोजेक्ट व्यवस्थित केला की आपल्याला सगळं येतं अशी हवा डोक्यात जायला लागते का?" त्याला रागवायला तिला कोणतेतरी कारण हवे होते.

तिच्या बाजूला उभे राहून त्याने लॅपटॉप मध्ये डोकावून पाहिले. ती म्हणत होती त्याप्रमाणे त्यात भरपूर चुका होत्या आणि त्यामुळे तिचे खवळणे साहजिक होते.

"मॅम, मिस्टेक तर भरपूर दिसत आहेत बट ही फाईल विनीतची आहे." तो तिच्याकडे बघून म्हणाला.

"एक्झ्याक्टली. विनीत तुमच्या बाजूला बसतो, तेव्हा त्याच्या कामावर नजर ठेवणं तुमचं काम आहे." ती थोडे गोंधळून म्हणाली. आपण काय बोलतोय हे तिला उमजत नव्हते पण याला असं सोडायचे देखील नव्हते.

"मॅम, मला असं वाटतंय की कदाचित तुमची सुद्धा रात्री नीट झोप झाली नसावी. म्हणजे मी काल एका स्पेशल व्यक्तीबरोबर डिनरला गेलो होतो. रात्री घरी परतल्यावरही रात्रभर ती व्यक्ती माझ्या डोक्यातून गेली नाही.. तुमच्याशीही काहीसं असंच झालंय का?"
तिच्याकडे एक कटाक्ष टाकत त्याने विचारले.

तो जे बोलत होता त्याने तिचा चेहरा उगाचच ब्लश करायला लागला होता. त्याच्या चाणक्ष नजरेतून ते सुटले नव्हते. तिला तसे ब्लश करताना बघून त्याच्या ओठावर एक मिश्किल हसू उमटले.

"काय म्हणालात?" ती उगाचच न कळल्याचा आव आणत म्हणाली.

"कुठे काय? इट्स डन. सी." लॅपटॉपची स्क्रीन तिच्याकडे वळवत तो म्हणाला. बोलता बोलता त्याने विनीतची ती फाईल ओके केली होती. कामात तो किती परफेक्ट आहे हेच जणू त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले.

"हम्म. ओके. तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता." पर्समधून एक इंजेक्शन बाहेर काढत ती म्हणाली.

हे काय आहे?" त्याने आश्चर्याने विचारले. आता मी काहीही केलं नाहीये हं. असं इंजेक्शनची भीती दाखवू नका. " तो बाजूला होत म्हणाला.

"हं, इट्स नॉट फनी." जबरदस्तीने ओठ रुंदावून ती म्हणाली.

"माझ्या इन्सुलिनच्या डोजची वेळ झालीये."

"इन्सुलिन? मिन्स नव्या यू आर?"

"हो, मला डायबिटीस आहे. समोर बसलेली माणसं गोड गोड बोलायला लागली की ते आणखी वाढतं." ती.

"म्हणजे त्या दिवशी आलेली चक्कर यामुळे आली होती? आय एम सो सॉरी. मला खरंच नव्हतं माहिती." त्याला आता फार वाईट वाटू लागले होते.

"इट्स ओके. मला डायबिटीस आहे याचा गवगवा करायला मला आवडत नाही. बरं, या आता तुम्ही. मला इंजेक्शन लावायचे आहे." ती त्याला जायला सांगत म्हणाली.


'सॉरी.'

'आय एम सॉरी.'

'आय एम व्हेरी सॉरी.'

'आय एम व्हेरी व्हेरी सॉरी.'

विहान गेल्यानंतर पाचच मिनिटात तिची मेसेजटोन वाजली. त्याचे सॉरीचे चार मेसेज होते.त्यासोबत लटक्या चेहऱ्याचे ईमोजी सुद्धा.

ते मेसेज वाचून नव्याची कळी खुलली. तसाही तिचा राग तर केव्हाच मावळला होता पण लगेच रिप्लाय न करता थोडा भाव खाऊन दहा पंधरा मिनिटांनी तिने त्याला मेसेज केला.

"विहान, मी टू सॉरी. तुझ्याशी मी जरा जास्तच रुडली वागले." तिचा मेसेज नजरेखालून गेला अन विहानच्या ओठावर स्मित अवतरले.

******

"व्हॉट इज इट ऑल? हे सगळं काय आहे?" शशांक त्याच्या केबिनमध्ये होता. त्याच्यासमोर त्याचा संपूर्ण स्टॉफ खाली मान घालून उभा होता.


"सर, रिलॅक्स. तुम्हाला त्रास होतोय. प्लीज शांत व्हा ना." त्याला तसे हायपर होताना बघून नव्याचा जीव कासावीस होत होता.


"कसा शांत होऊ? मिस नव्या तुम्हीच सांगा ना? हा प्रोजेक्ट आपल्यासाठी किती महत्त्वाचा होता हे तुम्हालाच माहितीये. रात्रंदिवस तुम्हीच त्याच्यावर मेहनत घेतली होती. मागच्या आठवड्यात डील देखील जवळजवळ फायनल झाली होती मग अचानक काय झाले? आपले प्रोजेक्ट डावलल्या जावून त्या मेहताच्या घशात डील कशी काय जाऊ शकते?" त्याचा पारा आणखी चढला. चेहरा रागाने लालबुंद झाला होता. सहसा शशांक असा चिडायचा नाही. उलट एक सॉफ्ट हार्टेड म्हणूनच तो स्टॉफ मध्ये ओळखला जात होता. पण चिडला की त्याच्यातला जमदग्नी जागा होतो हे सुद्धा सगळ्यांनी पाहिले होते.


"आय एम सॉरी सर." शशांकचा चिडलेला अवतार बघून विहान समोर येत म्हणाला.

"तू का सॉरी म्हणतोस? तू तर काहीच केलं नाहीस ना?" त्याचा बोलण्याचा रोख काहीसा वेगळा होता.

"येस सर, मी काहीच केलं नाही. पण काही बदल केले होते. त्यामुळे या अपयशाची जबाबदारी मी घेतो." तो ठामपणे म्हणाला.


शशांक काही न बोलता त्याच्याकडे पाहत होता. त्याच्याबरोबर नव्या आणि इतर मंडळींनी सुद्धा त्याच्यावर नजर रोखली.

"सर, इफ यू डोन्ट माइंड, प्लीज गिव्ह मी टू अवर्स. मी काही होतेय का ते बघतो."
त्याच्या बोलण्यावर शशांकने नव्याकडे नजर टाकली. तिने खुणेनेच ठीक आहे म्हटल्यावर त्याने होकार भरला.

"विहान, हा तुझा शेवटचा चान्स समज. हा जर सक्सेस नाही झाला तर तुला इथून आपला गाशा गुंडाळावा लागेल." त्याला चेतावनी देत शशांक त्याच्या खुर्चीवर डोक्याला हात लावून बसला.

"येस सर मला मान्य आहे." एकप्रकारे ते चॅलेंज स्वीकारत विहान केबिनमधून बाहेर पडला. त्याच्या मागोमाग इतर स्टॉफदेखील गेला. केबिनमध्ये फक्त नव्या आणि शशांक उरले होते.


"डॅड, का इतका हायपर होतोस तू? एक डील गेली तरी त्याने एवढं काय बिघडणार आहे? तू नको ना त्रास करून घेऊस." त्याला पाण्याचा ग्लास देत ती म्हणाली.


"नव्या, तू इतकी शांत कशी आहेस याचेच मला आश्चर्य वाटते आहे. विहानवर जरा जास्तच विश्वास ठेवला होता का गं मी?" खचलेल्या मनाने तिला विचारले.

"कदाचित नाही. तूच म्हटलं होतंस ना, की त्याच्यात ते कॅलिबर आहे म्हणून? आय थिंक तुझे म्हणणे योग्य आहे. मला आताही वाटतंय की तो नक्कीच काहीतरी मार्ग काढेल." तिने शशांकच्या हातावर हात ठेवला.

"इतका विश्वास?"

"माहिती नाही का? पण ठेवावा वाटतोय." ती उत्तरली.

ती बोलली तसे शशांकने चमकून तिच्याकडे पाहिले, तिचे डोळे काहीतरी वेगळेच सांगत असल्याचे त्याला दिसत होते.

"निवी मला थोडावेळ जरा एकटं सोडशील?" तिच्याकडे बघत तो.

"आर यू शुअर?" ती.

त्याने मान हलवली. त्यावर थोडयावेळाने परत येईन म्हणत ती तिच्या केबिनमध्ये निघून गेली.

शशांकसमोर तिने विहानची खात्री तर दिली होती पण तो खरंच हे करेल की नाही याबद्दल ती आता सांशक होती.


"मे आय कम इन मॅम?" त्याच्या आवाजाने डोक्यावरचे हात बाजूला करून तिने वर पाहिले.

"मॅम, तुम्ही एकदा चेक करून बघा. त्यानंतर आपण सरांना दाखवू." तिच्यासमोर लॅपटॉप ठेवत विहान म्हणाला.
या दोन तासात त्याने पूर्ण प्रेजेंटेशनच चेंज केले होते जे आणखी जास्त दर्जेदार वाटत होते.

"वेल डन. इंप्रेसिव्ह." ती उठत म्हणाली.

शशांकच्या केबिनमध्ये परत ते बदल दाखवताना तिच्या मनात धाकधूक होती पण काही वेळातच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असलेले ती टिपत होती.


"मिस्टर विहान, हे वर्क करेल असे तुम्हाला वाटते का?" विहानकडे बघत त्याने विचारले.

"हँड्रेड पर्सेंट." त्याचा आत्मविश्वास ठळकपणे दिसून येत होता.

"ओके, ही डील कोणाला मिळाली हे पब्लिकली डिस्क्लोज व्हायला आणखी एक तास बाकी आहे. चल माझ्यासोबत." शशांक आपला कोट अंगावर चढवत उठला आणि तो विहानला सोबत घेऊन निघाला.

*******

दोघांना जाऊन तासभर तरी झाला होता. तेव्हापासून नव्याला ना कुणाचा फोन किंवा काही मेसेज देखील आला नव्हता. या तासभरात आपण एक कॉल करावा असे हजारदा तरी तिच्या मनात येऊन गेले. पण स्वतःवर कंट्रोल ठेवत ती फक्त टेबलवर ठेवलेल्या मोबाईलकडे बघत होती.

'देवा, सगळं नीट होऊ दे. डील नाही मिळाली तरी चालेल पण विहानची नोकरी जाऊ देऊ नकोस. असं जर केलंस ना, तर संडेला मी अनवाणी तुझ्या दर्शनाला येईन. आय प्रॉमिस.' कधी नव्हे ते आज ती देवाला साकडे घालत होती.

मनोमन प्रार्थना करताना तिचे हात कसे जोडले गेले
तिलाच कळले नाही. क्षणभर जोडलेल्या हाताकडे बघून ती चमकलीच. आज पहिल्यांदा तिने शशांक किंवा आपली कंपनी यांना वगळून विहानला निवडले होते.

ही डील होईल का फायनल? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//