Feb 25, 2024
प्रेम

हवास मज तू! भाग -१०

Read Later
हवास मज तू! भाग -१०


हवास मज तू!
भाग - दहा.

मागील भागात :-
डिनर डेट वरून आलेल्या निव्याला शौर्या ती प्रेमात पडल्याची जाणीव करून देते. विहान सुद्धा त्याच विचारात उशिरा झोपी जातो. त्यामुळे तो दुसऱ्या सकाळी लवकर उठू शकत नाही.

इकडे नव्या सकाळी लवकर ऑफिसला पोहचते. तिला विहान तिथे भेटेल का? वाचा आजच्या भागात.


"काकू, मी निघतोय. तुम्ही जाल तेव्हा घर नीट बंद करून जा." बुटात पाय कोंबत तो बाहेर पळाला.

"अहो साहेब, नाश्ता? किमान चहातरी पिऊन जा."

"अहो, नको मला काहीच."

"मग याचं मी काय करू?" ती कप घेऊन धावत दाराजवळ आली.

"ओता तुमच्याच घशात." कारची चावी घेऊन तो लिफ्टमध्ये घुसला.


'कसले वेंधळे आहेत साहेब.' चहाचा घोट घेत ती तिथेच सोफ्यावर बसली.

'नक्कीच प्रेमा बिमाचे चक्कर चाललेय. नाहीतर हे असे नाही वागायचे.' आरामात चहा संपवून ती उठली. उठताना सोफ्यावर विहानच्या आईचा फोटो तिला दिसला.

'आईचा फोटो कुशीत ठेवल्याशिवाय साहेबांना झोप येत नाही हेही खरंच आहे. बायको आल्यावर काय करतील कोणास ठाऊक?' एकटीच हसत ती एकेक कामे हातासरशी करू लागली.

विहानकडे ती कामाला लागल्यापासून त्याने एक चावी तिच्याकडे ठेवली होती. त्यामुळे तो नसला तरी ती आपली कामं आवरून निघून जायची. त्याचा तिच्यावर विश्वास होता आणि तिलाही त्याच्यातील एक चांगला माणूस दिसला होता.

******

"बाय मम्मा. मी येते गं." नव्याचा आवाज कानावर आला तशी स्वयंपाकघरातून सुनंदा आणि देवघरातून ललिता दोघीही बाहेर आल्या.


"निवी, नाश्ताऽऽ." सुनंदाचे पुढचे शब्द हवेतच विरले कारण डायनिंग टेबलवरची नाश्त्याची प्लेट रिकामी होती.


"मी नाश्ता केलाय. बाय गर्ल्स." त्या दोघींना एक फ्लायिंग किस देऊन तर्जनीत कारची चावी गोल गोल फिरवत तिने दाराबाहेर पाऊल टाकले.


आज ती पाच मिनिटे आधीच ऑफिसला निघाली होती. खरं तर उठल्यापासून कधी एकदा ऑफिसला जाते आणि विहानला बघते असे तिला झाले होते. एखाद्या गुडगर्ल सारखे तिने स्वतःचे लवकर आवरले होते. सुनंदा आणि ललिता मागे लागण्यापूर्वी तिने स्वतःहून नाश्ताही केला होता.

तिचे वागणे बघून दोघी सासवासुनेला काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे झाले होते. ती गेली तरी कितीतरी वेळ दोघीही आ वासून उभ्या होत्या."निवी बदललीय का?" ललिता सुनंदाकडे बघून म्हणाली.


"तिने आपल्या हाकेची वाट न बघता स्वतः नाश्ता केला. ऑफिसला देखील वेळेच्या आधी निघाली." सुनंदा तशीच बाहेर बघत बोलत होती.


"बरं बिरं आहे ना तिला? की डोकं उलटं चालायला लागलंय?" ललिता.


"आई, काहीतरी झालंय तिला. तिचे सगळे अंदाज बदले बदले से वाटत आहेत." सुनंदा ललिताकडे बघायला लागली.


"सुने, काय झाले असेल गं?" ललिता तिच्याकडे सांशकतेने पाहत म्हणाली.


"लव्हेरिया?" दोघीही एका सुरात म्हणाल्या.


"विहान?" पुन्हा दोघींचा स्वर एकत्र लागला.


"नाही हो आई, आपली निवी तशी नाहीये. काहीतरी महत्त्वाचे काम असेल म्हणून ती लवकर गेली असेल. आपण उगाचच भलता सलता विचार करतोय." सुनंदा तिच्या दुसऱ्या मनाचा विचार करून म्हणाली.


"शशीला फोन करून विचार कुठली मिटिंग वगैरे ठेवलीय का ते." ललिताला भलतंच काही सुचत होते.


"आई? या वेळेत त्याला फोन करायचा नाही हा नियम आहे ना त्याचा? तो कसा मोडायचा?" तिच्या मनाची घालमेल सुरु झाली.


"सुनंदा, मला काही सुचत नाहीये. मस्तपैकी आलं घातलेला घट्टसर दुधाचा चहा कर बघू. जाऊ दे मीच करते."


"अहो आई मी करते ना. का उगाच इतक्या पॅनिक होताय?" सुनंदा.


"आपण दोघी मिळून करूया. चल. त्या विहानला काय वाटलं? शशांक केळकरच्या मुलीला प्रेमात पाडायचा प्रयत्न करतोय तो." ललिता त्रागा करतच स्वयंपाकघरात गेली आणि तिच्या मागोमाग सुनंदा देखील.

चहा होईपर्यंत दोघी एकमेकींशी अवाक्षरही बोलल्या नाही.

"आई, अहो नव्या शशांकची लेक आहे हे त्या विहानला ठाऊक नाहीये. खरं तर ऑफिसमध्ये कोणालाच माहित नाहीये आणि तुम्हालाही हे माहित आहे ना?" कडक चहाचा घोट घेतल्याबरोबर सुनंदाच्या डोक्यातून बाहेर आले.


"हम्म. निवी तशी नाहीये गं सुनंदा. आपण ओळखतो ना आपल्या लेकीला आणि तसं काही असेल तर ती सांगेल आपल्याला, डोन्ट वरी." ललिताचे डोके देखील आता बऱ्यापैकी शांत झाले होते.


******

नव्याने गुणगुणतच ऑफिसमध्ये पाऊल टाकले. आज चक्क दहा मिनिटे ती लवकर पोहचली होती. नाहीतर नेहमी धावत पळत कसेतरी वेळेत पोहचायची तिची सवय होती. शशांकने केबिनच्या काचेतून तिला पाहिले आणि त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला. आज त्याची लेक लवकर आली होती ना.


"गुडमॉर्निंग." विनीत आणि कीर्तीने तिला ग्रीट केले.


"गुडमॉर्निंग." तिने स्मित करून त्यांना रिप्लाय दिला.


नकळत तिची नजर समोरच्या डेस्कवर गेली जो अजूनही रिकामा होता. ज्याच्यासाठी ती एवढया लवकर आली होती तोच तिथे नव्हता. तिला त्याचा जाम राग आला पण चेहऱ्यावर तसे काही जाणवू न देता ती तिच्या केबिनमध्ये निघून गेली.

आत पोहचल्यावर मात्र हातातील पर्स आपटून फेकावीशी वाटत होती पण मनावर आवर घालून तिने स्वतःला खुर्चीवर झोकून दिले.


'काल तर मारे मोठया मोठया गोष्टी करत होता आणि आज महाशय अजून आले नाहीत.' तिने चरफडतच बेल वाजवली आणि प्यूनला एक स्ट्रॉंग कॉफी आणायला सांगितले.

"मिस्टर विहानला आल्या आल्या माझ्या केबिनमध्ये पाठवा." हा आदेश द्यायला ती विसरली नाही.

******

"गुडमॉर्निंग विहान."

"कसली मॉर्निंग गुड बोलतोस यार? बघ ना किती उशीर झालाय." बाहेर कार पार्क करत घाईगडबडीने विहान आत आला आणि आपल्या जागेवर बसणार होता की विनीतने त्याला ग्रीट केले. त्यावर तो प्रत्युत्तर देत होता.


"हो, तुला का आज लेट झाला? आज तर नव्या मॅम देखील तुझ्याआधी आल्या." दोघांच्या गप्पा ऐकून कीर्तीने त्याच्या ज्ञानात आणखी एक भर घातली.

तो काही उत्तर देणार तोच नव्यासाठी कॉफी घेऊन जात असलेल्या प्यूनचे त्याच्याकडे लक्ष गेले.

"विहान सर, मॅम नी तुम्हाला केबिनमध्ये बोलावलंय." त्याने विहानला नव्याचा निरोप दिला.


"हो, आलोच." जागेवरून उठत विहान.


"विहान जरा सांभाळून बाबा. नाहीतर मॅडम मेमो वगैरे द्यायच्या." कीर्ती विनीतला टाळी देत म्हणाली.


"मे आय कम इन?" विहानच्या आवाजाने नव्याने केबिनच्या दाराकडे नजर टाकली. ओठावर गोड हसू घेऊन विहान उभा होता. त्याच्या काळ्याभोर नजरेत काहीतरी जादू होती की ज्यामुळे रागावलेली नव्या अगदी शांत झाली.


'निवी, तू रागावली आहेस हे विसरू नकोस. त्याच्याशी जर सौम्यपणे वागलीस तर बघ.' तिचे मन तिला जणू धमकी देत होते.

डोके मात्र गफलत करत होते. इतका वेळ रागाने नुसते वाफाळलेले डोके त्याला बघताक्षणीच शांत कसे होऊ शकते तिलाच कळत नव्हते.

'ऐसी सिच्यूएशन मे दिमाग की नही दिल की सुनो.' मनाने पुन्हा कौल दिला आणि गार झालेल्या डोक्याला बाजूला ठेवत तिने हातातील स्ट्रॉंग कॉफी ओठाला लावली.


"मे आय कम इन मॅम?" तो पुन्हा विचारत होता.


"ओह, मिस्टर विहान? आलात तुम्ही?" तिने मिस्टर विहान म्हटले त्यावर ती काल डिनरला आलेली नव्या नसून त्याची बॉस नव्या मॅडम आहे हे त्याला कळून चुकले होते.


"सॉरी मॅम, जरा लेट झाला. ते मी एसके सरांना.. आय मिन शशांक सरांना कळवले होते."


"आय डोन्ट वॉन्ट एनी एक्सप्लॅनेशन अँड डोन्ट फर्गेट द्याट की तुम्ही माझ्या हाताखाली कामाला आहात. सो, तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो मला सांगायला हवा होता." त्याच्याकडे दुर्लक्ष करत समोरच्या लॅपटॉप वर बोटं फिरवत ती म्हणाली.

"ॲक्च्युली मॅम रात्री.."

"लिव्ह इट." तो काही सांगू पाहत होता पण तिने विषय बदलला.

"किती मिस्टेक्स मिस्टर विहान? एक प्रोजेक्ट व्यवस्थित केला की आपल्याला सगळं येतं अशी हवा डोक्यात जायला लागते का?" त्याला रागवायला तिला कोणतेतरी कारण हवे होते.

तिच्या बाजूला उभे राहून त्याने लॅपटॉप मध्ये डोकावून पाहिले. ती म्हणत होती त्याप्रमाणे त्यात भरपूर चुका होत्या आणि त्यामुळे तिचे खवळणे साहजिक होते.

नव्याच्या राग घालवू शकेल का विहान? वाचा पुढील भागात.
:
क्रमशः
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे. *
******


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//