Jun 14, 2021
ललित

हौश्या

Read Later
हौश्या

“ #हौश्या ” 
   
              दोन दिस झालं सारखाचं पाऊस पडत हुता. म्हंजी तसा लय मोठा बी न्हाई पर थोडं का हुईना बारीक सारीक बुरगांट सारखं ढासळायचं. आपुन घरात गप बसलं की त्यो बी आभाळात गप व्हयाचा. आन आपुन एकांद काम करायला बाहीरं पडलं की ठरवून मुद्दामं केल्यागतं लगीचं त्येची रिपरिप चालू व्हयाची. बरं अशानं काय लय मोठं नुकसान व्हत असं बी काय न्हाय म्हणा पर सगळी काम्बुरनं मातुर भिजायची. त्यानं हुयाचं असं की घरातनं बाहीर पडल्यापस्नं ती घरला माघारी येईस्तोवर अंगात नुसती हुडहुडी भरायची. आन काय काम बी करू वाटायचं न्हाई.
          आन त्या दिशी बी तसंच झालं. पर त्यो दिस लय खास हुता. त्यामुळं घरात बसून चालणार नव्हतं. आव वर्षांचा ह्यो एवढाचं यक जीवाभावाचा दिस आसतुया शेतकऱ्याचा आन त्याच्या लाडक्या बैलाचा. हो, त्यो बेंदराचा दिस व्हता. त्या दिशीच्या आदल्या रात्रीचं हळदी तुपानं आमच्या “ हौश्याची ” मी अन माझ्या चुलत्यानं खांदमळणी केली व्हती. त्याला गुळाच्या मोदकाचा निवदं खायाला घातला व्हता. उद्याच्याला त्याला सजवायचं म्हणूनशानं त्येची शिंग बी घोळून घेतली व्हती. माझा चुलता म्हंजी पांडा काका. आन म्या शिरपती. 
           आमचा हौश्या म्हंजी लय लय गुणाचा बैल. समद्या गावठाणात असा यक बी बैल नव्हता तवा कुणाकडं. आम्ही त्येला कधी बैल समजलांच न्हाई. आव त्येला कारण बी तसंच हुतं. हौश्या लय समजूतदार व्हता. जणू एकांद्या माणसाचंच डोक्सं घिवून जल्माला आला व्हता त्यो. म्हंजी सगळं आपुन बोललेलं समजायचं त्येला. ते कसं ते मला अजून कळलेलं न्हाई. आमच्या गावात तर त्याला लय मान हुता. आवं जवळपास आर्ध्या गावाची जमीन व्हयवटून द्येचा त्यो. पांडा काका, हौश्या आन रम्या काकांचा “ छब्या ” ही तिकडी जमली की मग किती बी काम असुदे. आवं पार पाडणार म्हंजी पाडणारचं.
             हौश्या आम्हांला किनवीच्या बाजारात घावला हुता. जवा २००३ साली पच्चिम महाराष्ट्रात दुष्काळ पडला हुता का न्हाई तवा सरकारनं समदीकडं गुरांच्या छावण्या चालू केल्या व्हत्या. त्यांतच पुसेगांवाहून इकडं आपलं बैल इकायला आलेल्या महिपती नावाच्या माणसांकडणं माझ्या चुलत आज्यानं हौश्याला खरेदी केला व्हता. तवा आमचा आन त्या चुलत आज्याचा वारंगुळा व्हता. आमच्या कडं तवा “ संज्या ” हुता. पण त्याचं वय झालं हुतं. त्यानं बी आम्हांला लय मदत केली समद्या कामात. पर यक दिस जे नव्हतं व्हायचं तेंच झालं. एकदा कळकीच्या बेटांजवळ चरण्यासाठी संज्याला बांधला हुता पांडा काकांनं. पावसाळ्यांचं दिस व्हतं. पाऊस पडायला चालू झाला म्हणून पांडा काका संज्याला आणायला गेला. मालकाला बघून संज्या हरखून गेला आन गरागरा त्या कळकीच्या बेटाशी फिरला. गळ्यातला कासरा असा काय त्या बेटांत गुतला की संज्याच्या नरड्याला फास बसला आन त्यांतच आमचा संज्या गेला. पांडा काका जवळ जाईस तवर संज्या आम्हांला सोडून गेला व्हता. 
             तवापास्न पांडा काकानं गुरं सांभाळायचा धसकाचं घेतला व्हता. पण अनायसे माझ्या चुलत आज्याचं मयत झालं. त्येंची समदी पोरं तिकडं लांब ममयला असल्यामुळं ती काय गावाला यचं नाव काढत नव्हती. म्हणूनशान हौश्याची जबाबदारी माझ्या चुलत्यानं घेतली. तसा त्येला पहिल्या नजरेतचं हौश्या लय आवडलेला. नक्षीदार डोळं, टुमदार वशिंड, लांबसडक बैठी शिंग, भरलेली लांब गळवंड आणि हे हत्तीगतं बलदंड शरीर अगदी परदर्शनात निवून ठेवावा असा. तरी बी लय शांत बैल. आवं औताच्या कामाला आख्ख्या गावठाणात कुणी त्येचा हात धरत नव्हतं. ज्या ज्या माणसानं त्याला घिवून औत हाणला हुता त्यो त्यो माणूस पुढचं सालं येईस्तोवर हौश्याचं नाव काढायचा समद्या गावात. म्हणायचा बैल असावा तर असा. जवर हौश्या हुता तवर पांडा काका समद्या गावात छाताड बाहीर काढून चालायचा.
             एवढा गुणाचा व्हता हौश्या की काय सांगू. कामाला तर कधी कंच्या बैलाला ऐकला न्हाईचं पर जवर हुता तवर एका बी माणसाला मारलं न्हाई की ढोसाललं न्हाई. आवं एकांद गुढग्या एवढं पोरगं जरी त्याच्या समोर गेलं तरी मान खाली घिवून त्याच्या बर खेळत बसायचा.पांडा काकांचं धाकलं पोरं पाच वर्षांचं व्हतं तवापास्न त्ये हौश्याला वैरण घालायला एकटं जायाचं. हौश्याचं कधीच कुणाला भ्या वाटलं न्हाई. अगदी बाया माणसं सुद्धा बेंदराला एकट्या एकट्या जावून पुजून यच्या. पण कधींच कुणाला मारलं न्हाई. आमच्या घरात तर सगळी माणसं त्येला शंकराचा नंदीचं म्हणायची. कारण आजपातुर एवढी जनावरं पाळली दावणीला पर एवढं शांत आन समजूतदार जनावारं पहिल्यांदा पाहिलं व्हतं सगळ्यांनी.
          आम्ही घरात अठरा माणसं व्हतो. मग हौश्या आला आन आम्ही एकोणीस झालो. एवढ्या सगळ्या माणसांचं खायाला एकट्या हौश्याच्या जीवांवर काढायचो आम्ही. तसं बैल दावणीला असणं म्हंजी प्रगतशील आन जाणत्या शेतकऱ्याचं लक्षाण असतं. यक येगळीच धुंद आन नशा असती. महत्वाचं म्हंजी गावात वट असतो. माझा चुलता तर म्हणायचा म्या हौश्याचा पुतळा बांधून घेणार हाय घरापुढं.आन घराला बी नाव देणार हाय “ हौश्याची कृपा ” म्हणून. आम्हांला बी कौतिक वाटायचं तवा जाम.
             त्या दिशी मग आम्ही पाणी गरम केलं आन शेडाकडं निघालो हौश्याला आणायला. तवा आमच्यात बैलाला घरापुढं धुवायची परथा हुती. अगदी साबण बिबन लावूनशान हौश्या पांढरा फिकट दिसत न्हाई तवर त्याला धुणार होतो आज आम्ही. त्येचा मागचा पाय आन मांडीचा भाग सदान् कदा शेणानं भरलेला असायचा. आज खासकरून मी त्येचा मागचा पाय घासणार व्हतो. मनातल्या मनात आज हौश्याला कसा सजवायचा त्यो इचार करत व्हतो. दरवर्षीगतं कांद्याचं, बटाट्याचं छाप उठवायचं न्हाईत हे मनाशी पक्कं केलं हुतं. ह्या बारीला त्याच्या पांढऱ्या फिकट अंगावं छान छान चितरं काढायची आनं शेतकरी आत्महत्ये संबंधी एकांदा मेसेज बी लिव्हायचा असं मनात ठरवलं व्हतं. 
             आम्ही शेडजवळ पोचलो. पांडा काकानं शेडाचं फकाट उघाडलं आन त्यो हौश्या जवळ गेला. काल खांद मळणी केल्यामुळं काकाचं हात आन हौश्याचं वशिंड पिवळं चिटुक पडलं हुतं. काकानं माझ्या कडं बघत बघत एका बगलचा कासरा सोडला आन “ हौश्या..इ...उठ..उठ...आ हौश्या ” असा आवाज टाकला. एरवी नुसत्या मालकाच्या पायाचा आवाज ऐकून उठणारा हौश्या आज हाक दिली तरी उठला नव्हता. या गोष्टीचं अप्रूप वाटलं म्हणून म्या आन काकानं हौश्याकडं पाहिलं आन आमचं अवसान गळलं. काका तर तिथंच हातपाय गाळून बसला आन मला रडू कोसळलं. इतभर जीभ बाहीर काढून हौश्या आमच्या पुढ्यात पडला हुता. सतरा वर्ष आमची सेवा करून आन आम्हांला त्येचा लळा लावून हौश्या आम्हांला सोडून गेला व्हता. 
          आम्ही डाक्टर बोलावला तवा त्येनं सांगितलं की काल राती साधारण दोन वाजता त्येला अर्धांग वायूचा झटका आला व्हता आणि जास्त वय झाल्या मुळं त्येला त्यो झटका सहन झाला न्हाई. त्यांतच त्येला मराणं आलं हुतं. ते ऐकता ऐकता आम्ही सगळी रडू लागलो. त्याची तडफड डोळ्यांसमोर आणून आम्ही आमच्या घरातलं कुणी मेल्यागत हुंदकं दिवून दिवून रडत व्हतो. तसं त्येचं काम आम्ही दोन वरसापूर्वीचं बंद केलं व्हतं. आता त्यानं आयुष्यभर फक्त बसून खावं अशी आमची इच्छा व्हती. आम्ही ट्रॅक्टरनं सगळी काम करून घेत व्हतो. फक्त त्येला मरेपर्यंत सांभाळायचं व्हतं. आन त्यो गेला. आमची इच्छा पूर्ण केली पण आमचा बेंदूर सुना करून गेला. त्या दिसापासून बेंदूर आमच्यासाठी संपला तो कायमचाचं. 
           आज पुन्हा बेंदूर आला. दरवर्षी येतो अन जातो पर आमचा हौश्या आमच्या बरं न्हाई हे दुःख काय मनातून जात न्हाई.

---- विशाल घाडगे ©™✍️

Circle Image

विशाल घाडगे

Student

Writer, Poet, Storyteller, Lyricist, Author, Rapper. I write the stories about village and its rural culture.