झपाटलेली इमारत भाग 1

सत्य घटनांवर आधारित थरार..
"अरे पश्या, तुला आठवतं का, त्यादिवशी तुला आम्ही सगळ्यांनी मिळून घाबरवलेलं."


"अरे मग काय, बोबडी वळली होती याची. " : रमेश काका रीळ ओढत म्हणाले.


"मग काय एकदम हल्ला झाल्यावर घाबरणारच ना!!" : प्रसाद


"लाईट गेली होती संपूर्ण बिल्डिंगची.. मी खालून वर येत होतो घरी आणि तुम्ही मिळून ब्लॅंकेट टाकलं माझ्यावर आणि असं झोडलं जसं काय मी चोर आहे. नशीब लाईट आली म्हणून नाही तर तुम्ही मारलंच असतं मला. " : प्रसाद


"अरे हा मंगेश बोलला, बिल्डिंगमध्ये चोर घुसलाय म्हणून. " : संदीप


"लय चोपला ह्याला.. " : रमेश


" थांबा रे. कशाला त्या बिचाऱ्याला सतवताय??" : विभा


"घ्या, बोलल्या वकिलीणबाई." : शशी हसत म्हणाला.


सगळे विभाच्या घरी जमले होते. बऱ्याच वर्षांनी त्यांच्या तरुणपणीच्या आठवणींना उजाळा मिळत होता. आता सगळे त्यांच्या त्यांच्या कामातून निवृत्त झाले होते. 35 - 40 वर्षांनी एकमेकांना भेटत होते.


लहानपणापासून सगळे एकत्र वाढलेले.. एकाच पोलीस वसाहतीत.. म्हणजे प्रत्येकाच्या घरचं कुणी ना कुणी पोलीस खात्यात होतं..


"मी सगळ्यांसाठी खायला घेऊन येते. " : विभा


" अरे मंगेश, तुला आठवतं आपण दरवर्षी 31 डिसेंबरला पार्टी करायचो.. कधी पावभाजी, कधी बिर्याणी.. नुसती धमाल असायची." : संदीप


"हो यार, खरंच कमाल होते ते दिवस. " : दिनकर


" आपली क्रिकेटची मॅच.. हा दिन्या स्टम्प घेऊन पळायचा आउट झाल्यावर.. रडका. " : मंगेश हसत म्हणाला.


"होळीच्या दिवशी काय झालं होतं माहितीये ना?? " : विभा


"काय झालं होतं?? " : अभी


" ही तर असून नसल्यासारखी.. घराच्या बाहेर पडेल तर माहिती असेल ना आजूबाजूचं!!" : संदीप


"तुला तरी माहितीये का, काय झालं होतं ते?? " : अभी


"हो, मग.. होळी झाली होती. " : संदीप


" ए विभा, तू सांग गं काय झालं होतं ते.. याच्याकडे लक्ष नको देऊस." : अभी


"सगळ्यांच्या घरात सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण होतं.. नैवेद्य दाखवण्यासाठी कुणी पुरीभाजी तर कुणी पुरणपोळ्या केल्या होत्या. ज्या क्षणाची उत्सुकता होती, तो क्षण आला.. रात्री होळी पेटली.. ज्वाला उंचच उंच जायला लागल्या.. मी बाल्कनीत उभी राहून हे सगळं बघत होते..

आईने तिच्यासोबत खाली जायला हाक मारली. मी खाली गेले. सगळ्या बायका तांब्याने पाणी घालत होळीला प्रदक्षिणा घालत होत्या. कुणी नारळ टाकत होतं. होळीसमोर मांडलेल्या पूजेजवळ जाणते लोकं इमारतीतील लोकांसाठी गाऱ्हाणं घालत होते. मी एका बाजूला उभी होते. कुणीतरी मला शुक शुक करतंय असा आवाज आला. मी इकडे तिकडे बघितलं तर कुणीच नव्हतं. गच्चीवर पाहिलं तर कठड्यावर हात ठेवून एक व्यक्ती माझ्याकडे हसून बघत होती. हातवारे करून बोलवत होती. चेहरा नीट दिसत नव्हता. तो चेहरा कधी हसतोय असा भासायचा तर कधी रडतोय असा. त्यानंतर मी कशी गच्चीवर पोहोचले मलाच कळलं नाही. तिथे मी खूप शोधलं पण कुणीच नव्हतं. परत खाली येण्यासाठी गच्चीचं दार उघडायला गेले तर दार बंद होतं. कुणीतरी कडी लावली होती बाहेरून. खाली स्पीकरचा आवाज होता त्यामुळे माझा आवाज कुणाला ऐकू गेलाच नाही. आतासारखे तेव्हा सगळ्यांकडे फोन नसायचे. खूप घाबरले होते. दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होते. पण काही केल्या दार उघडत नव्हतं. तिथेच झोप लागली मला. रात्री उशिरा कुणीतरी वर झोपायला आलं तेव्हा दार उघडलं. दार उघडलं तशी मी पळत खाली गेले. खाली आईचा जीव टांगणीला लागला होता. मी जाऊन तिला बिलगली. काही बोलण्याचे त्राण नव्हते." : विभा


"कुणीतरी उगाच मस्करी केली असेल गं. पोलीस लायनीतली कार्टी आहेत ती. काय करतील याचा नेम नाही." : अभी


"ते बाजूच्या इमारतीत रात्री अपरात्री चालणारे होम आजही आठवतात. " : विभा


"हो ना. वर्षाला चार ते पाच माणसं जायची तिथली. काय दोष होता कुणास ठाऊक?? " : नीलिमा


"आता विषय निघालाच आहे, म्हणून सांगतो." : दिनकर


"बाबांच्या जागी मी रुजू झालो, तेव्हाची गोष्ट. कामावरून घरी येत होतो. धड रात्रही नव्हती आणि पहाटही.. आपल्या गेटजवळ आलो आणि पाहिलं तर मैदानात दोन लहान मूलं खेळत होती.
मी दुर्लक्ष केलं. घरी गेलो, फ्रेश झालो आणि पुन्हा खाली पाहिलं तर कुणीच नव्हतं."


"काही नाही रे, मनाचे खेळ आहेत सगळे. " : मंगेश

"अरे पण हे सगळे भास होते, असं पण म्हणता येत नाही ना!!" : संदीप


"एकाला भास होईल, सगळेच का खोटं बोलतील?? " : अभी


"त्या नाईक काकू एकाएकीच गेल्या. बिचाऱ्या चांगल्या होत्या. पण नंतर नंतर कुणाच्याही घराची कडी कधीही वाजवायच्या. ते विस्कटलेले मोकळे केस, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि मध्येच जोरजोरात हसायच्या. सगळे एकदिवस जाणार, असं काहीतरी बोलायच्या." : नीलिमा


"हो, आम्ही नवीनच आलो होतो राहायला. त्या रात्री आमच्याकडे आल्या त्या शेवटच्या आणि दुसऱ्या दिवशी बिल्डिंगच्या मागच्या बाजूला त्यांची बॉडी सापडली." : विभा


"हो ना. त्यांच्या मृत्यूचं ते एक गुढच. त्यांच्या भावकीतल्या कुणीतरी त्यांना मारलं अशाही बातम्या पसरल्या नंतर. पण मारल्याचे काहीच पुरावे सापडले नाहीत." : प्रसाद


"समोरच्या इमारतीतला मृत्यूचा वणवा नंतर आपल्याही इमारतीत शिरला आणि एकेक मृत्यूच्या बातम्या कानावर यायला लागल्या." : विभा


"अरे काय तुम्ही हे सगळं बोलत बसलायत. चांगल्या आठवणींबद्दल बोला की जरा." : रमेश


"मी बाबांमुळे कधीच आले नाही ट्रीपला. पण जाम धमाल करायचात ना तुम्ही. गीता सांगायची मला. " : अभी


" तू तेव्हा अभ्यासावर लक्ष दिलंस म्हणून आज एका मोठ्या पदावर काम करून निवृत्त झालीयेस. " : विभा


"ते झालंच गं. पण जुने दिवस परत येत नाहीत ना!!" : अभी


"गोव्याची ट्रिप भारी झाली होती." : मंगेश


"अरे दरवर्षी अलिबागला जायचो आपण." : संदीप


"गप रे. तो अजुनपण अलिबागला गोवा समजतो." : प्रसाद टेर खेचत म्हणाला.


"हृदयाच्या जवळचं कारण होतं ना येण्यामागे. त्यामुळे अलिबाग गोवाच वाटणार. " : संदीप


"कुठलं कारण रे?? " : अभी


"संध्या" : प्रसाद


"आदल्या दिवशी ट्रीपला गेलो. मस्त फोटो काढले. याने संध्यासोबत फोटो काढले. घरी येताना वेगळ्याच धुंदीत होता आणि दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनला संध्या राखी घेऊन दारात हजर." : संदीप


"अरेरे!!!" : अभी


"मी ऐकलंय एकदा गाडी बंद पडली होती म्हणे, ट्रिपवरून येताना. " : विभा


"हो, अचानक बंद पडली. कुठून खटारा गाडी शोधली होती काय माहित.." : प्रसाद


"गाडीत प्रॉब्लेम नव्हताच." : मंगेश


" मग?? " : विभा


"उशीर झाला होता म्हणून शॉर्टकटने गाडी घ्यायचं ठरलं. वाटेत अचानक गाडी बंद पडली. पेट्रोल, इंजिन, टायर सगळं चेक केलं. गाडी एकदम ओके होती. पण काही केल्या चालू होत नव्हती. शेवटी धक्का मारत हायवेला आणली, त्यानंतर ती चालू झाली. आम्ही पाच जण धक्का मारत होतो, तरी ती ढकलली जात नव्हती. जणू कोणतरी आत बसलंय, असं वाटत होतं.पण जशी हायवेला आणली तशी चालू झाली. पण ती पंधरा वीस मिनटं कोणतरी आमच्यावर दुरून पाळत ठेऊन आहे, असं वाटत होतं." : सुनील


"विभा, हे घड्याळ बंद आहे का गं?? " : मंगेश


"नाही, चालू आहे." : विभा


"अगं मगाचपासून यात बाराच वाजतायत. " : मंगेश


"तुझे बारा वाजवले ना संध्याने म्हणून तुला बारा वाजलेले दिसत असतील. " : प्रसाद मस्करी करत म्हणाला.


"बरं चला. पुरे झाल्या गप्पा. जेवून घ्या. शाकाहारी खाणाऱ्यांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी खाणाऱ्यांसाठी मांसाहारी. पोटभर जेवा रे. " : विभा


"तू नाही का जेवणार आमच्यासोबत?? " : अभी


"नाही गं. माझा उपवास आहे आज. " : विभा


"बरं. मग उपवासाचं तरी खा आमच्यासोबत. " : अभी


विभा फळ उचलणार तोच जोरात खिडकी आपटली. संदीप ती बंद करायला उठला तर त्याचे पाय कुणीतरी मागे ओढतंय असं त्याला वाटलं. त्याला वाटलं तिथे जमलेल्या मित्रांपैकी कुणीतरी असेल पण सगळे जेवणाचा आस्वाद घेत होते. शेवटी तो मागे वळला आणि परत त्याच्या जागेवर येऊन बसला.


पुन्हा खिडकी जोरात आपटली. हवेने पडदे हलायला लागले. लाईट गेली. सगळे एकमेकांना हाका मारत होते. त्यात कोणतरी धडपडून खाली पडलं. काळोखात कोणीच कोणाला दिसत नव्हतं.


क्रमश :