झपाटलेली इमारत - भाग 2

ती एकेक पाऊल पुढे टाकत होती. "वाचवा मला", "मला वाचवा " असा आवाज तिच्या कानावर आला. ती जसजशी पुढे जात होती, तसा आवाज आणखी स्पष्ट ऐकू येत होता.


दहा वर्षांनंतर..


"अनन्या, दे यार कॉफी. " : माही

"थांब गं देते. दोन मिनटं थांब." : अनन्या

"लवकर दे. " : माही

"हे घे. " : अनन्या


"बरं ऐक. आज मला यायला उशीर होईल. तू बाहेर काहीतरी खाशील का आज?? " : अनन्या


"हो चालेल. " : माही


अनन्या ऑफिसला निघून गेली.


कॅनडा मध्ये एका नामांकित कंपनीत चांगल्या पदावर ती कामाला होती.


ऑफिसमध्ये बरंच काम होतं. काम संपवता संपवता रात्री खूप उशीर झाला. ऑफिसच्या गाडीने तिला घराजवळच्या मेन रोडवर सोडलं. रस्ता सामसूम होता. मेन रोडपासून तिचं घर दहा - पंधरा मिनिटावर होतं.


ती एकेक पाऊल पुढे टाकत होती. "वाचवा मला", "मला वाचवा " असा आवाज तिच्या कानावर आला. ती जसजशी पुढे जात होती, तसा आवाज आणखी स्पष्ट ऐकू येत होता.


ती चालता चालता घराजवळ येऊन पोहोचली, तसा आवाज यायचा थांबला.


ती दार उघडून घरात आत आली. समोरचं दृश्य बघून ती खूप घाबरली. माही बेशुद्धावस्थेत पडली होती. तिच्या डोक्याला मार लागला होता.


अनन्याने तिच्यावर पाणी शिंपडलं. पण ती शुद्धीवर येत नव्हती. अनन्याने डॉक्टरला फोन केला.


"श्रीराज, प्लीज लवकर ये. माही, माही बेशुद्ध पडलीये. " : अनन्या


थोड्याच वेळात श्रीराज घरी आला. त्याने माहीला तपासलं. थोड्या वेळात ती शुद्धीवर येईल, असं सांगून तो निघतच होता पण अनन्याच्या चेहऱ्यावरची भीती आणि काळजी बघून त्याची पावलं आपोआप मागे वळली.

बाहेरगावी राहायला आल्यापासून अनन्याची विश्वासातली व्यक्ती म्हणजे श्रीराज होता. त्यालाही तिची काळजी होती.


थोड्या वेळाने माही शुद्धीवर आली.


"माही, कसं वाटतंय तुला आता?? " : अनन्या


"ठीक आहे. तू कधी आलीस आणि मी इथे कशी?? " : माही


" माही, काल कुणी आलं होतं का घरी?? तुझ्या डोक्याला मार कसा लागला?? " : अनन्या


"अनन्या, काय बोलतेयस तू?? मी काल घरातच नव्हते तर मला कसं काय होईल??" : माही वैतागून बोलली.


जोरात ओरडून बोलल्यामुळे तिच्या डोक्यात कळा गेल्या. तिच्या उत्तराने अनन्या तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहिली. श्रीराजने तिला खुणेने शांत राहायला सांगितलं आणि माहीला झोपेचं इंजेक्शन दिलं, जेणेकरून तिला आराम मिळेल.


अनन्या हॉल मध्ये आली. तिच्यापाठोपाठ श्रीराजही आला.


"श्री, माही.. " : अनन्या


"अनन्या, शांत हो. जोरात मार लागल्यामुळे किंवा ग्लानीत असल्यामुळे आपल्याबाबतीत काय झालंय, याचा विसर पडू शकतो. तिला आता आराम करुदे." : श्रीराज


"बरं मी निघतो. क्लिनिकला जायचंय. आणि हो, माही उठली की तिच्यासमोर एकदम कालचा विषय काढू नकोस. तिला जेव्हा आठवेल, तेव्हा सांगेल ती स्वतःहून काय झालं होतं ते. " : श्रीराज


" ठीक आहे. थँक यू. काल तू होतास म्हणून आधार वाटला. " : अनन्या


"अनन्या, आपल्या मैत्रीप्रती माझं कर्तव्य होतं ते. " : श्रीराज


"बाय." : श्रीराज


श्रीराज निघून गेल्यावर अनन्या किचनमध्ये गेली. तिथे सगळं आवरताना काल रात्री पाहिलेलं दृश्य तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं.


माहीला अशा अवस्थेत एकटीला सोडून ऑफिसला जाणं तिला योग्य वाटत नव्हतं, म्हणून ऑफिसमध्ये आज येणार नसल्याचं तिने फोन करून सांगितलं.


बऱ्याच वेळाने माही बाहेर आली.


"माही, उठलीस तू.. कसं वाटतंय तुला आता?? " : अनन्या


"काय लावलंय सकाळपासून कशी आहे, कसं वाटतंय. काहीही झालं नाहीये मला. " : माही


"काही हवंय का तुला?? " : अनन्या


"नाही, नकोय. आणि आज तू घरी कशी?? ऑफिसला नाही जायचं का तुला?? " : माही


माहीने बोलता बोलता सहज कपाळाला हात लावला, डोक्यावरची पट्टी बघून " हे कसं झालं?? " असा प्रश्न अनन्यालाच विचारला.


अनन्याला डोक्यावर हात मारून घ्यावा की माहीला ओरडून विचारावं हेच कळत नव्हतं. पण तिने शांत राहून "काल तुला चक्कर येऊन तू टेबलला आपटून पडलीस.", असं सांगितलं.


माहीला ते खरं वाटलं. कारण काल नेमकं काय झालं, हे तिलाही आठवत नव्हतं.


एक दोन दिवस असेच गेले. त्या दिवशीचं रहस्य तसंच राहिलं.


अनन्याच्या मनात असंख्य प्रश्न होते पण ती ते स्पष्टपणे माहीला विचारू शकत नव्हती कारण माहीचा शीघ्रकोपी स्वभाव.


अनन्या शांतच राहिली.


एका क्लायंटला भेटायला अनन्याला त्याच्या घरी जावं लागणार होतं. कारण ते वयस्कर होते.


ठरल्या वेळी अनन्या तिथे पोहोचली. बराच वेळ दार वाजवूनही कोणी उघडलं नाही. तिने दार ढकलल्यावर तिच्या लक्षात आलं की ते उघडंच आहे.


ती आत गेली. एवढ्या मोठ्या बंगल्यात कोणीच कसं नाही, असा प्रश्न तिला पडला.


तिने बराच वेळ वाट बघितली. शेवटी क्लायंटला फोन केला पण फोन स्विच ऑफ येत होता. तिला काहीतरी गडबड वाटली. तिथून निघणार तोच "साहेबांनी तुम्हाला आत बसायला सांगितलंय. " असं एका नोकराने सांगितलं.


शेवटी काम महत्वाचं, असा विचार करून ती आत गेली. तिथेही तिला त्यादिवशीसारखाच "मला वाचवा", "वाचवा मला" असे आवाज यायला लागले. मध्येच रडण्याचा आवाज.. तिने घाबरत इकडे तिकडे पाहिलं तर कोणीच नव्हतं. ती तशीच तिथून बाहेर पडली.


"रात्र इतक्या लवकर कशी झाली?? " : ती स्वतःशीच बोलत होती.


घरी आली. तोंडावर पाणी मारलं. आणि काही न खाता तशीच झोपली.


दुसऱ्या दिवशी श्रीराज सकाळीच घरी आला.


बघितलं तर माही चक्क किचनमध्ये होती.


"माही, आज तू चक्क किचनमध्ये.. क्या बात है!!" : श्रीराज


"तुझी बेस्ट फ्रेंड झोपलीये ना अजून. मग काय मलाच यावं लागलं. मला कॉफी हवी होती, म्हणून म्हटलं मीच बनवून घेते. तुला हवीये का??" : माही


"नाही,नको.. नशीब कॉफीसाठी तिला झोपेतून न उठवण्याचं सौजन्य दाखवलंस. " : श्रीराज


"काही म्हणालास का?? " : माही


" नाही, कुठे काय.. " : श्रीराज


त्यांच्या बोलण्याच्या आवाजाने अनन्या बाहेर आली.


"हॅलो, अनन्या. " : श्रीराज


"श्री, तू आज सकाळ सकाळी इकडे कसा?? " : अनन्या


"अगं, रविवार आहे आज. सुट्टी होती म्हणून म्हटलं एक चक्कर मारावी इकडे." : श्रीराज


"बरं. तू काही घेणारेस का?? चहा, कॉफी.. की नाष्टा बनवू??" : अनन्या


"घ्या.. इथे घरातल्या लोकांपेक्षा बाहेरच्यांची जास्त काळजी!!!" : माही


"माही, श्री बाहेरचा नाहीये. इथे आपण आलो तेव्हा त्यानेच मदत केली आपली.. इतक्यात विसरलीस. " : अनन्या


"तू मला नको शिकवू. मी बाहेर चाललीये. दोघांनी काय घालायचा तो गोंधळ घाला. " : माही


माही ताडताड करत निघून गेली.


"अनन्या, का ऐकून घेतेस उगीच तिचं??? तू ऐकून घेतेस म्हणून ती जास्त करते. " : श्रीराज


"श्री, तसं नाहीये.. बिचारीच्या आयुष्यात बरंच काही घडून गेलंय.. म्हणून ती अशी चिडचिड करते.. मनाने वाईट नाहीये रे ती.. " : अनन्या


"जगन्माता, आपल्यासमोर काय बोलणार??? आपण धन्य आहात!!!" : श्रीराज


" जाऊदे ते.. मी फ्रेश होऊन काहीतरी खायला करते. तुलापण भूक लागली असेल ना. " : अनन्या


दोघांनी एकत्र नाश्ता केला. श्रीची बडबड सुरु होती. पण अनन्या कसल्यातरी विचारात हरवली होती.


"विचार करत बसण्यापेक्षा बोलून मोकळं व्हावं, मनाच्या तब्येतीसाठी चांगलं असतं ते. " : श्रीराज


"काही म्हणालास का??" : अनन्या


"काय झालंय?? मी मगाचपासून बघतोय, तुझं लक्ष नाहीये. " : श्रीराज


"कुठे काय?? काही नाही. " : अनन्या


" तू पास्ता कसा झालाय, हे नाही सांगितलंस मला. " : अनन्या


"अनन्या, बोल काय झालंय?? तुलाच बरं वाटेल गं बोलून. " : श्रीराज


"श्री, ते मी.. " : अनन्या


अनन्या सांगतच होती, तेवढ्यात घरातल्या टेलीफोनची रिंग वाजली.


अनन्याने फोन उचलला, पण समोरून कोणीच काही बोलत नव्हतं.


एक दोन वेळा असंच झालं.


मग श्रीराजने फोन उचलला. तेव्हाही तसंच, समोरून कोणीच काही बोलत नव्हतं.


"कोणीतरी मुद्दाम करतंय. " : श्रीराज


"तू काहीतरी सांगत होतीस." : श्रीराज


"जाऊदे ना श्री.. ते फार महत्वाचं नाहीये. " : अनन्या


"जशी तुझी इच्छा. तुला जेव्हा सांगावंस वाटेल, तेव्हा सांग. " : श्रीराज


श्रीला त्याच्या पेशंटचा फोन आला, त्यामुळे तो अनन्याचा निरोप घेऊन तिथून निघाला.


तो गेल्यावर अनन्या कोणाचातरी फोटो कवटाळून ओक्साबोक्शी रडायला लागली.