हत्ती गेला अन् शेपूट राहिलं

एकाच विषयावर वाहिलेल्या अतीलघुकथांचा समूह

पूर्वाला प्रमोशन वर बाहेरगावी राहून दोन वर्षं झाली होती. आता ती तिच्या गावी बदली मिळवण्यासाठी पात्रदेखील झाली. दोन वर्षे बाहेरगावी राहून अन् खानावळीत जेवून पूर्वा वैतागली. इतक्यात तिच्या बदलीची ऑर्डर हाती आली पण ऑडिट असल्यामुळे तिला सध्याच्याच ठिकाणी पंधरा दिवस थांबायला सांगितलं गेलं.


पूर्वा निराश झाली. खरं तर दोन वर्षं गैरसोयीच्या ठिकाणी काढल्यानंतर पंधरा दिवस थांबणं काही फार मोठी गोष्ट तिच्या वरिष्ठांना वाटली नाही.

"अहो, हत्ती गेलाय अन् शेपूट राहिलंय.." तिच्या वरिष्ठांनी समजावलं.. अन् \"आलिया भोगासी असावे सादर\" असं म्हणत पूर्वाने वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केलं.

***

ऊर्वी बाळंतपणासाठी माहेरी आलेली! तिला अगदी दुसऱ्या महिन्यापासून कडक डोहाळे लागलेले! डॉक्टरांनी जुळी बाळं आहेत असं सांगितल्यामुळे ती हट्ट करून पाचव्या महिन्यातच माहेरी आली अन् आईच्या कोडकौतुकात न्हाऊन निघाली.

नववा महिना लागला अन् ऊर्वी गर्भभाराने अधिकच जडावली. तिला उठणंबसणं, चालणं, झोपणं सगळंच अवघड होऊ लागलं. "आई गं, बाळं कधी जन्माला येतील गं! आता लवकर प्रसूती व्हायला हवी!" ऊर्वी कण्हू लागली.

"अगं, आई होणं सोपं नाही बरं का! बाळांची पोटातच पूर्ण वाढ झालेली चांगली! मग बाळं सुदृढ होतील. आणि इतके दिवस सगळं सहन केलंस ना! आता हत्ती गेला अन् शेपूट राहिलंय फक्त!"

ऊर्वी हसली आणि मातृत्वाच्या पुढच्या तयारीला लागली.

***

ऋचा आणि ऋत्विक ह्या जुळ्या भावंडांचा आज पाचवा वाढदिवस होता. त्यांच्या आईने घरीच केक करण्याचा घाट घातला.

दोघाही भावंडांचं आई केक करतेय ह्याकडे लक्ष होतं. "आई लवकर केक कर.. मग लवकर मित्र-मैत्रिणींना बोलावू आणि केक कापू!" दोघांनाही घाई झाली होती.

"अरे, हो.. हो.. केक बेक झालाय.. आईसिंग केलं की झालं.. जरा धीर धरा.. हत्ती गेलाय अन् शेपूट राहिलं आहे फक्त!"

"अगं, शिजेस्तोवर धीर आहे तर निवेस्तोवर धीर धरा असं म्हणायचंय का तुला!" आज्जीने विचारलं. "म्हणी ह्या भाषेचं सौंदर्य आहेत. त्यांचा योग्य वापर करावा म्हणजे पुढील पिढीवर भाषेचे संस्कार चांगले होतात!"

जुळ्या भावंडांना आणि त्यांच्या आईला‌देखील म्हणीचा योग्य वापर कळला.

***

वर्ष 2020 आणि 2021 मध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला. नवीन वर्ष सुरू होताच साऱ्यांना वाटलं 2021 संपलं अन् त्यासोबतच कोरोनासुद्धा!

आम्हालाही वाटलं, "कोरोनावरची लस घेतली आहे! संकट संपल्यातच जमा आहे म्हणायचं. हत्ती गेलाच आहे तर शेपूटदेखील जाणारच!"

आम्ही बिनधास्त राहिलो. प्रतिबंधक सूचनांचं पालन करायला विसरलो.

पण जानेवारीच्या सुरूवातीपासून कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला अन् "हत्ती गेला पण शेपूट राहिलं" अशी प्रचिती आली.

कोरोनाने जेव्हा घरातच प्रवेश मिळवला तेव्हा कळलं.. गेला तो हत्ती नव्हताच.. त्याची सोंड होती फक्त! अख्खा हत्ती जायचाय अजून.. शेपटासकट!

तेव्हा जरा जपून! साऱ्यांनीच!

***


सोहम अन् सईचं नुकतंच लग्न झालं खरं पण सोहमची नोकरी अमेरिकेला! सईला व्हिसा मिळण्यात अनेक अडचणी येऊ लागल्या.


सोहमची रजा संपली अन् त्याला एकट्यालाच अमेरिकेला जावं लागलं. सईला व्हिसा मिळायला अवकाश होता. म्हणून ती सासरीच राहिली. नव्या नवरीला सोहमशिवाय मुळीच करमेना!

अनेक अडचणींचे डोंगर पार करत तीन महिन्यांनी सईला व्हिसा मंजूर झाला अन् तिची सोहमकडे जाण्याची लगबग अन् निघण्याच्या तारखेची उलटगणती सुरू झाली.

"सईबाई शरीराने इथे असल्या तरी मनाने मात्र नवऱ्याकडे पोहोचल्या बरं का!" जावानणंदा चिडवू लागल्या..

"हो, हो.. अडचणींचा हत्ती गेलाय आता वाट बघण्याचं शेपूट तेवढं राहिलंय.." सईच्या सासूबाई म्हणाल्या अन् सारं घर हास्यात बुडून गेलं.

***