Login

हट्ट पोसणार नाही-3 अंतिम

मराठी कथा
"हो, अगदी पहिल्यांदा जीन्स घातली तेव्हा सरळ बदलून ये म्हणत होत्या, पण मीही ठामपणे सांगितलं की आज सर्वच मुली असे कपडे घालतात त्यामुळे मी स्वतःची आवडनिवड बदलणार नाही.."

"बापरे, मग त्या तर चांगल्याच चिडल्या असतील.."

"चिडल्या? घरात आकांडतांडव केलेलं त्यांनी. मला, माझ्या नवऱ्याला नको नको ते बोलल्या..अगदी घर सोडून जाईल अशी धमकीही दिली.."

"बापरे, मग तुम्ही काय केलं?"

"काहीच नाही..मी माझा हेका सोडला नाही..किती मूर्खपणा आहे हा? केवळ मी जीन्स घातली म्हणून घर सोडून जाणं हे किती अडाणीपणाचं लक्षण आहे. माझ्या लक्षात आलं, आता जर आपण माघार घेतली तर आयुष्यभर माघार घ्यावी लागत जाईल. माझ्यावर काही असर होत नाही हे लक्षात येताच त्यांनी आपला हेका सोडला. प्रत्येक गोष्टीत मी ठाम राहिले"

"पण एक तर आधीच तुमच्या लग्नाला विरोध होता..त्यात हे असं.."

"लग्नाला विरोध होता म्हणून काय आयुष्यभर आपलं मन मारून जगायचं? आम्हाला दोघांना एकमेकांसोबत आयुष्य काढायचं आहे, संसार करायचा आहे...तोही आनंदाने, मग केवळ कुणाच्यातरी वायफळ हट्टामुळे मन मारायचं? लग्नाला परवानगी दिली याचे आयुष्यभर उपकार मानून त्यांची हाजी हाजी करायची? त्यांच्यासाठी आमचं जे कर्तव्य आहे ते आम्ही न चुकता पूर्ण करत आहोत, त्यांना काय हवं नको सगळं बघतो. पण उगाच एखाद्याचा फालतू हट्ट हट्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही आमची आवडनिवड पणाला लावणार नाही..."

सारिकाचे डोळे उघडले. पहिल्याच वेळी तिने सासूबाईंच्या हट्टाला नाकारलं असतं तर सासूबाईंचा तिथेच लगाम बसला असता हे तिला कळलं.

दुसऱ्या दिवशी,

सारिका आणि तिचा नवरा फिरायला बाहेर जाणार होते. सारिकाने तिच्या आवडीचा वन पीस घातला. तिचा नवरा म्हणाला,

"अगं ए, आई बोलेल की.."

"मला हा ड्रेस आवडतो, उगाच कुणाच्यातरी आवडी निवडीमुळे मी माझं राहणीमान बदलणार नाही"

नवरा चकित झाला,

बाहेर निघत असतानाच सासूबाई आणि मोठी जाऊ हॉल मध्ये बसल्या होत्या, जाउबाई पेपर वाचत होत्या. सासूबाईंनी सुरू केलं,

"हे काय घातलं?? तुला माहितीये ना की..."

"सासूबाई...सगळं माहितीये, पण मला हा ड्रेस आवडतो..मी घालणार.." सारिका सासूबाईंना तोडत म्हणाली,

"मला नाही आवडत असले ड्रेस.."

"हो का? ठीक आहे मग तुम्ही नका घालू असले ड्रेस, बरं झालं सांगितलं, यावेळी तुमच्या वाढदिवसाला असाच ड्रेस घेणार होतो तुम्हाला.."

सासूबाई लालबुंद झाल्या, सारिका आणि तिचा नवरा निघून गेले.. सासूबाईंनी चरकन आपली नजर साक्षीकडे वळवली,

साक्षीने आपलं हसू दाबत चेहरा वर्तमानपत्रात झटकन लपवला...

समाप्त

🎭 Series Post

View all