Login

हट्ट पोसणार नाही-2

मराठी कथा
"अगं तुझ्या गोऱ्या रंगावर उठून दिसेल..घे ती.."

सारिकाला काही बोलताच येईना. नाईलाजाने तिने ती साडी घेतली. घरी जात असताना वाटेतच एक ब्लाउज शिवणारा होता, सासूबाई कायम त्यांच्याकडे ब्लाउज टाकत. सारिकालाही त्यांनी सांगितलं की इथे छान शिवून मिळतात.

दोघीजणी तिथे गेल्या, सारिकाने ब्लाउजसाठी छान छान डिझाइन शोधल्या, नवीन ट्रेंड च्या बाह्या, गळे निवडले..टेलरलाही तिच्या या निवडीचं कौतुक वाटलं.

"हे काय? हे असले गळे? अजिबात नको..आपण नेहमीचे गोल गळे शिवतो तसेच शिवा.."

सासूबाईंनी तिथेही नाक खुपसलं आणि सारिकाला पुन्हा स्वतःच्या आवडीला मुरड घालावी लागली.

हे असं नेहमीच होत असायचं, सगळे निर्णय सासूबाई घेत त्यामुळे सारिकाला आता कसली इच्छाच उरली नव्हती.

दिवाळी झाली आणि सासूबाईंना त्यांच्या मोठ्या मुलाचा फोन आला..

"आई या सुट्टीत आम्ही घरी येतोय.."

सासूबाईंना आनंद झाला. त्यांनी सारिकाला सांगितलं..

"सारिका..अगं सुट्टीत तुझे मोठे जेठ आणि तुझी मोठी जाऊ साक्षी येणार आहेत बरं का.."

सासूबाई दोघांबद्दल सांगू लागल्या, बोलता बोलता विषय निघाला आणि त्यांचं लग्न कसं जमलं याबद्दल सासूबाई सांगू लागल्या,

"महेशच्या कॉलेजपासून ती दोघे एकत्र होती, ती दुसऱ्या जातीची त्यामुळे आम्ही घरातून स्पष्टपणे सांगितलं होतं की हे लग्न अजिबात चालणार नाही...पण महेश कुठे ऐकतो..शेवटी केलंच लग्न..दोघेजण सुखात आहेत यातच समाधान मानायचं.."

सारिकाला समजलं की तिच्या मोठ्या जाऊचं सुद्धा लव्ह मॅरेज आहे म्हणून. त्यांची भेट फक्त लग्नात 8 दिवस झालेली, त्यात दोघींचं नीट बोलणंही झालेलं नाही.

साक्षी आणि महेश सुट्टी लागताच घरी आले. सारिकाने तिच्या मोठ्या जाऊला पाहिलं. जीन्स म्हणू नका, शॉर्टस म्हणू नका..अगदी सारिकाला ज्याला ज्याला बंधन होतं ते ते त्या सगळं घालत होत्या.

सारिकाला प्रश्न पडला, "जाऊबाईंना नाहीत का कसली बंधनं?"

साक्षी घरात वावरू लागली तसा तिचा आणि साक्षीचा संवाद हळूहळू वाढत होता. साक्षीला दिवाळीची साडी घ्यायची म्हणून सासूबाई तिला दुकानात घेऊन गेल्या, जाताना साक्षीने जीन्स घातली तेव्हा सासूबाई तिच्याकडे पाहू लागल्या पण काही बोलल्या नाही. सारिकाला विशेष वाटलं.

दुकानात गेल्यावर साक्षीने एक नवीन फॅशनची साडी काढली, ती बघताच सारिकाला तिच्या वेळेची आठवण झाली,

"सासूबाई आता नक्की या साडीला नकार देणार.." असं सारिका स्वतःशीच म्हणू लागली पण बघते तर, सासूबाई गपगुमान साक्षी जी साडी निवडेल त्याकडे बघत होत्या.

सारिकाला हा विरोधाभास खटकू लागला. आपल्याच बाबतीत हा दुजाभाव का म्हणून तिला वाईट वाटायचं. सासूबाई मोठया जावेला कुठलंही बंधन टाकत नाहीत, सगळं बंधन माझ्यासाठीच. एके दिवशी न राहवून सारिकाने आपल्या मोठ्या जावेजवळ मन मोकळं केलं.साक्षीने ते सगळं ऐकलं आणि तिने डोक्यावर हात मारून घेतला...

"अगं त्यांनी पहिल्यांदा तुला विरोध केला तेव्हा तू काय करत होतीस? त्यांना सांगितलं नाहीस का?"

"नाही, एक तर आमचं लग्न असंच विरोध पत्करून झालंय त्यात आणखी वाद नको म्हटलं.."

"तू पहिल्यांदा बोलली नाहीस हेच चुकलं तुझं. त्यांनी तुला त्यातच पारखून घेतलं, तू बोलत नाहीस हे पाहून त्यांना समजलं की तुला त्या हवं तसं वागवून घेऊ शकतात..."

"ताई तुम्हालाही असंच केलेलं का त्यांनी?"
******

🎭 Series Post

View all