Login

हट्ट पोसणार नाही-1

मराठी स्टोरी
"सुनबाई जा आणि कपडे बदलून ये, हे असे कपडे चालणार नाहीत.."

कुणीतरी कानात गरम वाफ फुकावी तसं हे वाक्य सारिकाला चांगलंच झोंबलं. नवीनच लग्न झालं होतं, सारिका खूप आनंदात होती. तिच्या आवडत्या मुलासोबत तिचं लग्न झालेलं. आपल्याला आवडणाऱ्या मुलासोबतच आपलं लग्न व्हावं हे सुख फार कमी स्त्रियांच्या पदरात पडतं. सारिका स्वतःला नशीबवान समजत होती.

आता आयुष्य सुखात जाणार, खऱ्या अर्थाने आनंदी आयुष्याला सुरवात होणार याची स्वप्न बघत असतानाच सासूबाईंनी मध्ये खडा टाकला.

एकदा पूर्ण कुटुंब फिरायला म्हणून शहरातल्या जवळच्याच एका बागेत जाणार होते. तिथे मोठ्या माणसांसाठी सुद्धा खेळण्याची सुविधा होती. अश्या ठिकाणी सोयीस्कर म्हणून सारिकाने जीन्स आणि गुडघ्यापर्यंत असा एक टॉप घातलेला.

"आजूबाजूला लोकं राहतात, माझी इज्जत आहे कॉलनीत..हे असले कपडे घालत जाऊ नकोस.."

सारिकाने तिच्या नवऱ्याकडे, अक्षयकडे पाहिलं. तो काही बोलत नव्हता. एक तर मोठ्या मुश्किलीने त्याने या लग्नासाठी घरात मान्यता मिळवली होती. त्यात आणखी बायकोची बाजू घेतली तर मोठा वाद व्हायचा हे तो जाणून होता.

अक्षयची ही हतबलता सारिकाच्या लक्षात आली. तिने मनावर दगड ठेऊन ऐकून घेतलं आणि कपडे बदलून आली. सगळेजण फिरायला गेले पण सारिकाचं मन काही लागत नव्हतं. मनात सतत सकाळचे विचार सुरू होते.

सारिकाने तेव्हापासून ठरवलं, जाऊद्या सासूबाईंना नाही आवडत ना असे कपडे, नको तर नको! सारिकाने स्वतःच्या आवडीला आवर घातला.

दिवाळी आली. दिवाळीची खरेदी म्हणून सर्वजण दुकानात गेले.

"आई ही साडी मला आवडली आहे, ही घेते मी"

सारिकाने तिच्या आवडीची नवीन फॅशनमधली साडी पसंत केली होती. सासूबाईंनी ते बघताच नाक मुरडलं..

"किती जुनाट रंग आहे..ही बघ ही घे.."

सासूबाईंनी एक भडक निळ्या हिरव्या रंगाची साडी तिच्या पुढ्यात केली. ती साडी बघताच सारिकाला मळमळू लागलं, कारण रंगच इतका भडक होता की विचारूच नका..