कॅटेगरी : गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय : चला हसुया आणि हसवूया
हास्य
हास्य म्हटलं की डोळ्यांसमोर एक निखळ हसणारा चेहरा येतो. लहान मुलांचं निरागस हसू असो किंवा मग एखाद्याचं खळखळून हसणं, सारं काही विसरून त्या हसण्यात रमावं वाटतं.
हास्याचे प्रकार नावाचा एक धडा संस्कृत विषयासाठी होता. तेव्हा शिकताना फार गंमत वाटली होती. हास्याच्या विविध प्रकारांंचं केलेलं वर्णन मजेशीरच होतं. ते कृत्रिम हास्य तेव्हा जरी गमतीशीर वाटलं असेल तरी आता मात्र खऱ्या हास्याची खरी किंमत जाणवू लागली आहे. वाढत्या वयाबरोबर खरा चेहरा, त्यावरचे हावभाव आणि चेहऱ्यावर चढवलेले मुखवटे यांतील फरक आपसूकच अधोरेखित व्हायला लागतो.
हसणं हसणं म्हणताना कधीतरी फसणं ही होतं ना!
लहानपणी विदूषकाबद्दल फार कुतूहल वाटायचं. जगाला हसवणारा हा जीव खऱ्या आयुष्यात मात्र मनात किती कायकाय साठवून जगत असावा, याची जाणीव आता कुठे व्हायला लागली. हास्याची ती भलीमोठी लकेर चेहऱ्यावर घेऊन मिरवणारा तो, बरेचदा त्या मुखवट्यामागे किती अश्रूंना वाट मोकळी करून देत असावा याची कल्पनाही नको वाटते. पण तरीही हा विदूषक, इतरांना हसवणं मात्र सोडत नाही. खरंतर विचार करायला लावणारी बाब आहे. जिथे अगदी जवळच्या व्यक्तीला दुखावल्यानंतरही एखाद्याला काही वाटत नाही, तिथे हे विदूषक मात्र हास्याच्या फवाऱ्यांमध्ये प्रत्येकाला मनमुराद भिजवून जातात.
हसण्याने आयुष्य वाढतं असं म्हणतात. पण नैसर्गिकतेची कमी म्हणावी की काय, आज हसण्यासाठी 'लाफ्टर क्लब' चं सदस्य व्हायची वेळ येते. शेवटी हसणं महत्त्वाचं! हसण्यासाठी निमित्त शोधत बसण्यापेक्षा, त्या त्या क्षणांना मनमुरादपणे जगलं तर कदाचित आयुष्य आपसूकच वाढेल.
हास्याचा मुखवटा घालून फिरणं काय कामाचं, जर मन हसणं विसरलं असेल!
-©® कामिनी खाने.