हास्य -एक आंतरिक ऊर्जा

हास्य-एक आंतरिक ऊर्जा

   विषय - "चला हसुया अन हसवूया"

            चला हसुया अन हसवूया...

            हसणं आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे...

            ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी...

            हा मार्ग स्वस्त आणि मस्त आहे.

हास्याची कारंजी ही एक आंतरिक ऊर्जा आहे. ज्यामुळे शारीरिक एनर्जी तर वाढतेच पण मनाचे स्वास्थ्य व मेंदूची कार्यक्षमता ही वाढते. मोकळेपणाने हसल्याने धमण्या फुलतात. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण गतिमान होते, शरीरातील अँटीबॉडीजही मजबूत होतात. खरंतर ताण विसरायला खळखळून हसणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी स्वतंत्र वेळही काढावा लागत नाही.


अलीकडे हास्य क्लब लोकप्रिय होत आहेत. कां? तर आपण सहज, नैसर्गिक हसणंच विसरलो आहोत. हास्य ही एक निसर्ग दत्त व प्राकृतिक देणगी आहे. मग ते हास्य इतकं महाग कां झालं आहे? इतक्या ताणतणावाखाली माणसं वावरत आहेत, की हसणं जणू त्यांना विसरावं लागत आहे. काम आणि काम व त्या कामाचा प्रचंड ताण यामुळे त्यांना हसण्यासाठी वेळ मिळत नाही कां? प्रतिष्ठा, प्रसिद्धी, सत्ता, संपत्ती यात गुरफटून गेलेल्या लोकांना हसणं हे ऑड तर वाटत नाही नां? हसणं हे तर नैसर्गिक, उत्स्फूर्त जणू एक वरदानच.


ऑफिस मधून आलेल्या नवऱ्याचे पत्नीने दारातच हसून स्वागत केले तर त्या व्यक्तीची ऑफिस मधील कामाची थकावट, ताण कुठल्या कुठे निघून जातो. नवऱ्यानं हसत केलेलं कौतुक बायकोच्या अंगावर मुठभर मांस वाढविणारे व मनाचा मोर पिसारा फुलविणारे ठरते. म्हणजेच हास्य समाधानाचे प्रतीक, आनंदाचे प्रतिबिंब. म्हणूनच चला हसुया अन हसवूया.


हसणं स्वतःसाठी तर लाभदायी आहेच पण इतरांनाही तशा मनस्थितीकडे नेणारे आहे. कामाचा कंटाळा, उदासीनता अशी मनस्थिती सुधारण्यासाठी मित्र-मैत्रिणीशी केलेल्या हलक्याफुलक्या गप्पा, विनोदी साहित्य, विनोदी मालिका यात रमलं पाहिजे. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक म्हणजे हसतमुखपणा. एकमेकांशी मैत्री जोडणं, ती वाढविणं यासाठी हास्य उपयुक्त ठरते.


हसण्यापेक्षा सुंदर काहीही नाही. जेव्हा आपण हसतो तेव्हा खऱ्या अर्थाने जगतो. "हास्य आणि स्मित ही अशी द्वारे आहेत की त्यातून अनेक चांगल्या गोष्टी माणसात प्रवेश करू शकतात." तेव्हा हसत रहा. आपण हसलो तर घर हसेल, मुलं हसतील. सभोवतालचे ही त्यात सामील होतील. आसमंतच नव्हे तर सर्व जग हसरं वाटेल.


विशेषतः स्त्रियांसाठी हास्य हे टॉनिक ऊर्जा वाढविणारे, जगणं उत्साहित व सुसह्य करणारे आहे. खरंतर मॅनर्स, एटीकेट्सवाले अगदीच स्मित हास्य करताना दिसतात. जणू काही नाईलाजाने. कदाचित अधिकाराची झुल, सत्तेची नशा, प्रतिष्ठेची धुंदी त्यांना खळखळून हसण्यापासून वंचित ठेवत असावी.


खरंतर तारुण्याचे निदर्शक हास्य. प्रौढ पणात हसणं आरोग्यासाठी, मनासाठी अत्यंत गुणकारी आहे. उतार वयात जगणं सुखकारक व समाधानी व्हावं म्हणून प्रत्येक दिवसाचं हास्यातून स्वागत निश्चितच लाभकारी आहे. म्हणूनच हसुया आणि हसवूया. जीवनाच्या अडथळ्याच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी, स्पीड ब्रेकर व रेड सिग्नल पार करण्यासाठी हास्य निश्चितच उपयुक्त आहे.

         नका ठेऊ आंबट तोंड आणि लांबट चेहरा...

          हसा आणि इतरांना हसवा की थोडं...

          का चेहऱ्यावर दाखवता जणू...

          साऱ्या जगाचं तुम्हालाचं पडलं कोडं.


धन्यवाद.

सौ.रेखा देशमुख