मुलं ही देवाघरची फुलं असं म्हणतात. लहान मुलं निरागस असतात.. त्यांना हेवेदावे व रागलोभ नसतात अन् म्हणूनच ते सर्वांना प्रिय होतात. आमच्याकडे तीन लहान हसरी पिल्लं होती.. होती म्हणजे तेव्हा लहान होती.. पण आता मोठी झालीत.. ही पिल्लं जेव्हा आजोळी आलीत तेव्हा काहीतरी गमती जमती घडवून गेलीत.. त्यापैकी ह्या काही..
*****
माझा पहिला भाचा .. सुयोग त्याचं नाव.. तीनचार वर्षांचा असताना त्याच्या आईबरोबर आजोळी आला की आईला विसरून जाई. तिथे त्याला सगळं काही मावशीच्या हातून लागत असे..
जेवू घालायला मावशी.. आंघोळ घालायला मावशी .. इतकंच काय पण शीशूसाठी पण मावशीच! त्याला पोळ्या मावशीच्या हातच्या आवडत अन् भाजी पण..
मावशी हरखून गेली.. भाच्याला आपलं इतकं कौतुक.. बिचारी नेटानं त्याचं सारं काही करी.. न कंटाळता ..
त्याच्या आईला मात्र जरा वाईट वाटे.. एक दिवस तिनं त्याला विचारलंच.. "घरी मीच करते ना रे तुझं..! मग इथे मी अजिबात नको असते तुला ?"
त्यावर तिचे पिल्लुमोशाय उद्गारले.. "तुला घरी खूप काम असतं ना ! इथे सगळं मावशी कडून करून घेतो.. तेवढाच तुला आराम !"
काय म्हणतात ते ?.. आई रॉकिंग अन् मावशी शॉकिंग..
*******
आमची एकुलती एक परी.. स्वर्णिमा.. ती ही एकदा पाहुणी म्हणून तिच्या आईबरोबर आजोळी आलेली ..
स्वर्णिमाच्या आजीला निरनिराळे पदार्थ करण्याची भरपूर हौस.. हौस एक परी ठीक आहे.. पण तिला स्वयंपाकात प्रयोग करण्याची भलतीच खोड..!
त्या दिवशी तिनं इन्स्टंट पुरण करण्याचा घाट घातला.. पुरण तयार केलं.. स्वतःचीच रेसिपि.. त्यामुळे उत्सुकता अपार.. तिनं पाच सहा वर्षांच्या स्वर्णिमाला जेवायला बसवलं.. पुरणपोळी वाढली अन् उत्सुकतेने प्रतिक्रियेची वाट बघत बसली.
स्वर्णिमा खाली मान घालून हळूहळू जेवतेय अन् तिच्या आजीची उत्सुकता शिगेला पोहोचतेय..
स्वर्णिमा काहीच बोलत नाही हे बघून तिचा आजीनंच विचारलं.. "कसं झालंय पुरण?"
स्वर्णिमाचं एक नाही अन् दोन नाही.. ती अजुनही जेवतेय.. खाली मान घालून..
तिची आजी पुन्हा पुन्हा विचारतेय.. "कसं झालं पुरण?"
शेवटी एकदा तिनं मौनभंग केला.. "चांगलं आहे..."
आजीचा जीव भांड्यात पडणार एव्हढ्यात तिनं आपलं वाक्य पूर्ण केलं, "चांगलं आहे .. पण डाएटवाल्यांसाठी.. एक घास खाल्ला की दिवसभर जेवणाची इच्छाच मरून जाईल..!"
स्वर्णिमाच्या आजीच्या स्वयंपाक प्रयोगांबाबतीत बोललं गेलेलं हे पहिलं अन् शेवटचं खरं ..!
******
आमचं शेंडेफळ सोहम.. सगळ्यांचा लाडका अन् म्हणून तेवढाच हट्टी. आजोळी आला की त्याला सगळं काही आजीच्या हातून करून हवं असे..
आधीच आजीला नातवंडांसाठी निरनिराळे पदार्थ करण्याची हौस.. त्यात सोहम त्याच्या फर्माईशींनी आजीला भंडावून सोडी.
ह्यावेळी आजीचं वय झालेलं अन् शरीरानंही जरा थकलेली.. पण हे चार वर्षांच्या सोहमला कुठलं कळतंय.. कितीही समजावून सांगितलं तरी ऐकायचा नाही.. दुसऱ्याच्या हातून काही करून घ्यायचा नाही.. त्याला आजी म्हणजे आजीच लागायची .. सगळं काही करायला..
एक दिवस आजी वैतागली.. चिडली अन् म्हणालीच.. "खूप दमते रे मी ! माझ्याच्याने नाही होत आता.. एक दिवस फटकन मरून जाईन मी !"
त्यावर लगेच सोहमनी सांगितलं.. " मग काही नाही होत.. आजोबा दुसरी आजी आणतील ..!"
आता ह्यावर काय प्रतिक्रिया झाली असेल ? तुम्हीच सांगा बरं ..!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा