हसरे दुःख

Trust your happiness ♥️ Trust your love


कार्तिक एक विशीतला तरुण. अतिशय लोभस शरीरयष्टी, देखणं रूप, हजरजबाबी, कोणालाही मदत हवी असेल तर काळ वेळ न पाहता लगेच समोर हजर. समाजसेवेचं व्यसनच म्हणावं लागेल इतकं स्वतःला झोकुन देऊन काम करणारा. समोरच्याला आपल्या वागण्या-बोलण्याचा त्रास होऊ नये; सतत ह्या विचारात राहणारा. आयुष्यातला बराचसा वेळ कामात गुंतवून ठेवणारा. हुशार,धाडसी पण काहीसा अबोल. कधीच स्वतःमध्ये न रमणारा. सध्या अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला होता. महाविद्यालात काही उत्साही मुलांना घेऊन त्यांनी एक संघ स्थापन केला होता ज्याच्या अंतर्गत ते समाजकार्य पुढे नेत होते. कार्तिकचा स्वभाव अतिशय मनमेळावू, त्यामुळे सगळ्यांचा आवडता आणि जबाबदार मुलगा म्हणून त्याने लवकरच महाविद्यालयात आपलं स्थान निर्माण केलं. गेली तीन वर्षे तो हे काम पाहत होता. ही मुले शिवजन्मोत्स्वाचा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करायची. त्यासाठी भव्य पालखी सोहळा, मोठी मिरवणूक, ढोल ताशे आणि मग सांस्कृतिक कार्यक्रम. कार्यक्रमासाठी रायगडावरुन ज्योत आणली जायची. संपूर्ण वातावरण उत्साहाने रंगून जायचं. राधा- कार्तिक सोबतच तिसऱ्या वर्षाला पण दुसऱ्या शाखेत होती. राधाचं कार्तिक वर जीवापाड प्रेम होतं, आणि कार्तिकचं देखील. कार्तिक बराच आत्मकेंद्री होता तर राधा सगळं बोलून मोकळी व्हायची. राधाच्या हट्टापायी कार्तिक तिच्याशी मनातल्या बऱ्याच गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करायचा पण सगळं निष्फळ. त्याला व्यक्त होण्यापेक्षा हास्याचा मुखवटा घेऊन फिरण्यात एक वेगळाच आनंद मिळायचा आणि म्हणूनच राधा त्याला बऱ्याचदा "विदूषक" अशी हाक मारायची.
       कार्तिकने राधाला त्याचा संपूर्ण भूतकाळ सांगितला होता. एकही अशी गोष्ट नव्हती जी राधाला माहीत नव्हती. ह्या गोष्टीमुळे राधा कार्तिकच्या आणखी प्रेमात पडली होती. सगळ्यांप्रमाणे त्याचा भूतकाळ देखील मजा, मस्ती, हट्ट, रुसवे, फुगवे, मित्र-मैत्रीणी यांच्या आंबट, तिखट गोड भेळेसारखा होता. त्यातली एक जिवाला चटका लावून गेलेली व्यक्ति म्हणजे मीरा. मीरा कार्तिकच्या आयुष्यातलं असं वळण होतं ज्याने ह्या उमलत्या फूलाचा बहर खूंटला होता. बोलका, हसरा कार्तिक काहीसा अबोल राहू लागला ते मीराच्या अचानक निघून जाण्याने. तशी मीरा शरीराने त्याच्या आयुष्यात कधीच नव्हती पण तरीही तिचं न दिसणं कार्तिकला सहन झालं नाही आणि तो असा झाला. तशी राधाला कार्तिकने सुरुवातीलाच मीराबद्दल सांगितलं होतं आणि आजही त्याच्या शांत होण्याला तो मीराला दोष देत नव्हता मात्र त्याने राधाला स्पष्ट सांगितलं होतं तुझी जागा माझ्या मनात कायम वेगळी राहील पण तरीही मीराची जागा मी कोणालाच देऊ शकत नाही. ती कायम राहील माझ्या मनात त्याच ठिकाणी. तिच्या नावाचं पान त्याच्या मनात कुठेतरी आनंदाने वसलं होतं.
     मीरा- अतिशय देखणी, पाणीदार सुंदर डोळे, नेहमी डोळ्यांत काजळ, लांबसडक केस, अगदी बघत रहावी अशी. कार्तिकने १०वी नंतर जवळच्या एका महाविद्यालयात ११ वी विज्ञान या शाखेत प्रवेश घेतला. कार्तिक खूप बोलका, सगळं समोर बोलून टाकणारा. समोरच्याला आपल्या वागण्या बोलण्याबद्दल कधीच स्पष्टीकरण न देणारा, मित्रांच्या घोळक्यातला राजकुमार, आईवडिलांचा लाडका. कार्तिक नेहमी आनंदी रहायचा सोबतच आसपासचं वातावरण देखील अगदी मधाळ करून टाकायचा. तास संपले की मुलं मुली तिथेच वर्गात डबे खायची. गप्पा, टप्पा, मजा, मस्ती, धमाल करत दुपार करायची आणि मग सायकल वरुन घरी असा रोजचा दिनक्रम. एकदिवस असाच तास संपवून तिथेच बाकावर डबे खायला बसले. ३ डबे अन ८ जण सगळे अगदी तूटून पडले त्या डब्यांवर. नकळत कार्तिकची नजर खिडकीबाहेर गेली. दोन मुली चालल्या होत्या. त्यातल्या एका चेहऱ्यावर त्याची नजर खिळून राहीली. त्या मुली चालत चालत तिथून कधीच निघून गेल्या आणि कार्तिक तंद्रित. तसं आजपर्यंत कोणत्याच चेहऱ्याबद्दल त्याला असं काहीच वाटलं नव्हतं, आणि आज अचानक ह्या विचारात तो कितीतरी वेळ तसाच शांत त्या खिडकीकडे पाहत होते. डबे संपले तसे सगळे घरी जायला निघाले. कार्तिक देखील निघाला पण त्याचे डोळे फक्त तो चेहरा शोधत होते. आता कार्तिकच्या दिनक्रमात ह्या गोष्टीची भर पडली होती. तसं त्याच्या मित्रांना समजायला वेळ लागलाच नाही. ती मुलगी दिसली की मित्र त्याला चिडवायला लागले होते, आणि तो गालतल्या गालात एक स्मित करून शांत रहायचा. आजकाल रोज नजराजर होऊ लागली. ती देखील पाहतेय हा आनंद कार्तिकला स्वर्गसुखाचा अनुभव द्यायचा. हळूहळू तिच्याविषयी माहिती समजली त्यानुसार ती एका प्रतिष्ठित घरण्यातील एकुलती एक मुलगी होती. नाव मीरा, अगदी मीरेसारखी शांत, निर्मळ आणि सुंदर. वाणिज्य शाखेत शिकत होती. बघता बघता दीड वर्ष सरलं. ह्या दीड वर्षात दोघेही एकमेकांशी एका शब्दानेही बोलले नव्हते. मात्र नजरेतलं प्रेम लपवू ही शकले नाहीत. शेवटी मित्रांच्या सहकार्याने व मीरावरील प्रेमाने कार्तिक एकदिवस तिच्याशी बोलायला गेला. सगळं सगळं बोलून टाकलं त्याने व आयुष्यभर साथ देशील का? अशी मागणी घातली. मीरा काहीच न बोलता एक शांत हास्य चेहऱ्यावर ठेऊन निघुन गेली. कार्तिक हिरमुसला, उद्या तिला स्पष्टपणे विचारु ह्या विचारात त्याने कशीबशी रात्र काढली. सकाळी उठून महाविद्यालयात आल्यापासुन तो केवळ  मीराला शोधत होता. असेच कित्येक दिवस निघुन गेले पण मीरा आलीच नाही तिच्या मैत्रीणींना देखील काहीच माहीत नव्हतं. परीक्षेचा दिवस उजाडला अभ्यास तसा जेमतेम झाला होता कार्तिकला मीरा येईल अशी आशा होती आणि ती खरी देखील झाली. मीरा आली होती पण ती न पाहता निघून गेली एका गाडीत बसून. मीरा दुरावल्याबद्दल सगळा दोष कार्तिकने स्वतःवर घेतला अन यापुढे काहीच व्यक्त न करण्याचा पण केला. राधाला ह्या सगळ्या गोष्टी मान्य होत्या पण तरीही मीराचं असं वागणं काही तिच्या पचनी पडलं नव्हतं.
          कार्तिकने राधाची ओळख त्याच्या बऱ्याच जुन्या मित्र, मैत्रीणींशी करून दिली होती. एकदिवस तिने न राहवून समीरला फोन केला. समीर- कार्तिकचा अगदी जवळचा मित्र. प्रत्येक क्षणी सोबत अशी ही राम-लखनची जोडी. कधीकधी राधा देखील मस्करीत म्हणायची माझ्या पेक्षा जास्त तुझी आणि समीरचीच जोडी शोभते. त्या फोन नंतर राधा आणि समीर भेटले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर राधाने मुख्य विषयाला हात घातला. कार्तिकचं मीरावरील प्रेम आणि राधाच्या खरेपणापुढे समीर खिन्न झाला. तो राधाला मीराचा शोध घेण्यासाठी मदत करण्यासाठी तयार झाला. त्याने मिळेल तशी माहिती काढून राधाला फोन केला. त्या महितीनुसार मीरा १०-१५ किमी अंतरावर रहायला होती आणि हे देखील समजलं की पुढच्या दोन दिवसांत तिचा साखरपुडा होता. आता वेळ घालवून उपयोग नव्हता. इतका जीवापाड प्रेम करणारा कार्तिक गमावणं यासाठी राधाला खूप जड जाणार होतं पण त्यापेक्षा ही जास्त कार्तिक मीरावर प्रेम करत होता त्याला त्याचं प्रेम मिळालंच पाहीजे ही गोष्ट राधाने पूर्णपणे मनावर बिंबवली होती. राधा लागलीच त्या पत्त्यावर गेली. तिथे एक वॉचमन काका होते ज्यानी राधाला अडवलं. आला दुष्काळात तेरावा महिना. पण त्यांना राधाने "मीराला भेटायला आले आहे" असं सांगताच त्यांनी तिला जाण्याची परवानगी दिली कारण मीराच्या बऱ्याच मैत्रीणी तिला भेटायला यायच्या आणि राधा ही त्याच ढंगात मीराचं नाव घेऊन आत आली होती. मोठा प्रश्न हा होता की, राधाने मीराला आजवर एकदाही पाहिलं नव्हतं त्यामुळे तिला ओळखणं काहीसं जड जाणार होतं. इतक्यात एक काका समोरून येताना दिसले त्यांना राधा काही विचारेल इतक्यात त्यांनीच मीराला हाक मारून " मीराताई तुमच्या मैत्रीण आल्यात बघा" असं सांगितलं. आणि त्यांनी खूण करून मीराची खोली दाखवली. राधा मीरापर्यंत पोहोचली पण मीरा एका अनोळखी मुलीला पाहून जराशी विचारात पडली. "आपण कोण? आणि इथे काय करताय?" मीराने असा प्रश्न केला. राधाने तिची ओळख कार्तिकची मैत्रीण अशी करून दिली व आपल्याला त्याच्या भुतकाळाविषयी असलेली सगळी माहीती सांगितली. हे ऐकून मीरा काहीशी शांत झाली. तिला खूप बोलायचं होतं हे तिच्या नजरेतून स्पष्ट दिसत होतं. तरीही ती शांत होती काहीच न बोलता ती आरश्यातल्या स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. फक्त एवढंच बोलली "माझ्यासाठी माझे आईवडील व त्यांची प्रतिष्ठा यापेक्षा मोठं काहीही नाही आणि कधीच नसेल" म्हणजे फक्त आईवडिलांना काय वाटेल ह्या एका विचाराखातर मीरा आपलं आयुष्य एका अनोळखी माणसासोबत व्यथित करायला तयार झाली होती तर. राधा काही क्षण अवाक झाली व पुढल्याच क्षणी " मला तुझ्या वडिलांना भेटायचं आहे.. कुठे आहेत ते?" असं म्हणाली. तेवढ्यात तो मगाशी खाली भेटलेला माणूस ज्याने राधाला मीराच्या खोलीची वाट दाखवली होती तो आत आला. मीराच्या हावभावांवरून ते तिचे वडील असावेत अशी शंका राधाच्या मनात आली पण ती शांत बसली. तेवढ्यात तो माणूस म्हणाला " झाल्या का मैत्रीणीच्या गप्पा.अहो ताई सांगा जरा आमच्या मीरेला. कशी कोमेजून गेली बघा. मागची ३ वर्ष ही पोरगी ना कुणात मिसळती, ना काही बोलती, ना कोणती तक्रार काहीच नाही. नुसती शांत शांत राहती बघा" असं म्हणून त्यांनी त्यांचे डोळे आपल्या हातानेच पुसले. बापाची माया अगदी स्पष्ट दिसत होती. राधाला वाटलं हीच ती वेळ.
राधा- "काका, या जगात तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करता?"
काका- "आमच्या ह्या मीरेवर" काका क्षणाचा ही विलंब न लावता बोलले.  "तिच्याशिवाय कोण आहे आम्हाला. एकच तर पोरगी आहे तिच्याच साठी सगळं".
राधा- "मग काका तुम्ही तिला विचारलंत तिला काय हवं आहे हे".
काका- "काही बोलतंच नाही ओ ती. मी इचारुन पाहिलं हिच्या आईनं इचारलं. काहीच सांगत नाही ही कसं कळणार वो आम्हाला. "
      राधाने मीराच्या बाबांना मीरासमोर सगळी हकीकत सांगितली शिवाय कार्तिक देखील मीराला विसरु शकलेला नाही हे देखील पटवून दिलं. हे सगळं ऐकून काका निःशब्द झाले. इतका मोकळेपणा असूनही आपली पोर आपल्याला मान खाली घालायला लागू नये यासाठी इतकी शांत राहिली की आपलं आयुष्य देखील झोकुन दिलं तिने हे सगळं त्यांना केवळ अनपेक्षित होतं. सगळं ऐकून झाल्यावर मीराच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रु तिच्या खरेपणाची साक्ष देत होता. त्यानंतर कार्तिकबद्दलच्या महत्वाच्या गोष्टी सांगून राधा घरी निघाली. जाताना काकांच्या चेहऱ्यावरील समाधान त्यांचं हलकं झालेलं मन सर्वकाही अगदी समोर राधा अनुभवत होती. काकांनी दुसऱ्या दिवशी कार्तिकला मागणी घालायला जात असल्याची गोष्ट सांगितली तेव्हा राधाच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं पण मीराच्या डोळ्यातील आनंद तिच्या चेहऱ्यावर खूप जास्त शोभून दिसत होता. राधा तिथून काही वेळात निघून गेली.
     दुसऱ्या दिवशी रविवार. सकाळी ११च्या दरम्यान कार्तिकच्या घराच्या दारावरची बेल वाजली. सुदैवाने कार्तिकनेच दार उघडलं होतं. मीराच्या वडिलांना तिच्या आणि अन्य काही मोजकया माणसांसमवेत उभा पाहून कार्तिक अवाक झाला. त्याला काय बोलावं काहीच कळेना. चाचपडत तो त्यांना "या ना.आत या" असं म्हणाला. त्याच्या बोलण्यात एकप्रकारची भीती होती. त्याने लागलीच आई बाबांना बाहेर बोलावलं. औपचारिक बोलणं व ओळख वगैरे झाल्यावर काकांनी मुद्दयाला हात घातला व कार्तिकला आपला जावई म्हणून पाहण्याची इच्छा आहे हे देखील सांगितलं. हे ऐकून कार्तिकच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या मनात फक्त राधाचा विचार येऊ लागला. ती मुलगी आपल्यावर जीवापाड प्रेम करते ही एकच गोष्ट त्याच्या डोक्यात होती.तो सतत तिला फोन लावायचा प्रयत्न करत होता पण फोन बंद आहे असं सारखं ऐकू येत होतं. आता कार्तिकला राधाची काळजी वाटू लागली. तो काही बोलणार इटक्यात कार्तिकचे वडील म्हणाले "पण अजून कार्तिक शिकतोय, काही कमवत नाही ही जबाबदारी इतक्यात नको."
मीराचे वडील-" चालतंय की. म्हणजे मी फक्त हे इचारायला आलो व्हतो की आमच्या पोरीला तुमच्या घरची सुन बनवाल का? आत्ताच नव्ह. हुद्या की समदं. मग करू."
      त्यांनंतर जुजबी बोलणं झालं. मीरामध्ये न आवडण्यासारखं असं काहीच नव्हतं त्यामुळे प्रथमदर्शनी सगळं  सरळ सोप्प होतं. बोलता बोलता मीराच्या वडिलांनी राधाचं नाव घेतलं "काल ती पोर, राधा आली नसती तर ह्या पोरीनी मला कधीच काहीच सांगितलं नसतं बघा.ती व्हती म्हणून मला कळलं तरी नायतर ही दुसऱ्या मुलाशी बी लगिन करायला तयार व्हति". राधाचं नाव ऐकताच कार्तिकला आणखी एक धक्का बसला. आता त्याला राधाचा फोन न लागण्याचं कारण समजलं होतं. त्याचं पाहिलं प्रेम समोर असूनही कार्तिकला राधाची ओढ जास्त होती. आपण तिला काहीच बोललो नसतो तर कदाचित ती आपल्या सोबत असती. तो लागलीच राधाच्या घराच्या दिशेने निघाला. गाडीचा वेग आणि त्याच्या हॄदयाची धडधड खूप वाढली होती. तो पोहोचला तेव्हा घरात राधाची आई होती. कार्तिकला राधाच्या घरी सगळे ओळखत होते त्यामुळे त्यांनी कार्तिकला आत यायला सांगितलं पाणी दिलं पण कार्तिकला राधा हवी होती. कार्तिकने राधाबद्दल विचारताच तिची आई म्हणाली "अरे..! ती तर आज सकाळीच दिल्लीला गेली नं, तरी मी तिला विचारलं कार्तिक नाही का येणार सोडायला? तर म्हणाली अगं त्याला आज काम आहे तो आला तर त्याला ही चिठ्ठी दे" आणि त्यांनी तिच्या हातात एक चिठ्ठी दिली. कार्तिकने घाईघाईने ती चिठ्ठी उघडली तर त्यात एवढंच लिहिलं होतं.
   " आज मी खूप खुश आहे कारण आज एका राधाने आपला कृष्ण त्याच्या मीरेला दिला". खूप खुश रहा दोघेही. राधाच्या डोळ्यातलं तरळणारं हसरं दुःख मात्र त्याच्या हृदयात एक अढळ जागा निर्माण करून गेलं.

#♥️

©श्वेता कुलकर्णी♥️