हसण्यासाठी जन्म आपुला !

About Laughter


हसण्यासाठी जन्म आपुला !

"आज भेटू या संध्याकाळी 5 वाजता, माझ्या घरी."

असा मेसेज माधुरीने मैत्रीणींच्या ग्रुपवर टाकला आणि तिच्या मेसेजला ओके म्हणून सर्वांचे पटकन रिप्लायही आले.

माधुरी व तिच्या मैत्रीणींचे भेटणे म्हणजे हास्यांची जणू उधळणचं!

हसण्यात,हसवण्यात किती वेळ निघून जातो, हे ही त्यांना कळत नसते. भेटण्यासाठी त्यांना काही निमित्तचं हवं असतं असं नाही. मनात आले की लगेच भेटायचं,मनसोक्त हसायचं,गप्पागोष्टी करत आयुष्य आनंदात जगायचं!

एकाच इमारतीत राहणाऱ्या,
माधुरी व तिच्या सहा मैत्रीणी अशा सात मैत्रीणींचा \"हास्यांगण\" ग्रुप. इमारतीत राहण्यास येण्यापूर्वी एकमेकींनाना ओळखतही नव्हत्या. ना नात्यातल्या ना परिचयाच्या. एकमेकांसाठी होत्या फक्त अनोळखी!

इमारतीत राहयला आल्यानंतर, वेगवेगळ्या निमित्ताने बोलणे होत गेले ,भेटी होत गेल्या, एकमेकांचे विचार, भावना एकमेकांत गुंतत गेल्या आणि अनोळखी असणाऱ्या ह्या सर्व मैत्रीच्या नात्यात गुंफत गेल्या. प्रत्येकीला जोडून ठेवणारे मैत्रीप्रेम तर होतेचं पण अजून एक गोष्ट होती ती म्हणजे.. प्रत्येकीचं निखळ हास्य!

सर्व चाळीशीच्या जवळपास. पण एकत्र भेटल्या की, वय विसरून लहानमुलांप्रमाणेच निरागस, खळखळून हसणाऱ्या!
सर्व उच्चशिक्षित पण मुलांची, संसाराची जबाबदारी म्हणून नोकरी, व्यवसाय न करता आनंदाने गृहीणी म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या!आणि आपल्या शिक्षणाचा,ज्ञानाचा आपल्या संसारात,मुलांच्या संगोपणात उपयोग करणाऱ्या!

रूप,रंग,गुण,स्वभाव यातं प्रत्येकीच वेगळपण !
तरीही एकमेकांना समजून घेण्याची जाणीव प्रत्येकीत होती.

हसण्यासाठी त्यांना विनोद ऐकण्याची किंवा कोणी विनोद सांगितला पाहिजे ,असे नाही. छोट्या-छोट्या गोष्टीतून, शब्दांतून विनोद निर्माण झाला तरी त्या खळखळून हसतात. हसताहसता डोळ्यातून पाणी येणे, जबडे व गाल दुखणे,पोटात दुखू लागणे हे नेहमीचेचं!

प्रत्येकीच्या आयुष्यात प्रॉब्लेम,टेंशन असले तरी हसण्यात सर्व विसरून जात. गप्पागप्पांत,हसण्या व हसवण्यात त्यांना आपल्या अनेक समस्यांचे उत्तरही मिळून जाते . त्या सर्व जेव्हा हसण्याचा आनंद घेत असतात, तेव्हा त्यांना हेचं वाटत असते..\"हसण्यासाठी जन्म आपुला!\"

त्यांची ही मैत्री होण्यापूर्वीचे आयुष्य व आताचे आयुष्य,यात बराच व चांगला बदल होत गेला.
मैत्रींमुळे,हसण्यामुळे
त्यांच्यात तर बदल झालाच पण घरातील वातावरणही
बदलून गेले. गृहलक्ष्मी हसरी व प्रसन्न राहू लागल्याने, घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आनंदी राहू लागले. कामांमुळे होणारी चिडचिड कमी झाली. टेंशन मुळे घरात तणावाचे वातावरण असायचे, आता हसून, बोलून वातावरण प्रसन्न होऊ लागले.
म्हणूनचं म्हणतात..

\" विनोदाचा शिडकावा ज्या घरात असतो,ते घर कायम टवटवीत व प्रसन्न असतं.\"

मैत्रीमुळे,हास्यामुळे या सातही जणींच्या आयुष्याबरोबर त्यांच्या घरातील ही उदासीनता, मरगळ जाऊन, त्यांच्या आयुष्यात उत्साह, चैतन्य आले होते.

इमारतीतील इतर लोकांनाही या मैत्रीणींची मैत्री, त्यांचे प्रसन्न जीवन आवडू लागले. त्यांच्या प्रसन्नतेचा हेवा वाटू लागला . व त्या लोकांचाही आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू लागला.

\"हसूया आणि हसवूया \" हा मंत्र या सातही मैत्रीणींसाठी जगण्याची संजीवनीच ठरला.


खरं आहे ना ..
कोमेजलेल्या, मुरझलेल्या फुलापेक्षा,
उमललेलं,टवटवीत फूल जसं मनाला प्रसन्न करतं तसचं दुःखी चेहऱ्यापेक्षा एखाद्या व्यक्तिचं हसणं हे मनाला भावून जातं,आनंद देवून जातं.

साचलेल्या डबक्यातील पाण्यापेक्षा, खळखळून वाहणारे धबधब्याचे पाणी जसे मन आकर्षित करते,तसेचं रडके, दुःखी,रागीट, मरगळलेले चेहरे व व्यक्तिमत्त्व कोणालाच आवडत नाही. हसरे,प्रसन्न चेहरे व व्यक्तिमत्त्व असणारे व्यक्ती स्वतः बरोबर इतरांच्याही आयुष्यात हास्य, प्रसन्नता फुलवतात.

विनोदबुद्धीने निरस असणारे आयुष्य प्रसन्न व खेळकर होऊ शकते.
नात्यातील ताणतणावाला हलकं करण्यासाठी एखादे खुसखुशीत विनोदी वाक्य प्रभावी ठरतं, वातावरण अगदी प्रसन्न होऊन जातं व नात्यातील दुरावा जाऊन नात्यांची वीणही घट्ट होऊन जाते.
विनोदबुद्धी असलेला व्यक्ती आशावादी असतो, एखाद्या घटनेकडे वेगळ्या नजरेने बघण्याची ताकदही त्यात असते.

मनमोकळं व खळखळून हसण्याने शरीरातील स्नायू रिलॅक्स होतात.
शरीराचा चांगला व्यायाम होतो,मेंदूला चालना मिळते.
हास्याचे हे फायदे लक्षात घेता, योगशास्त्रात \"हास्य योग\" शिकवला जातो.

आजच्या धकाधकीच्या जीवनात , वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त असलेल्या, जीवनात जेव्हा एखादा विनोद ऐकून हसू येते ...तेव्हा मन प्रसन्न होऊन जाते.
रडक्या सिरीयल्स बघण्यापेक्षा लोकांना हसवणूकीचे कार्यक्रम जास्त आवडू लागतात.


\"Laughter is the best medicine .\"

असे म्हणण्यामागे हाच उद्देश आहे की, हास्य हे सहज आणि फुकट उपलब्ध असते आणि स्वतः ही हसा ,इतरांना ही हसवा म्हणजे कोणत्याही प्रकारचे शारीरिक ,मानसिक आजार दूर होण्यास मदत होते.

एखादा रोगी जेव्हा डॉक्टरांचा प्रसन्न चेहरा पाहतो, तेव्हा तो अर्धा बरा होऊन जातो.
आपल्या हास्यामुळे कोणाचे आयुष्य चांगले होत असेल तर निश्चितच आपण पुण्याचे काम करीत असतो.

हसण्यामुळे शरीर, मन चांगले राहते. नाते टिकून राहते. जीवनात प्रसन्नता राहते मग नको त्या गोष्टींचे टेंशन घेवून दुःखी होऊन रडत राहण्यापेक्षा स्वतः ही हसूया आणि इतरांनाही हसवूया.


गुलजारांनी म्हटल्याप्रमाणे,


"गुजरी हुई जिंदगी को
कभी याद न कर,
तकदीर मे जो लिखा है
उसकी फर्याद न कर…
जो होगा वो होकर रहेगा,
तु कलकी फिकर मे
अपनी आज की हसी बर्बाद न कर…"



नलिनी बहाळकर