हास्य मानवाला मिळालेला दुर्मिळ अलंकार

ईरा शब्दातून समृद्धीकडे


हास्य मानवाला मिळालेला दुर्मिळ अलंकार

जीवनात हास्य अत्यंत महत्वाचे आहे.जीवन हे सुखदुःखाच्या अनेक धाग्यानी विणलेले आहे.ताणतणावातून जगताना गंभीर  समस्यांना सामोरे जावे लागते.अशावेळी मन हलके करणे गरजेचे असते ते काम हास्य करते.हास्याची निर्मिती छोट्या गोष्टीतून होत असते फक्त आपण त्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे.आपण रोजच्या जीवनात कधीच हास्य आणण्याचा प्रयत्न करत नाही.कौटुंबिक असे क्षण असतात की त्यात हास्याची लकेर संपूर्ण कुटुंबाला नवचेतना देते.घरात छोट्या संवादातून मार्मिक शब्दाने हास्याचे फवारे उडवता येतात पण सर्वांची मनाची निर्मळता असावी लागते तरच हास्याची निर्मिती होते.:

लहानमुलांच्या बरोबर खेळताना हास्य अगदी मनाला सुखावते.त्यांच्या प्रश्नोत्तरी मध्ये हास्याची किनार दडलेली असते.त्यांचे बोबडे बोल पोटभर हसायला लावतात त्यामुळे मुले मोठ्या माणसात रममाण होतात .देहभान विसरुन ती हसायला लागतात.त्यांच्या निरागस हास्यात जीवनाचा आनंंद ओसंडून वाहत असतो.मित्रमंडळी यांच्यात अनेक मजेशीर संवाद होतात.एकमेकांच्या सवयीवरुन केलेल्या शाब्दीक कोट्या यामुळे हास्याचे कारंजे उडतात.एरवी विविध कामात गर्क असणारी तरुणाई जेंव्हा आनंदाने हासण्याचा उपभोग घेते तेंव्हा त्यांंच्यातील उर्मटपणा केंव्हाच निघून गेलेला असतो.

कधी - कधी नकळत दुस-यांच्या बोलण्यातून हास्य निर्माण होते.पण निखळ हसवणारी व्यक्ती तितकीच मनाने निर्मळ असते.त्यांच्यात दुस-यांना हसवण्याची किमया अफलातून असते.सहज बोलण्यातून अशा व्यक्ती हसवतात आणि जिथं गांभिर्याने कळस गाठलेला असतो तिथं मनमोकळे वातावरण निर्मिती करतात.अशी माणसं समाजातील विविध घटकांत पसरलेली असतात त्यांना खरोखरच सन्मान दिला पाहिजे.

साहित्यक्षेत्रात अनेक दिग्गज लेखकांनी आपल्या लेखनातून हास्याने वाचकांना आनंद दिला आहे.प्र.के अत्रे , द.मा.मिरासदार , पु.ल.देशपांडे यांनी आपल्या अजरामर साहित्यातून हास्याची पेरणी केली.त्यांच्या प्रत्येक शब्दातून हास्य निर्मिती ठरलेली होती त्यामुळे हास्य हे मानवाला मिळालेली देणगी आहे म्हणून नेहमी हसत रहा असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

हसणे हे जीवन फुलवते.ते जीवनाला उर्जा देते त्याचे फायदे अनेक आहेत.हसण्यामुळे आरोग्य चांगले राहते.हसण्यामुळे स्नायूंना बळकटी येते.रक्तदाब व हार्ट अॕटॕक नियंत्रित करण्यासाठी हसणे अत्यंत गरजेचे आहे.हसणे मेंदूचे कार्य वेगवान करते.रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हसणे रामबाण औषध आहे.हसणे हार्मोंन्स नियंत्रित करण्यास उपयोगी आहे.हसणे वेदना कमी करते.हसणे हे उत्तम टॉनिक आहे.हसण्यामुळे तुम्हाला चांगले वाटते त्यामुळे तुम्ही नेहमी प्रसन्न राहता.

बदलत्या जीवशैलीत व धावपळीच्या युगात ताणतणाव घालवण्यासाठी हसणे फार मोलाचे कार्य करते.त्यासाठी जीवनात जर प्रसन्न आणि आनंदी राहायचे असेल तर नेहमी हसतमुख रहा.प्रत्येक क्षणाचा हसतमुखाने स्विकार करा आणि जीवन सुंदर बनवा.

©नामदेवपाटील