@हरवत चाललेला संवाद

लघुकथा
नीता, विवेक आणि त्यांचा पाच सहा वर्षाचा नीरज मुलगा आज बाहेर जाणार होते. त्यांच्या कुटुंबाचे गेट टुगेदर होते.

"आई , स्नेहमेळावा म्हणजे काय गं?"

स्नेहमेळावा म्हणजे गेट टुगेदर. म्हणजे आपले जेवढे जेवढे नातेवाईक आहेत ना. ते सगळे एका ठिकाणी जमतात आणि एकमेकांची नव्याने ओळख होते. शिवाय गप्पा मारतात. विविध खेळ खेळतात. परत आपापल्या घरी परत जातात आणि जातांना काही आठवणी सोबत घेऊन जातात.

"आई ,आपण तेवढ्या पुरतेच का बोलतो सगळ्यांशी. नाही तर फक्त फोन वर. आपले आजी आजोबा सुध्दा गावाकडे राहतात. तू जेव्हा घरी नसते ना . तेव्हा मला फार कंटाळा येतो गं. माझ्याशी बोलायला कोणीच नसते गं."

नीता आणि विवेक नीरजचे हे बोलणे ऐकत होते. तेही खरंच विभक्त कुटुंबपद्धती मुळे आज एकमेकांसोबतचा संवाद हरपत चालला आहे. नोकरीच्या निमित्ताने मुलांची धाव शहरात आहे. त्यामुळे साहाजिकच घरापासून दूर राहून फोनवर संवाद साधला जातो.
आज एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. दोन सख्खे भाऊ एका घरात नीट राहत नाही. त्यामुळे मुलांवर तसेच संस्कार होतात. आज प्रत्येकाला स्वतःची स्पेस हवी असते. वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ केलेली कोणालाही आवडत नाही.

"नीता आपले बालपण किती चांगले होते ना! सुख असो , आनंद असो किंवा दुःख. सुखाच्या आडोशात दुःखाची वाळवी सुध्दा लागत नव्हती. एकमेकांच्या आधाराने कुटुंबात समरस व्हायचे. आई ,बाबा घरात नसले तरी काकू होती, आजी होती, काका होते. बिनधास्तपणे संवाद साधला जायचा. त्यात प्रेमाचा ओलावा होता. सोबतीला शेजारी होतेच. मनातले मळभ दूर करणारे मित्र मैत्रिणी होतेच. त्यामुळे संवाद साधण्यासाठी जास्त विचार करावा लागत नव्हता."

"अहो, पण आज वेळच नाही. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आई वडील दोघेही घराच्या बाहेर पडले आहे. त्यामुळे नवरा बायको यांचा संवाद फार कमी होतो. मुले शाळा , विविध प्रकारचे शिकवणी वर्ग , अभ्यास यात दंग असतात. उरलेला वेळ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगळ्याच विश्वात वावरत असतात. शिवाय शुभेच्छा देण्यासाठी आज एक मेसेज टाईप करुन टाकला की आपण मोकळे होतो. कोणीच कोणाच्या आयुष्यात जास्त दखल घेत नाही. सकाळी नाही तर निदान रात्रीचे जेवण तरी सर्वांनी एकत्र येऊन केले पाहिजे. तरच सुख दुःखाची जाणीव मुलांमध्ये नक्कीच निर्माण होईल."

"मला वाटतं हे कुठेतरी थांबायला हवं नीता. या स्नेहमेळाव्याची खरंच गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे हरवलेली नाती, हरवलेली माणसं हरवलेला संवाद परत पुर्ववत होईल."

"चला आपणच आज पासून या गोष्टीची सुरूवात करू या."

©® अश्विनी मिश्रीकोटकर