हरवत चाललेला संवाद

लेख



संवाद हरवत चाललाय

‘आजच्या सुखवस्तू घरांमध्ये वस्तू सुखी आहेत; परंतु माणसं मात्रं दु:खी आहेत. आज मनातून कुणीही सुखी नाही.
व्हर्च्युअल चॅटींगच्या युगात गप्पांना जागाच नसल्याने संवाद हरवला आहे.
सकाळी उठल्यापासून प्रत्येकाची धावपळ सुरू होते. शर्यतीत जुंपल्याप्रमाणेच प्रत्येक जण धावत आहेत.
कुणाशीही बोलायला,विचारांची देवाणघेवाण करायला, एकमेकांना समजून घ्यायला कुणालाही वेळ नाही.
आधुनिक युगात जीवन जगतांना फक्त औपचारिकता आलेली आहे.
मायेचा ओलावा, प्रेम, सहानुभूती,दया, सहकार्य,मदत या भावना लोप पावत चालल्या आहेत.
फक्त स्वतःचा स्वार्थ हिच भावना दृढ होत चालली असून प्रत्येक माणसाचे जीवन यंत्रवत बनलेले आहे.
यंत्राची सर्व्हिसिंग केल्यावर यंत्र तरी अत्यंत चांगली सेवा देते, कार्य करते पण मानवाचं काय......?
जीवंत असूनही मनातल्या भावनांना प्रकट न करता आतल्या आत कुढत कुढत जीवन जगत आहे.

आपल्या मनातील भावनांची, विचारांची अभिव्यक्ती करायला घाबरत आहे आणि यांचे एकमेव कारण म्हणजे आज एकमेकांवरचा विश्वास उडालेला आहे.
माझ्या बोलण्याने व्यक्त होण्याने इतरांना वाईट वाटेल, दुःख होईल, यातना होतील व संबंध दुरावतील म्हणून न बोललेले बरे हा विचार मनात दृढ करून मनुष्य एकलकोंडेपणाने जगत आहे.
आजच्या पिढीतला हरवलेला संवाद आणि आपुलकीहीन जीवनशैली माणसांमध्ये दुरावा निर्माण करत आहे.
‘आज खूप काही मिळविण्याच्या नादात थोडं काही निसटतं आणि थोडं काही निसटतं म्हणूनच सारं बिन एकसतं’, असं सांगून हे बिनसणंच टाळाण्याची आपली जबाबदारी आहे.
आनंदी असण्यापेक्षा आनंदी दिसण्याला महत्त्व देणारा समाज आज वाढत असल्याचे सांगून हा ढोंगीपणा समाजघातक आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात वाचन कमी होत आहे यावर बोलताना त्यांनी वाचन केवळ माहितीपुरते नव्हे तर, स्वत:ला घडविण्यासाठी होणे आवश्यक आहे. समाजात हो‌त असलेला हा बदल आणि भावनाशून्य वर्तन जर टाळायचे असेल तर प्रत्येकाने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.

*1. इतरांच्या अपेक्षेप्रमाणे जीवन जगण्यापेक्षा, स्वत:च्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचे धैर्य दाखविले असते तर...........*

लोक काय म्हणतील या एका वाक्याने अनेक लोकांचे जीवन खराब केलेले आढळते. अनेक लोकामध्ये ही सर्वसामान्य खंत होती. जेव्हा लोकांना समजते की त्यांचे आयुष्य जवळजवळ संपले आहे आणि ते स्पष्टपणे मागे वळून पाहतात, तेव्हा किती स्वप्ने अपूर्ण राहिली आहेत हे सहज लक्षात येते. बहुतेक लोकांनी त्यांच्या अर्धवट स्वप्नांचाही सन्मान केला नव्हता आणि ते त्यांनी केलेल्या किंवा न केलेल्या निवडीमुळे घडत आहे हे जाणून मरण पत्करावे लागले. असले कपडे घालून नकोस लोक काय म्हणतील... ही शाखा निवडू नकोस लोक काय म्हणतील... हा जोडीदार निवडू नकोस लोक काय म्हणतील... हे करू नकोस, ते करू नकोस लोक काय म्हणतील... यातच अनेक लोकांचे खरे जगणे राहून जाते. पण 3 इडीयटस मधील फरहान सारखी हिम्मत करून एकदा बोलून तर बघा; आपलं मन हलक होईल. चांगल्या आरोग्यामुळे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य मिळते हे फार कमी लोकांना जाणवले होते, हे जेंव्हा कळले तोपर्यंत त्यांचे आरोग्य त्यांच्या हातून निसटून गेलेलं होत. यावरून खालील चार ओळी अलगद ओठावर येतात.

आज उद्या म्हणता म्हणता

खूप काही करायचं राहून गेलं

आयुष्य निसटलं हातून

मात्र जगायचं राहून गेलं......

*2. मला असे वाटते की मी इतके कठोर परिश्रम केले नसते तर........*

ब्रॉनी वेअरने देखभाल केलेल्या प्रत्येक पुरुष रुग्णाकडून अशी प्रतिक्रिया आलेली आहे. जीवनातील कठोर परिश्रमामुळे त्यांनी त्यांच्या मुलांचे बालपण, तारुण्य आणि त्यांच्या जोडीदाराचा सहवास गमावला आहे. याचा अर्थ आपण कठोर परिश्रम करू नका असे लेखिकेला म्हणायचे नाही. उलट आपल्या जीवनातील अमूल्य क्षणांना मुकावे लागेल असा करंटेपणा करू नका. महिलांही या खेदाबद्दल बोलल्या, परंतु त्या बहुतेक जुन्या पिढीतील असल्याने, बऱ्याच महिला रुग्णांना पैशाची कमतरता होती. ज्या पुरुषांची मी काळजी घेतली त्या सर्व पुरुषांना त्यांचे संपूर्ण आयुष्य काम आणि अस्तित्वाच्या ट्रेडमिलवर घालवल्याबद्दल अंत्यतिक पश्चाताप वाटत होते. जर त्यांची ही खंत शब्दबद्ध केल्यास खालील ओळी उमटतील.......

दूर गेलेल्या सा-यांनाच एकत्र गोळा करायचं राहून गेलं

हरवलेल्या आठवणींची छान मैफिल जमवायच राहून गेलं

दु:ख सारी विसरून आनंदाने नाचायचं राहून गेलं

स्वप्न सारी एकत्र करून जीवन जगायचं राहून गेलं.........

*3. मला मा‍झ्या भावना व्यक्त करण्याचे धैर्य मिळाले असते तर............*


अनेक रुग्णांनी इतरांसोबत शांततापूर्वक जीवन जगण्यासाठी स्वतःच्या भावना दाबून टाकल्या. परिणामी, ते इतरांच्या अस्तित्वासाठी स्वत:चे जीवन वाहून घेतले आणि ते जे बनण्यास सक्षम होते ते कधीही बनले नाहीत. जे आहे ते रोखठोक पण इतरांना न दुखावता व्यक्त केले असते तर बरे झाले असते अशी खंत राहून गेली. परिणामी त्यांच्यामध्ये कटुता आणि रागाशी संबंधित अनेक आजार जडले. राग तुम्हाला लढा-किंवा-पळा स्थितीमध्ये आणतो, ज्यामुळे हृदय गती, रक्तदाब आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रतिसादात असंख्य बदल होतात. ते बदल नंतर नैराश्य, हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढवतात. त्यामुळे योग्य शब्दात, योग्य वेळी, योग्य पद्धतीने, योग्य व्यक्तीसमोर व्यक्त व्हायला शिका नाहीतर जीवनाच्या शेवटी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी खालील ओळी गुनगुनाव्या लागतील............

सगेसोयरे सांभाळताना

मनातील आस विरून गेले

आयुष्याच्या अंती मागे पाहताना

आपले खरे जगणेच राहून गेले….........

*4. मी मा‍झ्या मित्रांच्या संपर्कात राहिलो असतो तर..........*

खरा मित्र अडचणीत योग्य वाट दाखवतो, सुखात आनंदी होतो, दुःखात गहिवरून जातो, वेळ प्रसंगी खंबीर होऊन साथ देतो, ढासळताना तोल सावरतो, अडखळताना पावलांना बळ देतो, आपल्या आनंदाच्या क्षणात हाच भारावून जातो. अनेकांना खऱ्या मित्रांचे फायदे त्यांच्या मृत्यूच्या आठवड्यांपर्यंत कळले नाहीत आणि त्यांचा मागोवा घेणे नेहमीच शक्य नव्हते. अनेकजण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात इतके अडकले होते की त्यांनी मैत्रीचे सोनेरी क्षण वर्षानुवर्षे निसटू दिली होती. मैत्रीला त्यांनी योग्य वेळ आणि मेहनत न केल्याने खूप खेद वाटत होता. प्रत्येकजण मरत असताना आपल्या मित्रांना खूप मिस करत होते. जर त्या रुग्णांना आपल्या मित्रा बद्दलच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली असती तर............

जो आपल्या प्रत्येक क्षणाचा सोबती असतो,

आपल्या प्रत्येक भल्याबुऱ्या कर्माचा साथी असतो

आयुष्यातील सगळे गुण दुर्गुण निभावुन नेईल

अशा खऱ्या मित्रासोबत जगायचे राहून गेले ...........

*5. मला असे वाटते की मी स्वतःला अधिक आनंदी होऊ दिले असते तर..........*

हे सर्वसामान्यपणे सर्व रुग्णांमध्ये आश्चर्यकारकपणे आढळून आलेले सत्य आहे. अनेकांना शेवटपर्यंत कळले नाही की आनंद ही एक निवड आहे. अनेकजण जुन्या रूढी परंपरा आणि सवयींमध्ये अडकलेले होते. नेहमीचा तथाकथित \"आराम\" त्यांच्या भावनांमध्ये, तसेच त्यांच्या भौतिक जीवनात ओसंडून वाहत होता. बदलाच्या भीतीने ते इतरांसमोर आणि स्वतःशीदेखील असे ढोंग करत होते की ते समाधानी आहेत, जेव्हा त्यांनी स्वतःशी सुसंवाद साधला तेंव्हा त्यांना असे लक्षात आले की आपण मनमुराद कधी हसलो होतो? एखादा उनाड दिवस स्वतःसाठी जगलो होतो? आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणं फारच अवघड झालंय. तरीही दिवसभर काम केल्यावर थोडासा विरंगुळा म्हणून आपण आपले छंद जोपासायचे प्रयत्न करतोच ना. मृत्युच्या दारात उभ्या असलेल्या एखाद्या व्यक्तीकडून जर आणखी एखादा बंगला बांधला असता, जमीन जुमला घेतला असता, नवीन दागिने घेतले असते असे शब्द आपण ऐकलेत का? तर याचे उत्तर शक्यतो नाही असेच असेल. कारण मृत्युसमयी भौतिक गोष्टीपेक्षा आपल्या आसपास असणाऱ्या, आपण करू शकलो नाही अशाच गोष्टींचा पश्चाताप केला जातो. आनंदाची व्याख्या करण तसं जिकिरीच काम आहे, पण एका कवीने आपला जीवनपट खालील काही ओळीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

डोळ्यात दाटून भावना सारे मलाच पाहत होते

कितीतरी ओळखी अनोळखी चेहरे त्यात होते

कधी नव्हे ते आज सार गाव मला पाहून गेल

मरता मरता सहज कळाल जगणं आपलं राहून गेल

आयुष्यात नागमोडी वळणाना मी खुपदा पाहील होत

जे क्षण होते निसटले त्यांना पुन्हा जगायचं होत

शेवटच्या श्वासात डोळ्यांसमोरून जीवन सार धावून गेलं

मरता मरता सहज कळाल जगणं आपलं राहून गेल

घरच्यांची स्वप्ने आज सारी एकदम चूर झाली

कोणी तरी म्हणाला नियती इतकी क्रूर का झाली

माझं त्यांच्यातून जान घरच्यांना घोर लावून गेलं

मरता मरता सहज कळाल जगणं आपलं राहून गेल

खोटा मान सन्मान यांना मी माझा म्हणालो

आयुष्यभर अपेक्षांचे केवळ ओझेच वाहत आलो

शेवटी खांदे पालटत लोकांनी प्रेत स्मशानापर्यंत वाहून नेलं

जळता जळता परत आठवलं जगणं आपलं राहून गेल.....

जीवन सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. जीवन ही रंगभूमी आहे, जीवन म्हणजे दोन घडीचा डाव आहे. जीवन हा एक संघर्ष आहे. अशा जीवनाच्या अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केलेल्या आहेत. आपले जीवन ही एक अनुभव सरिता आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे स्वत:ला येणार्‍या अनुभवांवर अवलंबून असते. जीवनात चढउतार हे हटकून असतात कारण जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु:ख असे क्वचितच आढळते. जाईल त्या क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे व प्रगतिपथावर राहावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे खरे सार्थक आहे. खरे म्हणजे जगण्याइतक आनंददायक असे जीवनात काहीच नाही. शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की कितीही आणि कसेही जगलो तरीही जीवन अजून जगायचे राहिले कारण खर जगण मात्र राहून गेलं...........

जीवन हा न संपणारा प्रवास आहे!

त्यामुळे जीवनात काहीही कमवा पण पश्चाताप मात्र कमवू नका.

©® श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर औरंगाबाद