Aug 09, 2022
General

हरवलेली गुलाबी नोट

Read Later
हरवलेली गुलाबी नोट

हरवलेली गुलाबी नोट

मार्गशिर्षातला दुसरा गुरुवार. निमा जरा लवकरच उठली. पटापटा घरातली साफसफाई करुन जरा मेसेजेसवर नजर फिरवली. आपल्या आधीच काही जणांनी उठून सुप्रभात करायला सुरुवात केलेली पाहून तिला किंचीत हसू आलं.

 या गारठ्यात खरं तर उठवतच नाही. गोधडी अंगभर पांघरुन गुडुप निजावसं वाटतं तिला पण मग डब्याची तयारी..

 निमाने मोबाईल चार्जिंगला लावला. अंघोळीला गरम पाणी काढलं नि न्हाऊन आली. पोळीभाजीचा डबा केला,ओटा आवरला,सिंकमधे जमलेली भांडी धुतली नि पुजेची तयारी करु लागली. 

काल तिनं फुलं आणून धुवून,पंख्याला वाळवली होती. कलशात पाणी भरुन त्यात सुपारी,नाणं व दुर्वा ठेवल्या. पाच पानांमधे श्रीफळ बसवून कलशाच्या अष्टदिशांनी हळदकुंकुमाची बोटं उमटवली. पाटाभोवती रांगोळी काढली. एक वस्त्र त्यावर ठेवून मुठभर तांदूळ ठेवले. त्यावर कलश ठेवला. देवीला वेणी घातली,गंध,पुष्प,नैवेद्य अर्पण केले. धुप,दिपाने ओवाळले आणि पुस्तकात लिहिलेली कथा वाचू लागली. 

अहंकारी सुरतचंद्रिका राणी,तिची दासी,श्यामबाला नावाची गुणी कन्या आणि तिने केलेले गुरुवार,तिचं सुयोग्य वराशी झालेलं लग्न,आईला केलेली धनाची मदत पण त्या धनाचे सुरतचंद्रिकेच्या अहंकारामुळे झालेले कोळसे,श्यामबालेने आईकडून करुन घेतलेले व्रत व सुरतचंद्रिकेस पुन्हा लाभलेलं स्थैर्य..कथा वाचून झाली तसं निमाने देवीला नमस्कार केला व नित्याच्या कामांना वळली. 

वीजेचं बील भरायचं होतं. तिने बील एका पुस्तकात घेतलं व सोबत पैसे ठेवले. खरंतर ही कामं हल्ली फोनपे वगैरेंनी होतात पण निमाच्या नवऱ्याची त्यावर खात्री नव्हती. 

निमा घर बंद करुन बाहेर पडली. नेहमीच्या भाजीवाल्याकडून सिमला मिरची,फरसबी,फ्लॉवर,मटार अशी भाजी घेतली. तिथून पुढे खाऊच्या दुकानात चॉकलेट्स, वेफर्स वगैरे खाऊ घेऊन ती पतपेढीकडे वळली. 

एव्हाना ते पुस्तक भाजीमुळे खाली गेलं होतं. तिच्याआधी एक नंबर होता. निमाने कसतरी करुन पुस्तक बाहेर काढलं,ते उघडलं. पाहते तर काय त्यात पैसे नव्हते. निमाने पुस्तकातच तर दोन हजाराची गुलाबी नोट ठेवली होती. तिने खाली,आजुबाजूला पाहिलं. पिशवीतही भाज्यांमधून चाचपून पाहिलं. 

निमाला वाटलं घरी राहिले असतील पैसे. काल टाकलेलं गव्हाचं नि तांदळाचं दळण तिने भैयाकडून घेतलं. मुलासाठी ढोकळा,तिच्यासाठी वेफर्स,पावाची लादी वगैरे घेऊन ती घराकडे निघाली. दोन्ही हात ओझ्याने अवघडले होते. लगबगीने कुलुप काढलंन नि सोफ्यावर पाहीलं पण तिथेही पैसे नव्हते. 

निमाने हातपाय स्वच्छ धुतले आणलेली भाजी स्वच्छ धुवून वाळवत ठेवली. तिला वाटलं ती नोट पडली असेल भाजीत पण छे! आत्ता मात्र निमाला काळजी वाटू लागली,नवरा घरी आल्यावर त्याला काय सांगायचं.

 प्रश्न नुसता दोन हजाराचा नव्हता तर विसराळूपणाचा होता आणि दोन हजार म्हणजे तिच्यासारख्या मध्यमवर्गीय ग्रुहिणीसाठी थोडीथोडकी रक्कम नव्हती.

 तिने जाम डोस्कं लावलं पण काही आठवेना. त्याच त्याच जागा पुन्हा पुन्हा तपासून पाहिल्या. त्यातच फटाफट भाजी चिरली,कुकरला लावली.  चिरलेला कांदा तेलात परतला,त्यात टोमॅटोच्या फोडी,चिरलेली सिमला मिरची घालून परतली. परत एकदा हॉलमधे,सोफ्याखाली राऊंड मारून गेली. 

कुकर उघडून भाजीतलं पाणी काढून त्या घोटून घेतल्या. इतक्यात लेक आला. आई काय करतैस विचारु लागला. निमाचं आधीच डोकं सणकलेलं. लेकावर कावली. 'भाज्या नको नं खायला तुला म्हणून हे बनवतेय.' बरा हातीत मिळाला. 

लेकाने ओळखलं आईचं काहीतरी बिनसलय. त्याने निमाला विचारलं,"काय झालंय तुझं,एवढी का वैतागतैस? पैसे हरवलेत का तुझे? निमा मनात म्हणाली,'याला कसं कळलं?' तरी पोक्तपणाचा आव आणत तिने म्हंटलं,"माझं वीजेचं बील हरवलय. मी बहुतेक टाकून आलेय कुठेतरी. मला शोधायला जायचय पण हा स्वैंपाकपण करायचाय नं." लेक म्हणाला,"ते येतं डायरेक्ट भरता. चिल चिल."

 निमा बिचारी..आत्ता लेकाला खरं सांगितलं तर लेक त्याच्या वडिलांना सांगणार नि दोघे बापबेटे मग बरेच दिवस तिला वेंधळी म्हणणार म्हणून झाकली मुठ दोन हजाराची म्हणत गप्प राहिली. भराभरा सगळं आवरुन,सिंक रिकामा करुन तिने त्या पतपेढीजवळ परत फेरी मारुन यायचं ठरवलं. मनात विचार आलाच,'असे पडलेले पैसे मिळतात का परत?' पण तरी एक शेवटचा उपाय मग असं नको वाटायला की आपण गेलोच नाही. निमाने ड्रेस चढवला. 

किचनमधे आली. देवीजवळ मंद ज्योत तेवत होती. देवीला नमस्कार करुन मनात म्हणाली,"देवी मला जरा नीट विचार करायचं सामर्थ्य दे." आणि मग तिने ते पुस्तक पिशवीत ठेवायला म्हणून घेतलं. 

निमाच्या मनात काय आलं ते ती परत तेच पुस्तक चाळू लागली अगदी शेवटच्या पानापासून.  पहिल्या व दुसऱ्या पानामधे तिने वीजबील ठेवलं होतं. पहिलं पान पलटलं गेलं नि मुखप्रुष्ठ नि पहिल्या पानामधे ठेवलेली गुलाबी नोट तिला दिसली. निमाची कळी खुलली. 

पुस्तक परत फ्रीजवर ठेवून निमा देवीकडे गेली व देवीपुढे तिने डोकं टेकवल.

----सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now