Jan 27, 2021
माहितीपूर्ण

हरितालिका व्रत कथा

Read Later
हरितालिका व्रत कथा

हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेवून गेली म्हणून पार्वतीला 'हरितालिका' असे म्हणतात.

शिवपार्वती किंवा उमा-महेश्वर ही जगताची माता-पिता म्हणून ओळखले जातात. स्त्रीतत्व आणि पुरुष तत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो.

इच्छित वर म्हणून शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली. पार्वतीने आपला वर कडक तपश्‍चर्येने मिळविला. त्याप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत.

रात्री १२ वाजता बेलाचे पान चाटून, काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून, तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही. त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात.

या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात. त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. "सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे”अशी प्रार्थना करून आरती केली जाते. या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात.

महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत होते, याचा संदर्भ आढळतो. भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी, धन-धान्याच्या समृद्धीसाठी कुंतीस या व्रताचे पालन करण्यास सांगितले होते.

या व्रतसंबंधी काही पौराणिक कथा प्रचलित आहे. त्या अश्या, “एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर निवांत बसली होती.

पार्वतीनं शंकराला विचारलं, “स्वामी, सर्व व्रतांत श्रेष्ठ व्रत कोणते?”

तेव्हा शिवशंकर म्हणाले, “जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, तार्‍यांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. हेच व्रत करूनच तर तू मला प्राप्त केलस.”

यासंदर्भात अजून एक कथा ऐकविली जाते ती अशी, “हिमालयाची कन्या पार्वती ज्यावेळी लग्ना योग्य झाली त्यावेळी तिच्याकरता वर पाहाणे सुरू झाले. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव “पार्वती` असे ठेवण्यात आले होते. तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी हिमालयाला सतत लागली होती. एकदा नारदमुनी हिमालयाकडे आले आणि त्याला म्हणाले,“हे पर्वतश्रेष्ठा ! तुझ्या या सुस्वरुप कन्येला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे.” ते ऐकून हिमालयाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ही बातमी सांगितली. पण पार्वतीने मनोमनी शिवशंकरांना पती म्हणून वरले होते. हे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला तेव्हा झाले नाही. मग तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. “जर बळजबरीने तुम्ही माझा विवाह भगवान विष्णुंशी लावुन दिलात तर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करेन.”आणि मग पार्वती आपल्या मैत्रिणींसह घनदाट अरण्यात निघून गेली. तिथे तिने घोर तपश्‍चर्या केली.

भगवान शिव प्रसन्न व्हावेत व तिचा पत्नी म्हणुन स्विकार करावा याकरीता पार्वतीने व्रत आरंभिले. तिने अत्यंत मनोभावे भगवान शंकराची पुजा केली आणि कडक उपवास देखील केला. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने तेही सोडून दिले. त्यामुळे तिला “अपर्णा` असे नाव पडले. तिच्या तपश्‍चर्येने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. तेव्हा ती म्हणाली,“तुम्ही माझ्या तपश्‍चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझा तुमची अर्धांगींनी म्हणून स्वीकार करा”,शंकराने “तथास्तु”म्हटले व ते अंतर्धान पावले.

इथे पार्वतीचा शोध घेत पर्वतराजा हिमालय त्या अरण्यात आला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्‍चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्‍चय आपल्या वडिलांना सांगितला. भगवान शिवशंकरांनी दिलेला वरही सांगितला.

तिचा दृढनिश्‍चय, श्रद्धा पाहून हिमालयाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला त्यादिवसापासून “पार्वतीपती”असे नामाभिधान पडले.

त्या दिवशी भाद्रपद महिन्यातील तृतिया होती त्यामुळे आजही प्रत्येक कुमारिका आणि सवाष्ण स्त्री हरितालिकेच्या दिवशी देवी पार्वतीने केलेले व्रत मोठया निष्ठेने आचरतात, यथासांग पुजन करतात, उपवास करतात.

अशी ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

(हा ब्लॉग कसं वाटला हे नक्की सांगा. तसेच आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद)

@preetisawantdalvi

Circle Image

Preeti Dalvi

Writer, Author, Blogger

मला वाचनाची खूप आवड आहे। वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही। मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत। त्या कथांमध्ये "गुंतता हृदय हे। " ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले। ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद। ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले। खूप खूप आभार ईरा टीम आणि त्याचा पिलर संजना मॅम।।