हरवलेली माणसं ( भाग एक )

किती तरी वेळा आपण आपल्या माणसांनाही ओळखायला चुकतो आणि त्यातूनच निर्माण होत मानव निर्मित दुःख

हरवलेली माणसं ( भाग एक  )

विषय: नातीगोती 


अप्पां स्वयंपाकीण बाईंशी गप्पा मारत होते. हे पाहून सुनबाईने नाराजीने नाक मुरडले. त्यांना मुंबईला आणून आपण नक्कीच मोठी चूक केली आहे याची तिला खात्री वाटायला लागली. तिला अप्पांचे हे वागणे फारच किळसवाणे वाटायला लागले होते.
अप्पा म्हणजे तिचे सासरे. सासूबाई गेल्याला अजून सहा महिनेही झाले नव्हते.

खरं म्हणजे अप्पांची मुंबईला यायची ईच्छा नव्हती. कोणाच्याही मदतीला धावून जात असल्याने  गावात सगळे जण त्यांना ओळखत असत आणि मान देत असत. त्यांच्या शब्दाला तिथं किमंत होती. कोणीही त्यांचा शब्द खाली पडू देत नसत. त्या मुळे बायको गेल्यानंतर गावी त्यांना कधीच एकट वाटलं नव्हतं. नेहमी कोणी ना कोणी  सोबत असे. पण त्यांच्या मुलाचे लक्ष लागत नसे. एकटे दुकटे अप्पा कसे राहतील. आजारी पडल्यावर त्यांच्या कडे कोण बघणार.

आता हातपाय चालले आहेत तो पर्यंत सगळ ठीक आहे पण एकदा का ते थकले की कोणी बघणार नाही. पण मुंबईला जायचं नावं काढल की अप्पा काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करत. अर्थात त्यांचं सगळ आयुष्य गावात गेलेलं असल्यानं त्यांचंही म्हणणं बरोबर होत.

अप्पा म्हणजे गावातल एक वेगळंच प्रस्थ होत. त्यांच्या डोक्यातून काहीतरी विक्षिप्त पण नंतर अर्थपूर्ण कल्पना निर्माण होतं असतं. आणि कोणी कितीही विरोध करो ते त्यांच्या मनानुसार वागत. उदाहरणार्थ त्यांची बायको वारली त्या वेळी त्यांनी अंत्य संस्काराला पूर्णपणे फाटा देऊन त्या विधीला लागणारा सगळा खर्च एका वृद्धाश्रमाला देवून टाकला होता. सगळ्या गावाला त्यांचं वागणं विक्षिप्तपणाच वाटलं होतं. पणं जेंव्हा त्यांचं नावं शहरातल्या वर्तमानपत्रात छापून आल त्या वेळी त्यांनी जे केलं ते योग्यच असावं अशी सगळ्यांची खात्री झाली. पणं मुलाला आणि सुनेला त्यांचं हे वागणं दुटप्पीपणाच वाटतं असे. हे सगळ अप्पा मोठेपणा मिळावा म्हणून आणि पुढे मागे सरपंचाची निवडणूक डोळयासमोर ठेवून वागत असतात असं त्यांना वाटे.

मधे एकदा ते मुंबईला सहज आले होते तर येताना गावातल्या मुलांसाठी बरीच गोष्टींची पुस्तकं घेवून आले होते. या गोष्टीचंही सगळ्यांनी खूप कौतुक केलं होतं. गावात असं एकही घर नव्हत जिथं अण्णांना कोणी ओळखत नव्हतं. अप्पा गोष्टी वेल्हाळ होते त्या मुळे सगळ्यांशी ते मन मोकळ्या गप्पा मारत. बऱ्याच जणांना त्यांच्याशी नुसत बोलूनच बरं वाटतं असे. बऱ्याच जणांना ते आपल्या घरातील व्यक्ती वाटतं असतं.

मुलगा आणि सून दोघेही मुंबईला नोकरी करतं असत. दोघेही आपल्या जगात सुखी होते. त्यांना कधी कधी अप्पा आपल्याकडे काही दिवस का होईना राहावे असं त्यांना वाटे. म्हणून  या वेळी मुलाने आणि सून बाईने पक्का निश्चय केला होता की अप्पांची दिवाळी मुंबईला करायची. अप्पा कटाक्षाने नाही म्हणत होते. पण मुलाने आणि सून बाईने अजिबात ऐकलं नव्हतं. त्यांना घेवून ते मुंबईला आले होते.

आप्पांनी मोठ्या मुश्किलीने या गोष्टीला होकार दिला होता. आणि ते मुंबईला आले होते.

घरात प्रत्येक कामाला बाया होत्या. एका एजन्सी कडून त्या येतं असत. तेव्हढीच त्यांची ओळख होती. त्यांची नावही कोणाला माहीत नसतं.

काही दिवस अप्पा घरातच पेपर वाचत, टी. व्ही. वर बातम्या बघत वेळ घालवायचे. पण काही दिवसातच त्यांचा मूळ बोलका स्वभाव उफाळून आला. सून आणि मुलगा सकाळीच उठून कामावर जात. ते तयारी करे पर्यंत स्वयंपाक करणारी बाई जेवण तयार करून डब्बा पण भरुन ठेवत असे.

दोघं जण नाश्ता चहा करून कामावर जात. मग सगळ घर रिकामं होवून जाई. संध्यकाळपर्यंत ते रिकामच असे.

आणि एक दिवस सूनेला अप्पा त्या बाईशी गप्पा मारतांना दिसले. तिला ते दृष्य खूप ओंगळवाणे वाटले.  ही गोष्ट नवऱ्याच्या कानावर घालायलाच हवी असं तिला वाटलं. पण त्या आधी पूर्ण खात्री करून घेणं आवश्यक होतं.

( क्रमशः)
लेखक : दत्ता जोशी

🎭 Series Post

View all