हरवलेले प्रेम नव्याने गवसले भाग ८

कथामालिका


भाग८

अष्टपैलू महासंग्राम स्पर्धा
हरवलेले प्रेम नव्याने गवसले...


माधवचे आई वडील निघून गेले. मामी आणि कांचन रागिणीला सारखा त्रास देत होत्या.

रागिणी मात्र सारखी रडतच होती. मामा गावावरून आले की मामी आणि कांचन विषयी सगळं काही सांगणार होती.

पण, मामीने तो धोका ओळखला आणि त्यांच्या प्रेमाचा डाव उलटवला. रोज नको नको ते मामाला रागिणीच्या विरोधात भडकावले आणि मामाने एके दिवशी तिच्या वर हात उचलला. त्यामुळे मामा आणि मामीमध्ये जोरत भांडण झाले. रागाच्या भरात मामा गरम इस्त्रीचा चटका मामीच्या हाताला द्यायला गेले. पण, रागिणी मध्ये पडली. तर झटापटीत मामीने इस्त्री हातात घेतली आणि मामीने रागिणीला चटका दिला. हातासोबतच तिच्या गालालाही जोरदार चटका बसला.

"आई गं..." रागिणी कळवळून उठली.

मामीने घाबरून इस्त्री खाली टाकली.

ही सगळी मजा कांचन बघत होती. रागिणीच्या कळवळल्याने मामा भानावर आला. आपण हे काय करुन बसलो. याची जाणीव झाली. तिच्या गालाचा आणि हाताचा बराचसा भाग जळला होता. मामाच्या डोळ्यांतून अश्रू थांबतच नव्हते.

त्याने रागिणीला जवळ घेतले.‌ ताबडतोब दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी औषध आणि मलम लावायला सांगितला.

"पण, हे बघा तिची त्वचा आधीच नाजूक आहे आणि हे डाग जातील की नाही. याची खात्री मी देत नाही."

डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून मामाने रागिणीसमोर हात जोडले आणि माफी मागू लागले.

"मामा, तू काहीच केलं नाही. मी माझ्या कर्माची फळं भोगतेय. आज आई बाबा असते तर तुमच्यावर आणि माझ्यावर ही वेळ आलीच नसती. तिच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू गालांवर ओघळले."

मामाने तिला घरी आणले. तेव्हापासून मामा तिची जास्त काळजी घेऊ लागला. आठ पंधरा दिवसांत तिची जखम भरू‌ लागली. पण गालावर आणि हातावर चटक्याचे व्रण मात्र तिथे तयार झाले. मामाने भरपूर प्रयत्न केले. अनेक क्रीम आणि औषधी आणून दिली. पण, ते डाग मात्र कायमचेच राहिले.

मामी आणि कांचनला मात्र अतिशय आनंद झाला. कारण, तिचा सुंदर चेहरा आता विद्रूप झाला होता.‌ पण, रागिणी हळूहळू त्यातून सावरत होतीच.

एवढं सगळं रागिणी सोबत घडले होते. पण, तिने कोणालाच काही सांगितले नाही. अगदी तिची मैत्रीण केतकीला सुध्दा नाही. केतकीच्या एकही फोन तिने उचलला नाही.

आता नेमक्या परीक्षा जवळ आल्या होत्या. रागिणीचा बराच अभ्यास मागे पडला होता. एके दिवशी रागिणी महाविद्यालयात गेली. तेवढ्यात केतकी समोर आली.

काय गं, किती दिवस झालेत. एक फोन सुध्दा करीत नाही. कुठे गायब होती इतके दिवस?"

"अगं, ते मी ..गावाला गेली होती.‌"

"रागिणी पण तू तुझा चेहरा का झाकला आहेस? इथे कुठे ऊन आहे? काढ तो रुमाल."

"अगं, नको गं. मी हल्ली रुमाल बांधूनच फिरते. पण, केतकीने जबरदस्तीने तिचा रुमाल काढलाच. तर तिचा चेहरा बघताच."

"रागिणी , काय झाले हे? तुझा चेहरा असा कसा झाला?"

रागिणीने मान फिरवून घेतली. म्हणून केतकीने तिचा हात धरला. तर परत रागिणी ओरडली.

"काय झालं रागिणी ? तुझ्या हाताला सुध्दा. बापरे कोण निर्दयी आहे एवढं. तुझ्या मामीला एवढाच कंटाळा आला तर तू होस्टेलमध्ये का नाही राहात गं. तू काही बोलत नाही ना. त्यांचा गैरफायदा घेत आहे. कळत कसं नाही तुला रागिणी?"

रागिणी केतकीच्या गळ्यात पडून खूप रडली.
"ते सगळं जाऊ दे. माझी चिंता तू करू नकोस. मला एकदा माधवशी बोलायचे आहे गं. माझा फोन मामीने काढून घेतला आहे."

"हा घे फोन. पण माधव उचलणार नाही बहुतेक. कारण आता त्याची परीक्षा जवळ आली आहे आणि सबमिशन, प्रॅक्टीकल वगैरे. त्यामुळे त्याने एक दीड महिन्यांसाठी फोन बंद ठेवला आहे." केतकी

रागिणीनै दोन तीन वेळा फोन केला. पण, माधवने उचलला नाही.

"पण, केतकी तुला जर कधी फोन आलाच तर त्याला माझं हे कळू देऊ नकोस. आमचं प्रेम , आमचं स्वप्न साकार होण्याआधीच संपले गं. मला त्याच्या समोर सुध्दा उभं राहण्याची इच्छा उरली नाही आता. तो तिकडे वाट बघतोय. पण, मी मात्र त्याच्यासाठी अनुरूप नाही राहिले गं आता. देव आमच्या प्रेमाची अजून किती परीक्षा पाहणार आहे माहिती नाही."

"अगं असा विचार का करतेस? माधव एवढा कोत्या विचारांचा नाही गं. तो तुझा या अवस्थेतही स्वीकार
करेल."

"पण, मला त्याचे आयुष्य बरबाद करायचे नाही. त्यांच्या प्रेमाची अशी परीक्षा ,असा गैरफायदा घ्यायचा नाही. मी इतके दिवस त्याची वाट बघत होते. त्याला भेटण्यासाठी अधीर झाले होते. पण, आता नाही. माझा विद्रुप चेहरा त्याच्या समोर नाही घेऊन जाऊ शकत गं. मी निर्णय घेतला. त्याच्या आयुष्यातून निघून जाण्याचा."

"नाही रागिणी ,असे करू नकोस. अगं, तोही एक उत्तम डाॅक्टर होणार आहे. काही तरी मार्ग नक्कीच निघेल. तू एकदा त्याला भेट आणि मगच ठरव."

"पण, तो मला स्वीकारेल का? त्याचे माझ्यावर तेवढेच प्रेम राहिल का? त्याला मी आवडलीच नाही तर? "

"रागिणी तू एकदा शेवटच माझं ऐक. अगदी काही दिवसांचाच प्रश्न आहे. तेव्हा धीर धर. कोणताही निर्णय तू एकटीने घेऊ शकत नाही. त्याची वाट बघ."

"केतकी तुझं म्हणणं पटतंय. पण.."

"रागिणी प्लीज. एवढं ऐक माझं."

"ठीक आहे. मी वाट बघेन त्याची.

चला, आपलीही परीक्षा जवळ आली आहे. तेव्हा फक्त अभ्यास आणि अभ्यास.‌ नो मस्ती, नो मस्करी.
दोघीजणी वाचनालयात जाऊन अभ्यास करतात.

माधव परत आल्यानंतर काय होते ? पाहुया पुढच्या भागात....


©® आश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all