हरवलेले प्रेम नव्याने गवसले भाग ७

कथामालिका
भाग ७

अष्टपैलू महासंग्राम स्पर्धा
हरवलेले प्रेम नव्याने गवसले..

माधव रागिणीचा निरोप घेऊन निघून जातो. पण, दोघांचेही मन कशातच लागत नसते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. एक एक दिवसांचा विरह सुध्दा त्यांना सहन होत नव्हता. पण, दोघेही स्वतः च्या भविष्याचा विचार करून शांत होते. ते दोघेही मोबाईलमध्ये काढलेले फोटो पाहून आनंदित व्हायचे. बघता बघता सात आठ महिने निघून गेले होते. फक्त दोन अडीच महिन्यांचाच प्रश्न होता. रागिणी तर माधवला भेटायला आतुर झाली होती.

पण, रागिणीची मामी फारच कजाग. त्यात कांचन सोबतीला. मामाला काहीही भाव न देता , एकही शब्द न ऐकता त्या रागिणीच्या हातातून कधी फोन घे, कधी वह्या फाड, कधी मारझोड कर. अशा पध्दतीने त्या तिच्याशी वागत असत. मामा बिचारा शांत स्वभावाचा असल्याने तो जास्त काही बोलत नसे‌.

एकदा तर तिच्या हातून फोन काढून घेतला आणि बंद करून ठेवून दिला. त्यामुळे तिचा माधवशी संपर्क होत नव्हता. माधवला तिची फार काळजी वाटू लागली. त्यामुळे त्याने केतकीला फोन लावला. पण, केतकीने सुध्दा फोन उचलला नाही. त्यामुळे माधवने त्याच्या आई वडीलांना तिच्या घरी भेटायला पाठवले.

ठरल्याप्रमाणे माधवचे आई वडील रागिणीला भेटायला गेले‌.

"येऊ का आत?"

"आता कोण आलं मरायला? त्रास द्यायला?"

दार उघडताच, "कोण पाहिजे तुम्हांला?"

"आम्हांला रागिणीला भेटायचे आहे?"

तेवढ्यात रागिणी बाहेर आली.

"अरे, काका- काकू या ना आत. तुम्ही बसा."

"कोण तुम्ही आणि काय काम आहे रागिणीशी?"

तिच्या मामीने जरा रागातच विचारले.

आम्ही रागिणीची चौकशी करायला आलो आहोत.

"रागिणी कशी आहेस? तुझा फोन सुध्दा लागत नाही. काय झालं? तुझा चेहरा एवढा निस्तेज का दिसतो आहे? तब्येत बरी नाही का तुझी?"

"ओ ताई , रागिणी बरी आहे. पण तुमचे काय काम तिच्याकडे?"

"अहो, रागिणी आमच्या घरची सून होणार आहे. माधव शिक्षण घेऊन परत आला की आम्ही मागणी घालायला येणारच आहोत परत. आता माधव फक्त माधव परांजपे नाही तर डॉक्टर माधव परांजपे होणार आहे. तेव्हा जपा आमच्या सुनेला काही दिवस."

"रागिणी, चल आम्ही निघतो आणि हो, आपण माधवला आणायला मुंबईला जाणार आहेत. मी फोन करेलच तसा. तेव्हा तयार राहशील आणि काळजी घे स्वतःची. रागिणी तुझे मामा कुठे आहे?"

"काकू , मामा काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले आहे. आले की कळवते."

"बरं, काळजी घे."

"हो काकू, तुम्ही काळजी करू नका."

"चला ताई येतो."

माधवचे आई वडील घराबाहेर पडले.

त्यानंतर मामीने रागिणीवर जे काही तोंडसुख घेतले की त्याची कल्पनाच करवत नव्हती.

"इथे आमची मुलगी लग्नाची आहे आणि तुला स्वतः च्या लग्नाची पडली आहे. काही लाज आहे का तुला ? म्हणे प्रेम करते ! तुझ्या माय बाप तर चालले गेले. तुला आमच्या भरोवशावर सोडून. आमची समाजात काही इज्जत वगैरे आहे की नाही. सगळी इज्जत धुळीला मिळवायला निघाली. थांब कशी प्रेम करते ते बघतेच आता?"

मामीचा राग अनावर झाला होता. एवढा चांगला डॉक्टर मुलगा रागिणीला भेटत आहे. हे बघून तिचा तिळपापड झाला. कांचनही तिला बोलू लागली.

"का गं रागिणी, तू प्रेम करतेस त्या मुलावर? लपून छपून भेटते त्या मुलाला. कधीपासून सुरू आहे. हे सगळं." कांचन

"कांचन ही अशी बोलणार नाही."

मामी तिचे केस ओढत तिला ओरडू लागली.

"मामी, केस सोड ना दुखत आहे गं."

"बोल पटकन."

"आमची महाविद्यालयातच भेट झाली होती. एकदा माझा अपघात झाला होता. तेव्हा त्याच्या गाडी मुळेच झाला होता आणि तेव्हापासून आमची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मला त्याचा आधार वाटू लागला. आई बाबा गेल्यापासून माझा प्रेमावरचा विश्वास उडाला. तू माझी सख्खी मामी असुनही तुमचे माझ्यावर कधीच प्रेम नव्हते. तुमचे प्रेम माझ्या बाबांच्या संपत्तीवर होते. त्यासाठी तुम्ही मला सांभाळत आहात."

"मामी, प्रेम म्हणजे विश्वास असतो. पण, तुमचे माझ्यावर असलेले प्रेम खोटे होते. त्यामुळे आयुष्यात खरं प्रेम करणारा साथीदार मला भेटला. ते पण तुम्हांला सहन होत नाही."

"ठीक आहे. आजपर्यंत मी बोलली नाही. पण, आता मामाला सगळं सांगणार आहे."

"अस्स...काय सांगणार आहेस? तशी वेळच नाही येऊ देणार तुझ्यावर."

चार दिवसांनी येणारा मामा नेमका त्याच दिवशी संध्याकाळी घरी आला.

मामीला आता भिती वाटत होती की रागिणी मामाजवळ सगळं खरं खरं सांगेल म्हणून. त्यामुळे मामी अजून नवीन कारस्थान करते का पाहुया पुढच्या भागात.....

©® आश्विनी मिश्रीकोटकर


🎭 Series Post

View all