हरवलेले प्रेम नव्याने गवसले भाग ६

कथामालिका


भाग६
अष्टपैलू महासंग्राम स्पर्धा
हरवलेले प्रेम नव्याने गवसले..

रागिणी माधवला काय सांगते तिच्या आयुष्यात विषयी...

माधव मला तुला बरंच काही सांगायचं आहे आणि तू मला समजून घेशील असे वाटते मला. हे बघ,"मी माझ्या मामा मामी कडे राहते. मला आई वडील नाहीत. मी बारावीची परीक्षा दिली आणि माझी नीट परीक्षेची तयारी सुरू केली. परीक्षा झाल्यानंतर मी मुंबईला शिकायला जाणार होते. आई वडीलांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण, नेमकं माझ्या आई वडीलांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यातच दोघांचाही मृत्यू झाला. मी एकटी पडले. आईचा जीव माझ्यात अडकलेला. म्हणून आईने मरता मरता मामाकडून वचन घेतले की माझा सांभाळ कर म्हणून. त्यामुळे मी इथे मामाकडे राहायला आली. माझ्या आई वडिलांच्या सोबतच माझं स्वप्नही मरून गेलं."

"माझे मामा वसंतराव आणि मामी मालतीबाई खूप सधन. तरीही मामीचा मात्र माझ्या पैशांवर सतत डोळा होता. मामा मामीला खूप समजावून सांगायचा. पण, तिने मामाचे ऐकलेच नाही. सुरुवातीला माझे दिवस खूप छान गेलेत. पण, माझ्या नकळत काही कागदपत्रांवर तुझ्या सह्या पाहिजे. असे सांगून मामीने आमचे घर, संपती सगळं स्वतः च्या नावावर करून घेतले‌ आणि याविषयी मला काहीही माहिती नव्हती.

"हळुहळु मामीचे वागणे बदलत होते. मामा मात्र सतत टूरवर असायचा. त्यामुळे त्याला काहीच माहिती नव्हते. मग मामाच्या घरी माझा वनवास सुरू झाला. मी आणि मामाची मुलगी आम्ही बरोबरीच्या. पण, मामी मात्र माझ्याशी नीट वागतच नव्हती. इतके काम सांगायची की मला उसंतच मिळत नव्हती. मामाने माझे शिक्षण बंद व्हायला नको म्हणून जवळच्याच काॅलेजमध्ये बी.ए.ला प्रवेश घेतला. थोडीशी आवड म्हणून नाईलाजाने मी संगीताकडे वळले. माझं मन रमविण्यासाठी ते एक साधन होते."

"मी माझा प्रवास तुझ्या सोबत पूर्ण करू शकेल की नाही माहिती नाही. तेव्हा तू माझ्यात अडकून पडू नकोस. तू खूप श्रीमंत आहेस, तुझं ध्येय वेगळे, तुझे राहणीमान वेगळे. मी कुठेच तुझी बरोबरी नाही करू शकत माधव."

"हे बघ रागिणी मी माझ्या घरी तुझ्या विषयी सांगितले आहे. फक्त पुढचे दोन वर्षे आपल्याला लग्न करता येणार नाही. मी तुला वचन देतो की त्यानंतर मी लगेच माझ्या आई वडीलांना घेऊन तुझ्या घरी येईन आणि तुझ्या मामा मामींना मागणी घालणार."

"पण, माधव तुला मीच का आवडते? एका लहानशा भेटीत तुझे माझ्यावर एवढं प्रेम ... तू कसं करू शकतोस? "

"रागिणी , प्रेम आणि दया या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ‌प्रेम हे नि:स्वार्थपणे केले पाहिजे. प्रेम हे फक्त शारीरिक आकर्षण नसून दोन मने जुळून येणार असावं. आयुष्यात प्रेम फक्त एकदाच होते आणि कायम राहते."

"पण, माधव."

"आता पण, कशासाठी?"

माधव तिचा हात हातात घेऊन तिला आश्वासन देतो.
आई वडीलांनंतर तिचा हात एका विश्वासक व्यक्तीच्या हातात आहे. हे पाहून तिला गहिवरून आले.

"माधव, खरंच का रे मला अशीच साथ देशील शेवटपर्यंत."

"रागिणी तू शांत हो. फक्त मला हे दोन वर्षे दे. मी तुला कधीच अंतर देणार नाही."

मग नव्याने सुरू झाली रागिणी आणि माधवची प्रेमकहाणी. काॅलेजमध्ये रोज एकदा तरी भेट होत होती. तिने तिचा मोबाईल नंबर दिला. फक्त मामीच्या नकळतपणे ती माधवशी बोलत होती. पण, मामी मात्र तिच्यावर सतत लक्ष ठेवायची. मी कुठे जाते? काय करते? कोणाशी बोलते? संपूर्ण माहिती ठेवून अनेक प्रश्न विचारून तिला भंडावून सोडायची. शिवाय तिची मामेबहीण कांचन तिही सतत तिला त्रास द्यायची. त्यामुळे त्यांना स्पशेल अशा डेटवर कधीच जाता आले नाही. फक्त एखादे दिवशी केतकीच्या भेटीच्या निमित्ताने ते दोघे भेटत होते."

माधवने त्याच्या आई आणि वडीलांशी सुध्दा ओळख करून दिली. त्यांनाही ती सून म्हणून आवडली होती.

दिवसेंदिवस त्यांचे प्रेम फुलत होते.‌ बघता बघता एक वर्षं होऊन गेले. दोघेही प्रेममय झाले होते. एकमेकांना समजून घेत होते.‌ रागिणीने ही गोष्ट मामा मामी पासून लपवून ठेवली.‌

माधवचे आता शेवटचे वर्षं होते. त्यामुळे त्याला मुंबईला प्रॅक्टिससाठी जावे लागणार होते. त्यामुळे तो जास्त बैचेन झाला होता.

"रागिणी ,आता एक वर्ष मला तुझ्यापासून दूर राहावे लागणार आहे. तू माझ्या पासून दूर राहून मला विसरणार तर नाही ना?"

"माधव, काय बोलतोस तू? मी कशी विसरेन तुला? एवढंच ओळखलं तू मला. पण, मला एक गोष्ट सांगायची आहे तुला. माझ्या मामी आणि बहिणीला आपल्या प्रेमाची कुणकुण लागली आहे.‌ त्या मला एकटीला सोडतच नाही . कारण, कांचन माझ्या पेक्षा
मोठी आहे आणि तिचे लग्न जमत नाही. त्यांचा आता तुझ्यावर डोळा आहे. कारण, मला आणि तुला त्या कॅफेत एकत्र पाहिले. तेव्हापासून त्या माझ्याशी अजूनच वाईट वागत आहेत."

"रागिणी तू काळजी करू नकोस. फक्त मी येईपर्यंत संयम ठेव. मग तुला हक्काने माझ्या घरी घेऊन जाईल. ए, वेडाबाई रडतेस कशाला? आपलं प्रेम एवढं कमकुवत आहे का? काही दिवसांचाच प्रश्न आहे. तू फक्त माझी वाट बघ. मी हा असा गेलो आणि असा आलो.

माधव रागिणीचे डोळे पुसत होता आणि रागिणीला त्याच्या कुशीत क्षणिक समाधान लाभले.

रागिणीच्या आयुष्यात पुढे काय घडते. पाहुया पुढच्या भागात...

©® आश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all