हरवलेले प्रेम नव्याने गवसले भाग३

कथामालिका
भाग ३

अष्टपैलू महासंग्राम स्पर्धा
हरवलेले प्रेम नव्याने गवसले..

दवाखान्यात एकमेकांना बघीतल्यापासून रागिणी आणि माधव दोघेही अस्वस्थ झाले होते. त्यात रागिणीला माधवचा फोन सुध्दा येऊन गेला.

‌ माधवला तिचा पत्ता कळल्यापासून तो कदाचित नक्की घरी येणार हे रागिणीला कळले होते आणि झालेही तसेच. तो देवच्या तब्येतीची चौकशी करायला आला होता. पण, देवसमोर दोघेही औपचारिक पध्दतीने वागले.

पण परत तो घरी येऊच शकतो. त्यामुळे देवला शेजारी ठेवून ती स्वतः दुसऱ्या दिवशी माधवला भेटायला दवाखान्यात गेली. तिला बघताच माधवला अतिशय आनंद झाला.

त्याने तिला थोडावेळ बसायला सांगितले. अर्ध्या तासात त्याने सर्व पेशंट तपासले आणि तिला केबिनमध्ये बोलावले.

"रागिणी, बस ना. कशी आहेस?"

आजही रागिणी तिचा चेहरा लपवून बोलत होती.

" मी तुला हे सांगायला आले की यापुढे तू माझ्या आयुष्यात डोकवायचे नाही. माझ्या मुलाशी तू इतके चांगले वागू नकोस. त्याला तुझा लळा लागलेला मला आवडणार नाही. प्लीज माधव, तू जे माझ्या सोबत वागला ते माझ्या मुलासोबत घडता कामा नये."

"का? माझं प्रेम खोटे होते. असं वाटतं का तुला."

माधव खूप आत्मीयतेने बोलत होता.


"रागिणी आजही तू ती गोष्ट विसरलेली नाही. रागिणी मी तुला खरोखरच भेटायला आलो होतो. पण, तू भेटलीस नाही. माझे आईबाबा देखील येऊन गेले होते. पण, तुझ्या मामीने सांगितले की तू तुझ्या आत्याकडे गावाला गेली आहेस . कधी येणार ते माहित नाही. तुला खूप फोन सुध्दा केले. पण ,तुझा फोन सुध्दा लागत नव्हता. त्यांना पत्ता विचारला तर ते सांगायला देखील तयार नव्हते. अगं, माझं प्रेम खोटे नव्हतं गं."

"हे बघ माधव , प्रेमाची व्याख्या तर तू सांगूच नकोस मला. तुझ्या वागण्यातून तू हे सिध्द करून दाखवले."

"तू खोटं का बोलत आहेस. माझ्या नजरेला नजर मिळवून बोल ना रागिणी."

"अगं, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केले. मला तो दिवस अजूनही चांगला आठवतो. जेव्हा तुझी आणि माझी पहिली भेट झाली होती.

"ए, चल ना लवकर‌‌."

रागिणी तिच्या मैत्रिणीसोबत रस्ता ओलांडून महाविद्यालयात जात होती.

"तू फार घाईत होती." आणि तेवढ्यात

"तू तुझ्या बाईकवरून बाहेर पडत होता. तुझ्या गाडीची स्पीड जरा जास्तच होती आणि नेमका मला धक्का बसला. मी खाली पडले.

"अरे, काय केलंस? तुला बाईक हळू नाही चालवता येत का? लागलं ना मला?"

माधव पटकन गाडीवरून खाली उतरला.

"ओ, आय एम सॉरी. प्लीज , चला आपण दवाखान्यात जाऊ या. तुम्हांला फार लागले तर नाही ना!"

रागिणीला उठताच येत नव्हते. डाव्या पायाला आणि हाताला मार‌ लागला होता.‌

"ओ मिस्टर काय केलं तुम्ही. रागिणीला किती लागले बघा ना जरा."

रागिणीची खास मैत्रिण चिडली होती. तिने तिला उठवून बाजुला बसवले. प्यायला पाणी दिले. पण , तिच्या पायातून रक्त येत होते. ते पाहून ती घाबरली.

"हे बघा , तुम्ही काळजी करू नका. मी तिला दवाखान्यात घेऊन जातो आणि नंतर तिला तिच्या घरी सोडतो. प्लीज ऐका माझं. "

"ओ मिस्टर तुम्ही कोण? कोणत्या डिपार्टमेंटमध्ये शिकता ? काय करता ? आम्हांला काही माहिती नको का? असं माझ्या मैत्रिणीला तुम्ही घेऊन चाललात."

"हॅलो, मी माधव परांजपे, मी आपल्याच काॅलेजमध्ये मेडिकल डिपार्टमेंटमध्ये शिकत आहे. सो ,डोन्ट वरी."

"नाही, तरीही तुम्ही तिला एकटीला घेऊन जाऊ शकत नाही. मी येते तुमच्या सोबत."

"त्याची काही गरज नाही. केतकी तू उद्याच्या कार्यक्रमाची तयारी कर. मला बर वाटल तर मी नक्कीच येईल."

"ठीक आहे . रागिणी तू काळजी घे. जमलं तर मी येते संध्याकाळी घरी."

माधवने टॅक्सी बोलावली तिला पटकन उचलून घेतले. आणि लगेच दवाखान्यात नेले. तिला बऱ्यापैकी लागले होते. डॉक्टरांनी तिला तपासले. डे्सिंग करून आणि इंजेक्शन दिले. "पाच सहा दिवसांत ठीक होतील या."

"साॅरी, माझ्यामुळे तुम्हांला बरेच लागले. चला मी तुम्हाला घरी सोडतो." माधव

"नाही, तुम्ही नका येऊ. मी जाईन माझी."

"का नको?"

"प्लीज, नाही म्हटलं ना तुम्हांला. नका येऊ माझ्याघरी."

रागिणी का नको म्हणते घरी सोडायला. पाहुया पुढच्या भागात....

©® आश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all